Friday, April 26, 2024

 योग ग्रंथ पाठ  5. 21/03/2024.  ध्वनी फीत . 





त्रिगुण : ही संकल्पना – आपल्याला ‘आपण’ समजण्यासाठी खूप महत्वाची. 

सत्व, रज व तम असे हे गुण आहेत.  व प्रकृती यांची जन्मभूमी  आहे. (गीता  १४/५). 

गुण म्हणजे शक्ती. ही शक्ती तीन प्रकारच्या प्रेरणा देते.  सात्त्विक, राजस व तामस अशा त्या प्रेरणा आहेत.

प्रत्येक सचेतन वस्तू हि ५ महाभूत अधिक ३ गुण  यांनी बनले आहे. आपण  ही तसेच आहोत. 

या गुणांचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीत कसे ठरते ? 

तर पूर्वीच्या अनेक जन्मांच्या संस्कारांमुळे वासना तयार होते. त्या वासनांना अनुसरून गुणांचे कमी आधिक्य

असते. मागच्या जन्मातील या अतृप्त वासना पुढचा जन्म घेण्यास भाग पाडतात. पारमार्थिक, आध्यात्मिक

 विकासासाठी सत्त्वगुण हवा यासाठी  क्रियमाण प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आवश्यक आहे. 

आज यातला काही भाग  अधिक समजून घेऊ. 

कारण हे सर्व आपल्या सर्वांगीण व्यक्तित्व विकासासाठी  महत्वाचे आहे.


विजय रा. जोशी. 



Saturday, April 13, 2024

  योग ग्रंथ पाठ  4. 13/03/2024.  ध्वनी फीत . 





द्वैत / अद्वैत . 


द्वैत/अद्वैत या मध्ये मुलभूत प्रश्न एकच आहे. तो असा की ‘हे जग एका गोष्टी पासून बनले आहे कि दोन ?

’दागिने अनेक, सोने एक., मडकी अनेक माती एक,  पाने/फांद्या अनेक वृक्ष एक. 

शरीरे अनेक, आत्मा एक.  

वेदांत दर्शन किंवा उत्तरमीमांसा :- 

हे दर्शन हिंदूंच्या षड्दर्शनांपैकी सर्वात प्रसिद्ध, प्रमुख व जवळजवळ सर्वमान्य असे दर्शन आहे. याच्यानुसार ईश्वर
आणि सृष्टी या दोन वेगवेगळ्या वस्तू नसून, म्हणजे त्या दोघांत ‘द्वैत’ नसून ‘अद्वैत’ आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टी व 
त्यातील सर्व सजीव ईश्वरमय आहेत. आत्मा व परमात्मा एकच आहेत,

त्रिगुण विचार चिंतन :

भगवद्गीतेत तीन गुण अध्यात्माच्या संदर्भात मांडले आहेत. या संकल्पनेचा पायाभूत विचार केला तर गुण म्हणजे काय, त्यांचा कशासाठी व कसा उपयोग करून घ्यावयाचा व ते समजून का घ्यायचे हे कळेल. या गुणांचा प्रभाव काय आहे, ते कसे बंधनात घालतात व त्यातून मोकळे होण्यास काय करायला हवे; मोकळे होण्याची तरी काय आवश्यकता आहे या सर्व गोष्टींचा काही विचार या पाठात  केला आहे. 

आपल्यात (माणसामध्ये) हे तीनही गुण असतात, मिश्र पद्धतीने ते आपल्या वर्तनातून वेळोवेळी व्यक्त होतात. पूर्ण सत्य, पूर्ण पराक्रमी आणि पूर्ण आळशी असा कोणी नाही. सत्व-रज-तम या गुणांचे मिश्रण म्हणजे आपण असतो. 
या मिश्रणात  बदल करण्यास माणसाला क्रियमाण स्वातंत्र्य व विवेक दिलेला आहे. त्याचा वापर करून कोणते गुण खाली ठेवून कोणते वर ठेवावे हे सारे माणूस ठरवू शकतो. 

