Thursday, August 31, 2023

 N. P. 8 / 11           ६ मार्च 



सकाळी ६ वाजता प्रस्थान. वाटेत नाश्ता चहा. 


येथे रोजचा सर्व साधारण कार्यक्रम असा असे:

सकाळी ३-३० ला उठणे. पहाटे ४ ला गरम चहा, कॉफी , बिन दुधाचा चहा तयार असे.  तो आपल्या सोयीने ४-३० पर्येत घेणे. मग स्नान  इत्यादी सर्व प्रातर्विधी आटोपून सामान पॅक करून , आपापल्या बॅग्स बाहेर बस कडे   घेऊन येणे, ६ वाजेपर्येत बॅग्स लोडींग व्हायचे, आणि बरोबर ६ वाजता बस सुरु व्हायची.


 

नंतर १० मिनिटात सकाळच्या आरत्या, प्रार्थना, स्तोत्र पाठ आणि नर्मदाष्टक सर्वानी म्हणायचे, बस मध्ये अत्यंत चांगली अशी माईक सिस्टम होती. एक टी.व्ही. स्क्रीन देखील होता.  नर्मदाष्टक बहुधा प्रभंजनच्या बरोबर म्हंटले जायचे. हे सर्व साधारण सात पर्येंत म्हणजे सुमारे तास भर चालायचे.


मध्ये वेळ मिळेल तसा “ओम नर्मदे हर” हा जप प्रभू ट्रॅव्हल्सने दिलेल्या वहीत लिहायचा. सर्व पाने भरल्यावे हा जप संख्येने ५००० पेक्षा जास्त होतो. शेवटी परिक्रमा सांगता पूजे नंतर हा जप नर्मदेत समर्पण करायचा. यात्रेला दिलेले हे साधनेचे एक परिमाण खूपच चांगले होते. जप आणि रिकामा वेळ सकारात्मक रित्या घालवणे त्याने शक्य झाले. सर्व यात्रा काळात धार्मिक, सात्विक वातावरण ठेवण्याचा महत्वाचा उद्देश साध्य होण्यासाठी असे काही उपक्रम आयोजकांनी ठेवले, ते नक्कीच कौतुकास्पद होते. 


नंतर ७ - ७-१५ च्या सुमारास प्रत्येकाच्या हातात चालू बस मधेच नाश्ता दिला जाई. जेव्हा शक्य असेल तेव्हा बस थांबवूनही होई. नाश्ता पोटभर असे एकदा दिल्यानंतर ज्यांना पाहिजे त्यांना परत परत दिला जाई. १५ दिवसात वेगवेगळे पदार्थ / डिशेस देत असत. अर्थात पोहे, उपमा, खिचडी वगैरे दोन वेळा दिले गेले. पण बटाटवडे, मिसळ, कटवडे, थाल्पीठे वगैरे सुद्धा गोष्टी होत्या. नाश्ता आणि जेवण रुचकर, घरगुती आणि पोट सांभाळणारे असे.


नाश्ता झाल्यानंतर ८ - ८१५ च्या सुमारास बस थांबविली जाई आणि मग नैसर्गिक परिसरात रस्त्याच्या बाजूला मोकळया हवेत चहा-कॉफी पान आणि नैसर्गिक विधी (१ नम्बर) यासाठी ब्रेक घेतला जाई. प्रवासात दर दोन तासांनी हा ब्रेक असे. कधीही बस प्रवास रात्री केला गेला नाही. वाटेत स्थळ दर्शन प्रमाणे बस थांबविली जाई. उतरण्या अगोदर त्या त्या स्थळाचे महत्व,महात्म्य, पप्पा देसाई विस्तृतपणे स्वतःच्या कंमेंट्स सकट सांगत असत. परत येण्याचा वेळ दिला जाई. आणि प्रभू आणि रागिणी ताई हे दोघेही आमच्या बरोबर मार्गदर्शनासाठी असत. सर्वांवर लक्ष आणि ग्रुप एकत्र असण्याची काळजी घेत. ज्यांना विशेष मदतीची गरज असे, त्यांना आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन देखील करत असत. वातावरण घरगुती आणि खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न असे. 


दिंडोरीहून महाराजपूर या प्रवासात बस चहासाठी थांबली ते नैसर्गिक, एकांतातले आणि वन्य भागातील एक ठिकाण होते. सर्व परिसर निसर्गाने नटला होता. बसच्या पुढील बाजूस थोडे पुढे गेलो. वाटेत जमिनीवर एक छोटे अत्यंत गोंडस, मोहक असे घुबडाचे पिल्लू बसले होते. शेखरने मला ते दाखविले. घुबड म्हणजे विद्रुपता हे आज पर्येंत असलेलं डोक्यातील समीकरण त्या पिल्लाने बदलून टाकले. घुबडाला दिवसा दिसत नाहीं असें म्हणतात . आम्ही पहायला जवळ आलो तरी  पिल्लू बसलेले होते पण नंतर आम्ही त्याला ओलांडल्यावर मात्र ते आमची चाहूल लागून उडून गेले. 


त्या भागात मोहाचे झाड होते. ते फुलांनी बहरलेले होते. आमचा चालक (परशुराम ज्याला प्रभू नेहमी परशा म्हणायचा) त्याने काही फुले ओंजळीत आणली. खूप मादक , मोहक वासाची ती फुले भगिनींनी आपल्या हातात घेतली. 


आज महाराष्ट्रात होळीचा सण. येथे मध्यप्रदेशात

७ तारखेला असतो असं समजले. होळीतील भांगेच्या नशेची आठवण अनेकांना त्या मोहाच्या फुलांनी करून दिली.  


