Tuesday, March 30, 2021

 

गीता अध्याय १2, भाग 2 , ध्वनी फीत



भक्त लक्षणे 



सर्व भुतांच्या ठिकाणी द्वेष न करणारा, मैत्रीने वागणारा, आणि तसाच कृपयुक्त , मी-माझेपण रहित, सुख व दुःख समान मानणारा. क्षमाशील  (१२/१३)

सर्वदा संतुष्ट, योगी, नियतचित्त, माझ्या ठिकाणी ज्याचे मन दृढ आहे असा, माझ्या ठिकाणी ज्याने मन व बुद्धी अर्पण केली आहेत; असा जो माझा भक्त असतो , तो मला प्रिय आहे. (१२/१४)

ज्याचा लोक कंटाळा करत नाहीत व जो लोकांचा कंटाळा करत नाही , जो हर्ष, क्रोध, भय यांच्यापासून सुटला आहे; तोच मला प्रिय आहे. (१२/१५)

निरपेक्ष, शुद्ध, तत्वार्थींचा देखणा, उदासीन, संसारदुःख विरहित, कर्मारंभास आवश्यक असणारा जो अहंकार ;तद्विरहित, असा जो माझा भक्त असतो तो मला प्रिय आहे. (१२/१६)

जो हर्ष पावत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, (अप्राप्त वस्तूची) इच्छा करीत नाही, चांगले व वाईट या दोन्हीचा त्याग केलेला जो भक्तिमान मनुष्य असतो, तो मला प्रिय आहे.  (१२/१७)

शत्रू, मित्र, मान व अपमान यांच्या ठिकाणी समान असणारा , शीत व उष्ण , सुख व दुःख यांच्या ठिकाणी समान असणारा (अंतर्बाहय), सग रहित.   (१२/१८)

निंदा व स्तुती समान मानणारा ,मौनी, जे काही मिळेल त्यांत संतोषवृत्ती ठेवणारा, कोठेच आश्रय धरून न रहाणारा, स्थिरबुद्धी असलेला जो भक्तिमान मनुष्य , तो मला प्रिय आहे.   (१२/१९)


भगवंताचे गुण आदर्श समजून त्या प्रमाणे वागणे म्हणजे भक्ती  


भक्तीसाठी मन तयार करायला व भक्तीचे वातावरण तयार करायला -- ज्या कृती, कर्म कांड आहे तेवढेच आपण करतो. व ती भक्ती असे समजून चालतो. पण हे विधी केल्यावर भगवंतात मिसळून जायचे असते ते आपण करत नाही. म्हणून अनेक वर्षे आपली पूजा असफल रहाते.

मी गोपाळ कृष्णाचा भक्त आहे तर मला गोपाल कृष्णाच्या गुणांचे ज्ञान असायला हवे. ते गुण माझ्या वर्तनात आणण्याचा प्रयत्न मी कसोशीने केला पाहिजे.

भक्तीची अंतीम अवस्था म्हणजे भक्त गुण-वर्तनाने संपूर्ण भगवंतमय होणे.

अशी भक्ती घडण्यासाठी  काय प्रयत्न करावे या बद्दल उपयुक्त माहिती या ऑडिओमध्ये ऐका. 


विजय रा. जोशी 




गीता अध्याय १2, भाग 2 , ध्वनी फीत


Tuesday, March 23, 2021

 

गीता अध्याय १2, भाग 1 , ध्वनी फीत



गंगेचा ओघ सर्वत्र पावन व पवित्र. परंतु हरिद्वार, काशी ,  प्रयाग, अशी स्थाने अधिक पवित्र आहेत. भगवत गीतेचीही तशीच स्थिती आहे. भगवतगीता आरंभापासून अंतापर्येत सर्वत्र पवित्र आहे. परंतु मध्यंतरी काही अध्याय तीर्थक्षेत्रे झाली आहेत. ज्या अध्याय बद्दल आज बोलायचे आहे तो अध्याय मोठा पावन, तीर्थ झाला आहे. प्रत्यक्ष भगवानच या अध्यायाला अमृतधार असे म्हणत आहेत. हा लहानसा वीस श्लोकांचा अध्याय अमृताप्रमाणे मधुर आहे. या अध्यायात भगवंताच्या मुखातून भक्तिरसाच्या महात्म्याचे तत्व गायिले गेले आहे. 





