Wednesday, August 18, 2021

मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

प्राथमिक माहितीचा पाठ : ध्वनिफीत 




समर्थांनी आजन्म राष्ट्रोद्धाराची चिंता केली . स्वतः विवाह केला नाही पण राष्ट्राचा प्रपंच निष्ठेने केला. शिस्तीने, व्यवस्थेने, मर्यादेने वागण्याचा कित्ता घालून दिला. उपासनेचे स्फुल्लिंग पेटविले.धर्माची पुनर्स्थापना केली. आणि शुद्ध अध्यात्म जागविले. श्रीराम गर्जनेसह भारतवर्ष दणाणून सोडले. जन-प्रबोधनार्थ अफाट ग्रंथरचना केली. अकरा मारुतींची प्राणप्रतिष्ठा करून मठस्थापना केली . मोठा शिष्य सम्प्रदाय निर्माण केला. अशा या थोर योग्याने आपल्या मुखाने निर्माण केलेल्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या साहित्यामध्ये २०५ मनाच्या श्लोकांचा समावेश होतो. 

पारतंत्र्यामुळे मरगळ आलेल्या राष्ट्रात स्वाभिमाचा आणि अभ्युत्थानाचा अंगार उत्पन्न
करणाऱ्या समर्थांचे कार्य निःसंशय ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्यांचे राष्ट्र जागृतीच्या कार्यातले
योगदान महत्वाचे आहे, आपण ते कदापि न विसरले पाहिजे. 

राष्ट्राच्या व समाजाच्या निकोप उन्नयनासाठी आणि आत्म-निर्भरतेसाठी त्यांनी संन्यासवृत्तीच्या तसेच
त्यागी संसारी भक्तांची उभारलेली संघटना , धर्म, संस्कृती स्वाभिमान या साठी ठिकठिकाणी स्थापन
केलेलं मठ, तेथील महंतांच्या रूपाने सामाजिक नेतृत्वाचे निर्माण केलेले आदर्श , समाजकंटकांसाठी
निर्माण केलेला धाक, या सर्वांचा स्वराज्य उदयाची पार्श्वभूमी म्हणून खूप मोठा उपयोग झाला.

समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनात प्रज्ञा आणि श्रद्धा, कर्म आणि सन्यास, परोपकार आणि
अनासक्ती, एकांत आणि लोकांत यांचा संगम आढळतो. हीच ज्ञानयुक्त श्रद्धा आधारित कर्म
करण्याची रीत आहे. याचा आदर्श  श्री समर्थांनी जगून दाखवला आहे. त्यांच्या बुद्धीला भ्रामक व
चुकीच्या कल्पनांचा स्पर्श कधीही झाला नाही. त्यांच्या श्रद्धेला ईश्वराहून अन्य वस्तू कधी रुचली
नाही. ईश्वरावरील अविचल श्रद्धेमुळे ते संकटात कधी डगमगले नाहीत. भयाने, चिंतेने त्यांच्या
मनास कधीच भ्रष्ट केले नाही. श्री रामरायास आपले जीवन सर्वस्व मानल्याने या जगातील सुखे,
संपत्ती त्यांनी कस्पटास्मान लेखली. त्यामुळे ईश्वरी सामर्थ्य त्यांच्या कर्तृत्वातून झळकले. पण 
‘कर्ता राम आहे’ अशी शंभर टक्के खरी भावना बाळगल्यामुळे जगात मोठेपणाच्या जाळ्यात ते
अडकले नाहीत. अखेरच्या क्षणापर्येत ते ‘रामाचा दास’ राहिले.

अशा श्री समर्थांनी श्रीरामावर प्रेम केले, त्याचे अखंड नाम जपले. त्याचे अखंड अनुसंधान सांभाळले.
या अभ्यासाने त्यांचे मन अतिशय शुद्ध व पवित्र झाले. तेव्हा श्रीरामाच्या कृपेने त्यांना
आत्मसाक्षात्कार झाला. त्या साक्षात्कारातून त्यांना परमानंद मिळाला. तो आनंद सर्वांना भोगायला
मिळावा हि तळमळ त्यांना लागली. 

आनंदाचा अनुभव घेणारे मन कसे तयार करावे हे समजावून सांगण्यासाठी समर्थांनी मनाचे श्लोक रचले. या श्लोकांना त्यांनी “मनोबोध” असेही नाव दिलेले आहे. 

या पाठमालेत आपण मनाच्या श्लोकांचा सविस्तर परिचय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
हा प्राथमिक पाठ आहे. 
 

विजय रा. जोशी. 



No comments:

Post a Comment