Thursday, May 26, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 116 ते 120 : ध्वनिफीत.




श्लोक ११६ - १२० सारांश. 

या पूर्वी हि बऱ्याच वेळा समर्थांनी आपल्या एखाद्या विधानावर खास जोर द्यायचा या उद्देशाने  त्या विधानावर

 पुन्हापुन्हा श्लोकाच्या शेवटच्या चरणात प्रतिपादन केले होते. 

……'.नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी' . 

हा चरण श्लोक क्रमांक ११६ पासून ते क्रमांक १२५ पर्यंत असा दहा वेळा आला आहे.

देव भक्ताकडे कधीहि दुर्लक्ष करत नाही, त्याची निराशा होऊ देत नाही कारण सच्च्या भक्ताचा  त्याला नेहमी

अभिमान असतो. हे समर्थ वारंवार सांगतात आणि त्यासाठी ते दाखले देखील देतात.

अंबरीष ऋषी, उपमन्यू , ध्रुवबाळ, गजेंद्र हत्ती, अजामेळ, या पौराणिक कथा तसेच विष्णू दशावतारातील

मत्स्य, कूर्म आणि वराह या अवतारांच्या कथा अशा माध्यमातून भगवन्त भक्तांची कशी काळजी घेतात,

विश्व रक्षणासाठी कसे धावून येतात ते समर्थ या ५ श्लोकात समजावून सांगत आहेत. 

या कथा सांगण्यात संदेश एकच, तो म्हणजे भगवंता साठी अशक्य काही नाही. आपले कर्तव्य पूर्ण करा

आणि मग सर्व सद्गुरुंवर सोडा. चिंता सोडा आणि पुढील कार्यास लागा. 

आज सुद्धा असे घडू शकते, घडते पण तो अनुभव घेण्यासाठी आपली साधना तीव्र, तीव्र-तम करायला हवी.

निसर्गाचे नियम, प्रकृतीचे नियम समजून घेऊन आपण या नियमांना आपल्या रोजच्या वर्तनात न्याय

द्यायला हवा. हे  देखील या विवेचनात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

कृपया एका आणि आवडल्यास  like , share  करा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी 

Wednesday, May 11, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 111 ते 115 : ध्वनिफीत.





सारांश श्लोक 111 ते 115 . 


अनेकदा आपले खरी हीत साधणारी मंडळी आपल्याला आवडत नाहीत. आपली आई, आणि परमार्थातील आपले गुरु हे कटू पण सत्य उत्तम हेतूने आपल्याला सांगत असतात. 

काय मिळवायचे ते शोधले पाहिजे. तसेच काय मिळू शकते पण न घेता ते सोडले पाहिजे याचाही सतर्क राहून शोध घेतला पाहिजे. सर्व गोष्टी योग्य संवादातून मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आत्महित जपणाऱ्या मूक संवादाचे, ‘हे  हृदयीचे ते हृदयी पोहोचणाऱ्या’ हितकारी  संवादाचे महत्व या श्लोकांच्या माध्यमातून आपण समजून घेत आहोत. वाद संपेल , आपल्याला नेमके ज्ञान होईल, खरे ज्ञान होईल, अहितकारक टळेल, असा संवाद हितकारी असतो. 

माणसाच्या पंडितत्वाचा , विद्वत्तेचा, बुध्दीमत्वाचा त्याला त्याच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी काही उपयोग होत नाही, किंबहुना त्याचा अडथळाच  होतो. परमार्थ क्षेत्रातील मोठेपणा मोजण्याचे निकष वेगळे आहेत. येथे लौकिक विद्येचे महत्व कमी आहे असे विधान नाही. पण त्या पदव्यांमुळे येणार अहंकार मात्र अध्यात्म क्षेत्रात पुढे नेणारा नाही एवढेच. आपल्या साधकत्वाचा, आपल्या सत्संगाचा देखील कधीतरी कोणाला अहंकार होतो. ही देखील अहंता तेवढीच अनावश्यक  आणि अनर्थकारक असते. 

वाद समाप्त करणारा संवाद , जेथून काही तत्व हाती येईल, हितकारी घडू शकेल असा संवाद जरूर करावा. आपली जगाकडे पहाण्याची दृष्टी भोगाची असते, ती ईशभावाची करण्याचा प्रयत्न करावा,

हे सर्व साध्य होण्यासाठी सुसंवाद कसा असावा विसंवाद कसा टाळावा या बद्दल मार्गदर्शन करणारे हे ज्ञान , लौकिक व्यवहारात पण तेवढेच उपयुक्त आहे.                          ‘श्रीराम !!’


विजय रा. जोशी. 



Thursday, April 28, 2022

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 106 ते 110 : ध्वनिफीत.







सारांश श्लोक १०६ ते ११०.

समर्थ समाधानाच्या प्राप्तीचा राजमार्ग समजावून सांगत आहेत. त्यासाठी ३ मार्ग .

१. देह शुद्धी - स्नान/संध्या आदी रोजची आन्हिके. 
2. मनशुद्धी - त्यासाठी प्रवास स्वार्था कडून निस्वार्थ कडे. 
3. अंतःकरण शुद्धी / चित्त शुद्धी - तो प्रवास दीर्घ आहे, संयमाववर, निश्चयावर आधारित आहे, 

दीर्घ कष्ट लागतात. प्रगती हळूहळू होते. 
व्यवहारिक शिक्षणाबरोबर नैतिकतेचे शिक्षण देखील कसोशीने, अगदी योग्यवेळी बालकाच्या आयष्यात 
योग्य काळी सुरु झाले पाहिजे. 

क्रोध अनावश्यक नाही पण तो ताब्यात पाहिजे आणि तो चांगल्या  हेतूसाठी असावा. संगत हि
सज्जनांच्या बरोबर असावी. स्वतःला समाधानाने जगायचे असेल तर,  जीवन उन्नत करायचे असेल 
तर जाणीवपूर्वक कुसंगती टाळून सत्संगती पत्करली पाहिजे.

आपण जीवनात अनेक लोकांशी विविध विषयांवर बोलतो, चर्चा  करतो ते  अटळ आहे ,पण त्यात
फक्त आवश्यक तेवढाच वेळ घालवावा. संत / सज्जनांशी जो संवाद होतो, तो सुख संवाद होतो. 
त्यांचा हेतू हा आपल्याला खऱ्या सत्याच्या मार्गाला नेण्याचा असतो. समर्थ आपण काय करावे, 
काय टाळावे हे नीट समजावून सांगत आहेत.  हे सर्व ज्ञान परमार्थासाठी तर महत्वाचे आहे, 
पण व्यवहारी जीवनात देखील खूप उपयुक्त आहे.

या ऑडीओच्या माध्यमातून याचे सविस्तर विवरण आपल्याला नक्कीच उपयुक्त वाटेल. 
जरूर ऐका  आणि योग्य वाटल्यास इतरांना ऐकण्याची शिफारस करा. 



विजय रा. जोशी. 



Sunday, April 17, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 101 ते 105 : ध्वनिफीत.




सारांश श्लोक 101 ते  105


नामस्मरण जेथे चालले आहे तेथील वातावरण तरंग चांगल्यास पोषक असतात. अति आदरे, दृढ

विश्वासाने नामस्मरण करावे, त्याने अंतर्बाहय चांगल्या विचार लहरी निर्माण होतील, सत्कर्म करण्याची

प्रेरणा होत राहील ,  स्वभाव दोष कमी होतील. अंतर्बाहय शुद्धी प्रक्रिया मार्गी लागेल. 

सदाचरणाचा अभ्यास. 

परमार्थ मार्गी लागण्यासाठी , स्थिर होण्यासाठी जे सद्गुण आपल्या अंगी असावे लागतात, प्रयत्नाने

धारण करावे लागतात त्याचे वर्णन समर्थ करत आहेत.  “अती लीनता” हवी आणि ती स्वाभाविक 

झाली पाहिजे, रामचरित्राच्या अभ्यासातून , थोर व्यक्तींच्या चरित्र प्रसंगांवरून , संत चरित्रातून अशी

तितिक्षेची, सहनशीलतेची , अति लीनतेची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. 

साधने मधील येणारे अडथळे विवेकाच्या साहाय्याने कसे दूर करावे याचे मार्गदर्शन आहे. कृतीच शास्त्र

परमार्थात सार आहे. त्या कृती-सातत्याच महत्व सांगत आहेत. विवेक आणि विचार यातील

फरक….. अध्यात्म कर्म, क्रिया सोडायला, टाकायला सांगत नाहीत, तर विवेकाने कर्म, क्रिया पालटायला,

सुधारायला सांगते. या बद्दलची माहिती सोप्या शब्दात या श्लोकांच्या माध्यमातून समजून घायचा

प्रयत्न आपण या  विवेचनातून करू या. 


विजय रा. जोशी. 


Wednesday, March 9, 2022

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 96 ते 100 : ध्वनिफीत.




सारांश श्लोक ९६ ते  १००

तत्व सांगणाऱ्या पुराण कथा आयुष्याचे धडे देतात. भक्त प्रह्लादाची भक्ती-कथा हि युगानुयुगे 

एखाद्या दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करीत आहे. अहंकारामुळे  भगवंत स्मरण रहात नाही, त्याचे महत्व

वाटत नाही. आणि मग वाढत जाणारा अहंकार आपल्याला नामस्मरण भक्ती पासून दूर घेऊन जातो.

जीवन दैन्यवाणे होते. रामदास स्वामी आपल्याला या वास्तवाची जाणीव करून देत आहेत 

आणि वेळीच नामस्मरणाच्या सन्मार्गने जायचे प्रेमाने सुचवत आहेत. राम-नामाने पाषाण तरले 

अशी कथा सांगतात. तसे मानवी जड बुद्धीचे जीवन (मानवी पाषण), देखील सत्कर्माने, भगवंत भक्तीने

तरुन जातात. पण मनात विकल्प, संशय असला तर हे घडत नाही, म्हणून मनापासून, कर्तव्य बुद्धीने,

श्रद्धेने, नम्रतेने, आणि सातत्याने साधना सुरु ठेवावी. 