संतसुद्धा सामान्य माणूस म्हणून जन्माला येतात. ते जन्माला येताना संत म्हणून येत नाहीत;  तर कष्टाने, प्रयत्नाने व साधनेने ते संतपदाला पोहोचतात. त्यांनी स्वतःला घडवून घेतले असते. त्यामुळे त्यांचा आदर्श पुढे ठेवून ते वागतात तसे वागणे हे साधनच आहे.

प्रारब्ध

संचित, प्रारब्ध व क्रियमाण या त्रिगुणांना  आपल्या स्वाधीन करणे हा साधनेचा भाग आहे. मुळात आपल्याला विशिष्ठ पद्धतीचे गुण मिश्रण जन्मतः कसे मिळते ,  हे समजण्यासाठी “प्रारब्ध” हि संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. 

यावरील काही चिंतन आपण या पाठात ऐकू शकाल. 


विजय रा. जोशी. 

















Thursday, April 11, 2024

 योग ग्रंथ पाठ  3. : 6 th MARCH ‘ 2024 .  ध्वनी फीत


ध्वनिफीत ऐकण्यासाठी वर क्लीक करा. 



साध्य आणि साधन - साधकत्वातील प्रगती - साधकाचा क्रम विकास .

अभ्यास :

करुणा सर्वाभूती*   जिव्हे नामस्मृती*|

*नित्य शोधणे सत्संगती*|  या नाव अभ्यास*||१ ||

*यथाभावे कीर्तन करावे*|  *दैवाचे वैभव नाचावे*|

*सत्किर्तन ऐकावे      या नाव अभ्यास*

अभ्यास केवळ आध्यात्मिक नसून व्यवहारातही चांगुलपणा कसा मिळवावा याचे तत्वच दिले आहे.

चांगले जगण्याचा पाया म्हणजे अभ्यास. हा संस्कृतमधला एक अर्थ. 

पुन्हा पुन्हा वर्तन करुन आत्मसात करणे….        तसेच चांगल्याची आस म्हणजे अभ्यास. 

यशस्वी जीवनासाठी,  अभ्यास महत्वाचा. 


प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही

समर्थांनी मानवी जीवनाचा आणि परमार्थाचा समन्वय साधला आणि प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही असे ठामपणे सांगितले म्हणूनच ते म्हणतात -

आधी प्रपंच करावा नेटका।

मग घ्यावे परमार्थ विवेका ।।

माणसाची सहजप्रवृत्ती प्रपंच नदीबरोबर वाहण्याची आहे. पण नदीच्या प्रवाहाला स्वत:चा उगम पाहाण्याचे भाग्य नसते. अनेक जन्माच्या सुकृत्याने जेव्हा मानव जन्म प्राप्त होतो तेव्हा त्याला बुद्धी मिळते. त्या बुद्धीच्या साहाय्याने मानवाला प्रपंचनदीचा प्रवाह पाहण्याचे भाग्य प्राप्त होते. म्हणजेच 'मी' कोण? कुठून आलो? ह्या प्रश्नांचा विचार करण्याचे सामर्थ्य त्याचे ठाई येते. 


भक्ती आणि ज्ञान 

यांचा झगडा निर्माण होऊ शकत नाही इतकी भक्ती श्रेष्ठ आहे.  हे कांही नवतत्वज्ञानाचें नवे मत किंवा पालटलेली धारणा नव्हे. ज्ञान हा लांबचा रस्ता, एका अर्थाने अपूर्ण, हे बुध्दीवादी मानतो.. श्रध्दा ही शंका रहित अवस्था त्याला पेलणारी वस्तु नाही, हे तो कबूल करतो. ज्ञान आधारित श्रद्धा  हा उत्तम पर्याय. 
माणूस आतून सुरक्षित पाहिजे. आंतरिक सुरक्षितता असली, तर बाहेरील  कोणतीही ताकद , प्रलोभने
माणसाला वाकवू शकत नाहीत.  आंतरिक सुरक्षितता श्रध्देतून व चांगल्या निश्चयातून अवतरते. 

