Showing posts with label मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी). Show all posts
Showing posts with label मनाचे श्लोक (संत श्री रामदास स्वामी). Show all posts

Sunday, October 9, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 186 ते 190 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १८६-१९०. 

परम वस्तूचा पत्ता, परमात्म्याचा  समर्थ आपल्याला सान्गताहेत. म्हणतात तो तुझ्या जवळच सानिध्यात आहे. 

त्याचा वियोग  सहन न होऊन तू त्याला तळमळीने जेव्हा हाक घालशील तेव्हा तो लगेच तुला भेटेल. 

या विश्वात प्रचंड सु-रचना, शिस्त , अनुशासन आहे. पंचमहाभूतांचे कार्य अतिशय सुसूत्रपणे हे सर्व विश्व निर्माण

करते. पण हे सर्व करणारी जी शक्ती आहे (निसर्ग / प्रकृती), ती त्या सर्वांच्या पलीकडे आहे. 

अस्तित्वहीन असा तो परमात्मा आहे. 

या विशाल विश्वात आपण माणसांनी आपली दृष्टी संकुचित ठेवली आहे. 

अन म्हणून आपल्याला हे सत्य न दिसेनासे झाले.

यावर उपाय म्हणजे , आपली धारणा, जी असत्यावर आधारित आहे ती बदलणे,  वृत्ती बदलणे हा आहे.

पंचमहाभूतांनी समृद्ध असलेल्या या सृष्टीत आपण आकंठ बुडालेले असतो. आणि त्यामुळे सहाजिकच दृश्य जग 

हेच सत्य असा आपला घट्ट समज असतो. पण ते खरे नाही. 

आसक्ती सोडा. जगाकडे पाठ फिरवून रुक्ष जीवन जगू नका,  पण त्यास सर्वस्वही मानू नका. 

समर्थ येथे सांगतात कि दृश्याचे ते बंधन ज्ञान शस्त्राने  तोडावे. 

ऐक ज्ञानाचें लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान |  पाहावें आपणासि आपण| या नांव ज्ञान                        

आपली व्यवहारातील ज्ञान-संकल्पना अध्यात्मात उपयोगी नाही.

समर्थ म्हणतात , ज्याने मायेच्या योगाने ही सृष्टी रचना केली तोच देव आहे असे ओळखावे .त्याला पाहता आले तर

जीवाच्या मागे लागलेली संसारपीडा संपते व मोक्ष प्राप्त होतो . वाणीचे मूळ स्थान जी परावाणी ती सुध्दा त्याचे वर्णन

करू शकत नाही. परावाणी च्या तो पलीकडे आहे. तो वाचातीत आहे. 

भ्रम ,माया या देवाला स्पर्श करू शकत नाही. 

निर्गुणाला कल्पित जावे असे समर्थ सांगतात. निर्विकल्प असे स्वरूप आपल्यात भरून आहे . 

अशी कल्पना करून आपला अहंभाव सोडायला समर्थ सांगतात.   अध्यात्मातील या सर्व संकल्पना खूप गहन

 आहेत पण समर्थ त्या कशा सोप्या करून सांगत आहेत ते आपल्यास या ध्वनिफितीत कळेल.    ... श्रीराम !


विजय रा. जोशी. 

                   


 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 181 ते 185 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १८१ - १८५. 

सद्गुरू कसे आसावे, कसे नसावे, त्यांना कसे ओळखावे याचे वर्णन करणारे  हे श्लोक आहेत. . 

साधना म्हणजे काय?  गुरु कोणाला म्हणावं ? साधक कोणाला म्हणावं? शिष्य कोण? कृपा म्हणजे काय, 

अध्यात्मात साधकत्व  म्हणजे काय ?  ........  या बद्दल प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष चर्चा आहे. 

ज्याच्या चेतनेतून मी-पण, अहंभाव हा अगदी पार निरसून गेला आहे , निराकरण झालं आहे, केवळ वैश्विक

चेतनाच तिथे स्पंदित आहे , अशा व्यक्तीला आपण गुरुपद प्राप्त झालय असं म्हणू शकतो. 

जिथे मी-पण उरलं नाही, आणि तू-पण उरलं नाही त्या ठिकाणी व्यापार शक्य नाही, दुकानदारी शक्य नाही,

जाहिरातबाजी शक्य नाही. ती व्यक्ती जगत राहील स्वतःच जीवन , शांतपणे, संथपणे.. तो/ती गुरुत्व प्राप्त व्यक्ती. 

ज्याच्या हृदयामध्ये साधकाची भूमिका परिपकव होते, त्या व्यक्तीला, त्या साधकाला,  अशा आत्मानुभावी व्यक्तीशी

मिळवून देण्याची जबाबदारी जीवन उचलते. 

सद्गुरुंचे मूल्यमापन करणे हि तशी अवघड गोष्ट . तरीही सद्गुरूंवर श्रद्धा ठेवण्यापूर्वी आपण आपल्या

पद्धतीने ते करणे आवश्यक आहे. 

शिष्यामधे शरणागती अत्यंत आदराने हवी. तळमळीने हवी. मनापासून हवी.  लीनतेने रामरुपात लपले, 

विलीन झाले, एकरूप झाले असे भक्त हवे. जो भक्त आत्मरूप झाला तो भयातीत झाला. सद्गुरू यास

सहाय्यभूत होतात. ..         सोप्या उदाहरणांनी, कथेच्या सहाय्याने आपण हे सर्व या ध्वनिफितीच्या माध्यमातून

 समजून घेऊ या. .   श्रीराम !