जेव्हा आपण काशी सारख्या कोणत्याही मन पावन करणाऱ्या ठिकाणी संवेदनशील भक्ती- भावनेने

वास्तव्य करू त्यावेळी आपल्याला त्याची महती कळेल, आपली श्रद्धा आपल्यला आगळे समाधान देईल. 

कधी ध्यान, कधी कर्म, कधी ज्ञानमार्ग, कधी भक्तिमार्ग… आपण सर्व करण्याचा प्रयत्न करतो, पण

काहीही “यथासांग” होत नाही. काम कुठले ही आपण पत्करू शकतो , पण ते एकाग्रतेने, समर्पण वृत्तीने

आणि अलिप्ततेने करायला हवे अशी संतांची, ज्ञानी माणसाची भूमिका असते. ती आपणसुद्धा कशी

साधावी आणि त्यासाठी अखंड नामस्मरण कसे उपयुक्त आहे 

सर्वांचे आयुष्य सन्मार्गी लावणारे हे श्लोक मौल्यवान माहिती देत आहेत. विवेचन जरूर एका, 

आणि योग्य वाटल्यास इतरांना ऐकायला सांगा. 



विजय रा. जोशी 




Friday, February 25, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 91 ते 95 : ध्वनिफीत.



सारांश , श्लोक 91 ते 95. 

चांगल्या स्थितीत असताना देवाचे स्मरण ठेवा. संकट आले, आजारपण आले, फक्त अशा वेळी देवाचा

धावा उपयोगी होईलच असं नाही. 

भगवंत म्हणजे नेमकं काय ? त्या पर्येंत पोहोचण्यासाठी नेमके काय करावं ?       

हे व्यक्तीनिहाय स्वतंत्र असू शकते.  देव वर्णन हे नेमके नाही कारण तो अवर्णनीय आहे. 

आपले सर्व दोष , जन्म जन्मांतरीचे दोष  जर घालवायचे असतील तर मनःपूर्वक केलेली देव भक्ती घडली पाहिजे. 

भगवन्त जीवाची सर्व व्यवस्था करीत असतो. 

व्यवहारात अनेक गोष्टी निभवायला लागतात, त्यामध्ये कितीतरी वेळा आपल्या कडून चुकीचे गैर असे वर्तन होते,

वाणी अपवित्र होते.  

पवित्र भाषेने, नामस्मरणाने वाणी पवित्र होते….  हळूहळू पवित्र होते. वर्तन शुद्ध होऊ लागते.

जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने (म्हणजे सर्व पाप-कार्यें सोडून देऊन ) 

माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा.

राम नामाने, नामस्मरणाने, सत्कर्माने सर्व कल्याण घडेल. 

नामस्मरणाचे महत्व सांगणारे हे विवेचन जरूर ऐका , आणि आवडल्यास इतरांना ऐकायलाही सांगा. 



विजय रा. जोशी. 







Wednesday, February 16, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 86 ते 90 : ध्वनिफीत






सारांश , श्लोक ८६ ते ९०. 


मूलभूत क्रांती होऊन व्यक्तिमत्व सर्वांगीण पद्धतीने विकसित होण्याची प्रक्रिया समर्थ आपल्याला सांगत आहेत. काम, वासना प्रत्येकाला जीव-धारणेसाठी आवश्यक आहेत. त्या जर अमर्याद असल्या तर त्यांचा त्रास होतो. पण रामभक्ताला हा “अति पणाचा” त्रास होत नाही. 

नामस्मरणाचे कार्य आणि उद्दिष्ट “चित्त-शुद्धी” हेच आहे. चान्गले, साजिरे, सुंदर सोपे, बिन पैशाचे आणि आपल्याला अत्यंत लाभदायक नाम आहे. पण आपण त्याचे महत्व पूर्णपणे ओळखत नाही. 

भोजनाच्या वेळी आणि समूहात, एकत्र असताना, दोन्ही वेळा आपल्याला रामाचा उच्चार, नामघोष करावा असं सांगितलंय. इथे आदराने, श्रद्धेने, म्हणायला सांगितले आहे.

अन्न  तुमच्या ताटात येण्यापूर्वी किती लोकांचा हातभार लागला असतो, त्यांच्याबद्दल, त्यांच्या मध्ये असलेल्या त्या परम तत्वाचे स्मरण , चिंतन म्हणजेच हरि-चिंतन. ते करीत असता अत्यंत समाधानाने जर भोजन केले तर त्याचा वैयक्तिक आणि सामुदायिक परिणाम हा उत्तमच असणार. 

सध्याच्या जीवनक्रमात जे आपल्या लक्षात कधीच येत नाही,  ते समजवण्याचा हा श्रीसमर्थांचा वडिलांच्या मायेने प्रयत्न आहे. 

या पाठातील संदेश आपण जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांना ऐकायची शिफारस करा, ही  विनंती !



विजय रा. जोशी.