महाराजपूर


येथील घाटावर नर्मदा, सरस्वती, बंजारा त्रिवेणी संगम आहे.  अर्थात सरस्वती गुप्त आहे. पात्र विस्तीर्ण आहे.


संगमावर नर्मदा मय्याची हळद कुंकू पूजा दीप दान वगैरे कार्यक्रम झाले. परत येताना ताज्या उसाच्या रसाचा काही जणांनी आस्वाद घेतला. पप्पांची बायपास आणि दोनवेळा अँजिओप्लास्टी झाली आहे. मुलगा,  सून त्यांच्या आहाराविषयी खूप सजग असतात. पण पप्पा हळूच जेव्हा जमेल तेव्हा त्यांच्या आवडीच्या गोष्टींचा आस्वाद घेतात.

आज ऊस  रसाचा स्वाद आमच्या बरोबर घेतला. 


झोतेश्वर 


येथे एका विस्तीर्ण मंदिर परिसरात

आद्य श्री शंकराचार्य यांनी ज्या गुहांमध्ये आपली साधना केली ते तप स्थान (गुरु गुफा) आहे.  दीर्घ तप साधनेतून ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या समोर  नर्मदा मय्या प्रकट  झाली. येथे त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे नर्मदा अष्टक स्तोत्र बाहेर पडले.अशी हकीगत प्रभुने  सांगितली. 


स्फटिक शिव लिंग - एक विस्तीर्ण असे स्फटिक शिवलिंग असलेले हे एक मंदिर आहे. गाभाऱ्याच्या बाहेर नर्मदेतील दगडापासून बनवलेली सुमारे १५ शिवलिंगे आहेत.




राज राजेश्वरी त्रिपुरा सुंदरी देवी मंदिर,,


याच परिसरात काहीशा उंच टेकडीवर हे देवीचे भव्य आणि अत्यंत देखणे असे मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याभोवती पण भिंतीला लागून ६४ योगिनीं छोट्या छोट्या मंदिरात स्थापन केल्या आहेत. १४ विद्या आणि ६४ कला असे ज्ञानाचे वर्णन आपल्याकडे केले जाते. त्या पैकी ६४ कलांच्या या ६४ योगिनी देवता आहेत असं म्हणतात. 


माझा रूम  पार्टनर  शेखर याने इथल्या व्यवस्थापनाशी फोनवर संपर्क करून भविष्यात सोयीच्या वेळी तेथे येऊन यज्ञ करण्यासाठी परवानगी मागितली . ती मिळाली.

शेखर दरवर्षी २ ते ३ यज्ञ विविध प्रसिद्ध तीर्थ क्षेत्रात जाऊन करतो असे म्हणाला. प्रत्येकी सुमारे ६० - ६५००० रुपये खर्च करून .

हा सर्व उपक्रम कशासाठी असे विचारले,

तर म्हणाला , माझ्या साधनेसाठी. आनंदासाठी देवाला थँक यु म्हणण्यासाठी. अन त्या निमित्त काही नातेवाईक येतात, भेटतात, क्षेत्रातील पुरोहिताना मदत होते, काही गरीब, गरजूंना काही मदत होते.


हा पठया संघाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे, द्वितीय वर्ष प्रशिक्षित आहे. जेव्हा यज्ञ शक्य झाला नाही तेव्हा त्याने तलासरी येथील वनवासी कल्याण आश्रमातील काही विद्यार्थींना मदत केली आणि यज्ञाचे पैसे खर्च केले 


मंदिरात कुंकुम, अष्टगंध, कासव (तांब्याचे)

वगैरे खरेदी केले.  



करेली मुक्काम, होळी दहन . हॉटेल ग्रँड शुक्राना . 



लिंक - होळी सेलिब्रेशन 


https://photos.google.com/photo/AF1QipPgE59ShRn9I0Rp9N59DxS7Jzl4kOCu8UXbWP6J


आज महाराष्ट्रात होळी आहे. आमच्या यात्रा आयोजकांनी होळीचे आयोजन हाटेल बाहेरच्या भागात खास आमच्यासाठी केले.

हॉटेलचा मालक एक सरदारजी, त्याची पत्नी, आणि मुलगी यांनी आमच्या सोबत होलिका दहनाचा कार्यक्रम प्रथमच पाहिला.


होळीची बोंब  मारून झाल्यावर मग रात्रीच्या जेवणाचा बेत झाला. जेवण चान्गले होते. अर्थात मला रात्री नेहमी प्रमाणेच कमी भूक होती. 


७ मार्च


सकाळी ७ वाजता,ब्रह्मांड घाट =( बरमान घाट)  , नर्मदा पूजन, दीप दान, आरती, नर्मदा अष्टक.

परत हॉटेलवर जाऊन चहा, नाश्ता घेऊन प्रवास सुरू.


(बरमान घाट नरसिंहपुर जिले का एक दर्शनीय स्थल है। यह घाट लोगों की आस्था का केन्द्र है। यह घाट पवित्र नर्मदा नदी के किनारे स्थित है। आप इस घाट पर अपने वाहन से असानी से पहुॅच सकते है। बरमान घाट का नजदीकी रेल्वे स्टेशन करेली है। करेली रेल्वे स्टेशन से बरमान घाट करीब 18 किलोमीटर दूर होगा। बरमान घाट अपनी खूबसूरती एवं धर्मिक महत्व के कारण प्रसिध्द है। बरमान घाट को भगवान ब्रह्मा की तपोभूमि के रूप में जाना जाता है। इस जगह को ब्रम्ह घाट के नाम से भी जाना जाता है। इस घाट के आसपास बहुत सारे मंदिर एवं सुंदर घाट है। इस घाट में आप स्नान कर सकते है। यह पर विशेष रूप से मकर संक्रांति में भीड लगती है। )


आज प्रवास कमी आहे.  सरळ नर्मदा पुरं,, पूर्वीचे होशिंगाबाद येथे आलो . मुक्काम हाटेल अग्निहोत्री


नर्मदापूरम . 


