संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी : पसायदान.
ज्या वेळी कोणताही यज्ञ सिध्दीस जातो त्या वेळी वैदिक संस्कृती प्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात
येतो. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा वाङ्मयरुपी यज्ञ सिध्दीला नेल्यानंतर जसे पसायदान मागितले तसा संत नामदेवांनी
“आकल्प आयुष्य व्हावे तयां कुळा ।माझिया सकळां हरिच्या दासां।।” असा क्रुपाप्रसाद मागितला.
संत तुकाराम म्हणतात, ”हें चि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा “.
समर्थ रामदासांनी श्रीरामाजवळ मागितलेलें पसायदान असे आहे
“कल्याण करी देवराया। जनहित विवरी ।। तळमळ तळमळ होत चि आहे। हे जन हाति धरी ।।
संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलें पसायदान म्हणजे संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी आहे.
संत ज्ञानदेवांचे पसायदान हा आपल्या सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण यात अनेक ठिकाणी
व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या आणि परमार्थाच्या हिताची व्यवस्था बघितलेली आहे.
अर्थात आपल्या खऱ्या हिताचे काय हे सहसा कोणाला कळत नाही.
पसायदानात आपल्या खऱ्या हिताचे काय ते ठासून भरलेले आहे. फक्त प्रत्येकाने त्याचे यथार्थ चिंतन करून
त्या दिशेने वाटचाल करणे मात्र महत्त्वाचे आहे. असे केले तर पसायदानात संत ज्ञानदेव नेमके जेथे घेऊन
जाऊ पाहतात तेथे आपण जाऊ शकू. कोणत्याही क्षेत्रांत प्रवेश करताना पूर्वतयारी लागते.
ज्ञानेश्वरीत ही पूर्वतयारी सांगितलेली आहे –
एथ अविद्यानाशु हें स्थळ । मोक्षोपादान फळ ।
या दोहीं केवळ । साधन ज्ञान ॥ (ज्ञाने. १८.१२४३).
गीतेचा विषय व प्रयोजन : गीतेत अविद्येचा निरास करणे हा विषय आहे व त्या योगाने मोक्ष मिळवणे हे फल
(प्रयोजन) आहे. अविद्यानाश व मोक्षप्राप्ती या दोहोस साधन केवळ ज्ञान आहे.
पसायदानाकडे त्याची अपेक्षित व्यापकता लक्षात घेऊन बघितले तरच त्याचे खरे महत्त्व पटेल.
पसायदान केवळ शिष्याने गुरूंकडे म्हणजे संत ज्ञानदेवांनी संत निवृत्तिनाथांकडे मागितलेले नसून
संत हे ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रिती ॥ (तु.गाथा. ११४०)
असे असल्याने तुमच्या आमच्या हितासाठी, तुमच्या आमच्या कडून काही मागणे मागितले आहे हे लक्षात
घ्यायला हवे. हे लक्षात घेतले तरच आपली जबाबदारी कळेल. पसायदान लिहून आज 700 plus वर्षे झाली परंतु
प्रत्यक्षात खळांची व्यंकटी सांडो । (ज्ञाने. १८.१७९४) असे संत ज्ञानदेव म्हणत असले तरी
ती खळांची व्यंकटी म्हणजे दुष्टांची तिरकस चाल गेलेली नाही.
येथे साधक म्हणून माझ्या हिताच्या दृष्टीने माझ्यापुरता विचार करून माझ्यातील खलत्वाचे अंश
हुडकून ते काढून टाकण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
इतरांतील खलत्व शोधत बसणे खऱ्या परमार्थात अपेक्षित नाही. माझ्यातील खलत्व काढून
टाकण्यापुरताच विचार करावा.
व्यंकटी म्हणजे बोलण्याचा, विचारांचा तिरकसपणा आणि असे तिरकस वागणे, बोलणे, स्वार्थाने,
मोहाने होते. ते प्रत्येकाने टाकावे असे मागणे संत ज्ञानदेव मागतात. आश्चर्य म्हणजे संत ज्ञानदेवांनी
स्वतःसाठी काहीही मागितले नाही तर जो समाज त्यांच्यासाठी काहीही करायला तयार नव्हता
त्याच्यासाठी मागितले; यावरून त्यांच्या विचारांच्या, मन:स्थितीच्या उत्तुंगतेची कल्पना सहज येते.
आपल्या सारखे दुःख दुसऱ्याला न व्हावे यासाठी केलेला ज्ञान शुद्ध प्रयत्न म्हणजे अध्यात्म जगणे.
संत अध्यात्म जगतात , परमार्थ साधतात, आणि कसे करावे ते सोपे पणाने आपल्याला सांगतात.
विजय रा . जोशी.
No comments:
Post a Comment