Wednesday, August 25, 2021

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक १ ते ५.  : ध्वनिफीत 




श्लोक १ - ५. सारांश 

शक्तिरूप शारदा आणि बुद्धीरूप गणेश यांच्या भक्तीच्या सहायाने परमात्म्याचा शोध घ्यावा असा उपदेश समर्थ रामदास स्वामी आपल्याला करीत आहेत. 

मनाला हळू हळू वळवायचे आहे, त्यास जी गोडी लावू तशी लागते. दिवसाची  सुरुवात मन्गलमय झाली की दिवस चांगला जायला मदत होते. याला दिवसभर सदाचाराची जोड द्यावी, दुराचार कमी करावा आणि मग या साधनेच्या वाटचालीत कधीतरी धन्यता आपल्या जीवनात येईल, निदान त्या दिशेने आपली प्रगती घडत राहील. 

रामदास स्वामी मनाला उपदेश करतात - वासना/ इच्छा चांगल्या आहेत, बुद्धी स्वतःसकट सर्वांना न्याय देणारी आहे, आपल्या कर्मात नीतीचा विचार झाला आहे हे सर्व काळजी पूर्वक आयुष्यभर पहा. म्हणजे संचित चांगले घडेल. आत्म विकास घडेल आणि मग प्रत्येक जन्मात उत्तरोत्तर प्रगती होत होत मोक्षाच्या मार्गावर प्रगती घडेल. 

देहबुद्धीपोटी स्वार्थ येतो. कळत नकळत कृती घडते , इतरांना त्रास होतो. पुण्यकर्म जाणीवपूर्वक करत राहिले पाहिजे. इतरांना त्रास देण्याची, पीडा देण्याची, इतरांविषयी बेफिकीर रहाण्याची वृत्ती / बुद्धी , हे टाळण्यासाठी सदैव जागृत रहायला हवे. देव आपल्या सर्व कृती पाहात असतो हि जाणीव, हे भान ठेवायचे म्हणजे मग सत्यसंकल्पात मन/ बुद्धी स्थिर राहील. उपासना आणि व्यवहार, प्रपंच आणि परमार्थ  याची सांगड घालणारे उपाय मनाचे श्लोक आपल्यासमोर मांडतात. 

या श्लोकांची मांडणी करणारे हे विवेचन ऐकून आपल्यास आवडले तर लिंक share करा आणि मनाच्या श्लोकांचा ज्ञान गुणाकार करा ही नम्र विनंती.. 


विजय रा. जोशी. 




Wednesday, August 18, 2021

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

प्राथमिक माहितीचा पाठ : ध्वनिफीत 




समर्थांनी आजन्म राष्ट्रोद्धाराची चिंता केली . स्वतः विवाह केला नाही पण राष्ट्राचा प्रपंच निष्ठेने केला. शिस्तीने, व्यवस्थेने, मर्यादेने वागण्याचा कित्ता घालून दिला. उपासनेचे स्फुल्लिंग पेटविले.धर्माची पुनर्स्थापना केली. आणि शुद्ध अध्यात्म जागविले. श्रीराम गर्जनेसह भारतवर्ष दणाणून सोडले. जन-प्रबोधनार्थ अफाट ग्रंथरचना केली. अकरा मारुतींची प्राणप्रतिष्ठा करून मठस्थापना केली . मोठा शिष्य सम्प्रदाय निर्माण केला. अशा या थोर योग्याने आपल्या मुखाने निर्माण केलेल्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या साहित्यामध्ये २०५ मनाच्या श्लोकांचा समावेश होतो. 

पारतंत्र्यामुळे मरगळ आलेल्या राष्ट्रात स्वाभिमाचा आणि अभ्युत्थानाचा अंगार उत्पन्न
करणाऱ्या समर्थांचे कार्य निःसंशय ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्यांचे राष्ट्र जागृतीच्या कार्यातले
योगदान महत्वाचे आहे, आपण ते कदापि न विसरले पाहिजे. 

