Monday, June 27, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 136 ते 140 :  ध्वनिफीत.




सारांश श्लोक  136 -140. 

ब्रह्माण्डातील जीवन भयाने ग्रासलं आहे. अस्तित्व-नाशाचे भय. जेथपर्येत ‘मी ’ आणि ‘तू’ अशी भूमिका आहे

तेथपर्येंत भय आहे, पण ‘मैं’ नही ‘तुही’ सही. अशी मनाची पक्की धारणा होते, तेव्हा हे भय नाहीसे होते.

अनेक संत सद्गुरू कितीतरी पद्धतीने हे सनातन सत्य आपल्या समोर मांडत आहेत. त्या त्या वेळेच्या

आवश्यकतेनुसार प्रबोधन करीत आहेत. संत हे सांगतात पण आपल्यला ते कळत नाही, कळले तरी वळत

नाही. देहबुद्धी सरत नाही, अहंकार सुटत नाही. 

आपण स्वतः, स्व -स्वरूपापासून दूर का जातो, याची कारण मीमांसा समर्थ करत आहेत. एकीकडे धोके

दाखवीत आहेत, एकीकडे सोपे उपाय सांगत आहेत. आपल्या जीवनाचे प्रयोजन (purpose) आपण विसरलेले

आहोत. बहिर्मुख वृत्ती आपला घात करत आहे, आपल्याला अंतर्मुख बनून आपल्या संकल्पाने अंतर्यामी शोध

घ्यायला सांगत आहेत. मायेचे भ्रम सोडून खऱ्या वास्तवाकडे जायला सांगत आहेत.  

माणसाची वृत्ती आणि त्रिगुण याचा संबंध जवळचा आहे. गुणातीत होणे म्हणजे मूळ रूपात जाणे हि साधना

अत्यंत प्रखर निश्चयाने आणि दीर्घ सातत्याने करणे हि दिशा आहे आणि या मानवी जन्मातच झाले तर ते

शक्य आहे. त्यासाठी ‘गुणावेगळी वृत्ति’ घडायला हवी. पण अज्ञानी माणसाकडून ते घडत नाही, हे वास्तव

सांगून समर्थ आपल्याला सावध करीत आहोत. “जुने ठेवणे मीपणे आकळेना”. या चरणांच्या श्लोकाच्या

माध्यमातून आत्मज्ञानाचे महत्व, प्राप्तीचे मार्ग आणि ते झाल्याने अंतरंगात होणारी क्रान्ति याबद्दल 

माहिती सांगितली आहे.  

हे सर्व जरूर ऐका , आणि योग्य वाटल्यास like आणि share करा. 


विजय रा जोशी 




Friday, June 17, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 131 ते 135 :  ध्वनिफीत.



सारांश श्लोक  131-135. 

संत संगतीमुळे, सत्संगतीमुळे  जे सर्वोत्कृष्ठ फळ आपल्याला मिळू शकेल, त्याचे वर्णन या  श्लोकांत आहे.

रामाच्या चारित्र्याच्या संदेश, आणि त्यातून विविध संकटे, आपत्तीत स्वतः श्रीरामाने निर्माण केलेले वर्तन

आदर्श यांचा अभ्यास , त्यावर चिंतन म्हणजेच “जानकीनायकाचा विवेकू” धारण करायला समर्थ सांगत

आहेत. आणि तो धारण करणे हे अवघड काम ज्याने साध्य होऊ शकेल तो उपाय म्हणजे “संत संगती,

सत्संगती” हाच आहे. असेही आपल्याला समजावत आहेत.  

संत म्हणजे कोण ? संतांचे १३ प्रमुख गुण :

हरिभक्त, विरक्ती, विज्ञानराशी (ज्ञानी),  निश्चयी, निगर्वी, वीतरागी (शाश्वत वैराग्य) , क्षमाशील, शांतीस्वरूप,

अभोगी, दयाघन, लोभ नाही, क्षोभ नाही, दैन्यवाणा नसलेला . 

