Thursday, August 31, 2023

 N. P. 6  / 11.     ४ मार्च सकाळ 



जबलपूर गौरी घाट. 



नदी पात्र रुंद आहे. घाट बांधीव आहेत. विशेष कोणी घाटावर नव्हते. सकाळचा रम्य प्रहर होता. नुकताच सूर्योदय झाला होता. 


नर्मदाष्टक आणि आरती लिंक. 

https://photos.google.com/photo/AF1QipPdq7dQJOH6-nGeJ7ENhByKn888ai0P204lzV34


तिथे विधिवत नर्मदा पूजन, आरती, दीपदान वगैरे कार्यक्रम झाले. आरती,नर्मदा अष्टक म्हंटले.  नंतर पूर्ण दिवस प्रवास करून सायंकाळी अमर कंटक येथे आलो. 


साध्वी भेट.


सकाळी गौरीघाट जबलपूर येथे आरती, पूजा वगैरे सर्व झाल्यावर दिवसभर प्रवास होता. सायंकाळी अमरकंटक येथे आलो. तेथे कपिल धारा या ठिकाणी नर्मदा नदी अत्यंत छोट्या प्रवाह धारा मध्ये वाहत आहे. येथे  कपिलमुनी यांची समाधी व अन्य समाधी आहेत. तेथे दर्शन झाले. काही मंडळी खाली उतरून जाऊन दुग्ध धारा प्रवाह पाहून आले. मी पाय दुखत असल्याने तिथे जाणे टाळले. 



शेजारीच श्री श्री नर्मदा स्वरूप मिरामाई यांचा आश्रम आहे. या एकांत अशा ठिकाणी गेली अनेक वर्षे त्या रहातात. पायी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या यात्रेकरूंना येथे अन्न दिले जाते. प्रभू ट्रॅव्हल्स नेहमी आपल्या यांत्रकरुंना माईंचे दर्शन आणि भेट घडवून आणतात. मीरा माई, ज्या सिद्धमाई म्हणून सुद्धा ओळखल्या जातात, त्या सुमारे ११० वर्षे वयाच्या आहेत असे समजले. 

माईंना प्राप्त असलेल्या सिद्धीचे अनुभव जे पूर्वी श्री देसाई किंवा त्यांचे बरोबर असलेल्या काही मंडळींना आले, त्याची माहिती त्यांनी बसमध्ये दिली. होती. 


अलीकडे साध्वी वयोमानाने कुठे जात नाहीत. पडूनच असतात. त्या थकलेल्या दिसत असल्या , तरी त्यांचे बोलणे स्पष्ट आणि धारदार होते. 

आम्ही गेलो तेव्हा बहुधा त्या परिसरातले काही स्त्री पुरुष त्यांना भेटायला आले होते. 

आम्ही सर्व  त्यांच्या साठी तिथे बसून होतो. असलेल्या मंडळींशी त्यांचे जे बोलणे झाले, त्यावरून असे लक्षात आले कि, परिसरातील  लोकसेवा उपक्रमात आणि तेथील कामात माईंचे  पूर्ण  लक्ष होते. त्या बद्दल बारीक सारीक माहिती लोकांकडून त्या जाणून घेत होत्या. आणि पुढे काय करावे, कसे करावे, या बद्दल अत्यंत तपशीलवार सूचना देत होत्या. माईंना स्वतःचा संसार नव्हता पण समाज संसार व्यवस्थित चालावा यासाठ त्या त्यांच्या वृद्ध, जर्जर अवस्थेत सुद्धा काळजी घेत होत्या. तळमळत होत्या, 

त्यांची ती खोली म्हणजे प्रचंड पसारा होता. मधेच एक कुत्रा येऊन सर्वत्र फिरून आणि थोडा वेळ माईंच्या जवळ बसून गेला. सर्व सामान अस्ताव्यस्त होते त्यातच प्रवेश दरवाज्या समोर आपल्या हांतरूणावर माई पडल्या होत्या. 


प्रभंजनने त्यांनाआमच्या येण्याचा  प्राथमिक उदिष्ट सांगण्यासाठी तोंड उघडले, आणि त्या कडाडल्या , “क्या आकेले आये  हो?  देवी की पूजा नही करोगे ? कौन साथ आया है”?


प्रभंजनने आपली बीबी बरोबर असल्याचे सांगितले. त्यांनी जवळ बोलावून फटकन त्याच्या तोंडावर एक चापटी / थप्पड मारली. नंतर त्या खोलीत  बाजूला असलेल्या देवीची पूजा (बहुधा नर्मदा देवीची तसवीर) करण्यास सांगितले.  माझा रूम  पार्टनर शेखर पुढे आला. त्याने देवीची शास्त्रोक्त पण थोडक्यात पूजा केली. 


कर्मकांडापेक्षा मनाचे भाव, मनाची शुद्धी हे सर्व महत्वाचे असे आहे. असे सर्व त्या सांगत असताना, आमच्या पैकी एकेक जणांनी त्यांच्या पाय पडून शेजारील तबकात काही दान टाकले, त्या सांगत होत्या मला तुमच्या पैशाचे नाही तर तुमच्या मनातील भावाचे, भक्तीचे महत्व आहे. शेखरची आई सुमारे १० - १२ वर्षांपूर्वी प्रभू ट्रॅव्हल्स मधून नर्मदा परिक्रमा करण्यास आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाचा संकट काळ सुरु होता. शेखरच्या कल्याणाविषयी बहुधा त्यांनी येथे प्रार्थना केली होती. हे सर्व शेखरनेच मला सांगितले. पण विशेष गोष्ट अशी की नेमकी  त्याच्या हातून साध्वीनी देवीची विधिवत पूजा करून घेतली. आणि ‘ठीक रास्तेपर चाल रहे हो’ - असा त्यास संदेशही दिला.


निस्वार्थ, साधनेने होणाऱ्या अंतर्ज्ञानाचा हा अविष्कार असावा असे मला वाटले. 

हे सुरु असतांना आमच्यातील एक यात्री आणि सुरेल गायिका परांजपे ताई यांनी एक छान हिंदी भजन म्हंटले. ते एकाग्रतेने ऐकत असताना साध्वीच्या डोळ्यात थोडे पाणी आले. त्या क्षणभर भाव विभोर झाल्या. त्यांना बरं  वाटले. 


“तबकात किती पैसे टाकले” ? त्यांनी परांजपे ताईंना विचारले. 

“पाहीले नाहीत. माझ्या हातात आले ते टाकले” परांजपे ताईंच्या उत्तराने माताजींना  समाधान वाटल्याचे दिसले. नंतर कळले की त्यांनी समर्पित केलेली जी रक्कम होती ती त्यांच्या पर्स मध्ये सायंकाळी परत आली होती.  


अधिक काही गोष्टी झाल्यावर बाहेर  असलेल्या इतरांना आत येण्यासाठी आम्ही सर्व एकेक बाहेर आलो. एक वेगळाच अनुभव मिळाला. वाटला . 

नंतर बसने hotel, maikal , अमरकंटक येथे रात्रीच्या विश्रांतीसाठी आलो.   



N. P. 6  / 11

                                                                          पुढे ...


No comments:

Post a Comment