हे दोनशे मनाचे श्लोक ऐकले (आणि त्यातील शिकवण वर्तनात आणण्याचा प्रयत्न झाला) म्हणजे सारे दोष नष्ट होतात. औषध घेतले म्हणजे रोग जातो तसेच हे आहे. आपले मन नाना विषयांच्या विचारांनी व्यापलेले असते. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, निर्दोष-सदोष अशा सर्व प्रकारच्या विकारांनी मनात गर्दी केलेली असते. काळे ढग जसे आकाश आच्छादित करून वातावरणात अंधार पसरवत असतात तसेच हे मनातले दोष आपल्या जीवनात अंधार आणतात. पण जेव्हा वारा त्या ढगांना उडवून लावतो आणि आकाश पुन्हा स्वच्छ, निरभ्र होते तसे हे मनाच्या श्लोकांचे श्रवण ते दोष उडवून लावतात आणि मनाला भक्तिमार्गावर घेऊन जातात. पण ऐकणाऱ्याने ते नुसते ऐकणे पुरे असत नाही.
‘अर्थांतर पाहिल्याविण l उगेचि करी जो श्रवण l तो श्रोता नव्हे पाषाण l मनुष्यवेषें ll
(दासबोध, द८, स६, श्लो७).
अर्थ समजून घ्यायचा तर लक्षपूर्वक, विश्वासून ऐकले पाहिजे. तेव्हा कोठे आपले दोष समजून येतील, आपण कुठे चुकत होतो ते समजेल आणि मग भक्तिमार्गाची साधना करता येईल. ही साधना केवळ बुध्दिमंत साधकच करू शकेल असे नाही, तर मतीमंद व्यक्तिदेखील करू शकेल असा परिणाम हे श्लोक साधतील.
इथे मतीमंद म्हणजे आज आपण जो अर्थ घेतो तसा मंदबुध्दी, लवकर बोध न होणारा असा नाही घ्यायचा. तर ज्याच्याकडे बुध्दी आहे परंतु तिच्यावर अज्ञानाचे, दुराग्रहाचे – ज्याला इंग्रजीत ईगो म्हणतात – जळमट साठलेले आहे, आत्मज्ञान करून घेण्याकडे प्रवृत्ती नाही असा. योग्य प्रकारे केलेले, श्रध्दापूर्वक, केलेले या मनाच्या श्लोकांचे श्रवण अशा माणसांच्या बुध्दीवर आलेला झाकोळ नाहीसे करते. आणि मग काय होते? तर अशा झाकोळरहित, जागृत, शुध्द बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश मिळतो, विकारांपासून सुटका होते, वैराग्याचे सामर्थ्य मिळते आणि मनुष्यजीवनातले अंतिम ध्येय असलेली मोक्षप्राप्ती होते. याची ग्वाही समर्थ या अंतिम श्लोकात देत आहेत.
फलश्रुतीचा श्लोक. तुमच्यावर काय परिणाम होईल ते सांगणारा श्लोक.
श्रवण केलियाचे फळ, क्रिया पाळते तात्काळ -- दासबोध फलश्रुती.
(वर्तन बदलेल, सुधारु लागेल. बाकी काही चमत्कार होणार नाही.)
उपासक (साधक) कसा असावा याबाबत मार्गदर्शन करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
"अवगुणांचा करूनि त्याग ! जेणे धरिला संतसंग !!१!! तयासी बोलिजे मग ! साधक ऐसा !!२
देहबुद्धी विवेके वारी ! आत्मबुद्धी सदृढ धरी !! श्रवण मनन केलेचि करी ! या नाव साधक !!"
स्वतःच्या अवगुणांची जाणीव, त्यांचा त्याग करण्याचा संकल्प, सद्गुरुंच्या सहाय्याने ते शक्य होते.
बऱ्याचदा आपले दोष आपल्याला कळत नाही. आपण आपल्या वागण्याचे (चुकीच्या देखील) समर्थन करत असतो. अर्थात मनाचे श्लोक वाचताना, समजून घेताना आपण जे करू ते सर्व शुद्ध बुद्धीने, पूर्ण श्रद्धेने हवे. दासभक्ती भावाने व्हावे तर मुक्तीचा सोहळा आपण अनुभवू शकू. असा समर्थनाचा आपल्याला आशीर्वाद आहे.
हरी ओम तत्सत !
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment