Thursday, August 31, 2023

 N. P. 8 / 11           ६ मार्च 



सकाळी ६ वाजता प्रस्थान. वाटेत नाश्ता चहा. 


येथे रोजचा सर्व साधारण कार्यक्रम असा असे:

सकाळी ३-३० ला उठणे. पहाटे ४ ला गरम चहा, कॉफी , बिन दुधाचा चहा तयार असे.  तो आपल्या सोयीने ४-३० पर्येत घेणे. मग स्नान  इत्यादी सर्व प्रातर्विधी आटोपून सामान पॅक करून , आपापल्या बॅग्स बाहेर बस कडे   घेऊन येणे, ६ वाजेपर्येत बॅग्स लोडींग व्हायचे, आणि बरोबर ६ वाजता बस सुरु व्हायची.


 

नंतर १० मिनिटात सकाळच्या आरत्या, प्रार्थना, स्तोत्र पाठ आणि नर्मदाष्टक सर्वानी म्हणायचे, बस मध्ये अत्यंत चांगली अशी माईक सिस्टम होती. एक टी.व्ही. स्क्रीन देखील होता.  नर्मदाष्टक बहुधा प्रभंजनच्या बरोबर म्हंटले जायचे. हे सर्व साधारण सात पर्येंत म्हणजे सुमारे तास भर चालायचे.


मध्ये वेळ मिळेल तसा “ओम नर्मदे हर” हा जप प्रभू ट्रॅव्हल्सने दिलेल्या वहीत लिहायचा. सर्व पाने भरल्यावे हा जप संख्येने ५००० पेक्षा जास्त होतो. शेवटी परिक्रमा सांगता पूजे नंतर हा जप नर्मदेत समर्पण करायचा. यात्रेला दिलेले हे साधनेचे एक परिमाण खूपच चांगले होते. जप आणि रिकामा वेळ सकारात्मक रित्या घालवणे त्याने शक्य झाले. सर्व यात्रा काळात धार्मिक, सात्विक वातावरण ठेवण्याचा महत्वाचा उद्देश साध्य होण्यासाठी असे काही उपक्रम आयोजकांनी ठेवले, ते नक्कीच कौतुकास्पद होते. 


नंतर ७ - ७-१५ च्या सुमारास प्रत्येकाच्या हातात चालू बस मधेच नाश्ता दिला जाई. जेव्हा शक्य असेल तेव्हा बस थांबवूनही होई. नाश्ता पोटभर असे एकदा दिल्यानंतर ज्यांना पाहिजे त्यांना परत परत दिला जाई. १५ दिवसात वेगवेगळे पदार्थ / डिशेस देत असत. अर्थात पोहे, उपमा, खिचडी वगैरे दोन वेळा दिले गेले. पण बटाटवडे, मिसळ, कटवडे, थाल्पीठे वगैरे सुद्धा गोष्टी होत्या. नाश्ता आणि जेवण रुचकर, घरगुती आणि पोट सांभाळणारे असे.


नाश्ता झाल्यानंतर ८ - ८१५ च्या सुमारास बस थांबविली जाई आणि मग नैसर्गिक परिसरात रस्त्याच्या बाजूला मोकळया हवेत चहा-कॉफी पान आणि नैसर्गिक विधी (१ नम्बर) यासाठी ब्रेक घेतला जाई. प्रवासात दर दोन तासांनी हा ब्रेक असे. कधीही बस प्रवास रात्री केला गेला नाही. वाटेत स्थळ दर्शन प्रमाणे बस थांबविली जाई. उतरण्या अगोदर त्या त्या स्थळाचे महत्व,महात्म्य, पप्पा देसाई विस्तृतपणे स्वतःच्या कंमेंट्स सकट सांगत असत. परत येण्याचा वेळ दिला जाई. आणि प्रभू आणि रागिणी ताई हे दोघेही आमच्या बरोबर मार्गदर्शनासाठी असत. सर्वांवर लक्ष आणि ग्रुप एकत्र असण्याची काळजी घेत. ज्यांना विशेष मदतीची गरज असे, त्यांना आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन देखील करत असत. वातावरण घरगुती आणि खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न असे. 


