पसायदान महात्म्य.
पसायदान म्हणजे लघु ज्ञानेश्वरीच होय. त्यात ज्ञानेश्वरी प्रमाणे काव्य आहे , तत्त्वज्ञान आहे.
कर्म, उपासना, ज्ञान हे तिन्ही मार्ग आहेत.
खलांच्या द्वारे आसुरी संपत्ती आणि ईश्वरनिष्ठ सज्जनांच्या द्वारे दैवी संपत्तीचे निर्देश आहे.
खलांच्या रूपाने तमाचा, स्वधर्माच्या द्वारे इच्छित फळ प्राप्त करून घेणाऱ्या लोकांच्या रूपाने रजाचा
आणि सज्जनांच्या द्वारे सत्वाचा असा त्रिगुणांचा विचार आहे.
त्यात ज्ञानदेवांना प्रिय असणारे संत-स्तवन आहे, सद्गुरुंशी संवाद आहे,
हा होईल दान पसावो’ या वरदानाने गुरुकृपेचा अनुभव व्यक्त झाला आहे. त्यात ‘विश्वेशरावो’ रूपाने
विश्वरूपदर्शन आहे. ‘ज्ञानदेवो सुखिया झाला’ या द्वारे जो मनुष्य देवरूप, आत्मरूप
होतो तोच सुखस्वरूप होतो हा ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाचा निष्कर्ष सांगितला आहे.
म्हणजे ज्ञानेश्वरीची सर्व महत्वाची अंगे पसायदानात उतरली आहेत. त्यामुळे पसायदानाचा पाठ हा
सर्व भाव लक्षात घेऊन केला तर ज्ञानेश्वरीच्या पाठाचेच फळ त्याला आहे.
पसायदान हा मंत्र आहे.
पसायदान हे दिव्य प्रार्थनासुक्त आहे.
पसायदान हा सर्व तत्व-विचारांचा एक संपूर्ण ग्रंथ आहे.
किंबहुना पसायदान म्हणजे अपार कृपेने भरलेलं श्रीज्ञानेश्वरमाऊलींचे अक्षर रूपच आहे.
आपल्या कल्याणासाठी त्या त्यांच्या वांग्मय रुपाला शरण जावे आणि जसे ओंकार रूप असलेल्या
परब्रह्माला ओंकारानेच आळवावे,
म्हणावे -
आता विश्वात्मके देवे I येणे वाग्यज्ञे तोषावें I
तोषोनि मज द्यावे I पसायदान हें II
विजय रा, जोशी
No comments:
Post a Comment