विजय रा. जोशी 


Wednesday, September 7, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 166 ते 170 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक 166-170 . 


प्रपंच हेच सर्वस्व समजण्याचा निश्चय आपण केला. त्यातील फोलपणा श्रीसमर्थ  समजावत आहेत. निश्चय

शाश्वताचा, जे कायम टिकणारे सत्य आहे त्याचा म्हणजे परमात्मा प्राप्तीचा निश्चय करावा असं सांगत आहेत. . हे 

उत्कृष्ठ ध्येय आहे.  जीवनातील घडी न घडी या कार्यात वेचावी. आणि हे सर्व संत्संगतीने, संत वचन पालनाने ,

साधनेने साधेल. म्हणून संत संगत सोडू नये. 

जीवन ध्येय काय असावे आणि त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन समर्थ करत आहेत. 

संत कोणाला म्हणाव ? जो भगवंतांशी एकरूप झाला तो संत . मन शान्त आहे आपुलकी आहे,

प्रसन्नता आहे, शुद्ध भाव आहे या वरून संत ओळखता येतात . दिसायला ते सामान्य माणसासारखे

दिसतात. 

त्यांच्याकडे खरे ज्ञान असते, त्यांचे वागणे शांत, तृप्त असते, सर्व करूनही त्यांची वृत्ती पूर्ण अलिप्त

असते. आणि यामुळे ते कोठल्याही उपाधीत अडकलेले नसतात. 

देहबुद्धी जाण्यासाठी ज्ञानबोध कसा करायचा ते समर्थ शिकवत आहेत. वाचनाची , अभ्यासाची मर्यदा

आहे. त्यातून ज्ञानबोध होणार नाही. अभ्यासाला निष्ठेची, सातत्य पूर्ण वर्तनाची जोड अनिवार्य आहे.

त्याशिवाय खरा ज्ञानबोध होणार नाही. या मार्गावर आपण अखंड राहिलो तर आपल्याला सतत

संतसंगती मिळेल आणि त्यातून योग्य वेळ आली कि ज्ञानबोध होऊन आपल्या अंतरंगात 

परिवर्तन घडेल, स्थित्यन्तर घडेल .

हे सर्व सविस्तर समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी हा ऑडिओ जरूर ऐका , 

आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा, शेअर करा. धन्यवाद !


विजय रा. जोशी. 



Friday, August 19, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 161 ते 165 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक 161 - 165.

मी म्हणजे माझे सध्याचे अस्तित्व, म्हणजेच माझे शरीर. या देहाचे सर्व संबंधी म्हणजेच माझा प्रपंच आणि

हे सर्व वास्तव / सत्य , असा आपला दृढ विश्वास अगदी बालपणापासून बनलेला असतो.  

अहंकाराचे विश्लेषण सुरू आहे , त्यापासून होणारे अनेक दुःख परिणाम समजावून सांगत आहेत. अहंकार

विसर्जन हे प्रमुख साध्य अध्यात्म साधनेत साधावे. अहंता-मुक्त श्रेष्ठ व्यक्ती अनुकूल/प्रतिकूल परिस्थितीत

सुखी रहातात हे पाहून आपण आपली अहंता कमी करण्याच्या प्रयत्नात राहिले पाहिजे. देहबुद्धी आपल्या

अंतरी स्थिर झाली तर काय होते आणि आत्मबुद्धीकडे आपली प्रगती घडली तर काय होते हे लक्षात घेऊन

आपण आपल्या भल्यासाठी सज्जनांच्या संगतीत रहावे असे समर्थ पुनःपुन्हा सांगत आहेत. 

अहंकार अज्ञानी पुरुषाच्या मागे विशेषेकरून लागत नाही; परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो. आणि त्याला नाना

 प्रकारच्या संकटात गोते खावयास लावतो. ज्ञान मार्गात अहंकार मोठा धोका, म्हणून तपाची जोड अनिवार्य.


ज्ञान आधारित कर्म करणे आणि कर्मात अहंकार रहित संपूर्ण समर्पण वृत्ती ठेवणे हे सोपे नाही. दृश्य जगाला

सोडून त्या पल्याड असलेल्या भगवन्ताला शरण जाणे हि आत्मबुद्धी  असते. आपले वासनेने लडबडलेले

अंतःकरण संतांच्या द्वारी सेवाकार्यात सतत ठेवले तर ते शुद्ध होऊ लागते. “मी” ला अहंकाराला जर

सम्पवायचं नसेल तर अध्यात्म म्हणजे फक्त शब्दांचा  काथ्याकूट असच म्हणावं लागेल. 


अध्यात्म साधनेत प्रगती होण्यासाठी काय करावे हे अत्यन्त तर्कनिष्ठ पद्धतीने सांगणाऱ्या या श्लोकांचे विवेचन

 आपणास नक्की   उपयुक्त वाटेल हा विश्वास आहे. जरूर काळजीपूर्वक ऐका आणि  योग्य  वाटल्यास 

जरूर like आणि share करा ही  विनंती. 


 विजय रा. जोशी. 




