Showing posts with label संत श्री रामदास स्वामी. Show all posts
Showing posts with label संत श्री रामदास स्वामी. Show all posts

Thursday, July 7, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 141 ते 145 :  ध्वनिफीत.





सारांश श्लोक १४१ ते १४५. 

समर्थ एखाद्या खऱ्या शिक्षका प्रमाणे साधकांना साधनेतील अति अवघड मार्गाची स्पष्ट जाणीव करून देत आहेत. आणि त्यासाठी मनोभूमिका तयार होण्यास मदत करीत आहेत. या मनुष्यजन्माचे खरे प्रबोधन साधायचे  असेल तर सद्गुरुकृपे शिवाय अन्य पर्याय नाही. जो पर्येंत आपली अहंता, अहंकार आहे, तेथ पर्येंत गुरुकृपा घडत नाही. आपण सद्गुरुंकडे का जातो, याचा आपण विचार केला आहे का ?भौतिक यशासाठी, काही यश प्राप्तीसाठी का स्वतःला जाणण्यासाठी ? सत्य शोधनासाठी ? अवघड प्रश्न, आणि अत्यंत अवघड काम म्हणजे याचे प्रामाणिक उत्तर शोधणे. 

आपल्याला अध्यात्म-अभ्यास खरच करायचा आहे का? बुद्धी, मनाने घेतलेले ज्ञान यांनी खूप मोठे शोध लागतील, पण आत्मज्ञान होणार नाही. त्यासाठी मन, बुद्धी, चित्त अहंकार. (अंतःकरण) शुद्धी घडणे अवश्य आहे. तू कशाला जन्माला आला आहेस असा प्रश्न विचारला तर अनेक लोकांची अनेक वेगळी उत्तरे देतील. पण मी अंतिम सत्य शोधण्यासाठी जन्म घेतला असे उत्तर बहुधा कोणीच देणार नाही. 

संतांनी सोपी व्याख्या केली - मी खरा कोण हे जाणणे म्हणजे ज्ञान, बाकीचे सर्व अज्ञान. 

स्वामीजी सांगतात ‘ द्याल तर सर्व मिळेल पण फक्त स्वतःजवळच राखाल तर राख होईल’. ‘निरपेक्षपणे द्यायची सवय ठेवा, त्यागाची सवय लावून घ्या. त्यातूनच पुढे यथावकाश षड्विकार, अहंकार मुक्ती घडे आणि मग विद्येचा मार्ग, सत्यशोधनाचा मार्ग प्रशस्त होत राहील. 

जीवन हेतूचे मूलभूत विशलेषण करणारे हे श्लोक आपल्याला नक्कीच शुभ-संदेश देतील. अवश्य ऐका, आवडल्यास like आणि share करा.


विजय रा. जोशी. 




Thursday, June 2, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 121 ते 125 : ध्वनिफीत.





सारांश, श्लोक - १२१ - १२५. 

समर्थ  भगवंत-लीला आणि त्याचे भगवंत भक्तांना आलेले अनेक अनुभव हे पौराणिक कथांच्या माध्यमातून 

सांगत आहेत. आणि त्यातून खऱ्या भक्तांचा देवाला कसा अभिमान, प्रेम वाटते. 

हे समर्थ आपल्या मनावत ठसवत आहेत….. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत यातील जीव-विकास 

आणि दशावतारातील श्री विष्णूचे अवतारक्रम यात बरेच साम्य आढळते. 

सारांशात पाहता मत्स्य, कूर्म व वराह हे पहिले तीन अवतार माणूस व पशू यांच्यामधील समान अशा प्रवृत्ती

दाखवतात. नरसिंह, वामन व परशुराम अवतारात मानव समूहाच्या प्रवृत्ती आढळतात. 

राम, कृष्ण व बुद्ध अवतारात माणसाच्या व्यक्तीगत उत्थानाचे नमूने दिसतात. कल्की अवतार कधी झालाच

तर तो त्याच पठडीतला होणार अशी अपेक्षा आहे. हे सर्व अवतार कालातीत आहेत. 

देव भक्ताकडे कधीहि दुर्लक्ष करत नाही, त्याची निराशा होऊ देत नाही कारण सच्च्या भक्ताचा त्याला 

नेहमी अभिमान असतो. हे समर्थ वारंवार सांगतात आणि त्यासाठी ते दाखले देखील देतात. 

नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, गौतम बुद्ध,आणि पुढे येणारा कल्की या अवतारांच्या कथांच्या

आधारे रामदास स्वामी सन्मार्गी स्थिर होण्यासाठी काय करावे त्याचे सर्व तपशीलवार वर्णन 

श्लोकांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहेत. 

मनाच्या उत्क्रांतीचे हे वर्णन आणि समर्थांचा उपदेश जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा. 


विजय रा. जोशी. 




Wednesday, May 11, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 111 ते 115 : ध्वनिफीत.





सारांश श्लोक 111 ते 115 . 


अनेकदा आपले खरी हीत साधणारी मंडळी आपल्याला आवडत नाहीत. आपली आई, आणि परमार्थातील आपले गुरु हे कटू पण सत्य उत्तम हेतूने आपल्याला सांगत असतात. 

काय मिळवायचे ते शोधले पाहिजे. तसेच काय मिळू शकते पण न घेता ते सोडले पाहिजे याचाही सतर्क राहून शोध घेतला पाहिजे. सर्व गोष्टी योग्य संवादातून मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्महित जपणाऱ्या मूक संवादाचे, ‘हे  हृदयीचे ते हृदयी पोहोचणाऱ्या’ हितकारी  संवादाचे महत्व या श्लोकांच्या माध्यमातून आपण समजून घेत आहोत. वाद संपेल , आपल्याला नेमके ज्ञान होईल, खरे ज्ञान होईल, अहितकारक टळेल, असा संवाद हितकारी असतो. 

माणसाच्या पंडितत्वाचा , विद्वत्तेचा, बुध्दीमत्वाचा त्याला त्याच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी काही उपयोग होत नाही, किंबहुना त्याचा अडथळाच  होतो. परमार्थ क्षेत्रातील मोठेपणा मोजण्याचे निकष वेगळे आहेत. येथे लौकिक विद्येचे महत्व कमी आहे असे विधान नाही. पण त्या पदव्यांमुळे येणार अहंकार मात्र अध्यात्म क्षेत्रात पुढे नेणारा नाही एवढेच. आपल्या साधकत्वाचा, आपल्या सत्संगाचा देखील कधीतरी कोणाला अहंकार होतो. ही देखील अहंता तेवढीच अनावश्यक  आणि अनर्थकारक असते. 

वाद समाप्त करणारा संवाद , जेथून काही तत्व हाती येईल, हितकारी घडू शकेल असा संवाद जरूर करावा. आपली जगाकडे पहाण्याची दृष्टी भोगाची असते, ती ईशभावाची करण्याचा प्रयत्न करावा,

हे सर्व साध्य होण्यासाठी सुसंवाद कसा असावा विसंवाद कसा टाळावा या बद्दल मार्गदर्शन करणारे हे ज्ञान , लौकिक व्यवहारात पण तेवढेच उपयुक्त आहे.                          ‘श्रीराम !!’


विजय रा. जोशी. 



Monday, January 17, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 76 ते 80 : ध्वनिफीत




सारांश , श्लोक 76 ते 80 . 

समर्थ सांगताहेत : राघवाची भावना ठेव म्हणजे भाव ठेव याचाच अर्थ त्याचा कोठेही अभाव नाही  हे तुझ्या मनात पक्के असू दे.  संसार, व्यवहार हा जर खरा मानला ,त्यासाठीच जर आपण आपले नित्य वर्तन ठेवले तर हे साध्य होणार नाही. म्ह्णून अंतिम सत्य काय हे पक्के ध्यानात ठेवून त्या अंतिम सत्यासाठी, परमात्म्यासाठी जर आपण जगलो तर चुकीच्या भयाने आपण ग्रस्त होणार नाही. आणि चुकीच्या ध्येयांची धारणा आपल्या जीवनात स्थिर होणार नाही. 

आपल्या जीवनातील घात टाळण्यासाठी योग्य ध्येय, योग्य साधन, योग्य हेतू, योग्य सुख-संकल्पना असाव्यात आणि त्यावर स्थिर रहाण्यासाठी मत्सरासारख्या  वाईट विकारांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवावे असे मार्गदर्शन आपल्याला येथे समर्थ रामदासस्वामी करीत आहेत. 