काही लोकांना श्रद्धा हि वृत्ती स्वाभाविक असते, काहींना ती मिळवावी लागते. 
परमार्थात ज्ञानी माणसावरील श्रद्धा खूप महत्वाची असते. 

क्रमशः आपण काही संकल्पना समजून घेण्याचे चिंतन करीत आहोत. 


विजय रा. जोशी. 




Saturday, April 6, 2024

 योग ग्रंथ पाठ २. २८/०२/२०२४.  ध्वनी फीत  

(ऑडिओ साठी क्लिक करा)




योग ग्रंथ सार / साध्य   स्वामीजी. (शक्ती योग, २४०/४१)    स्वावलंबी साधना.


जे वाचले, ऐकले त्याचे चिंतन करावे, स्वतःच्या मनाची खात्री पटवावी आणि त्या प्रक्रियेने 

सर्व शरीर बदलते याचा अनुभव घ्यावा.

मात्र अट आहे ती नितियुक्त समता वर्तन हवे. असे वर्तन खरया स्वार्थाचा मार्ग आहे. 

तो तात्पुरता नकोसा वाटला तरी त्यानेच अनेक विघ्ने दूर होतील.

कोणत्याही माणसाला स्वतः आपली साधना सहज करता येईल. 

चार योग ग्रंथ हेच मर्म सांगतात आणि त्याचे पुरावे देतात. त्यातील विचार पत्करल्यामुळे

तुमच्या मनाला शांती, समाधान मिळेल, इतकेच नव्हे तर एकदा तुमच्या मनाने अहंकार

सोडला की तुमच्यातील चेतन शक्ती देखील साधना प्रयत्नाने तुमच्या ज्ञान शक्तीशी

resonate होईल. हा एक स्वावलंबी असा अपूर्व आनंद असेल. 


सर्व शरीर तेज शांतीने प्रस्फुटित झाल्याचा 

अनुभव येईल. ही अंतःस्थिती तुम्हाला बाहेरही शांती प्रतिष्ठा मिळवून देईल.


स्वामीजी निर्मित - न्यू वे फिलॉसॉफी , रूप रेषा तत्वज्ञानाचे सार - प्रार्थना .

(साध्य - साधन – स्पष्टता.     प्रयत्न दिशा दर्शन)


1. कर्म शुद्धी प्रार्थना.                                                 स्वतः साठी                  


2. आत्म कल्याण प्रार्थना.                                          स्वतः साठी                   


3. यज्ञ / प्रकाश प्रार्थना                                              स्वतः साठी / सर्वांसाठी.


4. विश्व कल्याण प्रार्थना.                                            स्वतः साठी / सर्वांसाठी


5. राष्ट्र कल्याण प्रार्थना                                               स्वतः साठी / सर्वांसाठी


6. समाज कल्याण प्रार्थना ..                                         स्वतः साठी / सर्वांसाठी....  



मनशक्ती तत्वज्ञानाचे सार.


स्वार्थासाठी निस्वार्थ.

सुखासाठी दुख स्वीकार.

मिळविण्यासाठी संकल्प आधारित त्याग.

सत्कर्म पालन, निरपेक्ष, निरहंकार, कर्तव्य भावनेने.


निष्काम कर्माने              चित्त शुद्धी. 

निष्काम उपासनेने         चित्त शांती . 

चित्त वृत्ती निरोधाने -       ध्यान शांती. 


हरी ओम. 


विजय रा. जोशी. 






 



 



Monday, April 1, 2024

 

 योग ग्रंथ  :  पाठ 1.



वरील ओळीवर क्लिक करा , आपल्याला ध्वनीफीत ऐकू येईल. 




मागाल ते मिळेल , पण......


ज्ञानेश्वरी मधील पसायदान , सगळ्या जगाच्या सुखासाठी मागणी मागते,  तेथेही अट 

“सत्कर्मी रती वाढो” अशा सत्कर्म व्रताची आहे. 