दिंडोरीहून महाराजपूर या प्रवासात बस चहासाठी थांबली ते नैसर्गिक, एकांतातले आणि वन्य भागातील एक ठिकाण होते. सर्व परिसर निसर्गाने नटला होता. बसच्या पुढील बाजूस थोडे पुढे गेलो. वाटेत जमिनीवर एक छोटे अत्यंत गोंडस, मोहक असे घुबडाचे पिल्लू बसले होते. शेखरने मला ते दाखविले. घुबड म्हणजे विद्रुपता हे आज पर्येंत असलेलं डोक्यातील समीकरण त्या पिल्लाने बदलून टाकले. घुबडाला दिवसा दिसत नाहीं असें म्हणतात . आम्ही पहायला जवळ आलो तरी  पिल्लू बसलेले होते पण नंतर आम्ही त्याला ओलांडल्यावर मात्र ते आमची चाहूल लागून उडून गेले. 


त्या भागात मोहाचे झाड होते. ते फुलांनी बहरलेले होते. आमचा चालक (परशुराम ज्याला प्रभू नेहमी परशा म्हणायचा) त्याने काही फुले ओंजळीत आणली. खूप मादक , मोहक वासाची ती फुले भगिनींनी आपल्या हातात घेतली. 


आज महाराष्ट्रात होळीचा सण. येथे मध्यप्रदेशात

७ तारखेला असतो असं समजले. होळीतील भांगेच्या नशेची आठवण अनेकांना त्या मोहाच्या फुलांनी करून दिली.  


महाराजपूर


येथील घाटावर नर्मदा, सरस्वती, बंजारा त्रिवेणी संगम आहे.  अर्थात सरस्वती गुप्त आहे. पात्र विस्तीर्ण आहे.


संगमावर नर्मदा मय्याची हळद कुंकू पूजा दीप दान वगैरे कार्यक्रम झाले. परत येताना ताज्या उसाच्या रसाचा काही जणांनी आस्वाद घेतला. पप्पांची बायपास आणि दोनवेळा अँजिओप्लास्टी झाली आहे. मुलगा,  सून त्यांच्या आहाराविषयी खूप सजग असतात. पण पप्पा हळूच जेव्हा जमेल तेव्हा त्यांच्या आवडीच्या गोष्टींचा आस्वाद घेतात.

आज ऊस  रसाचा स्वाद आमच्या बरोबर घेतला. 


झोतेश्वर 


येथे एका विस्तीर्ण मंदिर परिसरात

आद्य श्री शंकराचार्य यांनी ज्या गुहांमध्ये आपली साधना केली ते तप स्थान (गुरु गुफा) आहे.  दीर्घ तप साधनेतून ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या समोर  नर्मदा मय्या प्रकट  झाली. येथे त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे नर्मदा अष्टक स्तोत्र बाहेर पडले.अशी हकीगत प्रभुने  सांगितली. 


स्फटिक शिव लिंग - एक विस्तीर्ण असे स्फटिक शिवलिंग असलेले हे एक मंदिर आहे. गाभाऱ्याच्या बाहेर नर्मदेतील दगडापासून बनवलेली सुमारे १५ शिवलिंगे आहेत.




राज राजेश्वरी त्रिपुरा सुंदरी देवी मंदिर,,


याच परिसरात काहीशा उंच टेकडीवर हे देवीचे भव्य आणि अत्यंत देखणे असे मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याभोवती पण भिंतीला लागून ६४ योगिनीं छोट्या छोट्या मंदिरात स्थापन केल्या आहेत. १४ विद्या आणि ६४ कला असे ज्ञानाचे वर्णन आपल्याकडे केले जाते. त्या पैकी ६४ कलांच्या या ६४ योगिनी देवता आहेत असं म्हणतात. 


माझा रूम  पार्टनर  शेखर याने इथल्या व्यवस्थापनाशी फोनवर संपर्क करून भविष्यात सोयीच्या वेळी तेथे येऊन यज्ञ करण्यासाठी परवानगी मागितली . ती मिळाली.

