Tuesday, November 28, 2023

 पसायदान , पाठ १८/१०/२०२३ 


 ९००० + ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या  अर्थाचे सार सांगणारे हे  ९ ओव्यांचे पसायदान 






आतां विश्वात्मकें देवें। येणें वाग्यज्ञें तोषावें। तोषोनि मज द्यावें। पसायदान हें ॥ १ 

एक महान ज्ञानयज्ञातून गीतेचे तत्वज्ञान सर्व सामान्यांच्या भाषेत आणण्याचे कार्य  संपन्न झाले, गुरूंची आज्ञा पालन

झाली. म्हणून आता  विश्वेशवराकडे, निवृत्तिनाथांकडे आणि श्रोत्यांकडे ज्ञानदेव मागणी करीत आहेत. प्रसन्न होऊन

माझी प्रार्थना ऐका आणि मला प्रसाद द्या. 

त्यांच्या प्रसादाचे स्वरूप काय आहे, ९००० + ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या  अर्थाचे सार सांगणारे हे ९ ओव्यांचे

 पसायदान आहे. म्हणून हा साररुपी संदेश, प्रत्येकाने आपल्या हृदयात धारण करण्या सारखा आहे. 

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥

मातेला आपल्या,मागास लेकराची अधिक काळजी वाटते.  तशी ज्ञानोबा माउलींना दुष्ट लोकांबद्दल अधिक

 काळजी, चिंता म्हणून त्यांच्यातील वाईटपणा, जावो अशी प्रार्थना ते करत आहेत.  

पण तेथेच न थांबता  सुधारणा झाल्यावर लोकांत सत्कर्माची आवड वाढो

सर्व  जीव एकत्र येऊन त्यांचे एकमेकात स्नेहसंबंध , मैत्र होवो. आणि सर्वांचे कल्याण होवो अशी ते मागणी

करतात.  

काही माणसे दुष्ट तर नसतात, पण ती फक्त स्व-केंद्रित वृत्तीने जगतात अशा लोकांना

सुद्धा सत्कर्म प्रेरणा मिळणे आवश्यक असते. 

थोडे फार सत्कृत्य करणाऱ्याना, लोकांनी आपल्याला शहाणे समजावे असे वाटते. 

आपण लोकांसाठी एवढा त्याग, कष्ट करतो पण लोकांनी आपल्यास जेवढे मानायला  पाहिजे तेवढे ते आपल्यास

 मानत नाहीत याचा त्याला खेद होतो, चीड येते. 

 -  सत्कृत्य निरपेक्ष हवे. 

खरे सत्कर्म ते; जे माणसाला परमात्म्यापर्येत पोहोचविते.  असे कर्म सर्वांकडून घडत राहो, आणि त्यातून सर्व

 

लोकांचे मैत्र होवो.  खरे ज्ञान सर्वांच्या वर्तनात येऊन त्यांचे प्रापंचिक तसेच पारमार्थिक सर्वांगीण कल्याण होवो . 


माझे चिंतन असे असावे :

आपल्यातील खलत्व गेले का ? 

आपले  सत्कर्म निरपेक्ष आहे का?

एकत्रित सत्कृत्य कार्यात आपला योग्य तो सहभाग आहे का ? 

अशा कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तीत / समूहात  मैत्र निर्माण होऊन त्यातून समाज, राष्ट्र , मानवता कल्याण-कार्य

होण्यासाठी आपण काही वेळ तरी लक्ष देतो का ? 

हे सर्व अधिक फलदायी होण्यासाठी मला माझ्यात काही सुधारणा करता येईल का ? 

दुरितांचे तिमिर जावो I  विश्व स्वद्धर्म सूर्ये पाहो I जो जे वांछील तो तें लाहो I प्राणीजात II ३ II

पापांचा अंधकार जावो. विश्व, स्वधर्मरूपी सूर्याने,  प्रकाशित होवो. प्राणीमात्र ज्याची इच्छा करील तो ते प्राप्त करो. 

दुराचरणातून जे निर्माण होते ते दुरित. अशा दुराचरणी पुरुषाचे आचरण माणुसकीला लाजवणारे

असते. पापांचा जोर होत होत तीं जशी वाढतील तसा त्यांस (आसुरी लोकांस) जीवंतपणींच नरकयातनांचा  

भोग घडतो. निषिद्ध कर्मापासून जे राजस आणि तामस सुख निर्माण होते तो केवळ

मृगजळासारखा सुखाभास असतो, सुख नसते. 

श्री तुकाराम महाराजांनी पापाची व्याख्या ‘पाप ते परपीडा’ अशी केली आहे. 

अशा या पापाचा अंधार गेला पाहिजे म्हणजे समाजात सौख्य नांदू लागेल. 

अमोल अशा मानवी जीवनाला उद्धस्त करणारा हा दुरितांचा अंधकार आहे. तो अंधार पूर्णपणे जाण्यासाठी 

स्वधर्मसूर्याचा उदय होणे आवश्यक आहे. 

तीच प्रार्थना ज्ञानदेवांनी पुढे केली आहे.

स्वधर्म म्हणजे जीवनातील प्रत्येक प्राप्त स्थितीतील स्वकर्तव्य. प्रकृती सर्वदा अगदी काटेकोरपणे

प्रत्येकाच्या कर्मानुसार न्याय फळ देत असते. त्यात रेसभरही इकडचे तिकडे व्हायचे नाही. 

आपल्यासमोर जे कर्तव्य असेल , जे अगदी आपल्या हाताशी असेल ते उत्तम रीतीने बजावून आपण

क्रमशः शक्ती संपादन करू शकू. 

ज्या समाजात आपण जन्म घेतो, ज्या कुटुंबात वाढतो, ज्या परमात्म्याच्या कृपेने आपल्याला हे

जीवन लाभले असते, त्या सर्वांना आपण काही देणे लागतो. ते ही आपल्याला स्वधर्माच्या द्वारे

फेडायचे असते. पण त्या ऐवजी जो  फक्त स्वतःलाच सर्वस्व मानतो, आणि स्वतःच्या देहसुखासाठी 

विषयोपभोग घेण्यात आयुष्य घालवितो.

माउलींना अशा सर्वांची अधिक काळजी वाटते. त्यामुळे सर्वांचे होणारे नुकसान न व्हावेसे वाटते.

या कळवळ्यातून त्यांच्या अंतःकरणातून ते आपल्याला सांगतात की जीवनात स्वतःच्या योग्य प्रयत्नांनी अनुकूल,

मंगल असा बदल करणे शक्य आहे, तसा होणे आवश्यक आहे. 

त्यासाठी  दुरितांचे म्हणजे पापाचे तिमिर म्हणजे अंधकार जाण्यासाठी ,

स्वधर्मसूर्याचा उदय व्हावा अशी ते प्रार्थना करतात.



विजय रा. जोशी. 





















No comments:

Post a Comment