Sunday, August 14, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 156 ते 160 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक १५६ - १६०.

परमात्मा पहातांना पहाणारा त्यात मिसळून गेला पाहिजे. ती स्थिती येण्यासाठी “मी” चे अस्तित्व पूर्णपणे

संपून ते अनंतात विलीन झाले पाहिजे. 

शब्द - ज्ञानाचे अध्यात्म शास्त्राचे मार्ग अनेक असू शकतील. पण स्वतःला विवेकाने जो मार्ग

समजला त्यावर निष्ठा ठेवून जो सतत पुढे जात राहील, कर्मशुध्दी करत मार्गक्रमण सुरु राहील, समर्पण

भावाने , अलिप्तता राखत , अहंतेचे विसर्जन करीत, ध्येय प्राप्तीसाठी  तळमळीने प्रयत्न करीत राहील, 

तो साधक.   

‘अहंता’ अडथळे निर्माण करते. अहंकारी वागणे मानवास आत्मिक उन्नतीपासून, परमार्थापासून दूर ठेवते.

मी आत्मा आहे, हि जाणीव मनी, वर्तनी मुरणे म्हणजे आत्मज्ञान होय. फक्त बुद्धीने कळणे उपयुक्त नाही.

सहज वर्तन तसे घडायला हवे. जाणीव हि एकवेळ शून्यरूप तरी  व्हायला हवी किंवा विश्वरूप एवढी विशाल

व्हायला हवी, तर आंतरिची साधना सफल होईल. म्हणून सतत अनुसंधान राखावे लागते आणि या

अनुसंधानाची अंतर्मनातील लागवड साधकास फार सावधपणे करावी  लागते.  

आंतरिक उन्नती साधण्यास काय करावे , काय टाळावे याचे मार्गदर्शन श्री समर्थ करीत आहेत. 

साधना म्हणजे काय आणि त्यामार्गातील विविध टप्पे समजावून सांगणारे हे विवेचन आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी

 खूप माहितीपूर्ण असून आपल्यास ते नक्की उपयुक्त वाटेल असा विश्वास आहे. 

जरूर ऐका आणि योग्य वाटल्यास like आणि share करा ही विनंती. 


विजय रा. जोशी. 




Thursday, July 14, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 146 ते 150 :  ध्वनिफीत.







सारांश - श्लोक १४६ - १५०. 


मनुष्य जीवनात जे  शोधायचे आहे ते  अनंत, शाश्वत तत्व आहे. 

मना ! त्याचा शोध घे. 

या मनुष्य जीवनाचा उपयोग करून जे सत्य आहे ते शोधून काढ. त्याची भेट घेण्यात खरं  तर जीवनाचे कल्याण

आहे.  आणि तेच करायला समर्थ आपल्याला सांगत आहेत. आपण आपल्या देहापुरते संकुचित झाले

आहोत, मर्यादित झालो आहोत. आपली दृष्टी, भाव विकसित केला पाहिजे.  देहाचा त्याग नको, 

पण देह म्हणजे मी,  हि देहबुद्धी कमी होत गेली पाहिजे.

विश्वातील सर्व संबंध त्या एका सर्व-व्यापी महाकारणाच्या सत्तेखाली वावरतात. ते  कारण कशाचेही कार्य

असत नाही. ते सर्व कारणांचे कारण असून स्वयंभू असते. स्वयंभू म्हणजे ते स्वतःच स्वतःचे कारण असते.

स्वतः कशाचेही कारण नसलेल्या या आदिकारणासच  ईश्वर म्हणतात.

जे सर्व सगुण जे आहे ते निराकारातून आलेले आहे. जडाची निर्मिती अजड अशा ऊर्जेतून झाली आहे.

त्या निराकाराचा जाणण्यासाठी साधकाला  स्वरूपात विलीन व्हायला लागते. स्व हा शून्यरूप

करून तो महाशुन्यात विसर्जित करावा लागतो. किंवा तो अति-विशाल ब्रह्मव्यापी व्हावा लागतो. यालाच

मनोलय म्हणतात, अहंकार मुक्ती म्हणतात. कर्म शुद्धी म्हणतात. 

अध्यात्मात हा व्यक्तिगत अनुभव साधनेने सिद्ध , प्रगत  होत जातो. तो विज्ञानाच्या प्रयोग शाळेत सिद्ध

करणे अजून तरी शक्य झालेले नाही. 

(पण अंतिम सत्या पर्येंत पोहोचावयाचे असेल तर विज्ञानाला आवश्यक

ते सर्व प्रयत्न करावेच लागतील, किंवा स्व-मर्यादा मान्य कराव्या लागतील).            श्रीराम !!


विजय रा. जोशी. 




Monday, June 27, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 136 ते 140 :  ध्वनिफीत.




सारांश श्लोक  136 -140. 

ब्रह्माण्डातील जीवन भयाने ग्रासलं आहे. अस्तित्व-नाशाचे भय. जेथपर्येत ‘मी ’ आणि ‘तू’ अशी भूमिका आहे

तेथपर्येंत भय आहे, पण ‘मैं’ नही ‘तुही’ सही. अशी मनाची पक्की धारणा होते, तेव्हा हे भय नाहीसे होते.

अनेक संत सद्गुरू कितीतरी पद्धतीने हे सनातन सत्य आपल्या समोर मांडत आहेत. त्या त्या वेळेच्या

आवश्यकतेनुसार प्रबोधन करीत आहेत. संत हे सांगतात पण आपल्यला ते कळत नाही, कळले तरी वळत

नाही. देहबुद्धी सरत नाही, अहंकार सुटत नाही. 

आपण स्वतः, स्व -स्वरूपापासून दूर का जातो, याची कारण मीमांसा समर्थ करत आहेत. एकीकडे धोके

दाखवीत आहेत, एकीकडे सोपे उपाय सांगत आहेत. आपल्या जीवनाचे प्रयोजन (purpose) आपण विसरलेले

आहोत. बहिर्मुख वृत्ती आपला घात करत आहे, आपल्याला अंतर्मुख बनून आपल्या संकल्पाने अंतर्यामी शोध

घ्यायला सांगत आहेत. मायेचे भ्रम सोडून खऱ्या वास्तवाकडे जायला सांगत आहेत.  

माणसाची वृत्ती आणि त्रिगुण याचा संबंध जवळचा आहे. गुणातीत होणे म्हणजे मूळ रूपात जाणे हि साधना

अत्यंत प्रखर निश्चयाने आणि दीर्घ सातत्याने करणे हि दिशा आहे आणि या मानवी जन्मातच झाले तर ते

शक्य आहे. त्यासाठी ‘गुणावेगळी वृत्ति’ घडायला हवी. पण अज्ञानी माणसाकडून ते घडत नाही, हे वास्तव

सांगून समर्थ आपल्याला सावध करीत आहोत. “जुने ठेवणे मीपणे आकळेना”. या चरणांच्या श्लोकाच्या

माध्यमातून आत्मज्ञानाचे महत्व, प्राप्तीचे मार्ग आणि ते झाल्याने अंतरंगात होणारी क्रान्ति याबद्दल 

माहिती सांगितली आहे.  

हे सर्व जरूर ऐका , आणि योग्य वाटल्यास like आणि share करा. 


विजय रा जोशी 




Monday, June 13, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 126 ते 130 :  ध्वनिफीत.





सारांश श्लोक  १२६-१३०

अनेक रूपांनी प्रभू आपल्या भोवती घुटमळत असतात. पण आपण त्याला ओळखत नाही, हे आपले दुर्दैव आहे. विष्णूचे दशावतार हे तर पूर्ण अवतार आहेत पण प्रत्येक जीव हा देखील भगवन्ताचा अंश रूप आहे. 

श्लोक १२७ - १३५.  यात सत्संगतीचे महत्व आणि त्याने होणारे लाभ समर्थ आपल्याला समजवून सांगत आहेत.

तू मनाच्या, मनातील वासनांच्या अधीन न होता, मनापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न कर, आणि हे साध्य होण्यासाठी तुला एकच गोष्ट उपयुक्त आहे, ती म्हणजे, सत्कृत्य, संत संगती, सदाचाराचे पालन. आपला संकल्प बहुतेक वेळा नश्वर गोष्टींबद्दल असतो. तर चिरंतन शांती, सत्याचे ज्ञान प्राप्त करण्याचा आणि त्या स्थितीत स्थिर रहाण्याचा संकल्प असावा. संत सांगत असतात कि रिकामा वेळ मिळाला तर नामस्मरण करावे, सारासार विवेकाच्या चिंतनात डुबून जावे, चांगल्या ग्रंथांचा, संत चरित्रांचा, थोर व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करावा.

मनाच्या श्लोकांचे उद्दिष्ट आपले अंतरंग सुधारणे आहे, आपली अध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग दाखविणे हे आहे. आणि त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे. याचा जर आपण प्रामाणिक पणे आपल्या जीवनात उपयोग केला तर अध्यात्मिक प्रगती बरोबर आपले भौतिक जीवनही अधिक समाधानी आणि शांत होते. 

कृपया विवेचन ऐका , आवडल्यास like , share करा. 


विजय रा. जोशी. 




Thursday, May 26, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 116 ते 120 : ध्वनिफीत.




श्लोक ११६ - १२० सारांश. 

या पूर्वी हि बऱ्याच वेळा समर्थांनी आपल्या एखाद्या विधानावर खास जोर द्यायचा या उद्देशाने  त्या विधानावर

 पुन्हापुन्हा श्लोकाच्या शेवटच्या चरणात प्रतिपादन केले होते. 

……'.नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी' . 

हा चरण श्लोक क्रमांक ११६ पासून ते क्रमांक १२५ पर्यंत असा दहा वेळा आला आहे.

देव भक्ताकडे कधीहि दुर्लक्ष करत नाही, त्याची निराशा होऊ देत नाही कारण सच्च्या भक्ताचा  त्याला नेहमी

अभिमान असतो. हे समर्थ वारंवार सांगतात आणि त्यासाठी ते दाखले देखील देतात.

अंबरीष ऋषी, उपमन्यू , ध्रुवबाळ, गजेंद्र हत्ती, अजामेळ, या पौराणिक कथा तसेच विष्णू दशावतारातील

मत्स्य, कूर्म आणि वराह या अवतारांच्या कथा अशा माध्यमातून भगवन्त भक्तांची कशी काळजी घेतात,

विश्व रक्षणासाठी कसे धावून येतात ते समर्थ या ५ श्लोकात समजावून सांगत आहेत. 

