Thursday, April 22, 2021

 

गीता अध्याय 15, भाग २, ध्वनी - फीत.


जग – श्लोक   ( १ ते ५). जीव –  श्लोक (६ ते 11).

हा भाग पाहून झाला. आता पुढील भाग :

जगदीश –  (श्लोक   १2 ते १५). जगदीशाचे श्रेष्ठत्व. –(श्लोक  १६ ते २०).


या संसारात क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष आहेत. सर्व भुते म्हणजे क्षर, आणि मायोपाधीने (माया -उपाधीने)  
युक्त असे जे चैतन्य त्यास अक्षर असे म्हणतात. (१५/१६)

पण या दोहोंहून वेगळा, ज्याला परमात्मा असे म्हणतात, जो त्रैलोक्यात प्रवेश करून त्यास धारण करतो व जो अव्यय व ईश आहे, असा उत्तम पुरुष आहे. (१५/१७) 

ज्या अर्थी मी (परमात्मा) क्षराच्या पलीकडचा आहे आणि अक्षराहून देखील उत्कृष्ठ आहे  , त्या अर्थी (म्हणून) जगामध्ये आणि वेदामध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे.  (१५/१८)

जो ज्ञानी; या प्रकारे मला, पुरुषोत्तमाला जाणतो, तो सर्वज्ञ होय. तो (स्वतः सकट सर्व माझे स्वरूप आहे असे जाणून ) सर्व प्रकारे माझी भक्ती करतो.    (१५/१९)

हे पापरहिता, या प्रमाणे हे अत्यंत गुह्य शास्त्र मी तुला सांगितले. याचे ज्ञान करून घेऊन मनुष्य बुद्धिमान आणि कृतकृत्य होतो. (१५/२०).

हे शास्त्र तसे अवघड आहे. भगवंतांनी ते सोपे करून सांगितले आहे , तरी ते आपल्या डोक्यात उतरत नाही. श्रोता व वक्ता यांचा हृदयाचा मिलाफ झाला तरच गीता कळेल. भगवंत सांगतात, हे समजून घे, बुद्धिमान हो. बुद्धिमान याचा अर्थ शहाणा हो असे नाही, विद्यापीठात पहिला नम्बर मिळव असाही नाही, तर बुध्दीवान हो याचा येथे अर्थ ‘आत्मसाक्षात्कारी हो’ असा आहे. 

एकीकडे भोगशक्ती आहे, दुसरीकडे ज्ञानशक्ती आहे, त्यात बुद्धी ‘अहं ‘ ला पकडून भोगशक्तीकडे न वळता ज्ञानशक्तीकडे वळली तर बुद्धिमान होता येईल. आपण आत्मसाक्षात्कारी व्हावे आणि कृतकृत्य व्हावे असे सूचित  करून भगवंतांनी हा अध्याय पूर्ण केला आहे. 

मनुष्याचा आत्म विकास कसा होतो / व्हावा - हे सर्व या अध्यायात भगवंतांनी समजावले आहे. हि शिकवण सर्व मानवमात्रांस उपयुक्त आहे. त्या संबंधी माहिती आपण ऐकाल. 



विजय रा. जोशी. 




गीता अध्याय 15, भाग २, ध्वनी - फीत.


No comments:

Post a Comment