N. P. 9 / 11. ७ मार्च २३ सायंकाळ
शेठाणी घाट नर्मदा पुरम (पूर्वी होशिंगाबाद).
येथे अनुभवलेले दोन अडीच तास हा या नर्मदा परिक्रमेचा एक climax point होता.
शांत सायंकाळ. मंदिर परिसर, गोपुरांच्या आकाश रेखांनी नटलेला नर्मदा मय्याचा किनारा , विस्तीर्ण शांत, स्वच्छ, मंद प्रवाहित पाणी, नदीचा दुसरा तट देखील असाच शांत, सुंदर, विलोभनीय.
आस्तिकच नव्हे तर नास्तिकाची चित्त-वृत्ती उल्हसित व्हावी असा तो मंगल, पवित्र परिसर.
आज आम्हाला आमच्या टूर व्यवस्थापनाने वेळेचे
बंधन ठेवले नव्हते. निवांत पणे आम्ही अगोदरच टेमबे स्वामी, गुळवणी स्वामी यांच्या पूर्व अस्तित्व तरंगांनी भारलेले एकमुखी दत्त मंदिर पाहून शेठाणी घाटावर आलो होतो.
प्रशस्त घाटावर योग्य अशी जागा पाहून स्नान केले . खूप छान वाटले, नंतर विधीवत नर्मदा मय्याची पूजा केली, दीपदान झाले. काही स्तोत्रपाठ केला, सर्व कल्याणाची स्व-अंतःकरण शुद्धीची प्रार्थना अत्यंत श्रद्धेने, कृतज्ञतेने केली .
आणि मग दुसऱ्या बाजूच्या घाटा वर सुरु झालेल्या लगबगीने आमचे लक्ष वेधले. आज येथील होळी पूजनाचा दिवस होता आणि त्या निमित्त घाटावर अति भव्य आणि देखण्या महा -आरतीचे आयोजन सुरु झाले होते.
लिंक महाआरती. (आमचे शूटिंग)
https://photos.google.com/photo/AF1QipNF1o-6D40MhT0gVCA50R_qZoNuqKlZAxQdVz3M
घाटाच्या वरच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर आरती धारकांसाठी पाच उंच आसने आणि त्यासमोर आरती पूजेसाठी मांडणी केली होती. . सोन्यासारखे चकाकणारे अनेक पाज्योती धारण करणारे आरती दिवे एका हातात तर दुसऱ्या हातात मंजुळ आवाज करणाऱ्या घंटा घेतलेले आरती धारक विशिष्ट अशा गणवेशात होते.
त्यांच्या उजव्या बाजूस शेण्यानी रचलेली होळी होती. होळीची बाजूला उंचावर पुरोहितांची स्वतंत्र व्यासपीठ तर त्यांच्या दुसऱ्या बाजूस आरती, भजन स्तोत्र म्हणणाऱ्या भगिनींसाठी बैठक आणि माईक सिस्टिम होती. वाद्य वृंद सज्ज होता, आरती धारकांच्या मागे घाटाच्या पायऱ्यावर लोकांना बसण्यासाठी विस्तीर्ण जागा होती. ती सर्व जागा जवळ जवळ भरली होती. आम्ही सर्व यात्रेकरूनी तेथे सोयीच्या जागा पाहून बसून घेतले.
कार्यक्रम आखीव, रेखीव होता. कार्यक्रमात
म्हणायच्या आरत्या, स्तोत्रे वगैरे ची पत्रके सर्वांना वाटण्यात आली आणि मग नर्मदा, होलिका पूजन झाल्यावर अत्यंत दिमाखदार अशा आरतीला मंगल वाद्यवृंदाच्या साथीने सुरवात झाली.
एकत्र भावाने म्हंटली गेली ती स्तोत्रे, त्या आरत्या, नर्मदाष्टक वगैरे म्हणणाऱ्या गायक-गायिकांच्या अत्यंत सुरेल स्वरांनी उपस्थितांची मने भक्तीत चिंब झाली, सात्विकतेने भारून गेली.
समोर उभे असलेले आरती धारक त्यांच्या करकमलातील आरती आणि घंटा विशिष्ट तालात, सुरात चारी बाजूस लयबद्ध पद्धतीने फिरवतांना पहाणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. नुकतेच स्नान , पूजा करून पुनीत झालेले मन प्रसन्नतेने पुलकित झाले. आता रोज म्हणून सरावाचे झालेले नर्मदाष्टक सुरेल, एकत्रित पद्धतीने, गायकवृंदाच्या साथीने म्हणताना, ऐकताना आज तर नर्मदा मय्याचे आशीर्वचन मिळाल्या सारखे वाटले.
आरती झाली, नर्मदाष्टकांनी कान , मन, अंतःकरण तृप्त झाले मग गुरुजींनी होलिका दहनाचे मन्त्र उच्चारायला सुरवात केली . पूजकांनी पुरोहितांच्या सल्यानुसार होलिका पूजन केले अग्नि प्रज्वलीत झाला. होळीची तेजोवलये आकाशाकडे प्रवाहित
होऊ लागली आणि मग त्या होलिका उत्सवाचा सामुदायिक आनंद सर्व जण एकमेकांच्या अंगावर फुलाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून घेऊ लागले.
वातावरण आनंदाने, भक्तीने, अंगावर बरसणाऱ्या
फुल पाकळ्यातील मय्याच्या परमेश्वरी आशीर्वादाच्या स्पर्शाने भारून गेले आणि त्या पवित्र क्षणी यात्रेला मिळालेल्या आशीर्वाद प्रसादाचा अवर्णनीय अनुभव माझ्या अंतरी विशाल झाला. नंतर इतरांशी बोलतांना याच प्रकारच्या एका अद्वितीय अनुभवाचे साक्षी आम्ही सर्वच सह-प्रवासी झाल्याचे एकमेकांना समजले, आकळले. (महाआरती गुगल लिंक)
या बहरलेल्या वातावरणात अंगावर पडलेल्या काही फुल पाकळ्या संभाळीत, त्या अद्वितीय धार्मिक, सामाजिक, पारंपरिक, अलौकिक अनुभवाच्या धुंदीत गर्दीतून वाट काढीत आणि मिळेल ते वाहन पकडीत आम्ही सर्व रात्री उशीरा लॉजवर आलो.
(हॉटेल अग्निहोत्री), नर्मदापूरम.
N. P. 9 / 12.
पुढे
No comments:
Post a Comment