Wednesday, June 2, 2021

 

गीता अध्याय 18, भाग 2, ध्वनी - फीत.


पूर्णत्व स्थिती प्रयत्न.

काम्य निषिद्ध कर्मांचा त्याग.

स्वधर्माचे निष्काम बुद्धीने आचरण.

सद्गुरू यांचा ज्ञानोपदेश मिळतो.

पण साधक तीव्र अधिकारी नसल्याने त्याची वृत्ती एकदम ब्रह्मरूप होत नाही.गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाचा तो पुनःपुन्हा अभ्यास करून आपली बुद्धी शुद्ध करतो. मग ती बुद्धी आत्म चिंतनात रत होते. इंद्रियांचा निग्रह करून विषय वासना नाहीशी झाल्यावर मग तो इंद्रिये व मन योग धारणेकडे लावतो.मग इष्ट / अनिष्ट गोष्टींबद्दल प्रेम अथवा खेद काहीच उरत नाही.




जीवन आहे तिथ पर्येंत संपूर्ण त्याग अशक्य.

एखादा रागावला असेल तर फार ओरडा करून किंवा बिलकुल न बोलून राग प्रकट करेल. ज्ञानी पुरुष लेशमात्रही क्रिया करीत नाहीत, परंतु कर्म अनंत करतात. त्यांचे केवळ अस्तित्वच अपार लोकसंग्रह करू शकते. त्यांचे हात, पाय कार्य करत नाहीत तरीही तो काम करतो. क्रिया सूक्ष्म होत जाते कर्म वाढत जाते. विचारांचा हा ओघ पुढे नेला तर असे म्हणता येईल की चित्त परिपूर्ण शुद्ध झाले म्हणजे क्रिया शून्यरुप होईल व कर्म अनंत होईल.आधी तीव्र, तीव्रातून सौम्य, त्यातून सूक्ष्म व सूक्ष्मातून शून्य असे ओघानेच क्रियाशून्यत्व प्राप्त होईल. पण मग अनंत कर्म आपोआप घडेल. 

गीता महती आणि फळ. 

हि गीता म्हणजे संसारात शिणलेल्या लोकांना विश्रांतीची जागा आहे. जो कायावाचामने करून गीतेची सेवा करेल त्याला संसारातील दुःख भासणार नाहीच, शिवाय ; अचिंत्य अशा ब्रह्माचा आनंद उपभोगास मिळेल. गीता हि प्रभू श्रीकृष्णाची वांग्मय-मूर्ती आहे. विश्व सुख-दुःखाने ग्रस्त झालेले पाहून भगवंताने हा ब्रह्मानंद अर्जुनाचे निमित्त करून सर्वांना उपलब्ध करून दिला आहे. गीतेचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे जो वर्तन  करील, जो नित्य श्रद्धा पूर्वक श्रवण, पठण करील त्याचे सर्व श्रेयस असेच होईल.

पसायदान / प्रार्थना 

माउलींनी ग्रंथाचा शेवट करतांना मराठी वांग्मयात अमर होऊन राहिलेले अलौकिक पसायदान ज्ञानेश्वर आपल्या गुरुंजवळ मागतात. खळ व दुष्ट लोकांचा उद्धार होऊन ते ईश्वरनिष्ठ कसे होतील याची काळजी माउलीला लागलेली स्पष्ट दिसते. म्हणून त्यांच्याबद्दल माउली प्रथम कळकळीने प्रार्थना करते. 

जगांतील खळ आणि दुष्ट लोकांच्या वृत्तीत पालट पडून , दुष्ट कर्मे टाकून सत्कर्मे करावी अशी त्यांना बुद्धी व्हावी. जगातील सर्व लोकांनी एकमेकांशी बंधुभावाने वागावे. सगळीकडे धर्माची वाढ होऊन सर्व सुखी व्हावेत. त्यांनी भगवंताची सेवा करण्यात आयुष्य घालवावे. व हे घडून येण्यासाठी संत, महात्मे यांचे वास्तव्य या पृथ्वीतलावर निरंतर असावे. …. 

‘सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।18.66।।

माणसाचा धर्म एकच आहे. तो म्हणजे त्याला चिकटलेला ‘त्व’. हा ‘त्व’ समजायचा. ‘त्व’ मध्ये सारे जग येते, सर्व जगाशी एकरूप होणे, अद्वैत साधणे – म्हणजे “सर्व धर्मान परित्यज्य” ही स्थिती. गीता ऐकून संजय निर्भय झाला. गीता वाचून, त्यातील शिकवणीचे अनुकरण करून तीच निर्भयता माणसात येईल. “निर्भयता’ हेच गीतेचे फलीत आहे.

हरी ओम तत्सत ब्र्हमार्पणमस्तु II 


विजय रा. जोशी. 



गीता अध्याय 18, भाग 2, ध्वनी - फीत.


No comments:

Post a Comment