राष्ट्राच्या व समाजाच्या निकोप उन्नयनासाठी आणि आत्म-निर्भरतेसाठी त्यांनी संन्यासवृत्तीच्या तसेच
त्यागी संसारी भक्तांची उभारलेली संघटना , धर्म, संस्कृती स्वाभिमान या साठी ठिकठिकाणी स्थापन
केलेलं मठ, तेथील महंतांच्या रूपाने सामाजिक नेतृत्वाचे निर्माण केलेले आदर्श , समाजकंटकांसाठी
निर्माण केलेला धाक, या सर्वांचा स्वराज्य उदयाची पार्श्वभूमी म्हणून खूप मोठा उपयोग झाला.

समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनात प्रज्ञा आणि श्रद्धा, कर्म आणि सन्यास, परोपकार आणि
अनासक्ती, एकांत आणि लोकांत यांचा संगम आढळतो. हीच ज्ञानयुक्त श्रद्धा आधारित कर्म
करण्याची रीत आहे. याचा आदर्श  श्री समर्थांनी जगून दाखवला आहे. त्यांच्या बुद्धीला भ्रामक व
चुकीच्या कल्पनांचा स्पर्श कधीही झाला नाही. त्यांच्या श्रद्धेला ईश्वराहून अन्य वस्तू कधी रुचली
नाही. ईश्वरावरील अविचल श्रद्धेमुळे ते संकटात कधी डगमगले नाहीत. भयाने, चिंतेने त्यांच्या
मनास कधीच भ्रष्ट केले नाही. श्री रामरायास आपले जीवन सर्वस्व मानल्याने या जगातील सुखे,
संपत्ती त्यांनी कस्पटास्मान लेखली. त्यामुळे ईश्वरी सामर्थ्य त्यांच्या कर्तृत्वातून झळकले. पण 
‘कर्ता राम आहे’ अशी शंभर टक्के खरी भावना बाळगल्यामुळे जगात मोठेपणाच्या जाळ्यात ते
अडकले नाहीत. अखेरच्या क्षणापर्येत ते ‘रामाचा दास’ राहिले.

अशा श्री समर्थांनी श्रीरामावर प्रेम केले, त्याचे अखंड नाम जपले. त्याचे अखंड अनुसंधान सांभाळले.
या अभ्यासाने त्यांचे मन अतिशय शुद्ध व पवित्र झाले. तेव्हा श्रीरामाच्या कृपेने त्यांना
आत्मसाक्षात्कार झाला. त्या साक्षात्कारातून त्यांना परमानंद मिळाला. तो आनंद सर्वांना भोगायला
मिळावा हि तळमळ त्यांना लागली. 

आनंदाचा अनुभव घेणारे मन कसे तयार करावे हे समजावून सांगण्यासाठी समर्थांनी मनाचे श्लोक रचले. या श्लोकांना त्यांनी “मनोबोध” असेही नाव दिलेले आहे. 

या पाठमालेत आपण मनाच्या श्लोकांचा सविस्तर परिचय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
हा प्राथमिक पाठ आहे. 
 

विजय रा. जोशी. 



Sunday, August 1, 2021

 कोरोना , गीता आणि स्वास्थ्य - ध्वनी चित्रफीत


गीता-तत्व पालनाने व्याधी (कोरोना) मुक्ती



कोरोना सह सर्व व्याधी मुक्तीसाठी शाश्वत उपाय गीता देते का?

मुळात व्याधी म्हणजे काय?

स्वास्थ्य म्हणजे काय ? जागतिक आरोग्य संघटना या बाबत काय म्हणते?

स्वास्थ्य प्राप्ती, व्याधी मुक्ती यासाठी गीतेत काय मार्गदर्शन केले आहे.

ते तर्कशुद्ध आहे का?

जगातील सर्वांना उपयुक्त आहे का?

कोरोना सह सर्व व्याधी मुक्तीसाठी शाश्वत उपाय गीता देते का?

अशा विषयावर केलेलं हे संक्षीप्त विवेचन आपल्याला आवडेल. अशी आशा आहे. 


