Friday, February 19, 2021

  

गीता अध्याय १०, भाग १ , ध्वनी फीत . 



ईश्वर म्हणजे सर्व कारणांचे कारण : आपण जगाकडे दोन दृष्टीने पाहू शकतो. 

1) व्यवहार दृष्टी : हि स्थूल ज्ञान दृष्टी आहे. या दृष्टीला विश्वसंसार दिसतो. जगामध्ये जिकडे  -तिकडे घडणे-मोडणे , वाढणे-घटणे,  येणे-जाणे, दिसणे-नाहीसे होणे अविरत चालू असते. हा अनुभव प्रमाण धरूनच दैनंदिन जीवन जगावे लागते. 

2) परमार्थ दृष्टी : इंद्रियांना जसे विश्व दिसते तसे ते खरोखर नाही. विश्वाच्या प्रत्येक अंगामध्ये वरवर आढळणाऱ्या अनेकपणात खोल एकपण ओवलेला आहे. तो एकपण कार्यकारण संबंधाच्या द्वारा प्रचीतीला  येतो. हे कार्यकारण संबंध अतिशय स्थिर आणि कधी खोटे न ठरणारे असतात. 


युगानुयुगे तेच कारण तेच कार्य घडवून आणते. याचा अर्थ असा कि विश्वाच्या तिन्ही प्रमुख अंगामध्ये (जडद्रव्य, जीवन आणि अंतःकरण यांच्या हालचालींमध्ये) कार्यकारणाचे जाळे पसरलेले आहे.येथे तत्वज्ञान असे सांगते कि जर प्रत्येक  घटनेस कारण आहे तर कार्यकारण संबंधास देखील कारण असले पाहिजे. ईश्वर म्हणजे सर्व कारणांचे कारण.(प्रेमयोग के वि बेलसरे )

श्लोक १२ ते १८ अर्जुन भगवंतांना विचारतात. 

तुम्ही आमचे जीवन चालवत आहेत हे समजण्यासारखे आहे, तशी अनुभूतीपण येते. तुम्ही अविकारी आहात पण बाहेर तर सर्व विषयच दिसतात. भगवंत व्यापक आहेत हे सत्य आहे, पण व्यापक भगवंताचे चिंतन करायचे असते व व्यापकतेचा अनुभव घ्यायचा असतो. कोणत्या भावात तुमचे चिंतन करू?  चित्त एकाग्र करू? माझ्या जीवनात गुण यायला मी काय करू? हे सर्व तुम्ही विस्ताराने सांगा. 

अध्याय १० विवेचन स्वरूप. 

भगवत दर्शन; आणि त्यासाठी उपासना, भक्ती या मार्गी जाणे हे मनुष्यास का आवश्यक आहे , त्या मार्गावर जाण्याची इच्छा निर्माण होऊन त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे (साधना करणे) काआवश्यक आणि उपयुक्त आहे या बद्दलचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न आपण या भागात बघणार आहोत . 

माणूस हा निसर्गतः स्व-केंद्रित असतो. अनेक प्रकारच्या न सम्पणाऱ्या इच्छा, आकांक्षा , वासना आणि भोग यामुळे आपले जीवन भोगवादी बनले आहे, अधीकाधीक बनत चालले आहे. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. १० वा अध्याय आपल्याला भोगयोगाकडून प्रेमयोगाकडे जायला कसे सांगतो हे  आपण समजून घ्यायचा प्रयत्न या भागात करणार आहोत.  

पुढील भागात ,  सर्वव्यापी , सर्वत्र पसरलेला भगवंत समजून घेण्यासाठी स्वतःला कसे शिकवायचे हे आपण पूज्य विनोबाजींच्या चिंतनातून शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर वरील सर्व ज्ञान विचारांच्या पार्श्वभूमीवर व्यवहारात , जीवनाच्या विविध टप्प्यामधील वाटचालीत,प्रयत्नांची दिशा नेमकी कशी ठेवायची, काय साधना प्रयत्नांचा मार्ग धरून  प्रगती करून घ्यायची हे सर्व पूज्य स्वामी विज्ञानानंद यांच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात समजून घेण्याचा आनंद आपण घेणार आहोत. 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय १०, भाग १ , ध्वनी फीत


Friday, February 12, 2021

 


गीता अध्याय  9 भाग  2 : ध्वनी फीत



कर्ममार्गाप्रमाणे भक्तिमार्गातही काही फुकट जात नाही.


माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी तू आपले मन स्थिर कर (गीता १८/२),

असा अर्जुनास प्रथम उपदेश केल्यावर नंतर “माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करणे

तुला होत नसेल तर अभ्यास म्हणजे वारंवार प्रयत्न कर, अभ्यासही होत नसेल तर

माझ्यासाठी चित्तशुद्धीकारक कर्म कर. आणि तेही होत नसेल तर कर्मफळाचा त्याग कर

आणि त्याद्वारे माझी प्राप्ती करून घे”. याप्रमाणे परमेश्वर स्वरूप मनात ठसविण्याचे जे निरनिराळे मार्ग भगवंतांनी वर्णिले आहेत.

(गीता १२/९-११). त्याचे कारण हेच होय.




मूळ देहस्वभाव किंवा प्रकृती तामस असेल तर, परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ठायी चित्त

स्थिर करण्याचा उद्योग एकदम जमणार नाही किंवा एकाच जन्मात सफल होणार नाही.

पण कर्ममार्गाप्रमाणे भक्तिमार्गातही काही फुकट जात नसून,

एकदा भक्तिपंथात पडल्यावर या नाही पुढच्या, नाहीतर त्याच्या पुढच्या जन्मात

केव्हां न केव्हातरी ‘सर्व वासुदेवात्मकच आहे’ असे परमेश्वराचे खरे ज्ञान मनुष्यास

प्राप्त होऊन , त्या ज्ञानाने त्याला मुक्ती मिळते. असे भगवंतांचे सर्वाना आश्वासन आहे.

आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र.

उद्धरावा स्वये आत्मा , खचू देऊ नये कधी

आत्मा चि आपुला बंधु , आत्मा चि रिपू आपुला (गीता ६/५)


हे तत्व भक्तिमार्गातही जसे च्या तसे सांगण्यात येते.

नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे I आणूनि निराळें द्यावे हाती I इंद्रियांचा जय साधुनियां मन I निर्विषय कारण असे तेथे II (गाथा ४२९७)

याची फोड तुकाराम महाराजांनी वरील अभंगात केली आहे. “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी” असे म्हंटले तर मूढ लोक आळशी होतील

म्हणूनच हे स्वावलंबनाचे आणि स्वप्रयत्नाने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

परमेश्वर जगातील सर्व घटनांचा करता करविता आहे हे खरे; तथापि त्याच्याकडे

निर्दयपणाचा व पक्षपातीपणाचा दोष येऊ नये म्हणून तो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे

ज्याला त्याला फळ देतो असा जो कर्मविपाक प्रक्रियेतील सिद्धांत आहे

तो तोच याच कारणासाठी भक्तिमार्गातही घेत असतात. ९ वा अध्याय कसा समजेल ? सगळ्यात जायची तयारी असेल (वाईट/चांगले, लहान/थोर इ.) तर जगाचे राजे व्हाल.

आणि choosy व्हाल, आवड/निवड ठेवाल तर मग तुम्ही देवही नाही आणि देवभक्तही नाही. देव फक्त सुख/दुःख, स्वर्ग/नर्क/मोक्ष/पुनर्जन्म या प्रक्रिया सांगतो. त्या समजून घ्या.

निसर्ग नियम प्रक्रियेत देव सुद्धा व्यत्यय आणू शकत नाही कारण देवाचे एक नाव नियमेश्वर आहे. देवभाव कृष्ण म्हणतात : तुझे प्रयत्न, जीवन संपूर्णतेने मला अर्पण कर. माझ्याशी एकरूप हो. “देवा तू करशील ते चांगलं असेल, तेच मला चांगल वाटेल” हा विश्वास म्हणजे देवभाव. आपल्यात तो देव-भाव निर्माण व्हावा म्हणून प्रार्थना करू या.

१०व्या अध्यायात देवाची अनेक रूपे आपल्याला पहायची आहेत.त्या दिशेने मार्गस्थ होऊ या.



विजय रा जोशी. 



गीता अध्याय  9 भाग  2: ध्वनी फीत


Friday, February 5, 2021


 गीता अध्याय  9 भाग  1: ध्वनी फीत 


गीतेचे जीवनांतील महत्व.

अर्जुनाच्या निराश मनाच्या निर्माल्यातून पराक्रमाची फुलबाग कृष्णाने  फुलवली. गीतेतील शिकवण आजही जीवनात उपयोगी आहे. कुटुंबातील साधे झगडे, असंतोष मिटविण्या पासून ते वाममार्गी लोकांचे मन योग्य मार्गावर आणून त्यांना शांती मिळवून देण्या पर्येंत गीता सर्वांना उपयोगी आहे. 




