Sunday, October 9, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 181 ते 185 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १८१ - १८५. 

सद्गुरू कसे आसावे, कसे नसावे, त्यांना कसे ओळखावे याचे वर्णन करणारे  हे श्लोक आहेत. . 

साधना म्हणजे काय?  गुरु कोणाला म्हणावं ? साधक कोणाला म्हणावं? शिष्य कोण? कृपा म्हणजे काय, 

अध्यात्मात साधकत्व  म्हणजे काय ?  ........  या बद्दल प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष चर्चा आहे. 

ज्याच्या चेतनेतून मी-पण, अहंभाव हा अगदी पार निरसून गेला आहे , निराकरण झालं आहे, केवळ वैश्विक

चेतनाच तिथे स्पंदित आहे , अशा व्यक्तीला आपण गुरुपद प्राप्त झालय असं म्हणू शकतो. 

जिथे मी-पण उरलं नाही, आणि तू-पण उरलं नाही त्या ठिकाणी व्यापार शक्य नाही, दुकानदारी शक्य नाही,

जाहिरातबाजी शक्य नाही. ती व्यक्ती जगत राहील स्वतःच जीवन , शांतपणे, संथपणे.. तो/ती गुरुत्व प्राप्त व्यक्ती. 

ज्याच्या हृदयामध्ये साधकाची भूमिका परिपकव होते, त्या व्यक्तीला, त्या साधकाला,  अशा आत्मानुभावी व्यक्तीशी

मिळवून देण्याची जबाबदारी जीवन उचलते. 

सद्गुरुंचे मूल्यमापन करणे हि तशी अवघड गोष्ट . तरीही सद्गुरूंवर श्रद्धा ठेवण्यापूर्वी आपण आपल्या

पद्धतीने ते करणे आवश्यक आहे. 

शिष्यामधे शरणागती अत्यंत आदराने हवी. तळमळीने हवी. मनापासून हवी.  लीनतेने रामरुपात लपले, 

विलीन झाले, एकरूप झाले असे भक्त हवे. जो भक्त आत्मरूप झाला तो भयातीत झाला. सद्गुरू यास

सहाय्यभूत होतात. ..         सोप्या उदाहरणांनी, कथेच्या सहाय्याने आपण हे सर्व या ध्वनिफितीच्या माध्यमातून

 समजून घेऊ या. .   श्रीराम !


विजय रा. जोशी 


Sunday, September 25, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 176 ते 180 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १७६ -१८०. 

सगुण उपासना करतांना मूळ निर्गुण रूपाची सतत जाणीव ठेवावी लागते.  ज्या निर्गुण रूपाची प्रतिक-रुप पूजा

आपण करतो त्याचे भान सतत ठेवावे लागते. ‘सगुण उपासना’ म्हणजे आपल्या उपास्य देवतेला हृदयात धारण

करुन तिचे विशेष गुण आपल्यात  येतील, आपला तसा स्वभाव बनेल असा प्रयत्न करणे.

एकीकडे ब्रह्माण्डाचा पसारा आणि ब्रह्माण्ड निर्मात्याचे अवर्णनीय स्वरूप आणि दुसरीकडे अहंतायुक्त मानवी

स्वभाव, बुद्धी … याचा आपण विचार करीत आहोत. आणि त्या अल्प बुद्धीला हा सर्वत्र असलेला परमात्मा कसा

समजून घेता येईल  हे समर्थ आपल्याला समजावत आहेत. 

मानवी जीवनात मनाचे स्थान महत्वाचे आहे. मनाचे उन्नयन करावे लागते. मनाला प्रशिक्षण द्यावे लागते.. हे मन

सत्संगतीने,  सत्संगाने आणि  पूर्व सुकृताने जेव्हा अधिक सूक्ष्म होऊ लागते तेव्हा वरवर दिसणाऱ्या दृश्यामागे जे

चिरंतन अदृश्य आहे त्याचे अस्तित्व कधी-कधी उमजू लागते त्याबद्दल उत्सुकता निर्माण होते.   

मग हे विश्व  कोणी, कसे, केव्हा, कशासाठी  निर्माण झाले हे प्रश्न मनात येतात. 