जेवण. केले, चहा घेऊन ग्रुप्स मधे रिक्षा करून खररा घाटावर गेलो. या घाटा  जवळ एक मुखी दत्त मंदिर आहे. येथे टेंबे स्वामी  यांनी काहीकाळ साधना केली. तो वृक्ष आहे.  गुळवणी स्वामींनी दीक्षा याच परिसरात घेतली असे सांगण्यात आले. 



.



 येथून रिक्षेने शेठाणी घाटावर गेलो.




N. P. 8 / 12 

                                                                         पुढे …


 N. P. 9  / 11.      ७ मार्च २३ सायंकाळ



शेठाणी घाट नर्मदा पुरम (पूर्वी होशिंगाबाद). 


येथे अनुभवलेले दोन अडीच तास हा या नर्मदा परिक्रमेचा एक climax point होता. 



शांत सायंकाळ. मंदिर परिसर, गोपुरांच्या आकाश रेखांनी नटलेला नर्मदा मय्याचा किनारा , विस्तीर्ण शांत, स्वच्छ, मंद प्रवाहित पाणी, नदीचा दुसरा तट देखील असाच शांत, सुंदर, विलोभनीय. 


आस्तिकच नव्हे तर नास्तिकाची चित्त-वृत्ती उल्हसित व्हावी असा तो मंगल, पवित्र परिसर. 

आज आम्हाला आमच्या टूर व्यवस्थापनाने वेळेचे

बंधन ठेवले नव्हते. निवांत पणे आम्ही अगोदरच टेमबे स्वामी, गुळवणी स्वामी यांच्या पूर्व अस्तित्व तरंगांनी भारलेले एकमुखी दत्त मंदिर पाहून शेठाणी घाटावर आलो होतो. 


प्रशस्त घाटावर योग्य अशी जागा पाहून स्नान केले . खूप छान वाटले, नंतर विधीवत नर्मदा मय्याची पूजा केली, दीपदान झाले. काही स्तोत्रपाठ केला, सर्व कल्याणाची स्व-अंतःकरण शुद्धीची प्रार्थना अत्यंत श्रद्धेने, कृतज्ञतेने केली .


आणि मग दुसऱ्या बाजूच्या घाटा वर सुरु झालेल्या लगबगीने आमचे लक्ष वेधले. आज येथील होळी पूजनाचा दिवस होता आणि त्या निमित्त घाटावर अति भव्य आणि देखण्या महा -आरतीचे आयोजन सुरु झाले होते. 


लिंक महाआरती. (आमचे शूटिंग)


https://photos.google.com/photo/AF1QipNF1o-6D40MhT0gVCA50R_qZoNuqKlZAxQdVz3M


घाटाच्या वरच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर आरती धारकांसाठी पाच उंच आसने आणि त्यासमोर आरती पूजेसाठी मांडणी केली होती.  . सोन्यासारखे चकाकणारे अनेक पाज्योती धारण करणारे आरती दिवे एका हातात  तर दुसऱ्या हातात मंजुळ आवाज करणाऱ्या घंटा घेतलेले आरती धारक विशिष्ट अशा गणवेशात होते.


त्यांच्या उजव्या बाजूस शेण्यानी रचलेली होळी होती. होळीची बाजूला उंचावर पुरोहितांची स्वतंत्र व्यासपीठ तर त्यांच्या दुसऱ्या बाजूस आरती, भजन स्तोत्र म्हणणाऱ्या भगिनींसाठी बैठक आणि माईक सिस्टिम होती. वाद्य वृंद सज्ज होता, आरती धारकांच्या मागे घाटाच्या पायऱ्यावर लोकांना बसण्यासाठी विस्तीर्ण जागा होती. ती सर्व जागा जवळ जवळ भरली होती. आम्ही सर्व यात्रेकरूनी तेथे सोयीच्या जागा पाहून बसून  घेतले.


कार्यक्रम आखीव, रेखीव होता. कार्यक्रमात

म्हणायच्या आरत्या, स्तोत्रे वगैरे ची  पत्रके सर्वांना वाटण्यात आली आणि मग नर्मदा, होलिका पूजन झाल्यावर अत्यंत दिमाखदार अशा आरतीला मंगल वाद्यवृंदाच्या साथीने सुरवात झाली.


एकत्र भावाने म्हंटली गेली ती स्तोत्रे, त्या आरत्या, नर्मदाष्टक वगैरे म्हणणाऱ्या गायक-गायिकांच्या अत्यंत सुरेल स्वरांनी उपस्थितांची मने भक्तीत चिंब झाली, सात्विकतेने भारून गेली. 


समोर उभे असलेले आरती धारक त्यांच्या करकमलातील आरती आणि घंटा विशिष्ट तालात, सुरात चारी बाजूस लयबद्ध पद्धतीने फिरवतांना पहाणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता.  नुकतेच स्नान , पूजा करून पुनीत झालेले मन प्रसन्नतेने पुलकित झाले.  आता रोज म्हणून सरावाचे झालेले नर्मदाष्टक सुरेल, एकत्रित पद्धतीने, गायकवृंदाच्या साथीने म्हणताना, ऐकताना  आज तर नर्मदा मय्याचे  आशीर्वचन मिळाल्या सारखे वाटले. 


