Monday, March 1, 2021

 

गीता अध्याय १०, भाग 2 , ध्वनी फीत .






परमेश्वरी अस्तित्व स्वतःला  कसे समजवून घ्यायचे ? 

लहान मुलांना शिकविण्यासाठी जे उपाय आपण योजतो तेच उपाय सर्वत्र परमात्मा दिसावा म्हणून या दहाव्या अध्यायात सांगितले आहेत. आधी अक्षरे मोठी  काढायची, गिरवयाची आणि नंतर तीच छोटी काढायला शिकायचे. आधी बिन घोटाळ्याची साधी अक्षरे शिकवायची आणि घोटाळ्याची जोडाक्षरे मागून शिकायची. अधि ठळक परमेश्वर पहायचा. समुद्र, पर्वत अशा महान विभूति भरलेला परमेश्वर पटकन डोळ्यात भरेल. हा परमेश्वर पटला तर एखाद्या जलबिंदूत, मातीच्या छोट्या कणातही तोच आहे हे पुढे कळेल. जेथे शुद्ध परमेश्वरी अविर्भाव सहज प्रकट झाला आहे, त्याचे ग्रहण पटकन होते . जसा रामाच्या ठिकाणी प्रकट झालेला परमेश्वरी अविर्भाव चटकन समजतो. राम हे  साधे अक्षर आहे, बिन भानगडीचा  परमेश्वर. पण रावण? तो समजायला जोडाक्षरा  सारखा आहे. रावणाची तपःश्चर्या,कार्यशक्ती थोर आहे, परंतु त्यात क्रूरपणा मिसळलेला आहे. दया, वत्सलता, प्रेम असलेला राम, त्याच्या ठिकाणी असलेला परमेश्वर सहज ग्रहण होईल पण रावणाच्यात असलेला परमेश्वर पहायला जरा वेळ लागेल. सज्जनांच्या परमेश्वर पाहून नंतर दुर्जनातही पहायला शिकायचे. समुद्रातील विशाल परमेश्वर त्या थेंबातही आहे, रामचंद्रातील परमेश्वर रावणातही आहे. जे स्थूलात, तेच सूक्ष्मात, जे सोप्यात तेच कठीणात. अशा दोन तर्हेने हा जगाचा ग्रंथ वाचावयास आपणास शिकायचे आहे. 

१० व्या अध्यायात कृष्ण म्हणतात – मी या देहात आहे खरा, पण अगदी खरा मी सर्वत्र आहे

१० वा अध्याय सांगतो “तू संकुचित होऊ नकोस. तसा प्रयत्न केलास तर ते आयुष्यात बरोबर होणारनाही.” त्यासाठी माझी प्रार्थना काय असली पाहिजे? माझी प्रार्थना अशी असली पाहिजे की “मी आता अपूर्ण असलो तरी संपूर्णाच्या दिशेने माझी वाटचाल झाली पाहिजे.”तशी प्रार्थना आपल्यास निवडायची असेल तर त्या साठी योग्य वर्तन आणि चिंतन झालं असल पाहिजे.

तुम्ही जेंव्हा किरण व्हायला तयार असता तेंव्हा सूर्य बनू शकता.

प्रकाश-किरण सर्वत्र जातो. तो राजमहालावर पडतो तसा उकिरड्यावर व गलीच्छ्य गटारावरही पडतो. सूर्यकिरण घाणीत, गटारात जाण्याची कधीच घृणा करत नाही..  घाणीची घृणा केली तर आम्ही किरणही होऊ शकणार नाही मग सूर्य कुठून होणार ? हा आपला पराभव असेल. आणि हि पराभूतता जर आपण टाळू शकलो तर आपल्याला सर्वत्रता मिळेल. नेहमी फायद्याचे घ्यायचे व तोटयाचे सोडायचे असं चालत नाही. न्याय व नियम हे तुमच्या सोयीप्रमाणे फिरत नसतात.

विभूती योग.

विभूतियोग म्हणजे सृष्टीच्या वैभवाचे वर्णन. ते वैभव भगवंतांनी अर्जुना समोर खुले केले. अर्जुन या सृष्टीतील विभूती (परमेश्वर रूपे) समजून घेतो व पुढे भगवंताना विचारतो “या सर्व विभूती कुठे आहेत ?” मला आपले खरे सर्वव्याप्त रूप बघायचे आहे. मग ११ व्या अध्यायात भगवंताना ‘विश्वरूप दर्शन’ घडवावे लागले.

विभूती योग कळल्यावर मग विश्वरूप दर्शन कळेल. हा विभूती योग या अध्यायात आपण समजून घेण्याचा प्रयत्न  करीत आहोत. 


विजय  रा. जोशी 



गीता अध्याय १०, भाग 2 , ध्वनी फीत .


No comments:

Post a Comment