Wednesday, March 9, 2022

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 96 ते 100 : ध्वनिफीत.




सारांश श्लोक ९६ ते  १००

तत्व सांगणाऱ्या पुराण कथा आयुष्याचे धडे देतात. भक्त प्रह्लादाची भक्ती-कथा हि युगानुयुगे 

एखाद्या दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करीत आहे. अहंकारामुळे  भगवंत स्मरण रहात नाही, त्याचे महत्व

वाटत नाही. आणि मग वाढत जाणारा अहंकार आपल्याला नामस्मरण भक्ती पासून दूर घेऊन जातो.

जीवन दैन्यवाणे होते. रामदास स्वामी आपल्याला या वास्तवाची जाणीव करून देत आहेत 

आणि वेळीच नामस्मरणाच्या सन्मार्गने जायचे प्रेमाने सुचवत आहेत. राम-नामाने पाषाण तरले 

अशी कथा सांगतात. तसे मानवी जड बुद्धीचे जीवन (मानवी पाषण), देखील सत्कर्माने, भगवंत भक्तीने

तरुन जातात. पण मनात विकल्प, संशय असला तर हे घडत नाही, म्हणून मनापासून, कर्तव्य बुद्धीने,

श्रद्धेने, नम्रतेने, आणि सातत्याने साधना सुरु ठेवावी. 

जेव्हा आपण काशी सारख्या कोणत्याही मन पावन करणाऱ्या ठिकाणी संवेदनशील भक्ती- भावनेने

वास्तव्य करू त्यावेळी आपल्याला त्याची महती कळेल, आपली श्रद्धा आपल्यला आगळे समाधान देईल. 

कधी ध्यान, कधी कर्म, कधी ज्ञानमार्ग, कधी भक्तिमार्ग… आपण सर्व करण्याचा प्रयत्न करतो, पण

काहीही “यथासांग” होत नाही. काम कुठले ही आपण पत्करू शकतो , पण ते एकाग्रतेने, समर्पण वृत्तीने

आणि अलिप्ततेने करायला हवे अशी संतांची, ज्ञानी माणसाची भूमिका असते. ती आपणसुद्धा कशी

साधावी आणि त्यासाठी अखंड नामस्मरण कसे उपयुक्त आहे 

सर्वांचे आयुष्य सन्मार्गी लावणारे हे श्लोक मौल्यवान माहिती देत आहेत. विवेचन जरूर एका, 

आणि योग्य वाटल्यास इतरांना ऐकायला सांगा. 



विजय रा. जोशी 




Friday, February 25, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 91 ते 95 : ध्वनिफीत.



सारांश , श्लोक 91 ते 95. 

चांगल्या स्थितीत असताना देवाचे स्मरण ठेवा. संकट आले, आजारपण आले, फक्त अशा वेळी देवाचा

धावा उपयोगी होईलच असं नाही. 

भगवंत म्हणजे नेमकं काय ? त्या पर्येंत पोहोचण्यासाठी नेमके काय करावं ?       

हे व्यक्तीनिहाय स्वतंत्र असू शकते.  देव वर्णन हे नेमके नाही कारण तो अवर्णनीय आहे. 

आपले सर्व दोष , जन्म जन्मांतरीचे दोष  जर घालवायचे असतील तर मनःपूर्वक केलेली देव भक्ती घडली पाहिजे. 

भगवन्त जीवाची सर्व व्यवस्था करीत असतो. 

व्यवहारात अनेक गोष्टी निभवायला लागतात, त्यामध्ये कितीतरी वेळा आपल्या कडून चुकीचे गैर असे वर्तन होते,

वाणी अपवित्र होते.  

पवित्र भाषेने, नामस्मरणाने वाणी पवित्र होते….  हळूहळू पवित्र होते. वर्तन शुद्ध होऊ लागते.

जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने (म्हणजे सर्व पाप-कार्यें सोडून देऊन ) 

माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा.

राम नामाने, नामस्मरणाने, सत्कर्माने सर्व कल्याण घडेल. 

नामस्मरणाचे महत्व सांगणारे हे विवेचन जरूर ऐका , आणि आवडल्यास इतरांना ऐकायलाही सांगा. 



विजय रा. जोशी. 







Wednesday, February 16, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 86 ते 90 : ध्वनिफीत






सारांश , श्लोक ८६ ते ९०. 


मूलभूत क्रांती होऊन व्यक्तिमत्व सर्वांगीण पद्धतीने विकसित होण्याची प्रक्रिया समर्थ आपल्याला सांगत आहेत. काम, वासना प्रत्येकाला जीव-धारणेसाठी आवश्यक आहेत. त्या जर अमर्याद असल्या तर त्यांचा त्रास होतो. पण रामभक्ताला हा “अति पणाचा” त्रास होत नाही. 