आपण आत्मपरीक्षण करून आपल्यातील सद्गुण आणि दुर्गुण जर समजून घेतले तर कुठल्या क्षेत्रात आपली

प्रगती करणे आवश्यक आहे याचा बोध होईल आणि मग आपल्याला आपली सुधारणा करण्याचा उपाय दिसू

लागेल. त्यासाठी गुणी, बोध असलेल्या सज्जनांची संगती आपण केली पाहिजे. हा उपाय दोन्ही ठिकाणी

म्हणजे व्यवहार आणि अध्यात्मिक क्षेत्रात करण्यासारखा आहे. मनाच्या श्लोकांचे उद्दिष्ट आपले अंतरंग

सुधारणे आहे, आपली अध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग दाखविणे हे आहे. आणि त्यासाठी काय करावे याचे

मार्गदर्शन केलेले आहे.  याचा जर आपण प्रामाणिक पणे आपल्या जीवनात उपयोग केला तर अध्यात्मिक

प्रगती बरोबर आपले भौतिक जीवनही अधिक समाधानी आणि शांत होते. 

स्वतःची आणि आपल्या पुढील पिढीची सर्वांगीण मानसिकता घडविण्यास मदत करू शकणारे , 

हे समर्थ विचार सर्वानी ऐकावे असे आहेत. 

कृपया ऐका , आवडल्यास like आणि share करा, ही विनंती. 


विजय रा. जोशी. 

 


Monday, June 13, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 126 ते 130 :  ध्वनिफीत.





सारांश श्लोक  १२६-१३०

अनेक रूपांनी प्रभू आपल्या भोवती घुटमळत असतात. पण आपण त्याला ओळखत नाही, हे आपले दुर्दैव आहे. विष्णूचे दशावतार हे तर पूर्ण अवतार आहेत पण प्रत्येक जीव हा देखील भगवन्ताचा अंश रूप आहे. 

श्लोक १२७ - १३५.  यात सत्संगतीचे महत्व आणि त्याने होणारे लाभ समर्थ आपल्याला समजवून सांगत आहेत.

तू मनाच्या, मनातील वासनांच्या अधीन न होता, मनापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न कर, आणि हे साध्य होण्यासाठी तुला एकच गोष्ट उपयुक्त आहे, ती म्हणजे, सत्कृत्य, संत संगती, सदाचाराचे पालन. आपला संकल्प बहुतेक वेळा नश्वर गोष्टींबद्दल असतो. तर चिरंतन शांती, सत्याचे ज्ञान प्राप्त करण्याचा आणि त्या स्थितीत स्थिर रहाण्याचा संकल्प असावा. संत सांगत असतात कि रिकामा वेळ मिळाला तर नामस्मरण करावे, सारासार विवेकाच्या चिंतनात डुबून जावे, चांगल्या ग्रंथांचा, संत चरित्रांचा, थोर व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करावा.

मनाच्या श्लोकांचे उद्दिष्ट आपले अंतरंग सुधारणे आहे, आपली अध्यात्मिक उन्नती करण्याचा मार्ग दाखविणे हे आहे. आणि त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन केलेले आहे. याचा जर आपण प्रामाणिक पणे आपल्या जीवनात उपयोग केला तर अध्यात्मिक प्रगती बरोबर आपले भौतिक जीवनही अधिक समाधानी आणि शांत होते. 

कृपया विवेचन ऐका , आवडल्यास like , share करा. 


विजय रा. जोशी. 




Thursday, June 2, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 121 ते 125 : ध्वनिफीत.





सारांश, श्लोक - १२१ - १२५. 

समर्थ  भगवंत-लीला आणि त्याचे भगवंत भक्तांना आलेले अनेक अनुभव हे पौराणिक कथांच्या माध्यमातून 

सांगत आहेत. आणि त्यातून खऱ्या भक्तांचा देवाला कसा अभिमान, प्रेम वाटते. 

हे समर्थ आपल्या मनावत ठसवत आहेत….. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत यातील जीव-विकास 

आणि दशावतारातील श्री विष्णूचे अवतारक्रम यात बरेच साम्य आढळते. 