विजय  जोशी. 



Thursday, June 17, 2021

 

पसायदान भाग 2, ध्वनी फीत 


संत ज्ञानेश्वर--पसायदान

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे. तत्वज्ञानाचे रहस्य मधुर काव्यरचनेतून उलगडून दाखवले आहे. आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये उपनिषदे ,ब्रह्मसूत्र, भगवद्गीता अशी प्रस्थानत्रयी आहे. प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे, प्रवृत्तीकडून निव्रुत्तीकडे हा जीवनाचा प्रवास आहे. आत्मोन्नती हे साध्य व प्रस्थानत्रयी हे साधन आहे. 



उपनिषदे संस्कृत मध्ये असून त्यातील तत्वज्ञान अभ्यासाला अवघड आहे . भगवद्गीतेत ते सुलभपणे सांगितले आहे आणि ज्ञानेश्वरांनी तर ते अनेक उपमा, दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणले आहे. हे तत्वज्ञान जन सामान्यांपर्यंत पोचवण्याचे असामान्य कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे.

इये मह्राठियेचिये नगरी ।  ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।I  

ही ज्ञानेश्वरी मागील उदात्त बैठक आहे. ज्ञानेश्वरांनी ग्रंथरुपी यज्ञ सिध्दीस नेला. हा यज्ञ सात्विक यज्ञ आहे कारण तो करणे हे कर्तव्य आहे असे मानून फलाची अपेक्षा न ठेवता केला गेला आहे, त्या साठी आवश्यक असे तप केले आहे. या तपश्चर्येतून हा वाक्-यज्ञ  सफल झाला व त्यातून ‘ज्ञानेश्वरी’  नावाचे अमृत निघाले .

पसायदान म्हणजे संत वाङमयातील कौस्तुभमणी आहे.

विश्वात्मक देवाने तोषून (आनंदित होऊन) संतुष्ट अंत:करणाने पसायदान द्यावे अशी प्रार्थना केली आहे. संताचे हे पसायदान व्यत्त्तिगत हितासाठी नसते तर अखिल सजीवस्रुष्टीच्या कल्याणासाठी या शुभकामना असतात.  ”जे जे जगी जगते तया , माझे म्हणा करुणा करा” अशी ती विश्वव्यापी प्रार्थना असते. ज्या वेळी कोणताही यज्ञ सिध्दीस जातो त्या वेळी वैदिक संस्कृती प्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात येतो. संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलें पसायदान म्हणजे संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी आहे.

पसायदानाच्या ओव्या म्हणजे विश्वा एवढ्या व्यापक झालेल्या अंतःकरणाने , विश्वात्मक देवाजवळ , विश्वाच्या कल्याणासाठी केलेले मागणे आहे. इथे देणारा, मागणारा, आणि मागितले गेलेले हे सर्वच एवढे मोठे आहे कि त्यांच्या दर्शनाने  माणसाचे लहानपण सरून जाते. या अपूर्व मागण्यामागील श्रीज्ञानदेवांचे हृद्गत काय असावे, याचा शोध त्यांनाच वाट पुसत या विवेचनात घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

संदर्भ -

1 प्रा. राम शेवाळकर युट्युब 

2 डॉ. शंकर अभ्यंकर (इंटरनेट , युट्युब) 

3 डॉ. सुषमा वाटवे , (स्वामी माधवनाथ प्रवचन आधारित) 

4 देगलूरकर महाराज , पंढरपूर

(Main REF धुंडामहाराज आणि भानुदास देगलूरकर +  स्वामी विज्ञानानंद यांच्या लेखन, विवेचनातील विविध अध्यात्म संदर्भ) . 


विजय रा. जोशी. 