थोडक्यात आपले वर्तन दोष कमी होण्यासाठी असमतेच्या जीवनाकडून समतेच्या जीवनाकडे आपण निरंतर प्रवास, प्रगती करीत राहावे. 

आपल्या भाग्याने आपल्याला या आर्जवाचे आवाहन भिडावे, त्याप्रमाणे आपल्या हातून कृती व्हावी अशी आपण समर्थ चरणी प्रार्थना करू या. 

हा संदेश सविस्तरपणे या ध्वनिफितीत ऐकावा आणि  योग्य वाटल्यास इतरांशी शेअर करावा ही नम्र विनंती. 


विजय रा. जोशी. 



Tuesday, January 4, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 71 ते 75 : ध्वनिफीत




सारांश श्लोक ७१ ते ७५. 

साधनेत वर्तन काटेकोरपणे जपायला हवे.  प्रथम आपण चुकत आहोत हेच माणसाला मान्य नसते.  पण कोणत्यातरी निमित्ताने काही तरी करायला हवे याची तीव्र जाणीव होऊ लागली तर माणूस उपायांकडे बघतो. अशा लोकांस मार्गदर्शन करणारे मनाचे श्लोक (७१ - ७६), “प्रभाते मनी राम चिंतीत जावा” असा उपाय देतात. 

नामस्मरणांनी लगेच हे दोष जातील का ? तर नाही मग त्याने काय होईल? हळूहळू आपल्या दोषांची जाणीव होते. इतरांचे दोष पाहणे कमी होते. पैसे लागत नाही, कष्ट होत नाहीत . एकाग्रतेने, नम्रतेने, भगवंताची आळवणी करायची. 

पण येथे काय मागायचे ? तर शाश्वत सुख, भगवंताशी एकरूपतेचा आनंद. बाकी काही भौतिक, सांसारिक सुख मागायचे नाही. नामस्मरणासाठी साधने, संपत्ती , कार्य-कर्म काही लागत नाही जर काय लागत असेल तर तो भगवंत प्राप्तीचा संकल्प, निर्धार, आस !!  

जर हे पटत नसेल तर सर्व अभ्यास स्वतः करावा, स्वतः करणे होत नसेल तर सद्गुरू शोधावे, सद्गुरूंची परीक्षा आपल्या बुद्धीप्रमाणे करून घ्यावी. आणि एकदा सर्व शन्का फिटल्या कि मग मात्र त्यांचा उपदेश, त्यांचे सांगणे बिनशर्त पाळावे, त्यात संशयी वृत्तीने , विविध सबबीने बाधा आणू  नये. 

समर्थ आपल्याला सांगत आहेत ते असे – 

दिवसाची सुरवात रामनामाने करा आणि दिवसभर रामनामाच्या निष्ठेने वैखरी, प्रकट बोलणे, वागणे करत प्रत्येक दिवस साजरा करीत जा. या श्लोकांतील संदेश आपल्याला उचित मार्गदर्शन करतो. 

श्रीराम II


विजय रा. जोशी. 


Monday, December 27, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 66 ते 70 : ध्वनिफीत




सारांश श्लोक ६६ - ७०. 

सत आणि असत यातील सत घ्यावे असत टाकावे असे कितीही सांगितले तरी असत संसार हाच सत वाटल्यामुळे माणूस संसारात गुंतूंन राहातो. राघवाचे ध्यान करा असे सांगतांना तो राघव कसा आहे याचे वर्णन हे श्लोक करतात .

सावळ्या  वर्णाचा , अतिशय सुंदर, धैर्यवान आहे, शांत आहे, स्थितप्रज्ञ असा आहे. लहानपणी अनेक राक्षसांचा यज्ञ संरक्षणासाठी  सामना करावा लागला, राज्याभिषेक व्हायच्या क्षणी वनवासात निघावे लागले, वनवासात अतिशय खडतर जीवनक्रम कंठावा लागला, रावण वध झाला सीतेला अग्निदिव्य करावे लागले . कोठेही चलबिचल झाली नाही (महाधीर गंभीर).

