Thursday, April 29, 2021


  गीता अध्याय 16, भाग १, ध्वनी - फीत.



गीताशास्त्र सर्वांना उपयोगी : उच्च आणि नीच स्थिती मधील सर्व माणसांसाठी.




हे सर्व आदर्शवत आहे. पण सर्वसामान्यांनी येथ पर्येंत पोहोचण्यासाठी काय केले पाहिजे, वास्तविक परिस्थिती काय आहे, हे समजावून घेण्यासाठी १६ वा अध्याय उपयुक्त आहे. कारण येथे मानवाची उच्च स्थिती (दैवी संपत्ती) आणि नीच स्थिती (आसुरी संपत्ती) याचे दर्शन घडविले आहे. आणि मग नीच स्थितीकडून उच्च स्थितीकडे जाणे कसे आवश्यक आहे तेही समजावून सांगितले आहे. 

कुरुक्षेत्र बाहेरही आहे आणि आपल्या मनातही आहे. सूक्ष्म रीतीने पाहिले तर जो झगडा मनात असतो तोच बाहेर आपणास मूर्तिमंत दिसत असतो. बाहेर जो शत्रू उभा आहे तो माझ्याच मनातील विकार साकार होऊन उभा आहे. जागेपणाचे विचार जसे मला स्वप्नात दिसतात तसे मनातील विचार मला बाहेर (बाह्य जगात) दिसतात. आपल्या अंतःकरणात एका बाजूला सद्गुण तर दुसऱ्या बाजूस दुर्गुण उभे आहेत. या दोन्ही मिळून आपले व्यक्तिमत्व साकार झाले आहे. जे खरे युध्द आहे ते आंतच आहे. १६ व्या अध्यायात आत्म-परीक्षण करण्या साठी भरपूर माहिती उपलब्ध आहे.

जडवाद, निरीश्वरवाद आणि भोगवाद.

केवळ स्वार्थ साधण्याची प्रवृत्ती असते. त्याकरताच बुद्धीचा उपयोग केला जातो. असुरी लोक समजतात की ‘स्वार्थ साधला कि सगळे झाले’. व आपल्या स्वार्थाला अनुरूप प्रवृत्तीत ते मग्न असतात. त्यांच्या अशा प्रवृत्तीमुळे त्यांच्यावर कसलेही बंधन किंवा अंकुश नसतो. व यांना कोठल्याही आचारसंहितेची गरज वाटत नाही. जसा स्वार्थ साधेल तसेच काम करणे हि त्यांची सहज प्रवृत्ती असते. आणि म्हणून, ज्यामुळे स्वार्थही साधला जाऊन आत्मिक विकास देखील घडू शकेल असे प्रवृत्ती व निवृत्तीचे सिद्धांत त्यांना मान्य नसतात. 

माऊलींचे जनप्रेमी कोमलहृदय. 

 आसुरी संपत्तीच्या लोकांना ज्या थोर यातना भोगाव्या लागतात त्याचे वर्णन करतांना श्रीज्ञानदेवांच्या अंगावर शहारे येऊन त्यांची वाणी रडकुंडीला आलेली दिसते व ‘हे असुरी लोक का बरे असे वागतात? असे निराशेचे पण कळवळ्याचे उद्गार त्यांच्या मुखातून निघतात. (४१७-२४)

म्हणोनि तवा धनुर्धरा,I  नोहावे गा तिया मोहरा I  

जेवता वासू असुरा I संपत्तीवन्त II (४२३) 

आणि दंभादी दोष साही I हे संपूर्ण जयांच्या ठायी I 

ते त्यजावे हे काई I  म्हणो कीर II (४२४)

म्हणून अर्जुना ! ज्या ठिकाणी आसुरी संपत्तीवाल्यांचे राहणे असेल , त्या बाजूला तू जाऊ नकोस. आणि दंभादी करून सहा दोष सर्वांच्या सर्व ज्यांच्या ठिकाणी असतील , त्यांचा त्याग करावा, हे खरोखरच सांगितले  पाहिजे का ? (४२३-२४)

बुडते हे जन न देखवे डोळा I येतो कळवळा म्हणउनी : संत  तुकाराम 

“आसुरी  गुणांचा त्याग करून दैवी गुणांचा अंगीकार करावा ”  हा संदेश श्रीकृष्ण भगवान यांचे पासून माउली , तुकोबाराय आणि अनेक संत महात्मे आपल्या पर्येंत पोहोचविण्याचा असा अथक प्रयत्न करत आहेत.  स्वतःचे जीवनात तसे वर्तन करून आपल्यासमोर आदर्श ठेवत आहेत , त्यांच्या पुण्यकार्याला मनोमन वंदन करून त्यांचा उपदेश आपल्या जीवनात शक्य तेवढा उतरविण्याचा संकल्प आपण करू या. 

या अध्यायातील वरील सूत्राला धरून केलेले विवेचन आपणास नक्कीच उपयुक्त वाटेल अशी खात्री आहे. 


विजय रा. जोशी 



गीता अध्याय 16, भाग १, ध्वनी - फीत.


No comments:

Post a Comment