Showing posts with label गीता अध्याय 16. Show all posts
Showing posts with label गीता अध्याय 16. Show all posts

Thursday, April 29, 2021

  

गीता अध्याय 16, भाग २, ध्वनी - फीत.



१६ वा अध्याय आपल्या रक्तात भिनला पाहिजे. 

अध्याय आत्म-परीक्षणाचा , स्वतःला प्रामाणिकपणे ओळखण्यास सहाय्य  करणारा, आणि स्वतःची गुणात्मक प्रगती घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त. एखादा एखादी गोष्ट उत्तम शिकला उदा गायन, अभिनय तर आपण म्हणतो कला त्याच्यात पूर्ण भिनली आहे. ज्ञान, शौर्य, भीती त्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबात आहे असे आपण वेगवेगळ्या व्यक्तींच वर्णन करतो. या पद्धतीने आपल्या चितात हा अध्याय धारण करायला हवा.
  

भौतिक जीवन व भोग वृत्ती. 

भौतिक जीवनही कामाला ताब्यात ठेवूनच सुखी होईल असे गीतेचे सांगणे आहे. स्त्री-पुरुष संबंध उत्तरोत्तर उच्च करायचे असतील तर मन/आत्म्याचा विचार हवा. ज्या समाजास फक्त शरीर सुखातच धन्यता वाटते  त्या समाजाची उत्साहशक्ती, जीवनशक्ती, धारणाशक्ती या नष्ट झालेल्या दिसतात. 

मानवा-मानवाशी असलेले संबंध जर उन्नत व विकसित करायचे असतील तर काम, क्रोध, लोभ रहीत (संयमित) समाज व व्यक्ती व्हावी अशी भगवंतांची इच्छा आहे.

या संयमाचे शास्त्र संतांच्या जीवनात, अनुभवात आपणास दिसेल. 

स्वतःच्या जीवनात प्रयोग करून संतांना जे सिद्धांत लाभले, त्याचे शास्त्र बनते.

आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |

झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग | उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू |

अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधने बुडविली |

पिटू भक्तीचा डांगोरा | कळिकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंदे || ५२०||

आसुरी संपत्ती टाळावी व दैवी संपत्ती कवटळावी. सद्गुण अंगी बाणल्याने वैयक्तिक विकास साधला, व्यक्ती विकास साधला तरी समष्टीचा विकास रहातोच. व्यक्तीने आपला विकास साध्य करत समाज, राष्ट्र यांतील लाखो व्यक्तींच्या विकासास सहाय्यभूत  व्हायचे असते.

जीव, जगत , जगदीश यांचे संपूर्ण पणे ज्ञान व संबंध करवून देते ते शास्त्र. जीवन म्हणजे काय ते समजावून आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होण्यास मदत करणारे, ते शास्त्र. म्हणून शास्त्र सोडून चालणार नाही. 

दैवी गुण अंगी येण्यासाठी अखंड साधना

असतो  मा सतगमय I तमसोमा ज्योतिर्गमय I 

मृत्योर्मा अमृतमगमय I 

असत, तमस व मृत्यू या माझ्या स्थिती आहेत त्यातून मला सत , ज्योती व अमृत व्हायचे आहे. म्हणूनच मला प्रयत्नशील रहायला हवे असे समजून खरा साधक आत्मविश्वासाच्या बाबतीत,प्रभुकार्याच्या बाबतीत सतत प्रयत्नशील असतो. आणि दैवी गुण अंगी येण्यासाठी अखंड साधना करतो.  

माणसाचे मन कसे आहे, कसे असावे हे १६ व्या अध्यायात कळत.

त्याच मर्म असं आहे की ..माणसाने असं वागावं, त्याच मन असं असाव, की शेवटी ‘आसवं’ गाळण्याची पाळी येऊ नये. साधनात मी गुंतून पडू नये. आणि साध्याचा विसर मला कधी पडू नये. जो संपत्तीला, साधनाना आदराने वागवितो त्याचा कधी अनादर होत नाही. या अध्यायातले सर्व विचार स्वतःचे सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त वाटतील. 



विजय रा. जोशी. 



गीता अध्याय 16, भाग २, ध्वनी - फीत.




  गीता अध्याय 16, भाग १, ध्वनी - फीत.



गीताशास्त्र सर्वांना उपयोगी : उच्च आणि नीच स्थिती मधील सर्व माणसांसाठी.