भगवंताजवळ सुख आणि आनंद आहे आणि देण्याची इच्छा पण आहे. ते भयाचे निवारण करतात. पण भक्ती बरोबर जर चुकीचे वागणे आणि हेवा/मत्सर असेल तर भक्ती उपयोगी पडणार नाही. म्ह्णून भक्ताचे वागणे सावध हवे, काळजीपूर्वक चांगुलपणा जपायला, सांभाळायला हवा. 

सद्गुरू निष्ठा , ईश्वर निष्ठा याचे आध्यत्मिक जीवनात खूप महत्व आहे.  त्याने जीवनात वैचारिक अधिष्ठान , स्थिरता प्राप्त होते, साधनेच्या वर्तनाने ती वाढत जाते. म्हणून राम भक्ती जीवनास जोडा. 

प्रत्येक दिवस - प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥ आणि दिवसभर हे अनुसंधान राखून निजतांना सर्व दिवसकार्य रामास समर्पण करून शांत व्हावे आणि निद्रा स्थितीत विलीन व्हावे. 

घरातील ज्येष्ठ व्यक्ती आपुलिकने जसे आपल्याला भले  काय ते सांगतात तसा हा उपदेश आहे. 

काय होत आहे आणि आपण काय करायला पाहिजे , दोन्ही सांगितले आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी ध्वनीफीत जरूर ऐका . आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा ही  विनंती. 



विजय रा. जोशी. 

 

 



Wednesday, December 15, 2021

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 61 ते 65 : ध्वनिफीत




सारांश श्लोक 61 ते 65. 

संत सांगतात कि आंनदात रहा. आंनदात जीव आत्म्याजवळ रहातो, दुःख करायला लागला कि जीव देहबुद्धीवर

येतो. पण जेव्हा साधक देहबुध्दीत येतो, निजध्यास सुटून जातो,  तेव्हा मी आणि तू, मी आणि जग अशी

जाणीव सुरु होते,  सर्व दुःख सुरु होतं . 

साधकाला हा साधना-आनन्द प्रयत्नाने मिळवावा लागतो. 

सर्व कामना पूर्ण करते ती कामधेनू. ती कामना पूर्ण करते पण काय मागायचे  ते कळलं पाहिजे. 

आपण संसारातल्या गोष्टी , ज्या अशाश्वत आहेत त्या मागून फायदा नाही. 

शाश्वत गोष्टी मागण्यात खरा लाभ आहे. 

पूर्ण ज्ञानी, कामनारहित, निर्लोभ आणि निर्विषयी असा मनुष्य नसतो हे लक्षात घेऊनच  ‘अतीपणा’ नको 

हे समर्थ सांगतात. काय नसावं आणि काय करावं हे सांगितले आहे. 

भक्ति ऊणे जीवन हे  दैन्यवाणे आहे. 

बाकी सर्व लौकिक संसार अति उत्तम असेल तरीही.  संसाराला परमार्थाची जोड नसेल तर सर्व व्यर्थ आहे, कारण

संसारातील सर्व गोष्टी इथेच सोडून जावे लागणार आहे. येणार आहे ते फक्त भक्तीचे, सत्कार्याचे , सत्कृत्याचे फळ

आणि शुद्ध हेतूमुळे मनावर झालेले संस्कार.

हे सर्व सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व मानव मात्रांस उपयुक्त ज्ञान आहे. 

म्ह्णून संतांच्या उपदेशास ‘अक्षय वांग्मय’ असे म्हणतात. 

कृपया पाठ ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 


विजय रा. जोशी . 


Saturday, November 20, 2021

  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 46 ते 50 : ध्वनिफीत




सारांश – श्लोक: 46 ते 50.

अध्यात्मात आपण किती माळा  जपल्या, देवासमोर किती वेळ बसलो , ते महत्वाचे नाही. 

तर भगवंताशी आपण किती काळ एकरूप झालो ते खूप महत्वाचे. एकचित्तता, स्वतःला विसरून मन

भगवंतांशी एकरूप होणे, महत्वाचे. सर्वोत्तमाची सेवा करणारा, दास्यत्व पत्करणारा कसा असतो याचे

वर्णन  (47-56)  या १० श्लोकात आहे. 