या कथा सांगण्यात संदेश एकच, तो म्हणजे भगवंता साठी अशक्य काही नाही. आपले कर्तव्य पूर्ण करा

आणि मग सर्व सद्गुरुंवर सोडा. चिंता सोडा आणि पुढील कार्यास लागा. 

आज सुद्धा असे घडू शकते, घडते पण तो अनुभव घेण्यासाठी आपली साधना तीव्र, तीव्र-तम करायला हवी.

निसर्गाचे नियम, प्रकृतीचे नियम समजून घेऊन आपण या नियमांना आपल्या रोजच्या वर्तनात न्याय

द्यायला हवा. हे  देखील या विवेचनात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

कृपया एका आणि आवडल्यास  like , share  करा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी 

Wednesday, March 9, 2022

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 96 ते 100 : ध्वनिफीत.




सारांश श्लोक ९६ ते  १००

तत्व सांगणाऱ्या पुराण कथा आयुष्याचे धडे देतात. भक्त प्रह्लादाची भक्ती-कथा हि युगानुयुगे 

एखाद्या दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करीत आहे. अहंकारामुळे  भगवंत स्मरण रहात नाही, त्याचे महत्व

वाटत नाही. आणि मग वाढत जाणारा अहंकार आपल्याला नामस्मरण भक्ती पासून दूर घेऊन जातो.

जीवन दैन्यवाणे होते. रामदास स्वामी आपल्याला या वास्तवाची जाणीव करून देत आहेत 

आणि वेळीच नामस्मरणाच्या सन्मार्गने जायचे प्रेमाने सुचवत आहेत. राम-नामाने पाषाण तरले 

अशी कथा सांगतात. तसे मानवी जड बुद्धीचे जीवन (मानवी पाषण), देखील सत्कर्माने, भगवंत भक्तीने

तरुन जातात. पण मनात विकल्प, संशय असला तर हे घडत नाही, म्हणून मनापासून, कर्तव्य बुद्धीने,

श्रद्धेने, नम्रतेने, आणि सातत्याने साधना सुरु ठेवावी. 

जेव्हा आपण काशी सारख्या कोणत्याही मन पावन करणाऱ्या ठिकाणी संवेदनशील भक्ती- भावनेने

वास्तव्य करू त्यावेळी आपल्याला त्याची महती कळेल, आपली श्रद्धा आपल्यला आगळे समाधान देईल. 

कधी ध्यान, कधी कर्म, कधी ज्ञानमार्ग, कधी भक्तिमार्ग… आपण सर्व करण्याचा प्रयत्न करतो, पण

काहीही “यथासांग” होत नाही. काम कुठले ही आपण पत्करू शकतो , पण ते एकाग्रतेने, समर्पण वृत्तीने

आणि अलिप्ततेने करायला हवे अशी संतांची, ज्ञानी माणसाची भूमिका असते. ती आपणसुद्धा कशी

साधावी आणि त्यासाठी अखंड नामस्मरण कसे उपयुक्त आहे 

सर्वांचे आयुष्य सन्मार्गी लावणारे हे श्लोक मौल्यवान माहिती देत आहेत. विवेचन जरूर एका, 

आणि योग्य वाटल्यास इतरांना ऐकायला सांगा. 



विजय रा. जोशी 




Wednesday, February 16, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 86 ते 90 : ध्वनिफीत






सारांश , श्लोक ८६ ते ९०. 


मूलभूत क्रांती होऊन व्यक्तिमत्व सर्वांगीण पद्धतीने विकसित होण्याची प्रक्रिया समर्थ आपल्याला सांगत आहेत. काम, वासना प्रत्येकाला जीव-धारणेसाठी आवश्यक आहेत. त्या जर अमर्याद असल्या तर त्यांचा त्रास होतो. पण रामभक्ताला हा “अति पणाचा” त्रास होत नाही. 

नामस्मरणाचे कार्य आणि उद्दिष्ट “चित्त-शुद्धी” हेच आहे. चान्गले, साजिरे, सुंदर सोपे, बिन पैशाचे आणि आपल्याला अत्यंत लाभदायक नाम आहे. पण आपण त्याचे महत्व पूर्णपणे ओळखत नाही. 

भोजनाच्या वेळी आणि समूहात, एकत्र असताना, दोन्ही वेळा आपल्याला रामाचा उच्चार, नामघोष करावा असं सांगितलंय. इथे आदराने, श्रद्धेने, म्हणायला सांगितले आहे.

अन्न  तुमच्या ताटात येण्यापूर्वी किती लोकांचा हातभार लागला असतो, त्यांच्याबद्दल, त्यांच्या मध्ये असलेल्या त्या परम तत्वाचे स्मरण , चिंतन म्हणजेच हरि-चिंतन. ते करीत असता अत्यंत समाधानाने जर भोजन केले तर त्याचा वैयक्तिक आणि सामुदायिक परिणाम हा उत्तमच असणार. 

सध्याच्या जीवनक्रमात जे आपल्या लक्षात कधीच येत नाही,  ते समजवण्याचा हा श्रीसमर्थांचा वडिलांच्या मायेने प्रयत्न आहे. 

या पाठातील संदेश आपण जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायची शिफारस करा, ही  विनंती !



विजय रा. जोशी. 