पसायदान भाग 2, ध्वनी फीत 


 

पसायदान भाग १ , ध्वनी फीत 


संत ज्ञानेश्वर--पसायदान

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे. तत्वज्ञानाचे रहस्य मधुर काव्यरचनेतून उलगडून दाखवले आहे. आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये उपनिषदे ,ब्रह्मसूत्र, भगवद्गीता अशी प्रस्थानत्रयी आहे. प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे, प्रवृत्तीकडून निव्रुत्तीकडे हा जीवनाचा प्रवास आहे. आत्मोन्नती हे साध्य व प्रस्थानत्रयी हे साधन आहे. 



उपनिषदे संस्कृत मध्ये असून त्यातील तत्वज्ञान अभ्यासाला अवघड आहे . भगवद्गीतेत ते सुलभपणे सांगितले आहे आणि ज्ञानेश्वरांनी तर ते अनेक उपमा, दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणले आहे. हे तत्वज्ञानजनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे असामान्य कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे.

इये मह्राठियेचिये नगरी ।  ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।I  

ही ज्ञानेश्वरी मागील उदात्त बैठक आहे. ज्ञानेश्वरांनी ग्रंथरुपी यज्ञ सिध्दीस नेला. हा यज्ञ सात्विक यज्ञ आहे कारण तो करणे हे कर्तव्य आहे असे मानून फलाची अपेक्षा न ठेवता केला गेला आहे, त्या साठी आवश्यक असे तप केले आहे. या तपश्चर्येतून हा वाक्-यज्ञ  सफल झाला व त्यातून ‘ज्ञानेश्वरी’  नावाचे अमृत निघाले .

पसायदान म्हणजे संत वाङमयातील कौस्तुभमणी आहे.

विश्वात्मक देवाने तोषून (आनंदित होऊन) संतुष्ट अंत:करणाने पसायदान द्यावे अशी प्रार्थना केली आहे. संताचे हे पसायदान व्यत्त्तिगत हितासाठी नसते तर अखिल सजीव स्रुष्टीच्या कल्याणासाठी या शुभकामना असतात.  ”जे जे जगी जगते तया , माझे म्हणा करुणा करा” अशी ती विश्वव्यापी प्रार्थना असते. ज्या वेळी कोणताही यज्ञ सिध्दीस जातो त्या वेळी वैदिक संस्कृती प्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात येतो. संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलें पसायदान म्हणजे संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी आहे.

पसायदानाच्या ओव्या म्हणजे विश्वा एवढ्या व्यापक झालेल्या अंतःकरणाने , विश्वात्मक देवाजवळ , विश्वाच्या कल्याणासाठी केलेले मागणे आहे. इथे देणारा, मागणारा, आणि मागितले गेलेले हे सर्वच एवढे मोठे आहे कि त्यांच्या दर्शनाने  माणसाचे लहानपण सरून जाते. या अपूर्व मागण्यामागील श्रीज्ञानदेवांचे हृद्गत काय असावे, याचा शोध त्यांनाच वाट पुसत या विवेचनात घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

संदर्भ -

1 प्रा. राम शेवाळकर युट्युब 

2 डॉ. शंकर अभ्यंकर (इंटरनेट , युट्युब 

3 डॉ. सुषमा वाटवे , (स्वामी माधवनाथ प्रवचन आधारित) 

4 देगलूरकर महाराज , पंढरपूर

(धुंडामहाराज आणि भानुदास देगलूरकर +  स्वामी विज्ञानानंद यांच्या लेखन, विवेचनातील विविध अध्यात्म संदर्भ) . 


विजय रा. जोशी. 



Wednesday, June 2, 2021

 

गीता अध्याय 18, भाग 2, ध्वनी - फीत.


पूर्णत्व स्थिती प्रयत्न.

काम्य निषिद्ध कर्मांचा त्याग.

स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण.

सद्गुरू यांचा ज्ञानोपदेश मिळतो.

पण साधक तीव्र अधिकारी नसल्याने त्याची वृत्ती एकदम ब्रह्मरूप होत नाही.गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाचा तो पुनःपुन्हा अभ्यास करून आपली बुद्धी शुद्ध करतो. मग ती बुद्धी आत्म चिंतनात रत होते. इंद्रियांचा निग्रह करून विषय वासना नाहीशी झाल्यावर मग तो इंद्रिये व मन योग धारणेकडे लावतो.मग इष्ट / अनिष्ट गोष्टींबद्दल प्रेम अथवा खेद काहीच उरत नाही.




