Sunday, September 25, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 171 ते 175 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १७१ -१७५ 

आत्मवस्तूला पहाणाऱ्या ज्ञान चक्षुंचा उदय कसा होतो, चर्म चक्षु, आणि ज्ञान चक्षु फरक. आणि 

त्या  स्थित्यन्तरासाठी उपाय, अहंकारमुक्ती.  हे सर्व मूलभूत ज्ञान सांगणारे श्लोक आहेत.  

निरपेक्ष त्याग दुसऱ्यांसाठी करणे अशी  आपली सहज अवस्था होणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. आपले जगणे

इतरांसाठी व्हायला हवे.  सुरवातीला ते जरी संकल्पाने असले तरी अंतिमतः ती आपली सहज अवस्था 

व्हायला पाहिजे.  

कल्पनेच्या दोन दिशा – 1. विषयाकडे धावणारी  (अविद्या). 2. परमात्म्याचा शोध घेणारी.(सुविद्या).  

विषय सुखाने आनंद होतोच पण तो चिरकाल नसतो. तात्पुरता असतो.  उलट परमात्म दर्शनाने अवीट, संपूर्ण

आणि कायम टिकणारा आनंद निर्माण होतो. म्हणून विवेकाच्या आधाराने सुविद्या मिळवून तसे जगण्याचा

प्रयत्न असावा. 

साधना सुरु झाली तर मग किती दिवसात सुविद्या येईल ? या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. 

ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबुन आहे. अहंकार रुपी राहू आपल्यातील  आत्मशक्ती आच्छादून टाकतो. विवेकाने

जर अहंकार मुक्ती साधली तर हे आच्छादन दूर होते. म्हणून जीवनात विवेकाला महत्वाचे स्थान हवे.

भगवान प्रचिती / दर्शन घेण्यासाठी काय करावे याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करीत आहेत. 

ब्रह्मांड नायकाची ओळख झाल्यावर जीवनाचे रूपच कसे आमूलाग्र बदलून जाईल हे समर्थांना सूचवायचे आहे

आणि त्यासाठी त्या जगन्नियंत्याला ओळखावे असा त्यांचा आग्रह आहे.                                        श्रीराम !!



विजय रा. जोशी. 



Wednesday, September 7, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 166 ते 170 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक 166-170 . 


प्रपंच हेच सर्वस्व समजण्याचा निश्चय आपण केला. त्यातील फोलपणा श्रीसमर्थ  समजावत आहेत. निश्चय

शाश्वताचा, जे कायम टिकणारे सत्य आहे त्याचा म्हणजे परमात्मा प्राप्तीचा निश्चय करावा असं सांगत आहेत. . हे 

उत्कृष्ठ ध्येय आहे.  जीवनातील घडी न घडी या कार्यात वेचावी. आणि हे सर्व संत्संगतीने, संत वचन पालनाने ,

साधनेने साधेल. म्हणून संत संगत सोडू नये. 

जीवन ध्येय काय असावे आणि त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन समर्थ करत आहेत. 

संत कोणाला म्हणाव ? जो भगवंतांशी एकरूप झाला तो संत . मन शान्त आहे आपुलकी आहे,

प्रसन्नता आहे, शुद्ध भाव आहे या वरून संत ओळखता येतात . दिसायला ते सामान्य माणसासारखे

दिसतात. 

त्यांच्याकडे खरे ज्ञान असते, त्यांचे वागणे शांत, तृप्त असते, सर्व करूनही त्यांची वृत्ती पूर्ण अलिप्त

असते. आणि यामुळे ते कोठल्याही उपाधीत अडकलेले नसतात. 

देहबुद्धी जाण्यासाठी ज्ञानबोध कसा करायचा ते समर्थ शिकवत आहेत. वाचनाची , अभ्यासाची मर्यदा

आहे. त्यातून ज्ञानबोध होणार नाही. अभ्यासाला निष्ठेची, सातत्य पूर्ण वर्तनाची जोड अनिवार्य आहे.

त्याशिवाय खरा ज्ञानबोध होणार नाही. या मार्गावर आपण अखंड राहिलो तर आपल्याला सतत

संतसंगती मिळेल आणि त्यातून योग्य वेळ आली कि ज्ञानबोध होऊन आपल्या अंतरंगात 

परिवर्तन घडेल, स्थित्यन्तर घडेल .