आरती झाली, नर्मदाष्टकांनी कान , मन, अंतःकरण तृप्त झाले मग गुरुजींनी होलिका दहनाचे मन्त्र उच्चारायला सुरवात केली . पूजकांनी पुरोहितांच्या सल्यानुसार होलिका पूजन केले अग्नि प्रज्वलीत झाला.  होळीची तेजोवलये आकाशाकडे प्रवाहित

होऊ लागली आणि मग त्या होलिका उत्सवाचा सामुदायिक आनंद सर्व जण एकमेकांच्या अंगावर फुलाच्या पाकळ्यांचा वर्षाव करून घेऊ लागले.


वातावरण आनंदाने, भक्तीने, अंगावर बरसणाऱ्या

फुल पाकळ्यातील मय्याच्या परमेश्वरी आशीर्वादाच्या स्पर्शाने भारून गेले आणि त्या पवित्र क्षणी यात्रेला मिळालेल्या आशीर्वाद प्रसादाचा अवर्णनीय अनुभव माझ्या अंतरी विशाल झाला. नंतर इतरांशी बोलतांना याच प्रकारच्या  एका अद्वितीय अनुभवाचे साक्षी आम्ही सर्वच सह-प्रवासी झाल्याचे एकमेकांना समजले, आकळले. (महाआरती गुगल लिंक) 


https://www.google.com/search?q=narmda+puram+holi+aarti+sethani+ghaat&oq=narmda+puram+holi+aarti+sethani+ghaat&aqs=chrome..69i57.21070j0j7&sourceid=chrome&ie=UTF-8#fpstate=ive&vld=cid:f3d4c53d,vid:YxUrTG725SM


या बहरलेल्या वातावरणात अंगावर पडलेल्या काही फुल पाकळ्या संभाळीत,  त्या अद्वितीय धार्मिक, सामाजिक, पारंपरिक, अलौकिक अनुभवाच्या धुंदीत गर्दीतून वाट काढीत आणि मिळेल ते वाहन पकडीत आम्ही सर्व रात्री उशीरा लॉजवर आलो.

(हॉटेल अग्निहोत्री), नर्मदापूरम. 



N. P. 9  / 12. 

                                                                          पुढे 


N. P. 10 /11               ८ मार्च     

                                                    


नर्मदा पुरमहून प्रस्थान, नेहमी प्रमाणे ६ ला  प्रवास सुरू


आज ओंकारेश्वर ला जायचे आहे. वाटेत कोणा थोर 

पुरुषाच्या समाधी मंदिराचे दर्शन  आहे.

हा additional भाग "स्पेशल केस" म्हणून

आमच्यासाठी add केला आहे असे सांगितले गेले. 



श्री धुनीवाले बाबा , ज्यांच्या अनेक वेळा झालेल्या

मृत्यूचे गूढ आणि त्यांचे कार्य

याविषयी देसाई सिनियर यांनी माहिती दिली.

त्यांनी या बाबांवर एक पुस्तक लिहिले आहे. 

असे म्हटले जाते की श्री दादाजी होशंगाबाद मध्ये

दिगंबर रूपात रामलालदादाच्या नावाने राहत |

तिथे त्यांनी अनेक चमत्कार दाखवले |

तेथे ते तीन वर्षे राहिले आणि नंतर त्यांनी विहिरीत

आपला देह त्याग केला |

काही दिवसांनंतर पुन्हा सोहागपूरच्या इम्लिया जंगलात

ते दिगंबर रूपात

एका झाडाखाली धुनीभोवती रममाण होऊन बसलेले दिसले

|

गावकऱ्यांच्या आग्रहास्तव नर्मदा किनाऱ्यापासून

जवळपास १०-१२ किलोमीटर

दूर असलेल्या नर्सिंगपूरला रवाना झाले तेथेही त्यांनी आपले

अद्भुत चमत्कार दाखवले आणि काही काळानंतर

समाधी घेतली

ते पुन्हा सीसीरी संदुक ग्राम जिल्ह्यात रामफल नावाने

प्रकट झाले .

जवळपास १९०१ मध्ये ते लोकांचे दुःख दूर करण्यासाठी

आणि लोकांना पापातून मुक्त करण्यासाठी साईखेडा

येथे आले तिथे त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले

आणि अगणित चमत्कार दाखवले |

साई खेड्यात श्री दादाजी पहिल्यांदा दिसले तेव्हा ते

कोणाच्यातरी घराच्या

छतावर उभे असलेले दिसले | तेथून ते मातीचे तुटलेले कौल

खाली उभ्या असलेल्या मुलांना मारत असत |

त्यामुळे मुले गोंधळ करायची आणि म्हणायची,

“अरे पगला बाबा आ गया, पगला बाबा आ गया”

(पागल बाबा आला , पागल बाबा आला)

