Thursday, August 31, 2023

 N. P. 11 / 11                 ९ मार्च २०२३                                                         


सकाळी उठून सर्व आवरून ८ च्या सुमारास ओंकारेश्वर कडे निघालो. 



नर्मदेवर जाऊन स्नान केले. नंतर सर्वांनी एकत्र बसून घाटावर यात्रा समाप्ती पूजन, आरती, नर्मदाष्टक वगरे सर्व कार्यक्रम झाले त्यानंतर ममलेश्वर दर्शन केले, गर्दी त्या मानाने खूप कमी होती . दर्शन शांततेत झाले. 


दर्शन घेऊन मग घाटावर आलो. झुलता बुल बंद असल्याने होडीने पैलतीरी ओंकारेश्वर दर्शनासाठी आलो. वाटेत नदी मध्यात घरी नेण्यासाठी आणि ओंकारेश्वर चढविण्यासाठी नर्मदाजल बाटल्यात भरून घेतले. 


ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती, दुपारी १२ २० ला मंदिर बंद होण्या अगोदर दर्शन व्हायला हवे होते. आमचे एक सह प्रवासी येथून वरॊदरा येथे जाण्यासाठी १ वाजे पर्यत निघायचे होते.  दर्शन क्षणभरच झाले. नर्मदा जल ओंकारेश्वर पिंडीवर चढविले. (अभिषेक केला, किंवा ,म्हणा ओतले. कारण तेथे प्रचंड गर्दीचा रेटा होता). प्रवासात सर्वत्र आणलेले आणि ठीक ठिकाणी भरून घेतलेले नर्मदा जल , श्री पटेल बोरिवली यांनी ओंकारेश्वरी चढवले आणि आणि सांगता झाली. 




नंतर बाहेर आलो. प्रसादाचे लाडू अनिकेतला  (अनिकेत सोनार, वय ३३ वर्षे , सर्वात तरुण सह-प्रवासी) आणायला सांगितले. तो सर्वांना यथाशक्ती मदत करीत असे. नंतर वर असलेल्या महाकालेश्वर मंदिरात अतिशय शांततेत रुद्र पाठ गुरुजींनी केला. आरती झाली आणि मग तेथून सर्व बाहेर पडलो. परत नर्मदा पात्र पार करून ममलेश्वरी आलो. वाटेत बाजारात नर्मदा गोटे, शिवलिंग आदी खरेदी केली. काही गोटे अगोदरच स्नान करताना नेमावर (नाभस्थान) येथे पात्रातून बुडी मारून काढले होते. येथून न्यायला आणि घरी भेट द्यायला प्रसाद आणि अशा गोष्टी उपलब्ध असतात. 








आटोपून लॉजवर आलो तेव्हा तीन वाजून गेले होते. नंतर साग्रसंगीत जेवण झाले. सायंकाळीं पाच वाजल्या नंतर तेथील गुरुजी कुमारिकांना घेऊन येणार होते. नर्मदा यात्रेत कुमारिका पूजनाचे विशेष महत्व आहे. ते आज सायंकाळी करायचे आहे. 


(नर्मदा हि कुमारिका आहे अशी मान्यता असल्याने या यात्रेत कुमारिका पूजेचे महत्व आहे. देवी भागवतात नवकन्यांचे महत्त्व प्रतिपादित करण्यात आले आहे. दोन ते दहा वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन आणि मान-पान केले जाते. यांनाच कुमारिका असे म्हटले जाते. कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बल वृद्धिंगत होते. यामध्ये तीन वर्षाच्या कन्येला त्रिमुर्ती, चार वर्षाच्या कन्येला कल्याणी, पाच वर्षांच्या कन्येला रोहिणी, सहा वर्षाच्या कन्येला कालिका, आठ वर्षांच्या कन्येला शांभवी आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा, दहा वर्षांच्या कन्येला सुभद्रा म्हटले जाते. या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेकविध लाभ मिळतात.)


कुमारिकांना देण्यासाठी काही उपयुक्त गोष्टी, खाऊ यांची २० -२५ पाकीटे  अगोदरच स्मिताने तयार करून दिली होती. वाटेत  अनेक लहान वयातील गरजू मुली भेटल्या तेव्हा त्याचे वाटप आणि १५/२० रुपये असे प्रत्येकीस वाटले होतेच. आज होणारे कुमारिका आणि सुवासिनीपूजन हे विधिवत होते.) 


सायंकाळी ६ नंतर शाळा सुटल्यानंतर गुरुजी पाच कुमारिका आणि एक सुवासिनी सह आमच्या निवास स्थानी आले. मग त्या सर्वांना एकत्र बसवून भगिनी यात्रिकांनी त्यांची पूजा, सन्मान करून भेट वस्तू आणि यथाशक्ती धन दान केले, सुहासिनींची ओटी भरून त्यांचाही सन्मान आणि दान केले. बंधू यात्रिकांनी देखील कुमारिका पूजन केले . सुवासिनी पूजनासाठी भगिनी यात्रिकांची मदत घेतली. 