नामस्मरणाचे कार्य आणि उद्दिष्ट “चित्त-शुद्धी” हेच आहे. चान्गले, साजिरे, सुंदर सोपे, बिन पैशाचे आणि आपल्याला अत्यंत लाभदायक नाम आहे. पण आपण त्याचे महत्व पूर्णपणे ओळखत नाही. 

भोजनाच्या वेळी आणि समूहात, एकत्र असताना, दोन्ही वेळा आपल्याला रामाचा उच्चार, नामघोष करावा असं सांगितलंय. इथे आदराने, श्रद्धेने, म्हणायला सांगितले आहे.

अन्न  तुमच्या ताटात येण्यापूर्वी किती लोकांचा हातभार लागला असतो, त्यांच्याबद्दल, त्यांच्या मध्ये असलेल्या त्या परम तत्वाचे स्मरण , चिंतन म्हणजेच हरि-चिंतन. ते करीत असता अत्यंत समाधानाने जर भोजन केले तर त्याचा वैयक्तिक आणि सामुदायिक परिणाम हा उत्तमच असणार. 

सध्याच्या जीवनक्रमात जे आपल्या लक्षात कधीच येत नाही,  ते समजवण्याचा हा श्रीसमर्थांचा वडिलांच्या मायेने प्रयत्न आहे. 

या पाठातील संदेश आपण जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायची शिफारस करा, ही  विनंती !



विजय रा. जोशी. 






Sunday, February 6, 2022

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 81 ते 85 : ध्वनिफीत



सारांश श्लोक 81 ते 85 . 


मत्सर घात यावर समर्थांचा भर आहे, कारण मत्सर हा मानवी जीवनात फार मोठा धोका आहे.

मत्सराच्या उदभवामुळे माणसाचे जीवन भकास, नष्ट, अतीव दुखी होते. ... 

अतिशय नकारी, भयंकर, विनाश-कारक भावना म्हणजे द्वेष आणि मत्सर.

हे मना ! तू मत्सरात शक्ती घालवून नामाला विसरू नकोस, स्वतःचा घात करू नको.

मत्सरा सारख्या नकारी, भयंकर भावना नाहीशा करण्याची शक्ती ही अखंड नाम-स्मरणात आहे.

आणि या नाम-साधने बरोबर दुसऱ्या कुठल्याही साधनेची सोपेपणात  तुलना होऊ शकत नाही. 

रामनामाने प्राप्त होणारी स्थिती हि ‘विश्राम’ स्थिती आहे. आणि ही  विश्राम स्थिती प्रत्येकास हवी

असते. जेव्हा आपण संपूर्णपणे साधना कार्यास समर्पित राहू तेव्हा आपली स्व-शुद्धी प्रक्रिया पुढे जात

राहून अंतिमतः आपल्याला “खरा विश्राम” लाभेल.

नामस्मरणाच्या जोडीला अखंड साधनेतून, सत्कर्मातून जेव्हा व्यक्ती सातत्य पूर्ण कार्य करीत राहील, 

तेव्हा आत्म-शुद्धी, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडतो. 

समस्त उपायांमध्ये “नाम स्मरण” हे सार आहे. 

भगवंत-स्वरूप प्राप्त झालेले संत, सद्गुरू आपल्याला हे मार्गदर्शन उपलब्ध करून देतात , 

त्याचे महत्व आपण ध्यानात ठेवले पाहिजे. 

सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये नाम-स्मरणाचे महत्व अधोरेखित करणारे हे विवेचन जरूर ऎका  

आणि आवडल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 


विजय रा. जोशी. 







Wednesday, January 26, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


प्रभाते मनी राम चिंतीत जावा”॥  कृतज्ञता दिनानिमित्त विशेष पाठ




“प्रभाते मनी राम चिंतीत जावा”॥  श्लोक सारांश. 

श्लोक ६७ - पराक्रमी श्रीराम भक्ताचे संकटापासून रक्षण करतो. 

६८ -  ज्याच्या समोर प्रलय काळ हि थरथरतो. त्याचे नाम घ्यावे. गुण घ्यावे. 

६९ -   माणसाने भक्तिमार्गावर असतांना कधीही अनीती, द्वेष-मत्सर करू नये. 

७० -   अहंकार आणि आळस त्यागून सातत्याने नाम-स्मरण करावे. 

७१ -    नामस्मरणाने दोष कमी होतात, पुण्य संचय घडतो. 

७२ -   खर्च आणि कष्ट नसलेले नामस्मरण करीत असता संसारापासून  शक्य तेवढे अलिप्त असावे. 

७३ -    महादेव सुद्धा ज्याचे नाम जपतात त्यास (संसार) दुःख भोगावे लागत नाही. 

७४ -    व्रते, दाने, उद्यापने असे काहीही न करता  दिन-दयाळू परमेश्व्राचे मनन करता येते. 

७५ -    नामस्मरणाचे सांगितलेले हे महत्व मान्य होत नसेल तर अभ्यास करून किंवा अधिकारी

              व्यक्तीच, गुरूंचा सल्ला घेऊन ते महत्व समजून घ्यावे. 