पण ज्या रोग्याला त्यांनी मारलेला कौल किंवा दगड

लागायचा तो रोगातुन मुक्त व्हायचा |

साईखेड्यातील मुले श्री दादाजींच्या

मागे पुढे फिरायचे आणि त्यांना पागल बाबा म्हणून त्रास द्यायचे |

मुलांना दूर पळवण्यासाठी श्री दादाजी हातात एक डंडा

(काठी) ठेवू लागले |

तेव्हापासून लोक त्यांना ‘डंडेवाले दादाजी’ म्हणू लागले |

ज्यांच्यावर त्यांचा हा डंडा

पडायचा त्यांचा उद्धार व्हायचा | ते दिवसभर जंगलात

किंवा शेतात फिरायचे आणि गाई चारायचे |

संध्याकाळी एका सुकलेल्या आंब्याच्या झाडाच्या

ढोलीत बसायचे | एकदा श्री दादाजीनीं त्या सुकलेल्या

झाडाच्या लाकडांची धुनी पेटवली आणि तेव्हापासून लोक

त्यांना ‘धुनीवाले दादाजी’ असे सुद्धा म्हणू लागले |

30 वर्षांपर्यंत श्री दादाजी साईखेडा

आणि त्याच्या आसपासच्याच्या परिसरात फिरायचे आणि

जेथे त्यांची इच्छा व्हायची

तेथे विश्राम करायचे | ते कधी नर्मदाकिनारी, कधी शेतात,

कधी झाडाखाली

तर कधी कोणाच्या घरात विश्रांती घ्यायचे |

श्री दादाजींनी कधी संसारिक साम्राज्य स्थापन केले नाही |

त्यांची गृहस्थी म्हणजे डंडा, चिमटा, जलपात्र आणि कांबळ

अशी अद्वितीय होती |

ज्यांना कुणाला श्री दादाजींकडून शिवी मिळायची

किंवा डंडा पडायचा त्याचे कल्याण व्हायचे |

याप्रमाणे त्यांची एवढी प्रसिद्धी झाली की एक दिवस

स्वतंत्रता सेनानी मदन मोहन मालवीय हे

पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी

यांना दादाजींकडे दर्शनासाठी घेवून आले |


प्रथम महात्मा गांधीजींनी नमस्कार केला |

पण जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी नमस्कार केले तेव्हा

श्री दादाजी जे सदैव रूद्र रूपात

असायचे त्यांनी नेहरूजींना डंडा मारून सांगितले की

“यह मोडा लायक है, याहै स्वराज दी है” |

(हा व्यक्ती लायक आहे | यांना स्वराज्य दिले)

आणि त्यांना आपला डंडा दिला |


सन १९७७ मध्ये इंदिरा गांधी

२४ अकबर रोड ए |आय |सी |सी हेडक्वार्टर मध्ये

राहत होत्या |

तेव्हा श्री श्री १००८ श्री छोटे सरकारजी त्यांना

दर्शन देण्यासाठी गेले |


आणि इंदोरचे श्री श्री १००८ श्री बडे सरकारजींनी

दिलेला मोगऱ्याचा गजरा त्यांच्या हातात बांधून


इंदिराजींना सांगितले की

इंदोरच्या श्री श्री १००८ श्री बडे सरकारजींनी निरोप दिला

आहे की,

“आप फिरसे प्रधानमंत्री बनोगी”

|(तुम्ही पुन्हा प्रधानमंत्री बनाल)

त्यावेळेस श्री छोटे सरकारजींनी त्यांना आठवण करून दिली

की त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरूजींना साईखेड्यात

श्री बडे दादाजींनी डंडा मारून त्यांना तो डंडा दिला होता |

इंदिराजींनी ही गोष्ट मान्य केली

आणि श्री श्री 1008 श्री छोटे सरकारजींना आपल्यापूजाघरात नेऊन त्यांना तो डंडा दाखवला |

इंदिराजींनी सांगितले की,

“माझे वडील पंडित जवाहरलाल नेहरू त्या डंड्याला

आपल्या काखेत दाबून नेहमी

आपल्याजवळच ठेवायचे” | काही महिन्यानंतरच इंदिराजी

चिकमगलूर मधून काँग्रेसमधूनर्ण बहुमताने निवडून पुन्हा एकदा भारताच्या

प्रधानमंत्री बनल्या |)


देसाई (पप्पा) यांची  १५-१६ अशी विविध विषयांवरील

पुस्तके प्रसिद्ध असून त्यातून होणारे सर्व उत्पन्न ते

श्री शंकर महाराज प्रतिष्ठान या त्यांनी स्थापन केलेल्या

संस्थेला देतात. संस्था  शंकर महाराज यांच्या

कार्याचा प्रचार करते. 


 


धुनीवाले बाबा यांच्या मठात  बऱ्याच लोकांनी अखंड सुरु

असलेल्या धुनीत

पाणी नसलेल्या नारळाचे हवन केले.

तेथे मागितली मागणे पूर्ण होते असा  विश्वास किंवा

लोकांची श्रद्धा आहे.

याच संकुलाच्या भोजन गृहात आमच्या जेवणाचे

आयोजन केले गेले.

येथे रोजची बुफे सिस्टम नव्हती.

स्वतः रागिणी ताई आणि प्रभंजन वाढप करीत होते. 


वाटेत प्रसिद्ध गायक आणि अभिनेता किशोर कुमार

यांचे स्मारक बसमधूनच पाहिले.

पुढे ओंकारेश्वर हॉटेल ला आलो. हे  हाटेल

जेथे आम्ही सुरवातीस राहिलो होतो,

गावापासून १५ कि,मी, दूर आहे, सर्व हॉटेल

दुसऱ्या दिवशी लग्न समारंभासाठी

बुक असल्याने त्यांनी आमची under construction

असलेल्या पर्यायी जागेत सोय केली.

काही गोष्टी सोडल्या तर हे हि हॊटेल ठीक होते. 