हे सर्व आदर्शवत आहे. पण सर्वसामान्यांनी येथ पर्येंत पोहोचण्यासाठी काय केले पाहिजे, वास्तविक परिस्थिती काय आहे, हे समजावून घेण्यासाठी १६ वा अध्याय उपयुक्त आहे. कारण येथे मानवाची उच्च स्थिती (दैवी संपत्ती) आणि नीच स्थिती (आसुरी संपत्ती) याचे दर्शन घडविले आहे. आणि मग नीच स्थितीकडून उच्च स्थितीकडे जाणे कसे आवश्यक आहे तेही समजावून सांगितले आहे. 

कुरुक्षेत्र बाहेरही आहे आणि आपल्या मनातही आहे. सूक्ष्म रीतीने पाहिले तर जो झगडा मनात असतो तोच बाहेर आपणास मूर्तिमंत दिसत असतो. बाहेर जो शत्रू उभा आहे तो माझ्याच मनातील विकार साकार होऊन उभा आहे. जागेपणाचे विचार जसे मला स्वप्नात दिसतात तसे मनातील विचार मला बाहेर (बाह्य जगात) दिसतात. आपल्या अंतःकरणात एका बाजूला सद्गुण तर दुसऱ्या बाजूस दुर्गुण उभे आहेत. या दोन्ही मिळून आपले व्यक्तिमत्व साकार झाले आहे. जे खरे युध्द आहे ते आंतच आहे. १६ व्या अध्यायात आत्म-परीक्षण करण्या साठी भरपूर माहिती उपलब्ध आहे.

जडवाद, निरीश्वरवाद आणि भोगवाद.

केवळ स्वार्थ साधण्याची प्रवृत्ती असते. त्याकरताच बुद्धीचा उपयोग केला जातो. असुरी लोक समजतात की ‘स्वार्थ साधला कि सगळे झाले’. व आपल्या स्वार्थाला अनुरूप प्रवृत्तीत ते मग्न असतात. त्यांच्या अशा प्रवृत्तीमुळे त्यांच्यावर कसलेही बंधन किंवा अंकुश नसतो. व यांना कोठल्याही आचारसंहितेची गरज वाटत नाही. जसा स्वार्थ साधेल तसेच काम करणे हि त्यांची सहज प्रवृत्ती असते. आणि म्हणून, ज्यामुळे स्वार्थही साधला जाऊन आत्मिक विकास देखील घडू शकेल असे प्रवृत्ती व निवृत्तीचे सिद्धांत त्यांना मान्य नसतात. 

माऊलींचे जनप्रेमी कोमलहृदय. 

 आसुरी संपत्तीच्या लोकांना ज्या थोर यातना भोगाव्या लागतात त्याचे वर्णन करतांना श्रीज्ञानदेवांच्या अंगावर शहारे येऊन त्यांची वाणी रडकुंडीला आलेली दिसते व ‘हे असुरी लोक का बरे असे वागतात? असे निराशेचे पण कळवळ्याचे उद्गार त्यांच्या मुखातून निघतात. (४१७-२४)

म्हणोनि तवा धनुर्धरा,I  नोहावे गा तिया मोहरा I  

जेवता वासू असुरा I संपत्तीवन्त II (४२३) 

आणि दंभादी दोष साही I हे संपूर्ण जयांच्या ठायी I 

ते त्यजावे हे काई I  म्हणो कीर II (४२४)

म्हणून अर्जुना ! ज्या ठिकाणी आसुरी संपत्तीवाल्यांचे राहणे असेल , त्या बाजूला तू जाऊ नकोस. आणि दंभादी करून सहा दोष सर्वांच्या सर्व ज्यांच्या ठिकाणी असतील , त्यांचा त्याग करावा, हे खरोखरच सांगितले  पाहिजे का ? (४२३-२४)

बुडते हे जन न देखवे डोळा I येतो कळवळा म्हणउनी : संत  तुकाराम 

“आसुरी  गुणांचा त्याग करून दैवी गुणांचा अंगीकार करावा ”  हा संदेश श्रीकृष्ण भगवान यांचे पासून माउली , तुकोबाराय आणि अनेक संत महात्मे आपल्या पर्येंत पोहोचविण्याचा असा अथक प्रयत्न करत आहेत.  स्वतःचे जीवनात तसे वर्तन करून आपल्यासमोर आदर्श ठेवत आहेत , त्यांच्या पुण्यकार्याला मनोमन वंदन करून त्यांचा उपदेश आपल्या जीवनात शक्य तेवढा उतरविण्याचा संकल्प आपण करू या. 

या अध्यायातील वरील सूत्राला धरून केलेले विवेचन आपणास नक्कीच उपयुक्त वाटेल अशी खात्री आहे. 


विजय रा. जोशी 



गीता अध्याय 16, भाग १, ध्वनी - फीत.