Friday, January 15, 2021

 गीता अध्याय  ७, भाग  2 : ध्वनी फीत


ज्ञान विज्ञान योग.  

गीता उपदेश जगन्मान्य असून त्याचा सर्वत्र उपयोग जाणकार, जिज्ञासू करीत आहेत. गीतेतील अध्यात्मिक तत्वे , संकल्पना, परिभाषा जी अगोदर समजायला अवघड आहे ती विविध माहितीच्या आधारे समजवायचा हा एक प्रयत्नआहे. 

समजणे एकवेळ सोपे पण उमजणे, प्रत्यक्ष वर्तनात आणणे  अतिशयअवघड याच अनुभव मी रोज घेतो आहे. श्रोते गोड  मानून घेत आहेत म्हणून प्रत्येक वेळी अधिक उत्साहाने , जास्तीत जास्त प्रामाणिक प्रयत्न करायला प्रेरणा आहे. 



पहिल्या १२ श्लोकांमध्ये प्रपत्ती तत्वज्ञान सांगितले आहे. प्रपत्ती - म्हणजे ईश्वर शरणता. हे तसे तर भक्तीचेच रूप आहे. परंतु दोघांमध्ये सूक्ष्म फरक आहे. भक्ती प्रेमपूर्वक सेवा करणे शिकवते तर प्रपत्तीत साधक पूर्णपणे शून्य होऊन जातो आणि सर्व काही ईश्वरावर सोडतो. 

श्लोक १३ ते २६ - लोकांचे प्रकार, भक्तीचे प्रकार, निष्काम भक्तांचे चार प्रकार. 

श्लोक २७ ते ३०. - सर्व अवनतीचे कारण “मोह” आहे. पुण्याचरणाने पापाचा क्षय होतो. आत्मशक्तीच्या विकास होतो. आणि मोहाचा नाश होतो. 

सृष्टीत अनेक प्रकारचे जे अनेक विनाशी पदार्थ आहेत त्या सर्वात एकच अविनाशी पदार्थ भरून राहिला आहे हे समजणे  याचे नाव “ज्ञान”. एकाच नित्य परमेश्वरापासून विविध नाशिवंत पदार्थ कसे होतात हे समजणे याचे नाव विज्ञान. यासच क्षराक्षर विचार असे म्हणतात, (१३/३०) 

प्रपंचाला विज्ञान म्हणतात. 

तो सत्य समजणे हे अज्ञान. 

जाणिवेचा जिथे शिरकावच होत नाही ते ज्ञान. (आत्मज्ञान).

भक्ती (गीता रहस्य). श्लोक (वीस ते तीस) अन्वयार्थ

उपासना सर्वांना पाहिजेच. मग ती व्यक्ताची करा, अगर अव्यक्ताची करा. पण या दोहोत व्यक्ताची उपासना सुलभ असल्याने तिचेच येथे वर्णन आहे. व तिलाच भक्ती असे नाव आहे. तथापि स्वार्थ-बुद्धी मनात ठेऊन काही विशिष्ठ हेतूसाठी परमेश्वराची भक्ती करणे ही भक्तीची पायरी कनिष्ठ असून, परमेश्वराचे ज्ञान व्हावे अशा हेतूने भक्ती करणारे (जिज्ञासू) देखील कच्चेच म्हंटले पाहिजेत, कारण त्यांचे ज्ञान परिपूर्ण नसते. . तथापि हे सर्व भक्ती करणारे असल्यामुळे सर्वच चांगल्या मार्गाने जाणारे असे म्हंटले आहे (श्लोक १८). पण त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे ज्ञानप्राप्तीने कृतार्थ होऊन या जगात ज्यांना करावयाचे किंवा मिळवायचे शिल्लक उरले नाही ते ज्ञानी पुरुष निष्काम बुद्धीने जी भक्ती करतात ती सर्वात श्रेष्ठ होय. त्यामुळे “भक्तियोग म्हणजे परमेश्वराची निर्हेतुक व निरंतर भक्ती” असे भागवतात भक्तीचे लक्षण केले आहे. आपापल्या प्रकृती नियमाप्रमाणे त्या त्या स्वर्गादिक फळांच्या कामवासनांनी वेडावलेले लोक तो तो उपासनेचा नियम पाळून दुसऱ्या निरनिराळ्या देवतांच्या भजनी लागत असतात (७/२०) 

भक्तीसाठी संपूर्ण, विनाशर्त समर्पण हवे.

माझे जन्म-जन्माचे सर्वस्व मी आणीन ओतले तरी देवाचे देण पूर्ण होणार नाही हा आंतरिक भाव हवा. असा भाव असेल तर देव पूर्ण प्रसन्न होईल. देव भक्ताची सेवा हि करेल. भक्तीसारखी सोपी पण तेवढीच अवघड गोष्ट नाही.

ज्ञाता व ज्ञेय, परा व अपरा प्रकृती याच्या पलीकडे असलेले व सर्व सामावलेले असे एक स्वतंत्र तत्व आहे  त्याला “सत्य” म्हणतात. त्यालाच परब्रह्म म्हणतात.या ब्रह्माला पहाण्याची इछ्या बाळगणे, त्याचे अनुसंधान ठेवणे, व ते ठेवतानाच इछ्या, द्वेष रहित होऊन ब्रह्माचे ध्यान करणे ही ७ व्या अध्यायातील प्रमुख गोष्ट आहे. ज्ञानी भक्त जन्म-जन्माच्या साधनेतून ते साध्य करतो.

पूर्ण माहितीसाठी  ध्वनिफित . 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय  ७, भाग  2 : ध्वनी फीत


No comments:

Post a Comment