Sunday, February 6, 2022

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 81 ते 85 : ध्वनिफीत



सारांश श्लोक 81 ते 85 . 


मत्सर घात यावर समर्थांचा भर आहे, कारण मत्सर हा मानवी जीवनात फार मोठा धोका आहे.

मत्सराच्या उदभवामुळे माणसाचे जीवन भकास, नष्ट, अतीव दुखी होते. ... 

अतिशय नकारी, भयंकर, विनाश-कारक भावना म्हणजे द्वेष आणि मत्सर.

हे मना ! तू मत्सरात शक्ती घालवून नामाला विसरू नकोस, स्वतःचा घात करू नको.

मत्सरा सारख्या नकारी, भयंकर भावना नाहीशा करण्याची शक्ती ही अखंड नाम-स्मरणात आहे.

आणि या नाम-साधने बरोबर दुसऱ्या कुठल्याही साधनेची सोपेपणात  तुलना होऊ शकत नाही. 

रामनामाने प्राप्त होणारी स्थिती हि ‘विश्राम’ स्थिती आहे. आणि ही  विश्राम स्थिती प्रत्येकास हवी

असते. जेव्हा आपण संपूर्णपणे साधना कार्यास समर्पित राहू तेव्हा आपली स्व-शुद्धी प्रक्रिया पुढे जात

राहून अंतिमतः आपल्याला “खरा विश्राम” लाभेल.

नामस्मरणाच्या जोडीला अखंड साधनेतून, सत्कर्मातून जेव्हा व्यक्ती सातत्य पूर्ण कार्य करीत राहील, 

तेव्हा आत्म-शुद्धी, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडतो. 

समस्त उपायांमध्ये “नाम स्मरण” हे सार आहे. 

भगवंत-स्वरूप प्राप्त झालेले संत, सद्गुरू आपल्याला हे मार्गदर्शन उपलब्ध करून देतात , 

त्याचे महत्व आपण ध्यानात ठेवले पाहिजे. 

सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये नाम-स्मरणाचे महत्व अधोरेखित करणारे हे विवेचन जरूर ऎका  

आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 


विजय रा. जोशी. 







Wednesday, January 26, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


प्रभाते मनी राम चिंतीत जावा”॥  कृतज्ञता दिनानिमित्त विशेष पाठ




“प्रभाते मनी राम चिंतीत जावा”॥  श्लोक सारांश. 

श्लोक ६७ - पराक्रमी श्रीराम भक्ताचे संकटापासून रक्षण करतो. 

६८ -  ज्याच्या समोर प्रलय काळ हि थरथरतो. त्याचे नाम घ्यावे. गुण घ्यावे. 

६९ -   माणसाने भक्तिमार्गावर असतांना कधीही अनीती, द्वेष-मत्सर करू नये. 

७० -   अहंकार आणि आळस त्यागून सातत्याने नाम-स्मरण करावे. 

७१ -    नामस्मरणाने दोष कमी होतात, पुण्य संचय घडतो. 

७२ -   खर्च आणि कष्ट नसलेले नामस्मरण करीत असता संसारापासून  शक्य तेवढे अलिप्त असावे. 

७३ -    महादेव सुद्धा ज्याचे नाम जपतात त्यास (संसार) दुःख भोगावे लागत नाही. 

७४ -    व्रते, दाने, उद्यापने असे काहीही न करता  दिन-दयाळू परमेश्व्राचे मनन करता येते. 

७५ -    नामस्मरणाचे सांगितलेले हे महत्व मान्य होत नसेल तर अभ्यास करून किंवा अधिकारी

              व्यक्तीच, गुरूंचा सल्ला घेऊन ते महत्व समजून घ्यावे. 

७६ -    मनाची चंचलता माणसास कोठेही स्थिर होऊ देत नाही. नामावरील विश्वास माणसाला

            सन्मार्गावर स्थिर ठेवतो. ……………..श्रीराम


या श्लोकांच्या निमित्ताने प्रभात काळी साधना कशी करावी या बद्दल पूज्य स्वामी विज्ञानानंद

सूचित विचार येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

पाठ आवडल्यास तो इतरांना ऐकण्याची शिफारस जरूर करावी, ही विनंती.


विजय रा जोशी.



Thursday, December 9, 2021

  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 56 ते 60 : ध्वनिफीत



सारांश श्लोक ५६ ते ६०. 

साधकांनी काय करावे, निदान या क्षेत्रात प्रगती व्हावी अशी इच्छा असलेल्या लोकांनी , जिज्ञासूंनी काय करावे, कसे करावे हे सांगणारे हे मनाचे श्लोक आहेत. 

उपासना हवी, त्याप्रमाणे शुद्ध कर्म व्हावे , आणि अशी  भक्तियुक्त क्रिया  सातत्याने व्हायला हवी. 

संत स्वतःचे चरित्र लिहीत नाहीत पण अत्यंत प्रेमाने इतरांसाठी आपल्या जीवनात केलेल्या साधनेचे सार सांगतात. ते म्हणजे राम-नाम आणि नित्य नेमे उपासना हे आहे. स्वार्थापायी रामभक्ती केली तर त्याचा लाभ घडत नाही. फक्त राम-भेट , ईश्वरप्राप्ती , हेच ध्येय असले पाहिजे. 