गीतेच्या अभ्यासासाठी एकाग्रता आवश्यक आहे.गीतेचा जन्म स्व-कर्तव्याच्या आड येणारा मोह निवारणार्थ आहे. गीतेच्या अभ्यासाने स्वकर्तव्याचे भान येते व ते चांगले साध्य करता येते.८ व्या अध्यायात ध्यान प्रधान भक्तिमार्गाचे विवरण संपले. ९ व्या अध्यायापासून प्रेमप्रधान भक्ती मार्गाच्या विवरणाला प्रारंभ होतो. 

भक्तांनी या अध्यायाला गीतेतील सर्वाश्रेष्ठ अध्याय मानले आहे. या अध्यायाचे रहस्य आत्मसात झाल्यावर सगळे सोपे होते. येथे ज्या प्रेममार्गाचे वर्णन आहे , तो ध्यान मार्गातून सोपा आहे. त्यासाठी फार बुद्धिमत्तेची गरज  लागत नाही. पण पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा मात्र हवी. 

राजयोग (कर्मयोग व भक्तियोग मिलाप)

सर्व महाभारताच्या मध्यावर गीता व गीतेच्या मध्यावर ९ वा अध्याय आहे. अनेक कारणांमुळे या अध्यायास पावनत्व आले आहे. ज्ञानदेवांनी जेंव्हा समाधी घेतली तेंव्हा हा अध्याय जपत ते समाधिस्थ झाले असे म्हणतात.

कर्मयोगात कर्म करायचे पण फलाची अपेक्षा मात्र ठेवायची नाही. भक्ती योगांत संपूर्ण शुद्ध भावाने ईश्वराशी जोडले जायचे. राजयोगात कर्म तर करायचे पण फळ टाकायचे नाही. तर ते घेऊन ईश्वरास तसेच्या तसे अर्पण करायचे.सर्व कर्माचा नेवेद्य प्रभूला अर्पण करायची ही भावना उत्तरोत्तर अधिक उत्कट करत गेलो की आपल्या साधनेच्या बरोबरीने क्षुद्र जीवन धन्य होते, मलीन जीवन सुंदर होते.

ज्या विद्येने जीवन कळते, जीवनाची कला कळते, ज्या विद्येमुळे जीवनाच्या शिल्पकारा विषयी माहिती मिळते, व ज्या विद्येमुळे या शिल्पकाराचे दर्शन घडते :तिलाच “विद्या” (राजविद्या) असे म्हणतात.तीच सर्व विद्यांचा राजा होय.

या राजविद्येबद्दल आणि राजयोगाची माहिती या पाठात घेऊ. 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय  9 भाग  1: ध्वनी फीत 

Friday, January 29, 2021


 गीता अध्याय  8 भाग  2: ध्वनी फीत 

   

या भागात जे विषय पहायचे आहेत ते असे आहेत : 

शेवटचा दिवस गोड कसा होईल. 

बहुत सुकृताची जोडी, म्हणुनी विठ्ठलीं आवडी. 

संस्कार कसे ठसतात. 

शुभ संस्काराचा संचय. 

ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंड पेशीत भरतात. 

आपली नियती आपणच बनवत असतो 

मरणाचे स्मरण असावे. 

सत्कृत्य संकल्प कसोशीने पालन. 

चांगली कामे करताना संघर्ष/संकटे (रात्रंदिन आम्हा युध्हाचा प्रसंग). 


अखंड साधनेने परिवर्तन 

ज्याचे जया ध्यान I तेचि होय त्याचे मन II १ II 

म्हणउनी अवघें सारा I पांडुरंग दृढ धरा II २ II संत श्रेष्ठ तुकाराम. 

माणसाला ज्या वस्तूचे ध्यान लागते त्या वस्तूचे रूप त्याच्या मनाला येते. म्हणून सर्व काही बाजूला सारावे 

आणि मनाने घट्टपणे ईश्वराचे ध्यान करावे. 

गतीचे गीत = जीवन.

ज = जग.                ग = गमन.

जन्म आणि गमन यांच्या मध्ये आहे ते जीवन. जन्मक्षणी गती सुरु होते. गमन-क्षणी गती थांबते.

या दोन क्षणा मधील गतीचे गीत म्हणजे जीवन.

जीवनात जी गती अपरिहार्य आहे ती सद-हेतू साठी व्हावी जीवन सफल होईल. गमन-क्षण गोड होईल.

सतत हेतू शुद्ध ठेऊन आपण वागलो तर आपल्याला भक्तीचा नेमका अर्थ कळेल.

 उत्तम मरण काळ.

अग्नी पेटलेला आहे –  अंतकाळ पर्येंत कर्म सुरु आहे.

सूर्य प्रकाशात आहे. – बुद्धीची प्रभा शेवट पर्येंत झगझगीत आहे. 

चंद्रकला वाढत आहे (शुक्ल पक्ष) –  मरणकाळी पवित्र भावना विकास होत आहे. 

आकाश (निरभ्र, सुंदर, उत्तरायणात असते.) – हृदय आकाशात आसक्तीचे ढग जरादेखील नाहीत. 

शेवटच्या श्वासा पर्येंत सेवाकर्म होत आहे,  सद्भावनेची पौर्णिमा प्रकाशात आहे, 

हृद्य-आकाशात यत्किंचितही आसक्ती नाही,  बुद्धी सतेज आहे. 

अशा प्रकारे जर देहांतर होईल तो परमात्म्यात विलीन होतो. 

सविस्तर वर्णन ध्वनिफितीत ऎका . 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय  8 भाग  2: ध्वनी फीत 







Friday, January 22, 2021

 

गीता अध्याय  8 भाग  1: ध्वनी चित्रफी


८ व्या अध्यायांतले अर्जुनाचे सात प्रश्न. 

१. ब्रह्म म्हणजे काय ?

२. अध्यात्म म्हणजे काय ?

३. कर्म म्हणजे काय ?

४. अधि-भूत म्हणजे काय ?

५. अधि-दैव कशाला म्हणतात ?

६. शरीरात अधि–यज्ञ कोणता ?

७. चित्ताला वश केलेले मरणकाली तुम्हाला कसे जाणतात ?

सर्वात महत्वाचा प्रश्न : मुख्य प्रश्न,ज्याचे भगवंतांनी विस्ताराने उत्तर दिले तो असा: चित्ताला वश केले मरणकाळी 

तुम्हाला कसे जाणतात ?



अंतकाळी हि माझेचि चित्ती स्मरण राखुनी,

देह सोडोनी गेला तो, मिळे मज न संशय.                   ८/५. 

म्हणून सगळा काळ , मज आठव झुंज तूं 

मन बुद्धी समर्पूनि , मज निःशंक पावसी                     ८/७

अंतकाळी जो माझेच स्मरण करीत शरीर सोडतो तो माझ्या (ईश्वर) भावाला प्राप्त होतो यांत संदेह नाही.

ज्याचे आपण अखंड चिंतन करतो तो विषय सतत मनासमोर येतो.  त्या विषय आकाराचे आपले मन होते. म्हणून ज्याचे सतत चिंतन कराल ते मनासमोर येईल. म्हणून भगवंत सांगतात “तू माझे अखंड चिंतन कर”. भगवंताचे अखंड चिंतन म्हणजे भगवंत गुण आदर्शांचे आचरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न.).

काय करावे ?

जीवनाचे शेवटील टोक मरणाकडे गेलेले आहे हे लक्षात घेऊन तो शेवटचा क्षण अत्यंत पावन, पुण्यमय, गोड कसा होईल याचा अभ्यास आयुष्यभर केला पाहिजे.उत्कृष्ठांतील उत्कृष्ठ संस्कार मनावर कसे रहातील याचा विचार ज्ञान झाल्या क्षणा पासून सुरु झाला पाहिजे. आत्म-परीक्षण रोज करीत गेले पाहिजे. इंद्रिये, मन, चित्त काय करते याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे.ज्या क्षणी आपले चुकते आहे असे समजले त्या क्षणापासून सुधारायला सुरुवात केली पाहिजे. तसे न केले तर वाईटाचा अभ्यास पुन्हा सुरु होईल.

साधना सातत्य राखण्याचे महत्व आणि त्यासाठी करावयाचे प्रयत्न याची माहिती आपण या अध्यायात बघणार आहोत. 


विजय रा  जोशी.


 गीता अध्याय  8 भाग  1: ध्वनी चित्रफी












Friday, January 15, 2021

 गीता अध्याय  ७, भाग  2 : ध्वनी फीत


ज्ञान विज्ञान योग.  

गीता उपदेश जगन्मान्य असून त्याचा सर्वत्र उपयोग जाणकार, जिज्ञासू करीत आहेत. गीतेतील अध्यात्मिक तत्वे , संकल्पना, परिभाषा जी अगोदर समजायला अवघड आहे ती विविध माहितीच्या आधारे समजवायचा हा एक प्रयत्नआहे. 

समजणे एकवेळ सोपे पण उमजणे, प्रत्यक्ष वर्तनात आणणे  अतिशयअवघड याच अनुभव मी रोज घेतो आहे. श्रोते गोड  मानून घेत आहेत म्हणून प्रत्येक वेळी अधिक उत्साहाने , जास्तीत जास्त प्रामाणिक प्रयत्न करायला प्रेरणा आहे. 



पहिल्या १२ श्लोकांमध्ये प्रपत्ती तत्वज्ञान सांगितले आहे. प्रपत्ती - म्हणजे ईश्वर शरणता. हे तसे तर भक्तीचेच रूप आहे. परंतु दोघांमध्ये सूक्ष्म फरक आहे. भक्ती प्रेमपूर्वक सेवा करणे शिकवते तर प्रपत्तीत साधक पूर्णपणे शून्य होऊन जातो आणि सर्व काही ईश्वरावर सोडतो. 

श्लोक १३ ते २६ - लोकांचे प्रकार, भक्तीचे प्रकार, निष्काम भक्तांचे चार प्रकार. 

श्लोक २७ ते ३०. - सर्व अवनतीचे कारण “मोह” आहे. पुण्याचरणाने पापाचा क्षय होतो. आत्मशक्तीच्या विकास होतो. आणि मोहाचा नाश होतो. 

सृष्टीत अनेक प्रकारचे जे अनेक विनाशी पदार्थ आहेत त्या सर्वात एकच अविनाशी पदार्थ भरून राहिला आहे हे समजणे  याचे नाव “ज्ञान”. एकाच नित्य परमेश्वरापासून विविध नाशिवंत पदार्थ कसे होतात हे समजणे याचे नाव विज्ञान. यासच क्षराक्षर विचार असे म्हणतात, (१३/३०) 

प्रपंचाला विज्ञान म्हणतात. 

तो सत्य समजणे हे अज्ञान. 

जाणिवेचा जिथे शिरकावच होत नाही ते ज्ञान. (आत्मज्ञान).

भक्ती (गीता रहस्य). श्लोक (वीस ते तीस) अन्वयार्थ

उपासना सर्वांना पाहिजेच. मग ती व्यक्ताची करा, अगर अव्यक्ताची करा. पण या दोहोत व्यक्ताची उपासना सुलभ असल्याने तिचेच येथे वर्णन आहे. व तिलाच भक्ती असे नाव आहे. तथापि स्वार्थ-बुद्धी मनात ठेऊन काही विशिष्ठ हेतूसाठी परमेश्वराची भक्ती करणे ही भक्तीची पायरी कनिष्ठ असून, परमेश्वराचे ज्ञान व्हावे अशा हेतूने भक्ती करणारे (जिज्ञासू) देखील कच्चेच म्हंटले पाहिजेत, कारण त्यांचे ज्ञान परिपूर्ण नसते. . तथापि हे सर्व भक्ती करणारे असल्यामुळे सर्वच चांगल्या मार्गाने जाणारे असे म्हंटले आहे (श्लोक १८). पण त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे ज्ञानप्राप्तीने कृतार्थ होऊन या जगात ज्यांना करावयाचे किंवा मिळवायचे शिल्लक उरले नाही ते ज्ञानी पुरुष निष्काम बुद्धीने जी भक्ती करतात ती सर्वात श्रेष्ठ होय. त्यामुळे “भक्तियोग म्हणजे परमेश्वराची निर्हेतुक व निरंतर भक्ती” असे भागवतात भक्तीचे लक्षण केले आहे. आपापल्या प्रकृती नियमाप्रमाणे त्या त्या स्वर्गादिक फळांच्या कामवासनांनी वेडावलेले लोक तो तो उपासनेचा नियम पाळून दुसऱ्या निरनिराळ्या देवतांच्या भजनी लागत असतात (७/२०) 

भक्तीसाठी संपूर्ण, विनाशर्त समर्पण हवे.

माझे जन्म-जन्माचे सर्वस्व मी आणीन ओतले तरी देवाचे देण पूर्ण होणार नाही हा आंतरिक भाव हवा. असा भाव असेल तर देव पूर्ण प्रसन्न होईल. देव भक्ताची सेवा हि करेल. भक्तीसारखी सोपी पण तेवढीच अवघड गोष्ट नाही.

ज्ञाता व ज्ञेय, परा व अपरा प्रकृती याच्या पलीकडे असलेले व सर्व सामावलेले असे एक स्वतंत्र तत्व आहे  त्याला “सत्य” म्हणतात. त्यालाच परब्रह्म म्हणतात.या ब्रह्माला पहाण्याची इछ्या बाळगणे, त्याचे अनुसंधान ठेवणे, व ते ठेवतानाच इछ्या, द्वेष रहित होऊन ब्रह्माचे ध्यान करणे ही ७ व्या अध्यायातील प्रमुख गोष्ट आहे. ज्ञानी भक्त जन्म-जन्माच्या साधनेतून ते साध्य करतो.

पूर्ण माहितीसाठी  ध्वनिफित . 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय  ७, भाग  2 : ध्वनी फीत


Friday, January 8, 2021

गीता अध्याय  ७, भाग  १: ध्वनी फीत


ज्ञान विज्ञान योग.  

अर्जुनाच्या निराश मनाच्या निर्माल्यातून पराक्रमाची फुलबाग कृष्णाने फुलवली. गीतेतील शिकवण आजही जीवनात उपयोगी आहे. कुटुंबातील साधे झगडे, असंतोष मिटविण्या पासून ते वाममार्गी लोकांचे मन योग्य मार्गावर आणून त्यांना शांती मिळवून देण्या पर्येंत गीता सर्वांना उपयोगी आहे. गीतेच्या अभ्यासासाठी एकाग्रता आवश्यक आहे. गीतेचा जन्म स्व-कर्तव्याच्या आड येणारा मोह निवारणार्थ आहे. गीतेच्या अभ्यासाने स्वकर्तव्याचे भान येते व ते चांगले साध्य करता येते.

या अध्यायातील पहिल्या १२ श्लोकांमध्ये प्रपत्ती तत्वज्ञान सांगितले आहे.  प्रपत्ती - म्हणजे ईश्वर शरणता. हे तसे तर भक्तीचेच रूप आहे. परंतु  दोघांमध्ये सूक्ष्म फरक आहे. भक्ती प्रेमपूर्वक सेवा करणे शिकवते तर प्रपत्तीत साधक पूर्णपणे शून्य होऊन जातो आणि सर्व काही ईश्वरावर सोडतो. 



श्लोक १३ ते २६ - लोकांचे प्रकार, भक्तीचे प्रकार, निष्काम भक्तांचे चार प्रकार. 

श्लोक २७ ते ३०. - सर्व अवनतीचे कारण “मोह” आहे. पुण्याचरणाने पापाचा  क्षय होतो. आत्मशक्तीच्या विकास होतो. आणि मोहाचा नाश होतो. 

माणसाला भेद का दिसतो? मोह का वाटतो

सर्व गोष्टींच्या मुळाशी एकाच चैतन्य असून माणसास भेद का दिसतो? मोह का वाटतो? प्रेमी माणसाचा चेहरा गोड वाटतो, दुसऱ्याचा कंटाळवाणा वाटतो. एकाला भेटावे, दुसऱ्याला टाळावे असे का वाटते? हा माझा, हा परका असे जे विचार येतात व ज्यामुळे प्रसंगी माणूस कर्तव्य ही टाळू पाहतो, त्याला कारण मोह आहे. 

वरवर पाहण्याची वृत्ती सोडून मुळात जाऊन पहिले पाहिजे. सृष्टी निर्मात्याच्या करांगुलीची करामत समजून घेतली पाहिजे. बृहदारण्यक उपनिषदात नगाऱ्याचा दृष्टांत दिला आहे. एकाच नगाऱ्यातून नाना नाद निघतात. काहींना मी भितो तर काहींवर नाचतो . हे सर्व भाव जिंकून घायचे असेल तर नगारा वाजविणाऱ्याला पकडले पाहिजे. त्याला पकडले कि सर्व आवाज आणि नाद माहीत होतात. 

भगवान एकाच वाक्यात सांगतात

जो मायेतून तरुन जाऊ इच्छित असेल; त्याने मला शरण यावे. भगवंताशी भक्ताची एकाग्रता कशी होऊ शकेल ती होणे कसे उपयुक्त आहे  याचे वर्णन या अध्यायात, पहिल्या भागात असून  उर्वरित तपशील आपण  भाग २ मध्ये  ऐकणार आहोत.

हरी ओम !


विजय रा. जोशी.


गीता अध्याय  ७, भाग  १: ध्वनी फीत