गीता अध्याय 16, भाग २, ध्वनी - फीत.
१६ वा अध्याय आपल्या रक्तात भिनला पाहिजे.
भौतिक जीवनही कामाला ताब्यात ठेवूनच सुखी होईल असे गीतेचे सांगणे आहे. स्त्री-पुरुष संबंध उत्तरोत्तर उच्च करायचे असतील तर मन/आत्म्याचा विचार हवा. ज्या समाजास फक्त शरीर सुखातच धन्यता वाटते त्या समाजाची उत्साहशक्ती, जीवनशक्ती, धारणाशक्ती या नष्ट झालेल्या दिसतात.
मानवा-मानवाशी असलेले संबंध जर उन्नत व विकसित करायचे असतील तर काम, क्रोध, लोभ रहीत (संयमित) समाज व व्यक्ती व्हावी अशी भगवंतांची इच्छा आहे.
या संयमाचे शास्त्र संतांच्या जीवनात, अनुभवात आपणास दिसेल.
स्वतःच्या जीवनात प्रयोग करून संतांना जे सिद्धांत लाभले, त्याचे शास्त्र बनते.
आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | बोलिले जे ऋषि | साच भावे वर्ताया |
झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग | उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू |
अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधने बुडविली |
पिटू भक्तीचा डांगोरा | कळिकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंदे || ५२०||
आसुरी संपत्ती टाळावी व दैवी संपत्ती कवटळावी. सद्गुण अंगी बाणल्याने वैयक्तिक विकास साधला, व्यक्ती विकास साधला तरी समष्टीचा विकास रहातोच. व्यक्तीने आपला विकास साध्य करत समाज, राष्ट्र यांतील लाखो व्यक्तींच्या विकासास सहाय्यभूत व्हायचे असते.
जीव, जगत , जगदीश यांचे संपूर्ण पणे ज्ञान व संबंध करवून देते ते शास्त्र. जीवन म्हणजे काय ते समजावून आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होण्यास मदत करणारे, ते शास्त्र. म्हणून शास्त्र सोडून चालणार नाही.
दैवी गुण अंगी येण्यासाठी अखंड साधना
असतो मा सतगमय I तमसोमा ज्योतिर्गमय I
मृत्योर्मा अमृतमगमय I
असत, तमस व मृत्यू या माझ्या स्थिती आहेत त्यातून मला सत , ज्योती व अमृत व्हायचे आहे. म्हणूनच मला प्रयत्नशील रहायला हवे असे समजून खरा साधक आत्मविश्वासाच्या बाबतीत,प्रभुकार्याच्या बाबतीत सतत प्रयत्नशील असतो. आणि दैवी गुण अंगी येण्यासाठी अखंड साधना करतो.
माणसाचे मन कसे आहे, कसे असावे हे १६ व्या अध्यायात कळत.
त्याच मर्म असं आहे की ..माणसाने असं वागावं, त्याच मन असं असाव, की शेवटी ‘आसवं’ गाळण्याची पाळी येऊ नये. साधनात मी गुंतून पडू नये. आणि साध्याचा विसर मला कधी पडू नये. जो संपत्तीला, साधनाना आदराने वागवितो त्याचा कधी अनादर होत नाही. या अध्यायातले सर्व विचार स्वतःचे सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त वाटतील.
विजय रा. जोशी.
गीता अध्याय 16, भाग २, ध्वनी - फीत.