जीवन आहे तिथ पर्येंत संपूर्ण त्याग अशक्य.

एखादा रागावला असेल तर फार ओरडा करून किंवा बिलकुल न बोलून राग प्रकट करेल. ज्ञानी पुरुष लेशमात्रही क्रिया करीत नाहीत, परंतु कर्म अनंत करतात. त्यांचे केवळ अस्तित्वच अपार लोकसंग्रह करू शकते. त्यांचे हात, पाय कार्य करत नाहीत तरीही तो काम करतो. क्रिया सूक्ष्म होत जाते कर्म वाढत जाते. विचारांचा हा ओघ पुढे नेला तर असे म्हणता येईल की चित्त परिपूर्ण शुद्ध झाले म्हणजे क्रिया शून्यरुप होईल व कर्म अनंत होईल.आधी तीव्र, तीव्रातून सौम्य, त्यातून सूक्ष्म व सूक्ष्मातून शून्य असे ओघानेच क्रियाशून्यत्व प्राप्त होईल. पण मग अनंत कर्म आपोआप घडेल. 

गीता महती आणि फळ. 

हि गीता म्हणजे संसारात शिणलेल्या लोकांना विश्रांतीची जागा आहे. जो कायावाचामने करून गीतेची सेवा करेल त्याला संसारातील दुःख भासणार नाहीच, शिवाय ; अचिंत्य अशा ब्रह्माचा आनंद उपभोगास मिळेल. गीता हि प्रभू श्रीकृष्णाची वांग्मय-मूर्ती आहे. विश्व सुख-दुःखाने ग्रस्त झालेले पाहून भगवंताने हा ब्रह्मानंद अर्जुनाचे निमित्त करून सर्वांना उपलब्ध करून दिला आहे. गीतेचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे जो वर्तन  करील, जो नित्य श्रद्धा पूर्वक श्रवण, पठण करील त्याचे सर्व श्रेयस असेच होईल.

पसायदान / प्रार्थना 

माउलींनी ग्रंथाचा शेवट करतांना मराठी वांग्मयात अमर होऊन राहिलेले अलौकिक पसायदान ज्ञानेश्वर आपल्या गुरुंजवळ मागतात. खळ व दुष्ट लोकांचा उद्धार होऊन ते ईश्वरनिष्ठ कसे होतील याची काळजी माउलीला लागलेली स्पष्ट दिसते. म्हणून त्यांच्याबद्दल माउली प्रथम कळकळीने प्रार्थना करते. 

जगांतील खळ आणि दुष्ट लोकांच्या वृत्तीत पालट पडून , दुष्ट कर्मे टाकून सत्कर्मे करावी अशी त्यांना बुद्धी व्हावी. जगातील सर्व लोकांनी एकमेकांशी बंधुभावाने वागावे. सगळीकडे धर्माची वाढ होऊन सर्व सुखी व्हावेत. त्यांनी भगवंताची सेवा करण्यात आयुष्य घालवावे. व हे घडून येण्यासाठी संत, महात्मे यांचे वास्तव्य या पृथ्वीतलावर निरंतर असावे. …. 

‘सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।18.66।।

माणसाचा धर्म एकच आहे. तो म्हणजे त्याला चिकटलेला ‘त्व’. हा ‘त्व’ समजायचा. ‘त्व’ मध्ये सारे जग येते, सर्व जगाशी एकरूप होणे, अद्वैत साधणे – म्हणजे “सर्व धर्मान परित्यज्य” ही स्थिती. गीता ऐकून संजय निर्भय झाला. गीता वाचून, त्यातील शिकवणीचे अनुकरण करून तीच निर्भयता माणसात येईल. “निर्भयता’ हेच गीतेचे फलीत आहे.