  N. P. 10 /12                                                                     पुढे 


 

 N. P. 11 / 11                 ९ मार्च २०२३                                                         


सकाळी उठून सर्व आवरून ८ च्या सुमारास ओंकारेश्वर कडे निघालो. 



नर्मदेवर जाऊन स्नान केले. नंतर सर्वांनी एकत्र बसून घाटावर यात्रा समाप्ती पूजन, आरती, नर्मदाष्टक वगरे सर्व कार्यक्रम झाले त्यानंतर ममलेश्वर दर्शन केले, गर्दी त्या मानाने खूप कमी होती . दर्शन शांततेत झाले. 


दर्शन घेऊन मग घाटावर आलो. झुलता बुल बंद असल्याने होडीने पैलतीरी ओंकारेश्वर दर्शनासाठी आलो. वाटेत नदी मध्यात घरी नेण्यासाठी आणि ओंकारेश्वर चढविण्यासाठी नर्मदाजल बाटल्यात भरून घेतले. 


ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी होती, दुपारी १२ २० ला मंदिर बंद होण्या अगोदर दर्शन व्हायला हवे होते. आमचे एक सह प्रवासी येथून वरॊदरा येथे जाण्यासाठी १ वाजे पर्यत निघायचे होते.  दर्शन क्षणभरच झाले. नर्मदा जल ओंकारेश्वर पिंडीवर चढविले. (अभिषेक केला, किंवा ,म्हणा ओतले. कारण तेथे प्रचंड गर्दीचा रेटा होता). प्रवासात सर्वत्र आणलेले आणि ठीक ठिकाणी भरून घेतलेले नर्मदा जल , श्री पटेल बोरिवली यांनी ओंकारेश्वरी चढवले आणि आणि सांगता झाली. 




नंतर बाहेर आलो. प्रसादाचे लाडू अनिकेतला  (अनिकेत सोनार, वय ३३ वर्षे , सर्वात तरुण सह-प्रवासी) आणायला सांगितले. तो सर्वांना यथाशक्ती मदत करीत असे. नंतर वर असलेल्या महाकालेश्वर मंदिरात अतिशय शांततेत रुद्र पाठ गुरुजींनी केला. आरती झाली आणि मग तेथून सर्व बाहेर पडलो. परत नर्मदा पात्र पार करून ममलेश्वरी आलो. वाटेत बाजारात नर्मदा गोटे, शिवलिंग आदी खरेदी केली. काही गोटे अगोदरच स्नान करताना नेमावर (नाभस्थान) येथे पात्रातून बुडी मारून काढले होते. येथून न्यायला आणि घरी भेट द्यायला प्रसाद आणि अशा गोष्टी उपलब्ध असतात. 








आटोपून लॉजवर आलो तेव्हा तीन वाजून गेले होते. नंतर साग्रसंगीत जेवण झाले. सायंकाळीं पाच वाजल्या नंतर तेथील गुरुजी कुमारिकांना घेऊन येणार होते. नर्मदा यात्रेत कुमारिका पूजनाचे विशेष महत्व आहे. ते आज सायंकाळी करायचे आहे. 


(नर्मदा हि कुमारिका आहे अशी मान्यता असल्याने या यात्रेत कुमारिका पूजेचे महत्व आहे. देवी भागवतात नवकन्यांचे महत्त्व प्रतिपादित करण्यात आले आहे. दोन ते दहा वर्षांच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन आणि मान-पान केले जाते. यांनाच कुमारिका असे म्हटले जाते. कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुष्य, बल वृद्धिंगत होते. यामध्ये तीन वर्षाच्या कन्येला त्रिमुर्ती, चार वर्षाच्या कन्येला कल्याणी, पाच वर्षांच्या कन्येला रोहिणी, सहा वर्षाच्या कन्येला कालिका, आठ वर्षांच्या कन्येला शांभवी आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा, दहा वर्षांच्या कन्येला सुभद्रा म्हटले जाते. या नवकन्या कुमारिकांच्या पूजनाने अनेकविध लाभ मिळतात.)


कुमारिकांना देण्यासाठी काही उपयुक्त गोष्टी, खाऊ यांची २० -२५ पाकीटे  अगोदरच स्मिताने तयार करून दिली होती. वाटेत  अनेक लहान वयातील गरजू मुली भेटल्या तेव्हा त्याचे वाटप आणि १५/२० रुपये असे प्रत्येकीस वाटले होतेच. आज होणारे कुमारिका आणि सुवासिनीपूजन हे विधिवत होते.) 


सायंकाळी ६ नंतर शाळा सुटल्यानंतर गुरुजी पाच कुमारिका आणि एक सुवासिनी सह आमच्या निवास स्थानी आले. मग त्या सर्वांना एकत्र बसवून भगिनी यात्रिकांनी त्यांची पूजा, सन्मान करून भेट वस्तू आणि यथाशक्ती धन दान केले, सुहासिनींची ओटी भरून त्यांचाही सन्मान आणि दान केले. बंधू यात्रिकांनी देखील कुमारिका पूजन केले . सुवासिनी पूजनासाठी भगिनी यात्रिकांची मदत घेतली. 


या व्यतिरिक्त गुरुजींनी जे सेवा कार्य, पूजा आणि अन्य धार्मिक कार्य केले त्यासाठी सर्व यात्रिकांनी आपापली वर्गणी दिली (एकूण रु. (१०० +३००) प्रत्येकी). हि सर्व रकम एकत्रितपणे गुरुजींना दक्षिण म्हणून दिली. 

येथे सर्व यात्रा उपक्रम संपन्न होतो. 