हे सर्व सविस्तर समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी हा ऑडिओ जरूर ऐका , 

आवडल्यास इतरांना ऐकायला सांगा, शेअर करा. धन्यवाद !


विजय रा. जोशी. 



Friday, August 19, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 161 ते 165 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक 161 - 165.

मी म्हणजे माझे सध्याचे अस्तित्व, म्हणजेच माझे शरीर. या देहाचे सर्व संबंधी म्हणजेच माझा प्रपंच आणि

हे सर्व वास्तव / सत्य , असा आपला दृढ विश्वास अगदी बालपणापासून बनलेला असतो.  

अहंकाराचे विश्लेषण सुरू आहे , त्यापासून होणारे अनेक दुःख परिणाम समजावून सांगत आहेत. अहंकार

विसर्जन हे प्रमुख साध्य अध्यात्म साधनेत साधावे. अहंता-मुक्त श्रेष्ठ व्यक्ती अनुकूल/प्रतिकूल परिस्थितीत

सुखी रहातात हे पाहून आपण आपली अहंता कमी करण्याच्या प्रयत्नात राहिले पाहिजे. देहबुद्धी आपल्या

अंतरी स्थिर झाली तर काय होते आणि आत्मबुद्धीकडे आपली प्रगती घडली तर काय होते हे लक्षात घेऊन

आपण आपल्या भल्यासाठी सज्जनांच्या संगतीत रहावे असे समर्थ पुनःपुन्हा सांगत आहेत. 

अहंकार अज्ञानी पुरुषाच्या मागे विशेषेकरून लागत नाही; परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो. आणि त्याला नाना

 प्रकारच्या संकटात गोते खावयास लावतो. ज्ञान मार्गात अहंकार मोठा धोका, म्हणून तपाची जोड अनिवार्य.


ज्ञान आधारित कर्म करणे आणि कर्मात अहंकार रहित संपूर्ण समर्पण वृत्ती ठेवणे हे सोपे नाही. दृश्य जगाला

सोडून त्या पल्याड असलेल्या भगवन्ताला शरण जाणे हि आत्मबुद्धी  असते. आपले वासनेने लडबडलेले

अंतःकरण संतांच्या द्वारी सेवाकार्यात सतत ठेवले तर ते शुद्ध होऊ लागते. “मी” ला अहंकाराला जर

सम्पवायचं नसेल तर अध्यात्म म्हणजे फक्त शब्दांचा  काथ्याकूट असच म्हणावं लागेल. 


अध्यात्म साधनेत प्रगती होण्यासाठी काय करावे हे अत्यन्त तर्कनिष्ठ पद्धतीने सांगणाऱ्या या श्लोकांचे विवेचन

 आपणास नक्की   उपयुक्त वाटेल हा विश्वास आहे. जरूर काळजीपूर्वक ऐका आणि  योग्य  वाटल्यास 

जरूर like आणि share करा ही  विनंती. 


 विजय रा. जोशी. 




Sunday, August 14, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 156 ते 160 :  ध्वनिफीत :




सारांश : श्लोक १५६ - १६०.

परमात्मा पहातांना पहाणारा त्यात मिसळून गेला पाहिजे. ती स्थिती येण्यासाठी “मी” चे अस्तित्व पूर्णपणे

संपून ते अनंतात विलीन झाले पाहिजे. 

शब्द - ज्ञानाचे अध्यात्म शास्त्राचे मार्ग अनेक असू शकतील. पण स्वतःला विवेकाने जो मार्ग

समजला त्यावर निष्ठा ठेवून जो सतत पुढे जात राहील, कर्मशुध्दी करत मार्गक्रमण सुरु राहील, समर्पण

भावाने , अलिप्तता राखत , अहंतेचे विसर्जन करीत, ध्येय प्राप्तीसाठी  तळमळीने प्रयत्न करीत राहील, 

तो साधक.   

‘अहंता’ अडथळे निर्माण करते. अहंकारी वागणे मानवास आत्मिक उन्नतीपासून, परमार्थापासून दूर ठेवते.

मी आत्मा आहे, हि जाणीव मनी, वर्तनी मुरणे म्हणजे आत्मज्ञान होय. फक्त बुद्धीने कळणे उपयुक्त नाही.