शेखर दरवर्षी २ ते ३ यज्ञ विविध प्रसिद्ध तीर्थ क्षेत्रात जाऊन करतो असे म्हणाला. प्रत्येकी सुमारे ६० - ६५००० रुपये खर्च करून .

हा सर्व उपक्रम कशासाठी असे विचारले,

तर म्हणाला , माझ्या साधनेसाठी. आनंदासाठी देवाला थँक यु म्हणण्यासाठी. अन त्या निमित्त काही नातेवाईक येतात, भेटतात, क्षेत्रातील पुरोहिताना मदत होते, काही गरीब, गरजूंना काही मदत होते.


हा पठया संघाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे, द्वितीय वर्ष प्रशिक्षित आहे. जेव्हा यज्ञ शक्य झाला नाही तेव्हा त्याने तलासरी येथील वनवासी कल्याण आश्रमातील काही विद्यार्थींना मदत केली आणि यज्ञाचे पैसे खर्च केले 


मंदिरात कुंकुम, अष्टगंध, कासव (तांब्याचे)

वगैरे खरेदी केले.  



करेली मुक्काम, होळी दहन . हॉटेल ग्रँड शुक्राना . 



लिंक - होळी सेलिब्रेशन 


https://photos.google.com/photo/AF1QipPgE59ShRn9I0Rp9N59DxS7Jzl4kOCu8UXbWP6J


आज महाराष्ट्रात होळी आहे. आमच्या यात्रा आयोजकांनी होळीचे आयोजन हाटेल बाहेरच्या भागात खास आमच्यासाठी केले.

हॉटेलचा मालक एक सरदारजी, त्याची पत्नी, आणि मुलगी यांनी आमच्या सोबत होलिका दहनाचा कार्यक्रम प्रथमच पाहिला.


होळीची बोंब  मारून झाल्यावर मग रात्रीच्या जेवणाचा बेत झाला. जेवण चान्गले होते. अर्थात मला रात्री नेहमी प्रमाणेच कमी भूक होती. 


७ मार्च


सकाळी ७ वाजता,ब्रह्मांड घाट =( बरमान घाट)  , नर्मदा पूजन, दीप दान, आरती, नर्मदा अष्टक.

परत हॉटेलवर जाऊन चहा, नाश्ता घेऊन प्रवास सुरू.


(बरमान घाट नरसिंहपुर जिले का एक दर्शनीय स्थल है। यह घाट लोगों की आस्था का केन्द्र है। यह घाट पवित्र नर्मदा नदी के किनारे स्थित है। आप इस घाट पर अपने वाहन से असानी से पहुॅच सकते है। बरमान घाट का नजदीकी रेल्वे स्टेशन करेली है। करेली रेल्वे स्टेशन से बरमान घाट करीब 18 किलोमीटर दूर होगा। बरमान घाट अपनी खूबसूरती एवं धर्मिक महत्व के कारण प्रसिध्द है। बरमान घाट को भगवान ब्रह्मा की तपोभूमि के रूप में जाना जाता है। इस जगह को ब्रम्ह घाट के नाम से भी जाना जाता है। इस घाट के आसपास बहुत सारे मंदिर एवं सुंदर घाट है। इस घाट में आप स्नान कर सकते है। यह पर विशेष रूप से मकर संक्रांति में भीड लगती है। )


आज प्रवास कमी आहे.  सरळ नर्मदा पुरं,, पूर्वीचे होशिंगाबाद येथे आलो . मुक्काम हाटेल अग्निहोत्री


नर्मदापूरम . 


जेवण. केले, चहा घेऊन ग्रुप्स मधे रिक्षा करून खररा घाटावर गेलो. या घाटा  जवळ एक मुखी दत्त मंदिर आहे. येथे टेंबे स्वामी  यांनी काहीकाळ साधना केली. तो वृक्ष आहे.  गुळवणी स्वामींनी दीक्षा याच परिसरात घेतली असे सांगण्यात आले. 



.



 येथून रिक्षेने शेठाणी घाटावर गेलो.




N. P. 8 / 12 

                                                                         पुढे …


No comments:

Post a Comment