७६ -    मनाची चंचलता माणसास कोठेही स्थिर होऊ देत नाही. नामावरील विश्वास माणसाला

            सन्मार्गावर स्थिर ठेवतो. ……………..श्रीराम


या श्लोकांच्या निमित्ताने प्रभात काळी साधना कशी करावी या बद्दल पूज्य स्वामी विज्ञानानंद

सूचित विचार येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

पाठ आवडल्यास तो इतरांना ऐकण्याची शिफारस जरूर करावी, ही विनंती.


विजय रा जोशी.



Monday, January 17, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 76 ते 80 : ध्वनिफीत




सारांश , श्लोक 76 ते 80 . 

समर्थ सांगताहेत : राघवाची भावना ठेव म्हणजे भाव ठेव याचाच अर्थ त्याचा कोठेही अभाव नाही  हे तुझ्या मनात पक्के असू दे.  संसार, व्यवहार हा जर खरा मानला ,त्यासाठीच जर आपण आपले नित्य वर्तन ठेवले तर हे साध्य होणार नाही. म्ह्णून अंतिम सत्य काय हे पक्के ध्यानात ठेवून त्या अंतिम सत्यासाठी, परमात्म्यासाठी जर आपण जगलो तर चुकीच्या भयाने आपण ग्रस्त होणार नाही. आणि चुकीच्या ध्येयांची धारणा आपल्या जीवनात स्थिर होणार नाही. 

आपल्या जीवनातील घात टाळण्यासाठी योग्य ध्येय, योग्य साधन, योग्य हेतू, योग्य सुख-संकल्पना असाव्यात आणि त्यावर स्थिर रहाण्यासाठी मत्सरासारख्या  वाईट विकारांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवावे असे मार्गदर्शन आपल्याला येथे समर्थ रामदासस्वामी करीत आहेत. 

थोडक्यात आपले वर्तन दोष कमी होण्यासाठी असमतेच्या जीवनाकडून समतेच्या जीवनाकडे आपण निरंतर प्रवास, प्रगती करीत राहावे. 

आपल्या भाग्याने आपल्याला या आर्जवाचे आवाहन भिडावे, त्याप्रमाणे आपल्या हातून कृती व्हावी अशी आपण समर्थ चरणी प्रार्थना करू या. 

हा संदेश सविस्तरपणे या ध्वनिफितीत ऐकावा आणि  योग्य वाटल्यास इतरांशी शेअर करावा ही नम्र विनंती. 


विजय रा. जोशी. 



Tuesday, January 4, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 71 ते 75 : ध्वनिफीत




सारांश श्लोक ७१ ते ७५. 

साधनेत वर्तन काटेकोरपणे जपायला हवे.  प्रथम आपण चुकत आहोत हेच माणसाला मान्य नसते.  पण कोणत्यातरी निमित्ताने काही तरी करायला हवे याची तीव्र जाणीव होऊ लागली तर माणूस उपायांकडे बघतो. अशा लोकांस मार्गदर्शन करणारे मनाचे श्लोक (७१ - ७६), “प्रभाते मनी राम चिंतीत जावा” असा उपाय देतात. 

नामस्मरणांनी लगेच हे दोष जातील का ? तर नाही मग त्याने काय होईल? हळूहळू आपल्या दोषांची जाणीव होते. इतरांचे दोष पाहणे कमी होते. पैसे लागत नाही, कष्ट होत नाहीत . एकाग्रतेने, नम्रतेने, भगवंताची आळवणी करायची. 

पण येथे काय मागायचे ? तर शाश्वत सुख, भगवंताशी एकरूपतेचा आनंद. बाकी काही भौतिक, सांसारिक सुख मागायचे नाही. नामस्मरणासाठी साधने, संपत्ती , कार्य-कर्म काही लागत नाही जर काय लागत असेल तर तो भगवंत प्राप्तीचा संकल्प, निर्धार, आस !!  

जर हे पटत नसेल तर सर्व अभ्यास स्वतः करावा, स्वतः करणे होत नसेल तर सद्गुरू शोधावे, सद्गुरूंची परीक्षा आपल्या बुद्धीप्रमाणे करून घ्यावी. आणि एकदा सर्व शन्का फिटल्या कि मग मात्र त्यांचा उपदेश, त्यांचे सांगणे बिनशर्त पाळावे, त्यात संशयी वृत्तीने , विविध सबबीने बाधा आणू  नये. 

समर्थ आपल्याला सांगत आहेत ते असे – 

दिवसाची सुरवात रामनामाने करा आणि दिवसभर रामनामाच्या निष्ठेने वैखरी, प्रकट बोलणे, वागणे करत प्रत्येक दिवस साजरा करीत जा. या श्लोकांतील संदेश आपल्याला उचित मार्गदर्शन करतो. 

श्रीराम II


विजय रा. जोशी.