आढावा, ओव्या १ ते ६ , चिंतन ओव्या ७ व ८.
ज्ञानेश्वरांनी ज्या विश्वात्मक देवाकडे प्रसाद मागितला आहे. त्यांनी या या यज्ञाने संतुष्ट होऊन
आपणास पसायदान द्यावे ही ज्ञानेश्वरांची पहिली प्रार्थना !
आपण संत संगतीचे महत्व जाणून घेतले. संतसंगती, सद्गुरू उपदेश पालन
या सर्वांनी काय लाभ होऊ शकतो यावर काही चिंतन केले. अशा संत सज्जनांची मांदियाळी
निर्माण होवो आणि त्यांच्याकडून सर्व भूतमात्रांचे कल्याण घडेल , ते घडो अशी माऊलींची अपेक्षा
देखील व्यक्त झाली हे आपण पाहिले. (ओवी ४)
अर्थात हे घडण्या अगोदर प्रत्येक मानवाने स्वतःत सुधारणा होण्यासाठी, आपापले खलत्व कमी करून
अंतरी सदभाव निर्माण होण्यासाठी काय करायचे आणि अशा सद्भाव असलेल्या लोकांची मैत्री होऊन
परस्पर कल्याणासाठी काय करायचे याचा विचार झाला. (ओवी २)
अशा वर्तन क्रान्तितून मानवाच्या मनातील दुरिताचा अंधकार दूर होऊन सर्व विश्वातील मानवता
स्वधर्म , स्वकर्तव्य पालनाच्या ज्ञान प्रकाशाने उजळून गेल्यावर विश्वातील सर्व भूतमात्रांचे कल्याण
घडो आणि ज्याला ज्याची वांछ्या असेल ते ते त्यास प्राप्त होवो, मिळो , मिळेल असा आशीर्वाद
माउलींच्या अंतरंगातून व्यक्त झाला आहे. हा (ओवीं ३,मधील) आशय आपण विस्ताराने पहिला,
त्याचा अभ्यास केला.
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
कल्पतरू आणि चिंतामणी यांपेक्षाही संतांच्या ठायी अधिक गुण आहेत. संत ज्या साधनाने
हे सर्व अलौकिक प्राप्त करून देतात ते साधन म्हणजे त्यांची अलौकिक वाणी. म्ह्णून श्रीज्ञानदेव
पुढे संतांच्या मांदियाळीच वर्णन ‘अमृताचे बोलते सागर’ असे करतात.
कल्पतरू आणि चिंतामणी हे मनोकामना पूर्ण करतील व अमृत मृत्यूचे भय घालविल; पण मनाला
शांती प्राप्त करून देतील असे नाही. शीतलता आणि शांती देणाऱ्या चंद्रासारखे संत आहेत असे
ज्ञानदेव म्हणतात. (चंद्रमे जे अलांछन) पण त्या चंद्राला डाग आहेत, लांच्छन आहे, पण आमचे
संत मात्र अलांछन चंद्र आहेत.
ते म्हणतात - चन्द्राच्या शीतल प्रकाशाची गोडी ही राजाला आणि
रंकाला जशी सारखीच प्राप्त होते त्या प्रमाणे सर्व भूतमात्रांबाबत संताची समता असते.
संत हे सूर्याप्रमाणे अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्यात सामर्थ्यशाली आहेत. पण सर्व सामर्थ्या मध्ये
इतरांना तापदायक होण्याचा एक दुर्गुण निर्माण होत असतो. जसा उष्णकाळात मध्यान्हीचा सूर्य
हा तापदायक असतो. हा कमीपणा संतांमध्ये नसतो. म्हणून ते तापहीन मार्तंड (सूर्य) आहेत.
स्वतःच्या ज्ञानाने, आचरणाने शुद्ध , निर्मल असणारे, इतरांचे जीवन उज्वलीत करण्याचे सामर्थ्य
असणारे पण इतरांना कधीही तापदायक न होणारे असे हे सुजाण सर्वांना सोयरे म्हणजे अत्यंत
जवळचे होवोत, वाटोत .
माउलींच्या प्रसादरूपी विचारांचा आशय आपण पहिल्या ६ ओव्यांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला.
आणि त्याचा आपल्या जीवनात लाभ होण्यासाठी काय करणे शक्य आहे यावर काही चिंतन देखील
केले.
आजच्या पाठात ओव्या ७ आणि ८ समजून घेण्याचा प्रयत्न, अभ्यास आपण करणार आहोत.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment