गीता अध्याय ७, भाग १: ध्वनी फीत
ज्ञान विज्ञान योग.
अर्जुनाच्या निराश मनाच्या निर्माल्यातून पराक्रमाची फुलबाग कृष्णाने फुलवली. गीतेतील शिकवण आजही जीवनात उपयोगी आहे. कुटुंबातील साधे झगडे, असंतोष मिटविण्या पासून ते वाममार्गी लोकांचे मन योग्य मार्गावर आणून त्यांना शांती मिळवून देण्या पर्येंत गीता सर्वांना उपयोगी आहे. गीतेच्या अभ्यासासाठी एकाग्रता आवश्यक आहे. गीतेचा जन्म स्व-कर्तव्याच्या आड येणारा मोह निवारणार्थ आहे. गीतेच्या अभ्यासाने स्वकर्तव्याचे भान येते व ते चांगले साध्य करता येते.
या अध्यायातील पहिल्या १२ श्लोकांमध्ये प्रपत्ती तत्वज्ञान सांगितले आहे. प्रपत्ती - म्हणजे ईश्वर शरणता. हे तसे तर भक्तीचेच रूप आहे. परंतु दोघांमध्ये सूक्ष्म फरक आहे. भक्ती प्रेमपूर्वक सेवा करणे शिकवते तर प्रपत्तीत साधक पूर्णपणे शून्य होऊन जातो आणि सर्व काही ईश्वरावर सोडतो.
श्लोक १३ ते २६ - लोकांचे प्रकार, भक्तीचे प्रकार, निष्काम भक्तांचे चार प्रकार.
श्लोक २७ ते ३०. - सर्व अवनतीचे कारण “मोह” आहे. पुण्याचरणाने पापाचा क्षय होतो. आत्मशक्तीच्या विकास होतो. आणि मोहाचा नाश होतो.
माणसाला भेद का दिसतो? मोह का वाटतो
सर्व गोष्टींच्या मुळाशी एकाच चैतन्य असून माणसास भेद का दिसतो? मोह का वाटतो? प्रेमी माणसाचा चेहरा गोड वाटतो, दुसऱ्याचा कंटाळवाणा वाटतो. एकाला भेटावे, दुसऱ्याला टाळावे असे का वाटते? हा माझा, हा परका असे जे विचार येतात व ज्यामुळे प्रसंगी माणूस कर्तव्य ही टाळू पाहतो, त्याला कारण मोह आहे.
वरवर पाहण्याची वृत्ती सोडून मुळात जाऊन पहिले पाहिजे. सृष्टी निर्मात्याच्या करांगुलीची करामत समजून घेतली पाहिजे. बृहदारण्यक उपनिषदात नगाऱ्याचा दृष्टांत दिला आहे. एकाच नगाऱ्यातून नाना नाद निघतात. काहींना मी भितो तर काहींवर नाचतो . हे सर्व भाव जिंकून घायचे असेल तर नगारा वाजविणाऱ्याला पकडले पाहिजे. त्याला पकडले कि सर्व आवाज आणि नाद माहीत होतात.
भगवान एकाच वाक्यात सांगतात ;
जो मायेतून तरुन जाऊ इच्छित असेल; त्याने मला शरण यावे. भगवंताशी भक्ताची एकाग्रता कशी होऊ शकेल ती होणे कसे उपयुक्त आहे याचे वर्णन या अध्यायात, पहिल्या भागात असून उर्वरित तपशील आपण भाग २ मध्ये ऐकणार आहोत.
हरी ओम !
विजय रा. जोशी.
गीता अध्याय ७, भाग १: ध्वनी फीत
No comments:
Post a Comment