सायंकाळी सर्व जण परिसरात आरामात ग्रुपमध्ये गप्पा मारत फिरत होते. काही भगिनी साधक विशेषतः कोल्हापूरच्या भगिनी माझ्या  कडे येऊन काही गोष्टी सांगा म्हणाल्या, त्यांना मनाचे श्लोक निर्माण झाले त्याची गोष्ट सांगितली. भक्ती म्हणजे, उपासना म्हणजे काय ? रोजच्या कर्माला साधनेचे स्वरूप समता हेतू ने कसे द्यायचे , देव भक्ती म्हणजे देव आदर्शचे  आचरण, समता हा निसर्ग नियम, विश्वाच्या संचलनात समता दिसते, पण याच विश्वाचा अत्यंत सूक्ष्म घटक असलेल्या माणसास विषमता प्रिय असते. आणि म्हणून विश्व नियमांचे पालन थोड्या तरी निस्वार्थ वर्तनाने कसे साधता येईल, आणि जीवन सुखी कसे करता येईल या बद्दल स्वामीजींनी सांगितलेल्या , मनशक्तीत समजलेल्या काही गोष्टी सांगितल्या. त्या त्यांना खूप भावल्याचे दिसले, अर्थात वेळेची मर्यदा असल्याने हा भाग ३० -४० मिनिटात संपवावा लागला. त्या अगोदर आमचे सहा-प्रवासी असलेले श्री आणि सौ हवासखान यांचा लग्न वाढदिवस केक कापून आणि सर्वानी शुभेच्छा देऊन साजरा झाला. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन प्रभू ट्रॅव्हल्स तर्फे आठवणीने करण्यात आले, हे विशेष आहे. 



ही  यात्रा सुखकर आणि आनंददायी होण्यासाठी प्रभू ट्रॅव्हल्सच्या बस बरोबर असलेल्या कर्मचाऱ्यांचा वाटा मोलाचा होता. उत्तम प्रवास, वेळेवर पोहोचणे, सुग्रास नाश्ता, जेवण,आणि सर्वांना योग्य तर्हेने सेवा पुरविणाऱ्या बरोबरच्या सात प्रभू ट्रॅव्हल्स स्टाफचा कौतुक, अभिनंदन आणि प्रोत्साहन सोहळा मग सर्व यात्रेकरुंना मिळून साजरा केला. प्रत्येकी रुपये ७०० वर्गणी जमा करून आलेली रक्कम पाकिटातून योग्य त्या कौतुक शब्दांसह त्यांच्या कडे देण्यासाठी एक छोटेखानी पण गोड समारंभ साजरा झाला. मग मंडळी आपापल्या निवास स्थानी विश्रांती साठी गेली. परिक्रमेचा १३ वा दिवस आणि यात्रेचा १४ व दिवस संपन्न झाला. 


दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ला मुंबई कडे प्रवास सुरु झाला, एखाद तास ट्राफिक मध्ये अधिक गेला. 


Link   रोकडोबा मंदिर 


https://photos.google.com/photo/AF1QipPyePts203JjRn8AnFqjYsEIczwEuBXCU2-MIju



आर्वी येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरात बस थांबली. 

वाटेत भोजनासाठी थांबलो तो राम हनुमान मंदिर देऊळ वाडा, तेथे चालू असलेली अखंड रामधून आणि परिसरात उन्हात निश्चल बसलेला हट योगी हे सर्व वैशिष्ठयपूर्ण होते. मंदिर परिसरातील झाडांच्या पारावर यात्रेतील हे शेवटचे भोजन. तो  स्वाद सर्वानी घेतला. 



रात्री सुमारे ११ वाजता ठाणे ज्युपिटर हॉस्पिटल जवळ बस मधून उतरलो. नंतर उबेर कॅब करून पनवेल ला रात्री १२ च्या नंतर पोहोचलो. बरोबर पुण्याचे खवासखान जोडपे होते. त्यांना कारंजाडयात त्यांच्या मुलीकडे जावयाचे होते. मला घरी ड्रॉप करून ते पुढे करंजाडयास गेले. 


१५ दिवसाची नर्मदा परिक्रमा सफल संपन्न झाली. 


ओम नर्मदे हर ! मंगल मूर्ती मोरया. !!  हरी ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु !!!





विजय रा. जोशी.




    (समाप्त) 


Wednesday, August 23, 2023

 मनाचे श्लोक - समारोप पाठ. 



हे दोनशे मनाचे श्लोक ऐकले (आणि त्यातील शिकवण वर्तनात आणण्याचा प्रयत्न झाला) म्हणजे सारे दोष नष्ट होतात. औषध घेतले म्हणजे रोग जातो तसेच हे आहे. आपले मन नाना विषयांच्या विचारांनी व्यापलेले असते. चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, निर्दोष-सदोष अशा सर्व प्रकारच्या विकारांनी मनात गर्दी केलेली असते. काळे ढग जसे आकाश आच्छादित करून वातावरणात अंधार पसरवत असतात तसेच हे मनातले दोष आपल्या जीवनात अंधार आणतात. पण जेव्हा वारा त्या ढगांना उडवून लावतो आणि आकाश पुन्हा स्वच्छ, निरभ्र होते तसे हे मनाच्या श्लोकांचे श्रवण ते दोष उडवून लावतात आणि मनाला भक्तिमार्गावर घेऊन जातात.  पण ऐकणाऱ्याने ते नुसते ऐकणे पुरे असत नाही. 

