Thursday, October 20, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 196 ते 200 :  ध्वनिफीत :





सारांश - श्लोक  : १९६ -२००. 

संपूर्ण आसमंतात वावरत असलेल्या अणुरेणूंमध्ये अस्तित्व असलेल्या परब्रह्म ईश्वर-तत्वाला श्रीसमर्थ राघव असे

 संबोधतात  आणि म्हणतात की या राघवाने व्यापल्यामुळे  आसमंतात रिकामी अशी जागाच उरलेली नाही.

राघवाचे रूप कसे आहे हे सांगताना समर्थाना आकाशाची आठवण होते. 

मन आभाळा एवढे विशाल केले, स्वतःशी मर्यादित आपले  भावना/विचार जर सर्वांची चिंता करण्यासाठी वापरले,

तर अर्थात आपण समर्थांच्या / रामाच्या जवळ जाऊ. आणि त्याच्या सानिध्याने आपल्या सर्व भव-चिंता, 

संसार-काळज्या नष्ट होतील. आपण भयातीत होऊ. आणि भयातून पूर्ण मुक्ती हाच मोक्ष असतो. 

परमात्मा आकाशा  सारखा आहे असे सांगतात,  नंतर ती उपमा अपुरी आहे असंही सांगतात. उपमा हि कधीच

 पूर्णत्वाने घेता येत नाही, फक्त समजून घेण्यास  त्या उपमा मदत करतात. 

नभाच्या मर्यादेत तो नाही. तो सर्वत्र ओतप्रोत आहे, म्ह्णून त्याला मर्यादित करता येत नाही. श्रीरामाचे रूप विस्तीर्ण,

अतिशय पुरातन असे आहे. त्याला कसलीही तर्कसंगती लागू पडत नाही. अतिशय गूढ असे हे ईश्वरतत्व आहे. 

पण तरीही त्याच्याच कृपेने गूढता नाहीशी होऊन त्याचे ते अद्वितीय असलेले रूप सुलभपणे समजून येते. 

ज्ञान शब्दांनी आपण ऐकतो, नंतर अनुभवाने त्याची प्रचिती येते तेव्हा ते आकळते. 

मग साक्षी अवस्थाही आटून जाते. ध्यानात उन्मनी अवस्था येते त्यात दिवसाचे क्षण होतात. 

कृतार्थतेची अनुभूती येते .         श्रीराम !!


विजय रा.जोशी. 





  मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 191 ते 195 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक :  १९१-१९५ . 

स्वत:च्या ऐहिक सुखातच गुंतून पडलेल्या जीवाला आध्यात्माचा, परमात्म्याचा  विचार करायला फुरसत  मिळत

नाही. म्हणून ब्रह्मज्ञान अगदी कल्पान्त झाला तरी आकलन होणे शक्य नाही. 

शरीर, मन आणि बुद्धी यापलीकडे न गेल्यास परमात्म्याचे स्वरूप कळणार नाही. 

देहबुद्धी निरास म्हणजे अध्यात्म/समाधी तयारी. 

जाणीव आणि नेणीव या मानवी स्थितीतल्या कल्पना आहे, त्या सर्वसाक्षी परमात्म्याला लागू नाहीत.

जन्म हा आपल्या जीवनाची सुरवात नाही आणि मृत्यू आपल्या जीवनाचा अंत नाही , एका अनंत प्रवाहाचा 

एक छोटा भाग म्हणजे आपले जीवन.

देव हा आकाशासारखा असतो.  आकाश म्हणजे काय? आकाशाची सुरुवात कुठून होते आणि शेवट कुठे होतो हे

जसे समजत नाही तसेच हा देवराणा कुठून येतो? कुठे जातो? हे ही कळत नाही.

देव म्हणजे काय ? देह सोडल्यावर जीव कोठे जातो ? मानवी मनाचे हे चिरंतन प्रश्न आहेत.

‘देहबुद्धी, मीपणा न ठेवता मनुजाने परमेश्वराच्या भक्तीत आपले आयुष्य व्यतीत करावे अन्यथा ब्रह्मज्ञान होणे नाही’ 

अशी जाग देण्याचे काम समर्थ या श्लोकात करत आहेत. 

या सर्व विषयांची सोप्या तर्हेने मांडणी असलेले विवेचन जरूर एक, आपला अभिप्रायही जरूर नोंदवा. 

धन्यवाद. 


विजय रा. जोशी. 

 




Sunday, October 9, 2022

 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)


पाठ श्लोक 186 ते 190 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १८६-१९०. 

परम वस्तूचा पत्ता, परमात्म्याचा  समर्थ आपल्याला सान्गताहेत. म्हणतात तो तुझ्या जवळच सानिध्यात आहे. 

त्याचा वियोग  सहन न होऊन तू त्याला तळमळीने जेव्हा हाक घालशील तेव्हा तो लगेच तुला भेटेल. 

