Friday, February 19, 2021

  

गीता अध्याय १०, भाग १ , ध्वनी फीत . 



ईश्वर म्हणजे सर्व कारणांचे कारण : आपण जगाकडे दोन दृष्टीने पाहू शकतो. 

1) व्यवहार दृष्टी : हि स्थूल ज्ञान दृष्टी आहे. या दृष्टीला विश्वसंसार दिसतो. जगामध्ये जिकडे  -तिकडे घडणे-मोडणे , वाढणे-घटणे,  येणे-जाणे, दिसणे-नाहीसे होणे अविरत चालू असते. हा अनुभव प्रमाण धरूनच दैनंदिन जीवन जगावे लागते. 

2) परमार्थ दृष्टी : इंद्रियांना जसे विश्व दिसते तसे ते खरोखर नाही. विश्वाच्या प्रत्येक अंगामध्ये वरवर आढळणाऱ्या अनेकपणात खोल एकपण ओवलेला आहे. तो एकपण कार्यकारण संबंधाच्या द्वारा प्रचीतीला  येतो. हे कार्यकारण संबंध अतिशय स्थिर आणि कधी खोटे न ठरणारे असतात. 


युगानुयुगे तेच कारण तेच कार्य घडवून आणते. याचा अर्थ असा कि विश्वाच्या तिन्ही प्रमुख अंगामध्ये (जडद्रव्य, जीवन आणि अंतःकरण यांच्या हालचालींमध्ये) कार्यकारणाचे जाळे पसरलेले आहे.येथे तत्वज्ञान असे सांगते कि जर प्रत्येक  घटनेस कारण आहे तर कार्यकारण संबंधास देखील कारण असले पाहिजे. ईश्वर म्हणजे सर्व कारणांचे कारण.(प्रेमयोग के वि बेलसरे )

श्लोक १२ ते १८ अर्जुन भगवंतांना विचारतात. 

तुम्ही आमचे जीवन चालवत आहेत हे समजण्यासारखे आहे, तशी अनुभूतीपण येते. तुम्ही अविकारी आहात पण बाहेर तर सर्व विषयच दिसतात. भगवंत व्यापक आहेत हे सत्य आहे, पण व्यापक भगवंताचे चिंतन करायचे असते व व्यापकतेचा अनुभव घ्यायचा असतो. कोणत्या भावात तुमचे चिंतन करू?  चित्त एकाग्र करू? माझ्या जीवनात गुण यायला मी काय करू? हे सर्व तुम्ही विस्ताराने सांगा. 

अध्याय १० विवेचन स्वरूप. 

भगवत दर्शन; आणि त्यासाठी उपासना, भक्ती या मार्गी जाणे हे मनुष्यास का आवश्यक आहे , त्या मार्गावर जाण्याची इच्छा निर्माण होऊन त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे (साधना करणे) काआवश्यक आणि उपयुक्त आहे या बद्दलचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न आपण या भागात बघणार आहोत . 

माणूस हा निसर्गतः स्व-केंद्रित असतो. अनेक प्रकारच्या न सम्पणाऱ्या इच्छा, आकांक्षा , वासना आणि भोग यामुळे आपले जीवन भोगवादी बनले आहे, अधीकाधीक बनत चालले आहे. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. १० वा अध्याय आपल्याला भोगयोगाकडून प्रेमयोगाकडे जायला कसे सांगतो हे  आपण समजून घ्यायचा प्रयत्न या भागात करणार आहोत.  

पुढील भागात ,  सर्वव्यापी , सर्वत्र पसरलेला भगवंत समजून घेण्यासाठी स्वतःला कसे शिकवायचे हे आपण पूज्य विनोबाजींच्या चिंतनातून शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर वरील सर्व ज्ञान विचारांच्या पार्श्वभूमीवर व्यवहारात , जीवनाच्या विविध टप्प्यामधील वाटचालीत,प्रयत्नांची दिशा नेमकी कशी ठेवायची, काय साधना प्रयत्नांचा मार्ग धरून  प्रगती करून घ्यायची हे सर्व पूज्य स्वामी विज्ञानानंद यांच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात समजून घेण्याचा आनंद आपण घेणार आहोत. 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय १०, भाग १ , ध्वनी फीत


No comments:

Post a Comment