“मनाच्या श्लोक” मधेही हे पथ्य चुकलेले नाही. सुख भोगण्यासाठी माणूस सतत उतावीळ असतो,

इच्छुक असतो. त्यासाठी आयुष्यभर जीवतोड प्रयत्न करतो. त्या प्रयत्नात खर्च होणाऱ्या शक्तीपैकी

जरी निम्मी शक्ती त्याने सुख प्राप्तीचे नियम समजून घेण्यात खर्च केली तर त्याचे 

खरेखुरे कल्याण होईल. याबद्दल मार्गदर्शन मनाच्या श्लोकात आहे.  

इतरांच्या  कल्याणातच आपले खरे कल्याण आहे हे कळते पण वळत नाही .

आत्मचिंतनाच्या, आत्मपरीक्षणाच्या काही सुवर्ण-क्षणांना हे आपल्याला पटते पण दुर्दैवाने त्या क्षणांचे

ते ज्ञान क्षणभंगुर ठरते. 

याला उपाय म्हणजे सतत सत्संग, अभ्यास, त्यावर चिंतन आणि त्याप्रमाणे वर्तन …. सद्वर्तन. 

हे एकट्याने करतांना दुबळाई वाटते, आळस डोकावतो, हातून सहज होत नाही, म्हणून 

श्री रामदासांनी मनाच्या एकांत साधने बरोबरच समाज बांधणीचा सामुदायिक कार्यक्रम सांगितला.

त्यावेळी आवश्यकअसलेली राष्ट्र उभारणी केली.  

ते सर्व करण्याची  गरज आजही आहे, चिरंतन आहे. मागील पाठमालांमध्ये आपण हे विस्ताराने 

पाहिले.  स्वामीजी लिखित योग ग्रंथावरील हि नवीन पाठमाला सुरु होत आहे. 

आपला जीवनातील साधक म्हणून क्रमविकास आपापल्या ध्येया  प्रमाणे करण्यासाठी जी 

जीवनशैली साधकांना उपयुक्त आहे या विषयी मार्गदर्शन योग ग्रंथात मनशक्ती केंद्राचे संस्थापक

स्वामी विज्ञानानंद करतात   

शक्ती आणि शांती  याचा मेळ जीवनात आवश्यक असतो. त्यावर ध्यान हा उपाय आहे. 

शरीर आणि मनाचे संतुलन साधणारी "शरीराशी संवाद" हि ध्यान पद्धती देखील योग ग्रंथात 

आपल्याला शिकायला मिळते. 

हे सर्व विषय आपण क्रमाने या पाठमालेत अभ्यासण्याचा प्रयत्न करणार  आहोत, त्यावर चिंतन

 करणार आहोत. यापुढील काही पाठ यासंबंधी आवश्यक अशा प्राथमिक माहिती / तपशिलाचे

 होतील. त्यातील हा सुरवातीचा पाठ !


तत्सत ब्रह्मार्पण मस्तू I I   हरी ओम !!


विजय रा. जोशी. 




 

 

महाशिवरात्री निमित्त विशेष पाठ.


वरील लिंकवर क्लिक करा. ऑडिओ सुरु होईल. 





२०० वर्षाच्या ऋषीतुल्य व्यक्तीला घडलेले दर्शन.


अग्निलिंगाचे रूपांतर शिवलिंगात झाल्याचा एक आगळा अनुभव देवजीबाबांना आला. 

त्यानंतर एक अभूतपूर्ण शिव दर्शन त्यांना घडले. आणि २०० वर्षाचा तो जीव श्रांत झाला.

हे दर्शन कसे घडले, त्यामागे त्यांची किती दुर्दम्य इच्छाशक्ती होती, 

त्यासाठी त्यांनी काय केले, 

स्वामीजींनी त्यांना कोणते मार्गदर्शन केले ,   याचा रोमांचकारी प्रत्यय      


'शिवदर्शन'.


विजय रा. जोशी. 

(महाशिवरात्री , ८ मार्च २०२४).