खऱ्या साधकानं आणि भक्तानं परमेश्वराचं सगुण निर्गुण रूप समजावून घेतले पाहिजे. काही साधक तत्त्वज्ञानी परमेश्वराच्या सगुण स्वरूपाला मानणारे नसतात. मूर्तिपूजेला त्यांचा विरोध असतो. तो विरोध त्यांच्यापुरता ठीक आहे; पण निर्गुण भक्ती करणाऱ्यांनी सगुण भक्ती करणाऱ्यांना कमी मानण्याचे काहीच कारण नाही. निर्गुणोपासनेचाही अभिनिवेश त्याज्यच मानाव लागेल. भक्ती सगुण रूपातील असो वा निर्गुण, त्यातील भाव महत्त्वाचे आहेत.


सगुण आणि निर्गुण परस्पर पूरक आहेत. सगुण सुलभ आहे, निर्गुण कठीण आहे तर तसे पहिले तर उलटही खरे आहे - सगुण कठीण आहे व निर्गुण सोपे आहे. दोहोंनी एकच ध्येय प्राप्त होते. भगवंतांनी सुलभता, कठीणता तारतम्य लक्षात घेऊन ‘सगुण सोपे’ असे उत्तर दिले आहे.  नाही तर योग, सन्यास, सगुण, निर्गुण  एकरूपच आहेत. शेवटी भगवान सांगतात ‘अर्जुना ! तू सगुण ऐस कि निर्गुण ऐस, भक्त ऐस म्हणजे झाले, गोटा राहू नकोस. असे सांगून भगवंतांनी शेवटी भक्ताची लक्षणे दिली आहेत. 


हि लक्षणे मधुर आहेत. त्याची माधुरी चाखावी. या लक्षणांचा वर्तन अनुभव घ्यावा. स्थितप्रज्ञाच्या लक्षणाप्रमाणे हि लक्षणे आपण रोज सेवन करावी, मनन करावी, त्यातील थोडी थोडी आपल्या आचरणात आणून पुष्टी प्राप्त करून घ्यावी. अशा तर्हेने जीवन हळूहळू परमेश्व्राकडे न्यावे. 


सगुण आणि निर्गुण भक्ती बद्दल या ध्वनिफितीतील माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त वाटेल, तर जरूर ऐका . 


विजय रा. जोशी 



गीता अध्याय १2, भाग 1 , ध्वनी फीत

Tuesday, March 16, 2021


गीता अध्याय ११, भाग 2 , ध्वनी फीत



गीता जीवनाचे रहस्य समजावून देते. 


पहिली गोष्ट भगवंत सांगतात  - तुझ्या शिवाय सर्व होणार आहे. ज्याला जीवनात, ज्ञानात वर जायचे असेल त्याने समजून घेतले पाहिजे. माझ्याशिवाय हे सर्व चालू रहाणार आहे. माणसाने लक्षात ठेवले पाहिजे , तो नव्हता तेव्हा हे जग अव्याहत सुरु होते, तो नसला तरी जगाचे काही अडणार नाही. जे नाटक करण्यासाठी आपल्याला पाठविले आहे ते नाटक व ती भूमिका आपण फक्त करत असतो. 



विराट,  विश्वरूप दर्शनाने अर्जुन वेगळ्याच मनस्थितीत जातो. 

तो म्हणतो: कधी न पाहिलेले रूप पाहून मला हर्ष झाला आहे व भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. हे जगन्निवासा देवाधिदेवा ! प्रसन्न व्हा. आणि आपले ते पूर्वीचे रूप दाखवा. किरीट व  गदा धारण करणारे , हातात चक्र घेतलेले, पूर्वीप्रमाणेच मी तुम्हाला पाहू इच्छितो. म्हणून हे सहस्रबाहो विश्वमूर्ते ! त्याच चतुर्भुज रूपात प्रकट व्हा. 