मनुष्य जीवनात आपल्याला जी बुद्धी, विवेक शक्ती लाभलेली आहे तिचा उपयोग करून मानव देवरूपाला पोहोचू

शकतो. त्यासाठी आत्मज्ञान प्राप्त केलेल्या गुरूंचे मार्गदर्शन उपयोगी ठरते. 

लोकांना फसविण्यासाठी काम करणारे अनेक भोंदू पण हुशार मंडळी असतात. ते तात्काळ चमत्कार घडविणारे

उपायांचा मोह आपल्याला पाडतात. आपल्याला जाळ्यात ओढू पहातात..  

अशा तथाकथित गुरु पासून सावध रहायला समर्थ सांगत आहेत.                                                              श्रीराम !



विजय रा. जोशी. 


 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 171 ते 175 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १७१ -१७५ 

आत्मवस्तूला पहाणाऱ्या ज्ञान चक्षुंचा उदय कसा होतो, चर्म चक्षु, आणि ज्ञान चक्षु फरक. आणि 

त्या  स्थित्यन्तरासाठी उपाय, अहंकारमुक्ती.  हे सर्व मूलभूत ज्ञान सांगणारे श्लोक आहेत.  

निरपेक्ष त्याग दुसऱ्यांसाठी करणे अशी  आपली सहज अवस्था होणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. आपले जगणे

इतरांसाठी व्हायला हवे.  सुरवातीला ते जरी संकल्पाने असले तरी अंतिमतः ती आपली सहज अवस्था 

व्हायला पाहिजे.  

कल्पनेच्या दोन दिशा – 1. विषयाकडे धावणारी  (अविद्या). 2. परमात्म्याचा शोध घेणारी.(सुविद्या).  

विषय सुखाने आनंद होतोच पण तो चिरकाल नसतो. तात्पुरता असतो.  उलट परमात्म दर्शनाने अवीट, संपूर्ण

आणि कायम टिकणारा आनंद निर्माण होतो. म्हणून विवेकाच्या आधाराने सुविद्या मिळवून तसे जगण्याचा

प्रयत्न असावा. 

साधना सुरु झाली तर मग किती दिवसात सुविद्या येईल ? या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. 

ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबुन आहे. अहंकार रुपी राहू आपल्यातील  आत्मशक्ती आच्छादून टाकतो. विवेकाने

जर अहंकार मुक्ती साधली तर हे आच्छादन दूर होते. म्हणून जीवनात विवेकाला महत्वाचे स्थान हवे.

भगवान प्रचिती / दर्शन घेण्यासाठी काय करावे याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करीत आहेत. 

ब्रह्मांड नायकाची ओळख झाल्यावर जीवनाचे रूपच कसे आमूलाग्र बदलून जाईल हे समर्थांना सूचवायचे आहे

आणि त्यासाठी त्या जगन्नियंत्याला ओळखावे असा त्यांचा आग्रह आहे.                                        श्रीराम !!



विजय रा. जोशी. 



Wednesday, September 7, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 166 ते 170 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक 166-170 . 


प्रपंच हेच सर्वस्व समजण्याचा निश्चय आपण केला. त्यातील फोलपणा श्रीसमर्थ  समजावत आहेत. निश्चय

शाश्वताचा, जे कायम टिकणारे सत्य आहे त्याचा म्हणजे परमात्मा प्राप्तीचा निश्चय करावा असं सांगत आहेत. . हे 

उत्कृष्ठ ध्येय आहे.  जीवनातील घडी न घडी या कार्यात वेचावी. आणि हे सर्व संत्संगतीने, संत वचन पालनाने ,

साधनेने साधेल. म्हणून संत संगत सोडू नये. 

जीवन ध्येय काय असावे आणि त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन समर्थ करत आहेत. 

संत कोणाला म्हणाव ? जो भगवंतांशी एकरूप झाला तो संत . मन शान्त आहे आपुलकी आहे,

प्रसन्नता आहे, शुद्ध भाव आहे या वरून संत ओळखता येतात . दिसायला ते सामान्य माणसासारखे

दिसतात. 

त्यांच्याकडे खरे ज्ञान असते, त्यांचे वागणे शांत, तृप्त असते, सर्व करूनही त्यांची वृत्ती पूर्ण अलिप्त

असते. आणि यामुळे ते कोठल्याही उपाधीत अडकलेले नसतात. 