कल्पना मनात येते आणि मग तिचा विस्तार होतो. मनात कल्पना येतात त्यातून वासना आणि मग पुढे कृती होते. पण अशा कोटी-कोटी कल्पना केल्या तरी त्यातून रामभेट होणार नाही. कल्पनेने सुरु होणारा  रस्ता रामाकडे जात नाही. कल्पनाच करायची तर ती निर्विकल्पाचीच करावी. म्हणजेच चिंतन परमेश्वराचेच होईल. 

वासनेची गोडी सहज आहे, राम नामाची, नामस्मरणाची गोडी जाणीवपूर्वक लावावी लागते, पण साधनेने, प्रयत्नाने, निश्चयाने  जर लागली तर मग ती आपले सर्व अवधान अंतर्बाहय भरून टाकते आणि मग जीवन धन्य होते असा संतांचा अभिप्राय आहे. 

आपली सर्व भौतिक, अध्यात्मिक मागणी निरपेक्ष आणि शुद्ध भक्तिभावाने पूर्ण होतात पण त्यासाठी मन, कल्पना आणि वृत्ती यात आमूलाग्र बदल करावा लागतो. तो का व कसा करायचा हेच श्रीसमर्थ आपल्याला आईच्या मायेने समजावून सांगत आहेत. 

ध्वनिफितीमध्ये हे सर्व सोपेपणाने समजावून सांगितले आहे. जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा, ही  विनंति. 


विजय रा. जोशी. 


Tuesday, November 30, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 51 ते 55 : ध्वनिफीत



सारांश : श्लोक ५१ ते ५५. 


साधकाने सुरवातीला आपले विकार सांडायचे असतात. साधना प्रगत झाली की मग विकारच त्याला सोडून जातात. 

तत्वांच चिंतन करण्यात मौनात राहून सर्वोत्तमाचा दास वेळ घालवत असतो. मग वाचेने ते ज्ञान लोकांना मनापासून, आपुलकीने कर्तव्यभावनेने देत असतो. 

संत सत्य शिकवतात पण ते विद्वत्तेने नसते, अत्यंत प्रेमाचे सांगणे असते.

देहाचे चोचले पुरवावे, मजा करावी, उपभोग घ्यावा, कला शिकाव्या , इंद्रिये/विषयांचा भोग घ्यावा, हे सर्व साधारणपणे असते. पण संत चरित्रात अनेकदा (पूर्वकर्मामुळे)  लहानपणीच वैराग्य लक्षणांचा उदय झालेला दिसतो

निश्चय नक्की असतो. प्राप्त कर्तव्ये करून सर्व वेळ त्या सत्य शोधनात खर्च केला जातो. 

आपलं प्रेम हे नेहमी व्यक्ती सापेक्ष असते. वस्तू सापेक्ष, गुण सापेक्ष असते. म्हणून त्यात आसक्ती असते. सतांचे प्रेम हे तसे नसते आणि ते आसक्तीमध्ये कधीही गुंतलेले नसतात. सर्वोत्तमाचा दास धन्य होय. 

प्रापंचिक श्रोत्यांच्या मार्गदर्शनासाठी  उत्कृष्ठतेचा निकष. भगवंताचे गुणविशेष यांचे वर्णन केलेआहे. 

या सर्वांचे  तपशीलवार विवरण या ध्वनिफितेत आले आहे. जरूर ऐका , आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी. 





Tuesday, November 16, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 41 ते 45 : ध्वनिफीत





श्लोक ४१- ४५ सारांश . 


थोडा शोध , प्रयत्न आवश्यक आहे . पण अति चंचलता (बहू हिंडता) , धरसोड उपयुक्त नाही. गरजेपुरते प्रयत्न आवश्यकच आहे. ध्येय कोणते, तिथे पोहोचण्याचा आपला मार्ग कोणता हे समजले पाहिजे. स्वतःला काहीकाळ तरी विसरण्याचा  जेव्हा आपण  सराव करतो, (ध्यान) त्यावेळीआपण खूप शांती अनुभवतो. ती शांती, आनंद वर्णनातीत असते. स्वतःला विसरण्यातला,अहंकार सोडण्याचा तो आनंद असतो.अशा अखण्ड एकतेने “रघूनायका आपुलेसे करावे” हे साध्य होते. 

कर्मा चे फळ सर्वांनांच भोगावे लागतात, अगदी देवांची सुद्धा ह्यातून सुटका ज्ञालेली नाही. आपल्या कर्मावर सतत लक्ष ठेवा.

अनावश्यक बोलणे म्हणजे स्वतःची शक्ती वाया घालवणे आहे. म्हणून अनावश्यक बोलणे टाळणे  हे परमार्थिकाने नाही तर प्रापंचिकांसाठी देखील आवश्यक आहे. समाधान मिळणे मुळात अवघड आहे. पण जेव्हा कधी मिळाले तर ते सुद्धा कुसंगतीने भंग पावते, नाहीसे होते. सत्संगतीच्या योगाने अनेक माणसं उद्धरून गेली, म्ह्णून संत्संगतीत राहावे. 

हा सर्व बोध आपल्या बुद्धीला, विचारांना व्हावा असे समर्थ सांगत आहेत. 