सारांशात पाहता मत्स्य, कूर्म व वराह हे पहिले तीन अवतार माणूस व पशू यांच्यामधील समान अशा प्रवृत्ती

दाखवतात. नरसिंह, वामन व परशुराम अवतारात मानव समूहाच्या प्रवृत्ती आढळतात. 

राम, कृष्ण व बुद्ध अवतारात माणसाच्या व्यक्तीगत उत्थानाचे नमूने दिसतात. कल्की अवतार कधी झालाच

तर तो त्याच पठडीतला होणार अशी अपेक्षा आहे. हे सर्व अवतार कालातीत आहेत. 

देव भक्ताकडे कधीहि दुर्लक्ष करत नाही, त्याची निराशा होऊ देत नाही कारण सच्च्या भक्ताचा त्याला 

नेहमी अभिमान असतो. हे समर्थ वारंवार सांगतात आणि त्यासाठी ते दाखले देखील देतात. 

नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, गौतम बुद्ध,आणि पुढे येणारा कल्की या अवतारांच्या कथांच्या

आधारे रामदास स्वामी सन्मार्गी स्थिर होण्यासाठी काय करावे त्याचे सर्व तपशीलवार वर्णन 

श्लोकांच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहेत. 

मनाच्या उत्क्रांतीचे हे वर्णन आणि समर्थांचा उपदेश जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा. 


विजय रा. जोशी. 




Thursday, May 26, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 116 ते 120 : ध्वनिफीत.




श्लोक ११६ - १२० सारांश. 

या पूर्वी हि बऱ्याच वेळा समर्थांनी आपल्या एखाद्या विधानावर खास जोर द्यायचा या उद्देशाने  त्या विधानावर

 पुन्हापुन्हा श्लोकाच्या शेवटच्या चरणात प्रतिपादन केले होते. 

……'.नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी' . 

हा चरण श्लोक क्रमांक ११६ पासून ते क्रमांक १२५ पर्यंत असा दहा वेळा आला आहे.

देव भक्ताकडे कधीहि दुर्लक्ष करत नाही, त्याची निराशा होऊ देत नाही कारण सच्च्या भक्ताचा  त्याला नेहमी

अभिमान असतो. हे समर्थ वारंवार सांगतात आणि त्यासाठी ते दाखले देखील देतात.

अंबरीष ऋषी, उपमन्यू , ध्रुवबाळ, गजेंद्र हत्ती, अजामेळ, या पौराणिक कथा तसेच विष्णू दशावतारातील

मत्स्य, कूर्म आणि वराह या अवतारांच्या कथा अशा माध्यमातून भगवन्त भक्तांची कशी काळजी घेतात,

विश्व रक्षणासाठी कसे धावून येतात ते समर्थ या ५ श्लोकात समजावून सांगत आहेत. 

या कथा सांगण्यात संदेश एकच, तो म्हणजे भगवंता साठी अशक्य काही नाही. आपले कर्तव्य पूर्ण करा

आणि मग सर्व सद्गुरुंवर सोडा. चिंता सोडा आणि पुढील कार्यास लागा. 

आज सुद्धा असे घडू शकते, घडते पण तो अनुभव घेण्यासाठी आपली साधना तीव्र, तीव्र-तम करायला हवी.

निसर्गाचे नियम, प्रकृतीचे नियम समजून घेऊन आपण या नियमांना आपल्या रोजच्या वर्तनात न्याय

द्यायला हवा. हे  देखील या विवेचनात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

कृपया एका आणि आवडल्यास  like , share  करा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी 

Wednesday, May 11, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 111 ते 115 : ध्वनिफीत.





सारांश श्लोक 111 ते 115 . 


अनेकदा आपले खरी हीत साधणारी मंडळी आपल्याला आवडत नाहीत. आपली आई, आणि परमार्थातील आपले गुरु हे कटू पण सत्य उत्तम हेतूने आपल्याला सांगत असतात. 