काही संत प्रपंच धारक होते, काही नव्हते पण सर्वांचे कार्य हे देवकार्य होते. स्वतःची प्रगती करून

सर्व-सामान्यांना सन्मार्गास लावण्यासाठी त्यांनी देह झिजविला. नुसते रामनाम घेऊन पुरत नाही,

ज्यांचे आपण नाम घेतो त्याचे गुण सुद्धा आपल्यात आणले पाहिजे, आपल्या जीवनाचा लाभ

जगाला झाला पाहिजे - असे समर्थांचे वर्तन होते, आणि इतरांना शिकवण होती. 

साधकाच्या जीवनातले अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या वागण्याचे प्रामाणिक परीक्षण झाले

पाहिजे, आपल्या उक्ती आणि कृतीतले अंतर जाणून घेऊन ते कमी करण्याचा सदैव प्रयत्न हे खूप

हत्वाचे आहे. आपली इंद्रिये, आपले षड्विकार आपल्याला विविध दिशेने खेचत असतो म्हणून आपण

अशांत असतो. संतांनी हे सर्व आपल्या ताब्यात ठेवलेले असते, म्हणून ते शात, निवालेले  असतात. 

या श्लोकांवरील विवेचन समर्थांचा संदेश सोप्या भाषेत उदाहरणे, दाखल्यासह या ध्वनिफितीमध्ये आहे. 


जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना  लिंक पाठवा अशी विनंती आहे. 


विजय रा. जोशी 








Wednesday, September 15, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 11 ते 15  : ध्वनिफीत 



श्लोक ११ – १५  : सारांश 

सर्वकाळ सुखी कोणी नाही. पूर्व संचिता प्रमाणे भोग येतात. 

देहबुद्धी कमी करत रहाणे हा मुक्तीचा मार्ग आहे. 

दुष्ट वासना असतील तर कितीही शूर, पराक्रमी व्यक्तींचाही नाश होतो. आणि 

त्यातून जीवन व्यर्थ जाते . 

जन्म होतो, जगात माणूस येतो. जीवनभर पूर्वकर्मानुसार सुख-दुःखे येतात, जातात. 

आणि केव्हातरी हे जग सोडावे लागते. 

हे जग मृत्युभूमी आहे. पण जगणारा माणूस “मृत्यू येणार” हे सत्य विसरतो. 

लक्षात घेत नाही. मग माणसात “मी”, “अहं” आणि “अहंकार” निर्माण होतो.

हे सर्व लक्षात घेऊन जीवन कसे जगावे याचे दिशा दर्शन श्री समर्थ आपल्याला करीत आहेत. 


श्लोकांचे अर्थ विवरण आणि संदेश आपण ध्वनिफितीमध्ये ऐकू शकाल. 



विजय रा. जोशी. 

Wednesday, September 1, 2021

 

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 6 ते 10.  : ध्वनिफीत 





सारांश - श्लोक ६ ते १०. 

आपण विकार टाळू शकत नाही पण त्यावर लक्ष हवे, स्वतःचे निरीक्षण हवे. हेतुकडे लक्ष हवे. हेतू स्वार्थीनको. समतेचा हवा. स्वतः बरोबर तेवढाच इतरांचा विचार हवा. आणि  विकाराची तीव्रता हळू हळू संकल्पाने कमी करण्याचा प्रयत्न हवा. अहंकार रहित निर्भयता निर्माण करणारे शूरत्व जर आपण अंगी बाणू  शकलो  तर अशा वर्तनाने  इतर लोकांस देखील आपण संतुष्ट, तृप्त आनंदी, शांत करू शकू. तोडणाऱ्या कुर्हाडीला देखील चंदनाचे झाड सुगंधित करते. म्हणून येथे समर्थ म्हणतात तू आयुष्यात चंदन प्रमाणे झिजत कार्य कर.  

कर्मात अपेक्षा असेल तर त्यात शीतलता, पवित्रता  रहात नाही. वडिलार्जित संपत्ती, रेस , लॉटरी, यातून मिळालेली संपत्ती याचा लोभ नको. सुखा मागे दुःख आणि दुःखामागे सुख हे चिरंतन चक्र आहे. दुःखाचे दुःख कमी झाले की सुखाचा ताठा देखील रहात नाही.  आणि मग  यथाकाल अशा विवेकी  वर्तनाने आपण आपल्या स-स्वरुपाशी . आत्मरुपाशी एकरूप होऊ शकू. 


विजय रा. जोशी.