आपल्या रोजच्या वर्तनात थोडा बदल करून आपला सर्वांगीण विकास कसा साधता येईल यावरील समर्थांच्या उपदेशावरील  हे विवरण जरूर ऐका . आणि आवडल्यास इतरांशी शेअर करा.  

धन्यवाद. 


विजय रा. जोशी. 






Thursday, November 4, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 36 ते 40 : ध्वनिफीत




श्लोक ३६ - ४०, सारांश. 

हे मना !

भगवंत हा नेहमी खऱ्या भक्ताजवळच असतो. तो भक्ताची परीक्षा पाहिल, पण त्याचाकडे कधीही

दुर्लक्ष करणार नाही. भक्त संकटात सापडल्यास त्यास नेहमी सहाय मिळते. भगवंतांचे खरे दर्शन

तुला आनंदाने आश्चर्यचकित करेल.  अत्यंत उत्कृष्ठ , समाधान देणाऱ्या भगवन्त  कृपेला प्राप्त

करण्यासाठी स्वतःचे सर्व चंचलत्व सोडून दे आणि त्याचे ठायी हे मना ! तू अखंड स्थिर रहा.

स्वतःतले सर्व दोष झटकून आपल्यामध्ये सुयोग्य बदल घडवून, भगवंता नजिकचे स्थान मिळवून 

तेथे तू कामची वस्ती ठेव. 

मनाला उपदेश करणारे हे मनाचे श्लोक जीवन सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी जे सांगत आहेत, 

त्याचे सविस्तर सोपे विवरण आपल्याला नक्की आवडेल. ऐका आणि आवडल्यास इतरांबरोबर शेअर करा. 


विजय रा. जोशी. 



Wednesday, October 27, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 31 ते 35: ध्वनिफीत



सारांश - श्लोक ३१ ते ३५.  


प्रभू रामचंद्र पराक्रम आणि बळ यात श्रेष्ठ आहे. सर्व सृष्टी हि त्या भगवन्ताची लीला आहे.

पश्चाताप दग्ध अहिल्येचा  श्रीरामाने उद्धार केला.  हनुमंत आणि बिभीषण हे राम-कृपा प्राप्त

झालेले थोर भक्त आहेत. 

जो खरा निष्ठावान, श्रद्धावान भक्त आहे त्यास भगवंत कधीही अंतर देत नाहीत , 

भगवंत कधीही भक्ताची उपेक्षा करीत नाहीत. याबद्दल ते भक्तास आश्वासन देतात,

त्यावर आपण आढळ विश्वास ठेवला पाहिजे आणि आपली भक्ती दृढ आणि अचल ठेवली

पाहिजे. 

दृढ भक्तीचे जीवनातील महत्व या ध्वनिफितीत वर्णन केलेले आहे. 

जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना शेअर करा . 


विजय रा. जोशी 



Monday, October 11, 2021


 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 26 ते 30: ध्वनिफीत 







श्लोक २६ ते ३० - सारांश. 


जीवन हे क्षणभन्गुर आहे.  

जर भव, म्हणजे आपले प्रापंचिक जीवन, एक दिवस संपणार आहे, हे सत्य समजले की  त्या शेवटाला

भिण्या ऐवजी तो शेवट  कसा गोड होईल यासाठी तयारी केली पाहिजे. आपली मानसिकता

बनविली पाहिजे. आणि ती मानसिकता कशी बनवता येईल याचे मार्गदर्शन समर्थ या श्लोकात

आपल्याला करीत आहेत. 

भगवंत आणि सद्गुरू त्यांच्या सच्चा, निष्ठावान भक्ताकडे दुर्लक्ष करीत नाहीत. अनेकदा भक्तांचे

जीवन जरी वरवर इतरांना दुःखमय वाटले तरी त्यांचे, त्यांच्या सत्कार्याचे भगवंत नेहमी संरक्षण

करतात.

अंतिमतः,  भगवंत आपल्या भक्ताचा आपले पणाने सांभाळ करतात . त्यांची उपेक्षा कधीही करत

नाहीत . 

आपल्या भक्ती साधनेने आपले जीवन कसे सार्थकी लागते त्याबद्दल केलेले 

या श्लोकांवरील विवेचन जरूर ऐकावे आणि आपल्याला आवडल्यास इतरांशी शेअर करावे. 


विजय रा. जोशी. 

Thursday, September 23, 2021

  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 16 ते 20: ध्वनिफीत 




सारांश श्लोक १६ ते २०. 

जीवनात येणारे विविध ताप कसे टाळता येतील.  


जीवनात आसक्ती असते ती शेवट पर्येंत जात नाही , 

म्हणून  माणूस जन्म -मरणाच्या चक्रात फिरत राहतो. 

जीवनात प्रारब्धानुसार मिलन, वियोग येत राहातात.त्याबद्दल फार खेद  करू नये.  

अंतिम सत्य-स्वरूप भगवंताची  भक्ती करण्या शिवाय जीवनात अन्य योग्य असा मार्ग नाही. 

या मार्गाने पुनर्जन्म आणि त्याबरोबर येणारे विविध ताप टाळता येतील. 

हे कसे साधायचे त्याचे दिशादर्शन हे पाच श्लोक करत आहेत. 

सविस्तर माहिती ध्वनिफितीत उपलब्ध आहे. कृपया ऐकावी. आवडल्यास शेअर करावी. 


विजय रा. जोशी.