काय मिळवायचे ते शोधले पाहिजे. तसेच काय मिळू शकते पण न घेता ते सोडले पाहिजे याचाही सतर्क राहून शोध घेतला पाहिजे. सर्व गोष्टी योग्य संवादातून मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्महित जपणाऱ्या मूक संवादाचे, ‘हे  हृदयीचे ते हृदयी पोहोचणाऱ्या’ हितकारी  संवादाचे महत्व या श्लोकांच्या माध्यमातून आपण समजून घेत आहोत. वाद संपेल , आपल्याला नेमके ज्ञान होईल, खरे ज्ञान होईल, अहितकारक टळेल, असा संवाद हितकारी असतो. 

माणसाच्या पंडितत्वाचा , विद्वत्तेचा, बुध्दीमत्वाचा त्याला त्याच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी काही उपयोग होत नाही, किंबहुना त्याचा अडथळाच  होतो. परमार्थ क्षेत्रातील मोठेपणा मोजण्याचे निकष वेगळे आहेत. येथे लौकिक विद्येचे महत्व कमी आहे असे विधान नाही. पण त्या पदव्यांमुळे येणार अहंकार मात्र अध्यात्म क्षेत्रात पुढे नेणारा नाही एवढेच. आपल्या साधकत्वाचा, आपल्या सत्संगाचा देखील कधीतरी कोणाला अहंकार होतो. ही देखील अहंता तेवढीच अनावश्यक  आणि अनर्थकारक असते. 

वाद समाप्त करणारा संवाद , जेथून काही तत्व हाती येईल, हितकारी घडू शकेल असा संवाद जरूर करावा. आपली जगाकडे पहाण्याची दृष्टी भोगाची असते, ती ईशभावाची करण्याचा प्रयत्न करावा,

हे सर्व साध्य होण्यासाठी सुसंवाद कसा असावा विसंवाद कसा टाळावा या बद्दल मार्गदर्शन करणारे हे ज्ञान , लौकिक व्यवहारात पण तेवढेच उपयुक्त आहे.                          ‘श्रीराम !!’


विजय रा. जोशी. 



Thursday, April 28, 2022

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 106 ते 110 : ध्वनिफीत.







सारांश श्लोक १०६ ते ११०.

समर्थ समाधानाच्या प्राप्तीचा राजमार्ग समजावून सांगत आहेत. त्यासाठी ३ मार्ग .

१. देह शुद्धी - स्नान/संध्या आदी रोजची आन्हिके. 
2. मनशुद्धी - त्यासाठी प्रवास स्वार्था कडून निस्वार्थ कडे. 
3. अंतःकरण शुद्धी / चित्त शुद्धी - तो प्रवास दीर्घ आहे, संयमाववर, निश्चयावर आधारित आहे, 

दीर्घ कष्ट लागतात. प्रगती हळूहळू होते. 
व्यवहारिक शिक्षणाबरोबर नैतिकतेचे शिक्षण देखील कसोशीने, अगदी योग्यवेळी बालकाच्या आयष्यात 
योग्य काळी सुरु झाले पाहिजे. 

क्रोध अनावश्यक नाही पण तो ताब्यात पाहिजे आणि तो चांगल्या  हेतूसाठी असावा. संगत हि
सज्जनांच्या बरोबर असावी. स्वतःला समाधानाने जगायचे असेल तर,  जीवन उन्नत करायचे असेल 
तर जाणीवपूर्वक कुसंगती टाळून सत्संगती पत्करली पाहिजे.

आपण जीवनात अनेक लोकांशी विविध विषयांवर बोलतो, चर्चा  करतो ते  अटळ आहे ,पण त्यात
फक्त आवश्यक तेवढाच वेळ घालवावा. संत / सज्जनांशी जो संवाद होतो, तो सुख संवाद होतो. 
त्यांचा हेतू हा आपल्याला खऱ्या सत्याच्या मार्गाला नेण्याचा असतो. समर्थ आपण काय करावे, 
काय टाळावे हे नीट समजावून सांगत आहेत.  हे सर्व ज्ञान परमार्थासाठी तर महत्वाचे आहे, 
पण व्यवहारी जीवनात देखील खूप उपयुक्त आहे.

या ऑडीओच्या माध्यमातून याचे सविस्तर विवरण आपल्याला नक्कीच उपयुक्त वाटेल. 
जरूर ऐका  आणि योग्य वाटल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 



विजय रा. जोशी.