या व्यतिरिक्त गुरुजींनी जे सेवा कार्य, पूजा आणि अन्य धार्मिक कार्य केले त्यासाठी सर्व यात्रिकांनी आपापली वर्गणी दिली (एकूण रु. (१०० +३००) प्रत्येकी). हि सर्व रकम एकत्रितपणे गुरुजींना दक्षिण म्हणून दिली. 

येथे सर्व यात्रा उपक्रम संपन्न होतो. 

सायंकाळी सर्व जण परिसरात आरामात ग्रुपमध्ये गप्पा मारत फिरत होते. काही भगिनी साधक विशेषतः कोल्हापूरच्या भगिनी माझ्या  कडे येऊन काही गोष्टी सांगा म्हणाल्या, त्यांना मनाचे श्लोक निर्माण झाले त्याची गोष्ट सांगितली. भक्ती म्हणजे, उपासना म्हणजे काय ? रोजच्या कर्माला साधनेचे स्वरूप समता हेतू ने कसे द्यायचे , देव भक्ती म्हणजे देव आदर्शचे  आचरण, समता हा निसर्ग नियम, विश्वाच्या संचलनात समता दिसते, पण याच विश्वाचा अत्यंत सूक्ष्म घटक असलेल्या माणसास विषमता प्रिय असते. आणि म्हणून विश्व नियमांचे पालन थोड्या तरी निस्वार्थ वर्तनाने कसे साधता येईल, आणि जीवन सुखी कसे करता येईल या बद्दल स्वामीजींनी सांगितलेल्या , मनशक्तीत समजलेल्या काही गोष्टी सांगितल्या. त्या त्यांना खूप भावल्याचे दिसले, अर्थात वेळेची मर्यदा असल्याने हा भाग ३० -४० मिनिटात संपवावा लागला. त्या अगोदर आमचे सहा-प्रवासी असलेले श्री आणि सौ हवासखान यांचा लग्न वाढदिवस केक कापून आणि सर्वानी शुभेच्छा देऊन साजरा झाला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन प्रभू ट्रॅव्हल्स तर्फे आठवणीने करण्यात आले, हे विशेष आहे. 



ही  यात्रा सुखकर आणि आनंददायी होण्यासाठी प्रभू ट्रॅव्हल्सच्या बस बरोबर असलेल्या कर्मचाऱ्यांचा वाटा मोलाचा होता. उत्तम प्रवास, वेळेवर पोहोचणे, सुग्रास नाश्ता, जेवण,आणि सर्वांना योग्य तर्हेने सेवा पुरविणाऱ्या बरोबरच्या सात प्रभू ट्रॅव्हल्स स्टाफचा कौतुक, अभिनंदन आणि प्रोत्साहन सोहळा मग सर्व यात्रेकरुंना मिळून साजरा केला. प्रत्येकी रुपये ७०० वर्गणी जमा करून आलेली रक्कम पाकिटातून योग्य त्या कौतुक शब्दांसह त्यांच्या कडे देण्यासाठी एक छोटेखानी पण गोड समारंभ साजरा झाला. मग मंडळी आपापल्या निवास स्थानी विश्रांती साठी गेली. परिक्रमेचा १३ वा दिवस आणि यात्रेचा १४ व दिवस संपन्न झाला. 


दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला मुंबई कडे प्रवास सुरु झाला, एखाद तास ट्राफिक मध्ये अधिक गेला. 


Link   रोकडोबा मंदिर 


https://photos.google.com/photo/AF1QipPyePts203JjRn8AnFqjYsEIczwEuBXCU2-MIju



आर्वी येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरात बस थांबली. 

वाटेत भोजनासाठी थांबलो तो राम हनुमान मंदिर देऊळ वाडा, तेथे चालू असलेली अखंड रामधून आणि परिसरात उन्हात निश्चल बसलेला हट योगी हे सर्व वैशिष्ठयपूर्ण होते. मंदिर परिसरातील झाडांच्या पारावर यात्रेतील हे शेवटचे भोजन. तो  स्वाद सर्वानी घेतला. 



रात्री सुमारे ११ वाजता ठाणे ज्युपिटर हॉस्पिटल जवळ बस मधून उतरलो. नंतर उबेर कॅब करून पनवेल ला रात्री १२ च्या नंतर पोहोचलो. बरोबर पुण्याचे खवासखान जोडपे होते. त्यांना कारंजाडयात त्यांच्या मुलीकडे जावयाचे होते. मला घरी ड्रॉप करून ते पुढे करंजाडयास गेले. 


१५ दिवसाची नर्मदा परिक्रमा सफल संपन्न झाली. 


ओम नर्मदे हर ! मंगल मूर्ती मोरया. !!  हरी ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु !!!





विजय रा. जोशी.




    (समाप्त) 


No comments:

Post a Comment