देवाला; चतुर्भुज रूप दाखविण्याची अर्जुनाची मागणी; आवडली नाही. पण त्याच्या वरील प्रेमाखातर पुन्हा देव चतुर्भुज झाला. सूर्य मावळल्यावर आकाशात जशा चांदण्या प्रकट होतात ,  त्याप्रमाणे अर्जुनाला पुन्हा सर्व दृश्य पूर्ववत दिसू लागले. शेवटी देवाने अर्जुनास महत्वाचा उपदेश केला की , ‘गाय जरी डोंगरात चरावयाला गेली , तरी तिचे चित्त घरांतील तिच्या वासरावरच असते ; तसे तू विश्वरूपावरच आपले खरे प्रेम ठेऊन चतुर्भुज मर्यादित रुपावर वरवरचे बाह्यात्कारी प्रेम ठेव. 

भक्तीसाठी आवश्यक गोष्टी ,  भक्ती कशी करावी ? 

भगवन्ताला भजणारे लोक एकाच कक्षेतले आहेत असे समजू नये. वसिष्ठही फुले समर्पण करीत होते आणि शंकरराव हि फुले चढवतात.  एक गुणश्रेष्ठता समजून फुले चढवत असतो तर दुसरा श्रेष्ठता समजून फुले चढवत असतो. भगवंताची महानता व आपली सामान्यत कळते त्यातून इंद्रिये नमतात त्याला दीनता म्हणतात.  तूच महान आहेस,  तूच महान आहेस,, आम्ही तुझ्यापर्येत पोचू शकतनाही , आम्ही तुझ्या पायातल्या धूळींचेही लायक नाही, अशी भावना मनात झाल्यावर इंद्रिये नमतात पण मन नम्र होत नाही. ह्याला हिनता म्हणतात. तू महान आहेस हि तुझी शक्ती आहे व तू माझ्यासाठी सामान्य झाला आहेस हि तुझी कला आहे. शक्ती व माया ह्या दोहोंचेही ज्ञान ज्यावेळी मनाला होते त्यावेळी मन नमते, त्याला लीनता म्हणतात. तुला खरेतर काहीही नको असून सुद्धा माझ्याकडून तुला काही अपेक्षा आहे, इच्छा , वासना आहे असे तू नाटक करीत आहेस , हे ज्यावेळी बुद्धीला पटते, त्यावेळी बुद्धी नमते व तिला नम्रता म्हणतात. 

नमस्कार म्हणजे इंद्रिये, मन, बुद्धी ह्यांची नम्रता.

ज्या ठिकाणी इंद्रिये  मन  व बुद्धी हि सर्व पूर्ण  एक होऊन नम्र भाव निर्माण होतो.  म्हणून भगवंताचे :

१. सर्वज्ञत्व 

२. सर्वाश्रयत्व

३. सर्व व्यापकत्व 

४. सर्व सुखत्व 

ह्याचे भान, ज्ञान  रहायला हवे. ज्ञानपूर्वक भक्तीत थोडा कंटाळा येण्याची शक्यता आहे. पण ज्ञानोत्तर भक्तीत ‘तुष्यन्ति च रमनति च’ अशी स्थिती येते. तिलाच नम्रता म्हणतात. भगवंताला कुठल्याही रूपात स्वीकारायची मनाची पूर्ण तयारी म्हणजे  ज्ञानोत्तर भक्ती.  या बद्दल सविस्तर माहिती  ध्वनिफितीत ऐका . 

भक्ती वर्णन - १२  वा अध्याय 

अर्जुनास सगुण रूप हवे होते, त्यावर तो भाळला होता. देवांनी तर ते कमी योग्यतेचे ठरविले होते. म्हणून कोणते रूप श्रेष्ठ आहे ? असा प्रश्न देव रागावणार नाहीत अशा चातुर्याने तो देवापुढे मांडणार आहे. आणि त्यातूनच १२ वा अध्याय निर्माण होत आहे. 


विजय रा जोशी 




गीता अध्याय ११, भाग 2 , ध्वनी फीत


Sunday, March 7, 2021


गीता अध्याय ११, भाग १ , ध्वनी फीत .




“निसर्ग दयाळू नसतो, अन्यायी भासेल एवढा क्रूर असतो, हे समजून 
जगात राहावे. जर तुम्हाला भांडायचे असेल तर निसर्ग नियमा प्रमाणे भांडा, तो नियम समजून घ्या”... हा अकराव्या अध्यायाचा आशय आहे असे मी समजतो. (स्वामीजी,जीवन गीता).