सहज वर्तन तसे घडायला हवे. जाणीव हि एकवेळ शून्यरूप तरी  व्हायला हवी किंवा विश्वरूप एवढी विशाल

व्हायला हवी, तर आंतरिची साधना सफल होईल. म्हणून सतत अनुसंधान राखावे लागते आणि या

अनुसंधानाची अंतर्मनातील लागवड साधकास फार सावधपणे करावी  लागते.  

आंतरिक उन्नती साधण्यास काय करावे , काय टाळावे याचे मार्गदर्शन श्री समर्थ करीत आहेत. 

साधना म्हणजे काय आणि त्यामार्गातील विविध टप्पे समजावून सांगणारे हे विवेचन आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी

 खूप माहितीपूर्ण असून आपल्यास ते नक्की उपयुक्त वाटेल असा विश्वास आहे. 

जरूर ऐका आणि योग्य वाटल्यास like आणि share करा ही विनंती. 


विजय रा. जोशी. 




Saturday, August 6, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 151 ते 155 :  ध्वनिफीत :




सारांश - श्लोक १५१ - १५५. 

सत-तत्वाचा शोध घायचा आहे. आणि ते सत-तत्व आपल्यातच आहे.  विनासायास फायदा देणारे इन्व्हेस्टमेंट

ऑप्शन्स, आपण व्यवहारात शोधत रहातो. पण हि सवय परमार्थात खूप घातक ठरते. परमार्थात तितिक्षा

लागते, दीर्घ प्रयत्न लागतात . फक्त भोग किंवा त्यागाने अहंकार होईल पण समाधान होणार नाही. 

सु ख ---- समाधान  ---- शांती. ... ही प्रगत जीवनातील  चढत्या क्रमांची  उद्दिष्टे.  व्यवहारात आपण पहातो

की सुख संपल्यानंतर दुःख येते, समाधान अधिक  काळ टिकते. शांती जीवनात स्थिर  झाली तर मग काही

मिळवायचेच रहात नाही. सुख हे समाधानकारक वाटले पाहिजे आणि शाश्वत समाधानातून माणूस शांतीत

स्थिर झाला पाहिजे. 

संपन्नता (विविध सुख साधने) आणि प्रसन्नता या दोन चाकावर समाधानाचा रथ चालतो. माणूस संपन्नता

प्राप्तीसाठी जरूर प्रयत्न करेल. पण त्या संपन्नता प्राप्तीत काही अपेक्षा असेल तर प्रसन्नता काही काळ

मिळेल पण ती चिरकाल टिकणार नाही.  म्हणून निरपेक्ष कर्म करावे असे रामदास स्वामी सांगत आहेत. 

ज्ञान चक्षु विकसित होण्यासाठी संत सद्गुरूंनी आचारलेला मार्ग हाच एकमेव उपाय आहे.

पण त्या मार्गावर जर कायम स्थिर होता आलं नाही तर मात्र हे परम सत्य मनुष्य ओळखू शकत नाही . 

मन आणि ब्रह्म यांचा संबंध काय, तो जाणण्याचे महत्व काय  आणि  मनाला ब्रह्मज्ञान होण्यासाठी काय

प्रयत्न करायला हवेत  याचे मार्गदर्शन समर्थ या श्लोकांच्या माध्यमातून करीत आहेत. 

अध्यात्म आणि व्यवहार याचे सविस्तर विश्लेषण आपल्यास नक्कीच उपयुक्त वाटेल. जरूर ऎका 

आणि आवडल्यास share करा.  धन्यवाद. 


  विजय रा. जोशी . 



Thursday, July 14, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 146 ते 150 :  ध्वनिफीत.







सारांश - श्लोक १४६ - १५०. 


मनुष्य जीवनात जे  शोधायचे आहे ते  अनंत, शाश्वत तत्व आहे. 

मना ! त्याचा शोध घे. 

या मनुष्य जीवनाचा उपयोग करून जे सत्य आहे ते शोधून काढ. त्याची भेट घेण्यात खरं  तर जीवनाचे कल्याण

आहे.  आणि तेच करायला समर्थ आपल्याला सांगत आहेत. आपण आपल्या देहापुरते संकुचित झाले

आहोत, मर्यादित झालो आहोत. आपली दृष्टी, भाव विकसित केला पाहिजे.  देहाचा त्याग नको, 

पण देह म्हणजे मी,  हि देहबुद्धी कमी होत गेली पाहिजे.