या विश्वात प्रचंड सु-रचना, शिस्त , अनुशासन आहे. पंचमहाभूतांचे कार्य अतिशय सुसूत्रपणे हे सर्व विश्व निर्माण

करते. पण हे सर्व करणारी जी शक्ती आहे (निसर्ग / प्रकृती), ती त्या सर्वांच्या पलीकडे आहे. 

अस्तित्वहीन असा तो परमात्मा आहे. 

या विशाल विश्वात आपण माणसांनी आपली दृष्टी संकुचित ठेवली आहे. 

अन म्हणून आपल्याला हे सत्य न दिसेनासे झाले.

यावर उपाय म्हणजे , आपली धारणा, जी असत्यावर आधारित आहे ती बदलणे,  वृत्ती बदलणे हा आहे.

पंचमहाभूतांनी समृद्ध असलेल्या या सृष्टीत आपण आकंठ बुडालेले असतो. आणि त्यामुळे सहाजिकच दृश्य जग 

हेच सत्य असा आपला घट्ट समज असतो. पण ते खरे नाही. 

आसक्ती सोडा. जगाकडे पाठ फिरवून रुक्ष जीवन जगू नका,  पण त्यास सर्वस्वही मानू नका. 

समर्थ येथे सांगतात कि दृश्याचे ते बंधन ज्ञान शस्त्राने  तोडावे. 

ऐक ज्ञानाचें लक्षण| ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान |  पाहावें आपणासि आपण| या नांव ज्ञान                        

आपली व्यवहारातील ज्ञान-संकल्पना अध्यात्मात उपयोगी नाही.

समर्थ म्हणतात , ज्याने मायेच्या योगाने ही सृष्टी रचना केली तोच देव आहे असे ओळखावे .त्याला पाहता आले तर

जीवाच्या मागे लागलेली संसारपीडा संपते व मोक्ष प्राप्त होतो . वाणीचे मूळ स्थान जी परावाणी ती सुध्दा त्याचे वर्णन

करू शकत नाही. परावाणी च्या तो पलीकडे आहे. तो वाचातीत आहे. 

भ्रम ,माया या देवाला स्पर्श करू शकत नाही. 

निर्गुणाला कल्पित जावे असे समर्थ सांगतात. निर्विकल्प असे स्वरूप आपल्यात भरून आहे . 

अशी कल्पना करून आपला अहंभाव सोडायला समर्थ सांगतात.   अध्यात्मातील या सर्व संकल्पना खूप गहन

 आहेत पण समर्थ त्या कशा सोप्या करून सांगत आहेत ते आपल्यास या ध्वनिफितीत कळेल.    ... श्रीराम !


विजय रा. जोशी. 

                   


 मनाचे श्लोक  (संत श्री रामदास स्वामी)

पाठ श्लोक 181 ते 185 :  ध्वनिफीत :





सारांश श्लोक १८१ - १८५. 

सद्गुरू कसे आसावे, कसे नसावे, त्यांना कसे ओळखावे याचे वर्णन करणारे  हे श्लोक आहेत. . 

साधना म्हणजे काय?  गुरु कोणाला म्हणावं ? साधक कोणाला म्हणावं? शिष्य कोण? कृपा म्हणजे काय, 

अध्यात्मात साधकत्व  म्हणजे काय ?  ........  या बद्दल प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष चर्चा आहे. 

ज्याच्या चेतनेतून मी-पण, अहंभाव हा अगदी पार निरसून गेला आहे , निराकरण झालं आहे, केवळ वैश्विक

चेतनाच तिथे स्पंदित आहे , अशा व्यक्तीला आपण गुरुपद प्राप्त झालय असं म्हणू शकतो. 

जिथे मी-पण उरलं नाही, आणि तू-पण उरलं नाही त्या ठिकाणी व्यापार शक्य नाही, दुकानदारी शक्य नाही,

जाहिरातबाजी शक्य नाही. ती व्यक्ती जगत राहील स्वतःच जीवन , शांतपणे, संथपणे.. तो/ती गुरुत्व प्राप्त व्यक्ती. 

ज्याच्या हृदयामध्ये साधकाची भूमिका परिपकव होते, त्या व्यक्तीला, त्या साधकाला,  अशा आत्मानुभावी व्यक्तीशी

मिळवून देण्याची जबाबदारी जीवन उचलते. 

सद्गुरुंचे मूल्यमापन करणे हि तशी अवघड गोष्ट . तरीही सद्गुरूंवर श्रद्धा ठेवण्यापूर्वी आपण आपल्या

पद्धतीने ते करणे आवश्यक आहे. 

शिष्यामधे शरणागती अत्यंत आदराने हवी. तळमळीने हवी. मनापासून हवी.  लीनतेने रामरुपात लपले, 

विलीन झाले, एकरूप झाले असे भक्त हवे. जो भक्त आत्मरूप झाला तो भयातीत झाला. सद्गुरू यास

सहाय्यभूत होतात. ..         सोप्या उदाहरणांनी, कथेच्या सहाय्याने आपण हे सर्व या ध्वनिफितीच्या माध्यमातून

 समजून घेऊ या. .   श्रीराम !


विजय रा. जोशी