११ वा अध्याय २ ऱ्या अध्यायाला पूरक आहे.

विश्व नियमा प्रमाणे “समता” हे एकदा ध्येय ठरले की, ती समता मोडणाऱ्याचे काय होईल ? याच्या बद्दल विचार करणारा हा ‘अकरावा’ अध्याय आहे.

हा अकरावा अध्याय दुसऱ्या अध्यायाचा पूरक असा आहे. समता हे एकदा ध्येय ठरले (एंट्रोपी - उष्णता गतिशास्त्र २ रा नियम) कि ती समता मोडणाऱ्याच काय होईल याचा विचार करणारा हा  अध्याय आहे. 


बारावा श्लोक आहे , जर आकाशात हजारो सूर्याची एकाच वेळी उत्पन्न झालेली कांती असेल तर मात्र ती कांती त्या महात्म्याच्या कांतीशी बरोबर होऊ शकेल. नुसती कांती, कृष्ण लांबच राहिला.कृष्णाच्या बाह्यांगाच्या पडछाया, म्हणजे हजारो सूर्याची कांती. 


मग सतराव्या श्लोकात तो म्हणतो : सर्व बाजूनी पहायला कठीण, प्रदीप्त झालेल्या अग्नीप्रमाणे व अतिप्रखर सूर्याप्रमाणे तेजस्वी.. इतक्याच प्रमाणात आहे असा निश्चय न करता येण्यासारखा. म्हणजे अमुक इथे कृष्ण सुरु झाला आणि इथे संपला असा सांगता येणार नाही. एवढ्या अफाट दिव्यत्वाचं अनंत रूप त्या कृष्णाच्या ठिकाणी अर्जुनास दिसत आहे. एकोणिसाव्या श्लोकात अर्जुन म्हणतोय की , हे आकाश आणि पृथ्वी यातील अंतर तू एकट्याने भरून काढलं आहेस, इतकेच नव्हे तर सर्व दिशाही व्याप्त केल्या आहेस. तुझे हे अद्भुत उग्र रूप बघून सर्व त्रैलोक्य भयाने गडबडून गेले आहे. थरथर कापत तो म्हणतो आहे , ‘माझे धैर्य आणि स्थिरता नाहीशी झाली आहे. चोविसाव्या श्लोकात शेवटी तो म्हणतो आहे की , मला सुखच वाटत नाहीसे झाले आहे. अठ्ठाविसाव्या श्लोकात त्यांनी म्हंटल आहे ‘पेटलेल्या तोंडात झरझर राजे, लढवय्ये शिरत आहेत. काळाच्या तोंडात लोक कसे शिरतात हे मी प्रत्यक्ष आज पहातो आहे. 


कोणाला वाटेल कृष्णाच्या रूपाबद्दल अर्जुनाच्या मनात भ्रम निर्माण झाला असेल, श्लोक ३२ मध्ये कृष्ण स्वतः सांगत आहेत :हे अर्जुना ! मी सर्व लोकांचा नाश  करण्यासाठी, अत्युग्र रूप म्हणजे काळ; जो अंतकाळाचा सुद्धा अंत करेल एवढा क्रूर आहे. पहिल्यांदा कृष्णाच्या कराल दाढेत सगळे कौरव शिरत होते आणि मागोमाग पांडवही शिरत होते. भांडणारे दोन्ही पक्ष शेवटी याच गतीला मिळतात. शत्रू, मित्र तुम्हाला जे काही मानायचं असेल ते माना. शेवटी दोघांना मरण येणारच आहे. बाहेर कदाचित दुर्जनांचा प्रथम विजय झालेला दिसेल पण आत कत्तल प्रथम दुर्जनाचीच होणार आहे. 

फार पुण्य नसत. थोडं जमा झालं तर लगेच त्याचा अहंकार होतो.  पापाच फळ तर शेवटी वाईट मिळणारच आहे, पण पुण्याचाही फळ पहिल्यन्दा परिक्षा घेतल्याशिवाय पदरात पडणार नाही. 

प्रत्येक अहंकाराची गर्जना हि आंतून आर्त  किंकाळी असते. 