विश्वातील सर्व संबंध त्या एका सर्व-व्यापी महाकारणाच्या सत्तेखाली वावरतात. ते  कारण कशाचेही कार्य

असत नाही. ते सर्व कारणांचे कारण असून स्वयंभू असते. स्वयंभू म्हणजे ते स्वतःच स्वतःचे कारण असते.

स्वतः कशाचेही कारण नसलेल्या या आदिकारणासच  ईश्वर म्हणतात.

जे सर्व सगुण जे आहे ते निराकारातून आलेले आहे. जडाची निर्मिती अजड अशा ऊर्जेतून झाली आहे.

त्या निराकाराचा जाणण्यासाठी साधकाला  स्वरूपात विलीन व्हायला लागते. स्व हा शून्यरूप

करून तो महाशुन्यात विसर्जित करावा लागतो. किंवा तो अति-विशाल ब्रह्मव्यापी व्हावा लागतो. यालाच

मनोलय म्हणतात, अहंकार मुक्ती म्हणतात. कर्म शुद्धी म्हणतात. 

अध्यात्मात हा व्यक्तिगत अनुभव साधनेने सिद्ध , प्रगत  होत जातो. तो विज्ञानाच्या प्रयोग शाळेत सिद्ध

करणे अजून तरी शक्य झालेले नाही. 

(पण अंतिम सत्या पर्येंत पोहोचावयाचे असेल तर विज्ञानाला आवश्यक

ते सर्व प्रयत्न करावेच लागतील, किंवा स्व-मर्यादा मान्य कराव्या लागतील).            श्रीराम !!


विजय रा. जोशी. 




Thursday, July 7, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 141 ते 145 :  ध्वनिफीत.





सारांश श्लोक १४१ ते १४५. 

समर्थ एखाद्या खऱ्या शिक्षका प्रमाणे साधकांना साधनेतील अति अवघड मार्गाची स्पष्ट जाणीव करून देत आहेत. आणि त्यासाठी मनोभूमिका तयार होण्यास मदत करीत आहेत. या मनुष्यजन्माचे खरे प्रबोधन साधायचे  असेल तर सद्गुरुकृपे शिवाय अन्य पर्याय नाही. जो पर्येंत आपली अहंता, अहंकार आहे, तेथ पर्येंत गुरुकृपा घडत नाही. आपण सद्गुरुंकडे का जातो, याचा आपण विचार केला आहे का ?भौतिक यशासाठी, काही यश प्राप्तीसाठी का स्वतःला जाणण्यासाठी ? सत्य शोधनासाठी ? अवघड प्रश्न, आणि अत्यंत अवघड काम म्हणजे याचे प्रामाणिक उत्तर शोधणे. 

आपल्याला अध्यात्म-अभ्यास खरच करायचा आहे का? बुद्धी, मनाने घेतलेले ज्ञान यांनी खूप मोठे शोध लागतील, पण आत्मज्ञान होणार नाही. त्यासाठी मन, बुद्धी, चित्त अहंकार. (अंतःकरण) शुद्धी घडणे अवश्य आहे. तू कशाला जन्माला आला आहेस असा प्रश्न विचारला तर अनेक लोकांची अनेक वेगळी उत्तरे देतील. पण मी अंतिम सत्य शोधण्यासाठी जन्म घेतला असे उत्तर बहुधा कोणीच देणार नाही. 

संतांनी सोपी व्याख्या केली - मी खरा कोण हे जाणणे म्हणजे ज्ञान, बाकीचे सर्व अज्ञान. 

स्वामीजी सांगतात ‘ द्याल तर सर्व मिळेल पण फक्त स्वतःजवळच राखाल तर राख होईल’. ‘निरपेक्षपणे द्यायची सवय ठेवा, त्यागाची सवय लावून घ्या. त्यातूनच पुढे यथावकाश षड्विकार, अहंकार मुक्ती घडे आणि मग विद्येचा मार्ग, सत्यशोधनाचा मार्ग प्रशस्त होत राहील. 

जीवन हेतूचे मूलभूत विशलेषण करणारे हे श्लोक आपल्याला नक्कीच शुभ-संदेश देतील. अवश्य ऐका, आवडल्यास like आणि share करा.


विजय रा. जोशी.