हरी ओम तत्सत ब्र्हमार्पणमस्तु II 


विजय रा. जोशी. 



गीता अध्याय 18, भाग 2, ध्वनी - फीत.


 

गीता अध्याय 18, भाग १, ध्वनी - फीत.


गीता मंदीर

वेद रत्नांच्या डोंगरावर उपनिषदांच्या पठारातून उत्तम रत्ने काढून शिल्पज्ञ व्यासांनी हे गीता-रत्न-मंदीर तयार केले आहे. १८ वा अध्याय या गीता-मंदिराचा कळस आहे. हा अध्याय म्हणजे जणू काही एकाध्यायी गीता आहे. १८ अध्याय व ७०० श्लोक मिळून एकच सिद्धांत गीतेने सांगितला आहे. तो म्हणजे जीवाच्या मागचे संसार दुःख जाण्यास जे कर्म करायचे ते समजण्यास “ज्ञान” हाच एक उपाय आहे. हे ज्ञान गीता देते. हा अठरावा अध्याय नाही, तर हि एकाध्यायी गीताचं आहे. 




अध्याय श्लोक-संगती. 

श्लोक १ ते १७. त्याग मीमांसा – ज्या पुरुषाच्या हृदयात “मी कर्ता आहे” ही भावना नाही, तो सर्व लोकाना मारूनही कोणाला मारत नाही. आणि मारण्याच्या कर्माचा दोष (बंधन) त्याला लागत नाही.

श्लोक १८ ते ४० (अध्यायाचा पूर्वार्ध). – सत्वभावाने रज-तम कर्म दूर करा (कर्मत्याग} आणि फळ त्यागाने सत्व शुद्ध करा. (फलत्याग)

श्लोक ४१ ते ५६. उजळणी – आत्ता पर्येंत जी साधना सांगितली ती अध्यायाच्या उत्तरार्धात भगवान पुन्हा सांगतात.

श्लोक ५७ ते ६३ (६६) –भगवान सांगतात की मी जे  काही सांगितले त्यावर स्वतंत्र बुद्धीने विचार कर. मग जे योग्य वाटेल ते कर. नंतर सांगतात – आपल्या स्वतंत्र बुद्धीने मला शरण ये. (१८८/६६). 

(पुढील श्लोक – फलश्रुती)

नित्य/नैमत्तिक कर्मे अवश्य केली पाहिजेत, पण फळ घेऊ नये. काम्य कर्मे (मनात वासना ठेऊन केलेली कर्मे) चुकून सुध्दा करू नयेत. कर्मे तर करावीच लागतात. कर्मदोष योग्य कर्मानेच दूर होऊ शकतो.

तामसी त्याग –   शैथिल्य, आळशी पणामुळे विहित, कर्तव्य कर्माचा त्याग.

राजस त्याग – देहास कष्ट होऊ लागले म्हणून केलेला कर्म त्याग.

सात्विक त्याग – विहित कर्मे यथायोग्य करून, कर्तुत्व-मद व  फालास्वादाचा त्याग.

सुटकेचा एकमेव उपाय – कर्म करून कर्म-बंधनातून जे मुक्त झाले त्या पुरुषांची रहाणी (शिकवण) डोळ्यासमोर ठेऊन त्याचा निरंतर विचार व त्याप्रमाणे स्वतःचे वर्तन. (उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा नमावे .कोणत्या कर्माचा त्याग करावयाचा आणि कोणत्या कर्मफलांचा त्याग करायचा हे नीट कळले पाहिजे. (ते या अध्यायात समजावून सांगितले आहे). 

यात एक नक्की आहे की , नित्य - नैमित्तिक कर्माचा कोणीही त्याग करू नये (स्वधर्म, स्वकर्तव्य वगैरे?). पण ती दक्षता पूर्वक, म्हणजे सावधपणे कर्तृत्व मद आणि फलास्वाद टाकून करावी. (१८/११०-१७७ , श्लोक १ ते ६)). 

पुढील भाग ऑडिओ मध्ये ऐकावा. 


विजय रा. जोशी.