देहबुद्धी जाण्यासाठी ज्ञानबोध कसा करायचा ते समर्थ शिकवत आहेत. वाचनाची , अभ्यासाची मर्यदा

आहे. त्यातून ज्ञानबोध होणार नाही. अभ्यासाला निष्ठेची, सातत्य पूर्ण वर्तनाची जोड अनिवार्य आहे.

त्याशिवाय खरा ज्ञानबोध होणार नाही. या मार्गावर आपण अखंड राहिलो तर आपल्याला सतत

संतसंगती मिळेल आणि त्यातून योग्य वेळ आली कि ज्ञानबोध होऊन आपल्या अंतरंगात 

परिवर्तन घडेल, स्थित्यन्तर घडेल .

हे सर्व सविस्तर समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी हा ऑडिओ जरूर ऐका , 

आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा, शेअर करा. धन्यवाद !


विजय रा. जोशी. 



Friday, August 19, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 161 ते 165 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक 161 - 165.

मी म्हणजे माझे सध्याचे अस्तित्व, म्हणजेच माझे शरीर. या देहाचे सर्व संबंधी म्हणजेच माझा प्रपंच आणि

हे सर्व वास्तव / सत्य , असा आपला दृढ विश्वास अगदी बालपणापासून बनलेला असतो.  

अहंकाराचे विश्लेषण सुरू आहे , त्यापासून होणारे अनेक दुःख परिणाम समजावून सांगत आहेत. अहंकार

विसर्जन हे प्रमुख साध्य अध्यात्म साधनेत साधावे. अहंता-मुक्त श्रेष्ठ व्यक्ती अनुकूल/प्रतिकूल परिस्थितीत

सुखी रहातात हे पाहून आपण आपली अहंता कमी करण्याच्या प्रयत्नात राहिले पाहिजे. देहबुद्धी आपल्या

अंतरी स्थिर झाली तर काय होते आणि आत्मबुद्धीकडे आपली प्रगती घडली तर काय होते हे लक्षात घेऊन

आपण आपल्या भल्यासाठी सज्जनांच्या संगतीत रहावे असे समर्थ पुनःपुन्हा सांगत आहेत. 

अहंकार अज्ञानी पुरुषाच्या मागे विशेषेकरून लागत नाही; परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो. आणि त्याला नाना

 प्रकारच्या संकटात गोते खावयास लावतो. ज्ञान मार्गात अहंकार मोठा धोका, म्हणून तपाची जोड अनिवार्य.


ज्ञान आधारित कर्म करणे आणि कर्मात अहंकार रहित संपूर्ण समर्पण वृत्ती ठेवणे हे सोपे नाही. दृश्य जगाला

सोडून त्या पल्याड असलेल्या भगवन्ताला शरण जाणे हि आत्मबुद्धी  असते. आपले वासनेने लडबडलेले

अंतःकरण संतांच्या द्वारी सेवाकार्यात सतत ठेवले तर ते शुद्ध होऊ लागते. “मी” ला अहंकाराला जर

सम्पवायचं नसेल तर अध्यात्म म्हणजे फक्त शब्दांचा  काथ्याकूट असच म्हणावं लागेल. 


अध्यात्म साधनेत प्रगती होण्यासाठी काय करावे हे अत्यन्त तर्कनिष्ठ पद्धतीने सांगणाऱ्या या श्लोकांचे विवेचन

 आपणास नक्की   उपयुक्त वाटेल हा विश्वास आहे. जरूर काळजीपूर्वक ऐका आणि  योग्य  वाटल्यास 

जरूर like आणि share करा ही  विनंती. 


 विजय रा. जोशी. 




Sunday, August 14, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 156 ते 160 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक १५६ - १६०.

परमात्मा पहातांना पहाणारा त्यात मिसळून गेला पाहिजे. ती स्थिती येण्यासाठी “मी” चे अस्तित्व पूर्णपणे

संपून ते अनंतात विलीन झाले पाहिजे. 

शब्द - ज्ञानाचे अध्यात्म शास्त्राचे मार्ग अनेक असू शकतील. पण स्वतःला विवेकाने जो मार्ग

समजला त्यावर निष्ठा ठेवून जो सतत पुढे जात राहील, कर्मशुध्दी करत मार्गक्रमण सुरु राहील, समर्पण

भावाने , अलिप्तता राखत , अहंतेचे विसर्जन करीत, ध्येय प्राप्तीसाठी  तळमळीने प्रयत्न करीत राहील, 

तो साधक.   

‘अहंता’ अडथळे निर्माण करते. अहंकारी वागणे मानवास आत्मिक उन्नतीपासून, परमार्थापासून दूर ठेवते.

मी आत्मा आहे, हि जाणीव मनी, वर्तनी मुरणे म्हणजे आत्मज्ञान होय. फक्त बुद्धीने कळणे उपयुक्त नाही.

सहज वर्तन तसे घडायला हवे. जाणीव हि एकवेळ शून्यरूप तरी  व्हायला हवी किंवा विश्वरूप एवढी विशाल

व्हायला हवी, तर आंतरिची साधना सफल होईल. म्हणून सतत अनुसंधान राखावे लागते आणि या

अनुसंधानाची अंतर्मनातील लागवड साधकास फार सावधपणे करावी  लागते.  

आंतरिक उन्नती साधण्यास काय करावे , काय टाळावे याचे मार्गदर्शन श्री समर्थ करीत आहेत. 

साधना म्हणजे काय आणि त्यामार्गातील विविध टप्पे समजावून सांगणारे हे विवेचन आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी

 खूप माहितीपूर्ण असून आपल्यास ते नक्की उपयुक्त वाटेल असा विश्वास आहे. 

जरूर ऐका आणि योग्य वाटल्यास like आणि share करा ही विनंती. 


विजय रा. जोशी. 




Saturday, August 6, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 151 ते 155 :  ध्वनिफीत :




सारांश - श्लोक १५१ - १५५. 

सत-तत्वाचा शोध घायचा आहे. आणि ते सत-तत्व आपल्यातच आहे.  विनासायास फायदा देणारे इन्व्हेस्टमेंट

ऑप्शन्स, आपण व्यवहारात शोधत रहातो. पण हि सवय परमार्थात खूप घातक ठरते. परमार्थात तितिक्षा

लागते, दीर्घ प्रयत्न लागतात . फक्त भोग किंवा त्यागाने अहंकार होईल पण समाधान होणार नाही. 

सु ख ---- समाधान  ---- शांती. ... ही प्रगत जीवनातील  चढत्या क्रमांची  उद्दिष्टे.  व्यवहारात आपण पहातो

की सुख संपल्यानंतर दुःख येते, समाधान अधिक  काळ टिकते. शांती जीवनात स्थिर  झाली तर मग काही

मिळवायचेच रहात नाही. सुख हे समाधानकारक वाटले पाहिजे आणि शाश्वत समाधानातून माणूस शांतीत

स्थिर झाला पाहिजे. 

संपन्नता (विविध सुख साधने) आणि प्रसन्नता या दोन चाकावर समाधानाचा रथ चालतो. माणूस संपन्नता

प्राप्तीसाठी जरूर प्रयत्न करेल. पण त्या संपन्नता प्राप्तीत काही अपेक्षा असेल तर प्रसन्नता काही काळ

मिळेल पण ती चिरकाल टिकणार नाही.  म्हणून निरपेक्ष कर्म करावे असे रामदास स्वामी सांगत आहेत. 

ज्ञान चक्षु विकसित होण्यासाठी संत सद्गुरूंनी आचारलेला मार्ग हाच एकमेव उपाय आहे.

पण त्या मार्गावर जर कायम स्थिर होता आलं नाही तर मात्र हे परम सत्य मनुष्य ओळखू शकत नाही . 

मन आणि ब्रह्म यांचा संबंध काय, तो जाणण्याचे महत्व काय  आणि  मनाला ब्रह्मज्ञान होण्यासाठी काय

प्रयत्न करायला हवेत  याचे मार्गदर्शन समर्थ या श्लोकांच्या माध्यमातून करीत आहेत. 

अध्यात्म आणि व्यवहार याचे सविस्तर विश्लेषण आपल्यास नक्कीच उपयुक्त वाटेल. जरूर ऎका 

आणि आवडल्यास share करा.  धन्यवाद. 


  विजय रा. जोशी .