‘अर्थांतर पाहिल्याविण l उगेचि करी जो श्रवण l तो श्रोता नव्हे पाषाण l मनुष्यवेषें ll 

(दासबोध, द८, स६, श्लो७). 

अर्थ समजून घ्यायचा तर लक्षपूर्वक, विश्वासून ऐकले पाहिजे. तेव्हा कोठे आपले दोष समजून येतील, आपण कुठे चुकत होतो ते समजेल आणि मग भक्तिमार्गाची साधना करता येईल. ही साधना केवळ बुध्दिमंत साधकच करू शकेल असे नाही, तर मतीमंद व्यक्तिदेखील करू शकेल असा परिणाम हे श्लोक साधतील. 

इथे मतीमंद म्हणजे आज आपण जो अर्थ घेतो तसा मंदबुध्दी, लवकर बोध न होणारा असा नाही घ्यायचा. तर ज्याच्याकडे बुध्दी आहे परंतु तिच्यावर अज्ञानाचे, दुराग्रहाचे – ज्याला इंग्रजीत ईगो म्हणतात –  जळमट साठलेले आहे, आत्मज्ञान करून घेण्याकडे प्रवृत्ती नाही असा. योग्य प्रकारे केलेले, श्रध्दापूर्वक, केलेले या मनाच्या श्लोकांचे श्रवण अशा माणसांच्या बुध्दीवर आलेला झाकोळ नाहीसे करते. आणि मग काय होते? तर अशा झाकोळरहित, जागृत, शुध्द बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश मिळतो, विकारांपासून सुटका होते, वैराग्याचे सामर्थ्य मिळते आणि मनुष्यजीवनातले अंतिम ध्येय असलेली मोक्षप्राप्ती होते. याची ग्वाही समर्थ या अंतिम श्लोकात देत आहेत.

फलश्रुतीचा श्लोक. तुमच्यावर काय परिणाम होईल ते सांगणारा श्लोक. 

श्रवण केलियाचे फळ, क्रिया पाळते तात्काळ -- दासबोध फलश्रुती. 

(वर्तन बदलेल, सुधारु लागेल. बाकी काही चमत्कार होणार नाही.)

उपासक (साधक) कसा असावा याबाबत मार्गदर्शन करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 

"अवगुणांचा करूनि त्याग ! जेणे धरिला संतसंग !!१!! तयासी बोलिजे मग ! साधक ऐसा !!२ 

देहबुद्धी विवेके वारी ! आत्मबुद्धी सदृढ धरी !! श्रवण मनन केलेचि करी ! या नाव साधक !!"

स्वतःच्या अवगुणांची जाणीव, त्यांचा त्याग करण्याचा संकल्प, सद्गुरुंच्या सहाय्याने ते शक्य होते. 

बऱ्याचदा आपले दोष आपल्याला कळत नाही. आपण आपल्या वागण्याचे (चुकीच्या देखील) समर्थन करत असतो. अर्थात मनाचे श्लोक वाचताना, समजून घेताना आपण जे करू ते सर्व शुद्ध बुद्धीने, पूर्ण श्रद्धेने हवे. दासभक्ती भावाने व्हावे तर मुक्तीचा सोहळा आपण अनुभवू शकू. असा समर्थनाचा आपल्याला आशीर्वाद आहे. 

हरी ओम तत्सत ! 



विजय रा. जोशी. 



श्लोक २०१ - २०४ 




सारांश 

आत्मज्ञाना नंतर अंतरात होणारी क्रान्ति समर्थ या पुढील ५ श्लोकात सांगत आहेत. आपण खरे कसे आहोत त्या पासून (खऱ्या मी ) आपण आपल्यला काय खरे मानतो , समजतो (खोटा मी), यातील अंतर हेच ते द्वैत आहे. यावर उपाय एकांत आहे. एकाच अंत करणे आहे, आपल्यातील खोटा मी सम्पवणे आहे. हा एकांत मिळण्यासाठी उपाय “ध्यान” आहे

साधक परमात्म भेटीचे वर्णन केले आहे. दोघे एकरूप झाले, गंगा, यमुना एकरूप झाल्या, संगम झाला. द्वैत सरले, अद्वैत घडून आले.

सत्य ज्ञान प्राप्ती जरी जीवनात अवतरली तरी साधनेचे महत्व, प्रयत्नांचे महत्व कधीही समाप्त नाही. सत्संगती आणि सतशास्त्र श्रवण हे अखंड चालू राहिले पाहिजे. आपल्या आयुष्यात कर्तव्य पालनासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्यासाठी जो जीवन प्रवास आवश्यक आहे तो तर प्रत्येकाला करावाच लागेल, पण त्या व्यतिरिक्त अन्य संग मनाच्यानिश्चयाने सोडून द्यावेत. आणि अन्य सर्व काळ संत संगतीत, त्यांच्या विचारांच्या श्रवणात, वाचना, चर्चेत घालवावा.

साधना बीज सद्गुरू आपल्या अंतरात लावतो आणि  मग आपण आपल्या संकल्पाने, निष्ठेने, श्रद्धेने सातत्याने सर्व अडचणींवर मात करून जर ते बीज जोपासले, वाढवले तर या मानवी जीवनात सर्वांगीण प्रगती घडून आपला जन्म सर्वार्थाने सार्थकी लागतो. मृत्यू नंतर देखील सदगती मिळते. संत संगती साधकाला भव बंधनातून सोडविते आणि शरीरबुद्धी आत्मबुद्धीत पालटून अद्वैत साधनेकडे प्रगती घडते. 


विजय रा.  जोशी