Monday, December 27, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 66 ते 70 : ध्वनिफीत




सारांश श्लोक ६६ - ७०. 

सत आणि असत यातील सत घ्यावे असत टाकावे असे कितीही सांगितले तरी असत संसार हाच सत वाटल्यामुळे माणूस संसारात गुंतूंन राहातो. राघवाचे ध्यान करा असे सांगतांना तो राघव कसा आहे याचे वर्णन हे श्लोक करतात .

सावळ्या  वर्णाचा , अतिशय सुंदर, धैर्यवान आहे, शांत आहे, स्थितप्रज्ञ असा आहे. लहानपणी अनेक राक्षसांचा यज्ञ संरक्षणासाठी  सामना करावा लागला, राज्याभिषेक व्हायच्या क्षणी वनवासात निघावे लागले, वनवासात अतिशय खडतर जीवनक्रम कंठावा लागला, रावण वध झाला सीतेला अग्निदिव्य करावे लागले . कोठेही चलबिचल झाली नाही (महाधीर गंभीर).

भगवंताजवळ सुख आणि आनंद आहे आणि देण्याची इच्छा पण आहे. ते भयाचे निवारण करतात. पण भक्ती बरोबर जर चुकीचे वागणे आणि हेवा/मत्सर असेल तर भक्ती उपयोगी पडणार नाही. म्ह्णून भक्ताचे वागणे सावध हवे, काळजीपूर्वक चांगुलपणा जपायला, सांभाळायला हवा. 

सद्गुरू निष्ठा , ईश्वर निष्ठा याचे आध्यत्मिक जीवनात खूप महत्व आहे.  त्याने जीवनात वैचारिक अधिष्ठान , स्थिरता प्राप्त होते, साधनेच्या वर्तनाने ती वाढत जाते. म्हणून राम भक्ती जीवनास जोडा. 

प्रत्येक दिवस - प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥ आणि दिवसभर हे अनुसंधान राखून निजतांना सर्व दिवसकार्य रामास समर्पण करून शांत व्हावे आणि निद्रा स्थितीत विलीन व्हावे. 

घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपुलिकने जसे आपल्याला भले  काय ते सांगतात तसा हा उपदेश आहे. 

काय होत आहे आणि आपण काय करायला पाहिजे , दोन्ही सांगितले आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी ध्वनीफीत जरूर ऐका . आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा ही  विनंती. 



विजय रा. जोशी. 

 

 



Wednesday, December 15, 2021

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 61 ते 65 : ध्वनिफीत




सारांश श्लोक 61 ते 65. 

संत सांगतात कि आंनदात रहा. आंनदात जीव आत्म्याजवळ रहातो, दुःख करायला लागला कि जीव देहबुद्धीवर

येतो. पण जेव्हा साधक देहबुध्दीत येतो, निजध्यास सुटून जातो,  तेव्हा मी आणि तू, मी आणि जग अशी

जाणीव सुरु होते,  सर्व दुःख सुरु होतं . 

साधकाला हा साधना-आनन्द प्रयत्नाने मिळवावा लागतो. 

सर्व कामना पूर्ण करते ती कामधेनू. ती कामना पूर्ण करते पण काय मागायचे  ते कळलं पाहिजे. 

आपण संसारातल्या गोष्टी , ज्या अशाश्वत आहेत त्या मागून फायदा नाही. 

शाश्वत गोष्टी मागण्यात खरा लाभ आहे. 

पूर्ण ज्ञानी, कामनारहित, निर्लोभ आणि निर्विषयी असा मनुष्य नसतो हे लक्षात घेऊनच  ‘अतीपणा’ नको 

हे समर्थ सांगतात. काय नसावं आणि काय करावं हे सांगितले आहे. 

भक्ति ऊणे जीवन हे  दैन्यवाणे आहे. 

बाकी सर्व लौकिक संसार अति उत्तम असेल तरीही.  संसाराला परमार्थाची जोड नसेल तर सर्व व्यर्थ आहे, कारण

संसारातील सर्व गोष्टी इथेच सोडून जावे लागणार आहे. येणार आहे ते फक्त भक्तीचे, सत्कार्याचे , सत्कृत्याचे फळ

आणि शुद्ध हेतूमुळे मनावर झालेले संस्कार.

हे सर्व सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व मानव मात्रांस उपयुक्त ज्ञान आहे. 

म्ह्णून संतांच्या उपदेशास ‘अक्षय वांग्मय’ असे म्हणतात. 

कृपया पाठ ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 


विजय रा. जोशी . 


Thursday, December 9, 2021

  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 56 ते 60 : ध्वनिफीत



सारांश श्लोक ५६ ते ६०. 

साधकांनी काय करावे, निदान या क्षेत्रात प्रगती व्हावी अशी इच्छा असलेल्या लोकांनी , जिज्ञासूंनी काय करावे, कसे करावे हे सांगणारे हे मनाचे श्लोक आहेत. 

उपासना हवी, त्याप्रमाणे शुद्ध कर्म व्हावे , आणि अशी  भक्तियुक्त क्रिया  सातत्याने व्हायला हवी. 

संत स्वतःचे चरित्र लिहीत नाहीत पण अत्यंत प्रेमाने इतरांसाठी आपल्या जीवनात केलेल्या साधनेचे सार सांगतात. ते म्हणजे राम-नाम आणि नित्य नेमे उपासना हे आहे. स्वार्थापायी रामभक्ती केली तर त्याचा लाभ घडत नाही. फक्त राम-भेट , ईश्वरप्राप्ती , हेच ध्येय असले पाहिजे. 

कल्पना मनात येते आणि मग तिचा विस्तार होतो. मनात कल्पना येतात त्यातून वासना आणि मग पुढे कृती होते. पण अशा कोटी-कोटी कल्पना केल्या तरी त्यातून रामभेट होणार नाही. कल्पनेने सुरु होणारा  रस्ता रामाकडे जात नाही. कल्पनाच करायची तर ती निर्विकल्पाचीच करावी. म्हणजेच चिंतन परमेश्वराचेच होईल. 

वासनेची गोडी सहज आहे, राम नामाची, नामस्मरणाची गोडी जाणीवपूर्वक लावावी लागते, पण साधनेने, प्रयत्नाने, निश्चयाने  जर लागली तर मग ती आपले सर्व अवधान अंतर्बाहय भरून टाकते आणि मग जीवन धन्य होते असा संतांचा अभिप्राय आहे. 

आपली सर्व भौतिक, अध्यात्मिक मागणी निरपेक्ष आणि शुद्ध भक्तिभावाने पूर्ण होतात पण त्यासाठी मन, कल्पना आणि वृत्ती यात आमूलाग्र बदल करावा लागतो. तो का व कसा करायचा हेच श्रीसमर्थ आपल्याला आईच्या मायेने समजावून सांगत आहेत. 

ध्वनिफितीमध्ये हे सर्व सोपेपणाने समजावून सांगितले आहे. जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा, ही  विनंति. 


विजय रा. जोशी.