खरा देव न्यायी असतो त्याचाकडे जाणे. त्याच दर्शन घेणं सोपं नसत. कारण देवाला समता पाहिजेआणि आम्हाला मात्र विषमता हवी. आम्हला अनुकूल विषमता पाहिजे. आम्ही मोठे आणि इतर छोटे. इतरांना कोणाला मोठं मानायला आपण सहसा तयार नसतो. अकराव्या अध्यायाचा हा अर्थ आहे आणि तो अर्थ जेव्हा पहाण्याची आपल्यास शक्ती येईल तेव्हा सर्व सोपं असेल. 

विस्वरूप दर्शनाचा कथाभाग या ध्वनिफितीमध्ये आपल्यासमोर उलगडत जाईल , शुभेच्छा !


विजय रा जोशी. 



गीता अध्याय ११, भाग १ , ध्वनी फीत .

Monday, March 1, 2021

 

गीता अध्याय १०, भाग 2 , ध्वनी फीत .






परमेश्वरी अस्तित्व स्वतःला  कसे समजवून घ्यायचे ? 

लहान मुलांना शिकविण्यासाठी जे उपाय आपण योजतो तेच उपाय सर्वत्र परमात्मा दिसावा म्हणून या दहाव्या अध्यायात सांगितले आहेत. आधी अक्षरे मोठी  काढायची, गिरवयाची आणि नंतर तीच छोटी काढायला शिकायचे. आधी बिन घोटाळ्याची साधी अक्षरे शिकवायची आणि घोटाळ्याची जोडाक्षरे मागून शिकायची. अधि ठळक परमेश्वर पहायचा. समुद्र, पर्वत अशा महान विभूति भरलेला परमेश्वर पटकन डोळ्यात भरेल. हा परमेश्वर पटला तर एखाद्या जलबिंदूत, मातीच्या छोट्या कणातही तोच आहे हे पुढे कळेल. जेथे शुद्ध परमेश्वरी अविर्भाव सहज प्रकट झाला आहे, त्याचे ग्रहण पटकन होते . जसा रामाच्या ठिकाणी प्रकट झालेला परमेश्वरी अविर्भाव चटकन समजतो. राम हे  साधे अक्षर आहे, बिन भानगडीचा  परमेश्वर. पण रावण? तो समजायला जोडाक्षरा  सारखा आहे. रावणाची तपःश्चर्या,कार्यशक्ती थोर आहे, परंतु त्यात क्रूरपणा मिसळलेला आहे. दया, वत्सलता, प्रेम असलेला राम, त्याच्या ठिकाणी असलेला परमेश्वर सहज ग्रहण होईल पण रावणाच्यात असलेला परमेश्वर पहायला जरा वेळ लागेल. सज्जनांच्या परमेश्वर पाहून नंतर दुर्जनातही पहायला शिकायचे. समुद्रातील विशाल परमेश्वर त्या थेंबातही आहे, रामचंद्रातील परमेश्वर रावणातही आहे. जे स्थूलात, तेच सूक्ष्मात, जे सोप्यात तेच कठीणात. अशा दोन तर्हेने हा जगाचा ग्रंथ वाचावयास आपणास शिकायचे आहे. 

१० व्या अध्यायात कृष्ण म्हणतात – मी या देहात आहे खरा, पण अगदी खरा मी सर्वत्र आहे

१० वा अध्याय सांगतो “तू संकुचित होऊ नकोस. तसा प्रयत्न केलास तर ते आयुष्यात बरोबर होणारनाही.” त्यासाठी माझी प्रार्थना काय असली पाहिजे? माझी प्रार्थना अशी असली पाहिजे की “मी आता अपूर्ण असलो तरी संपूर्णाच्या दिशेने माझी वाटचाल झाली पाहिजे.”तशी प्रार्थना आपल्यास निवडायची असेल तर त्या साठी योग्य वर्तन आणि चिंतन झालं असल पाहिजे.

तुम्ही जेंव्हा किरण व्हायला तयार असता तेंव्हा सूर्य बनू शकता.

प्रकाश-किरण सर्वत्र जातो. तो राजमहालावर पडतो तसा उकिरड्यावर व गलीच्छ्य गटारावरही पडतो. सूर्यकिरण घाणीत, गटारात जाण्याची कधीच घृणा करत नाही..  घाणीची घृणा केली तर आम्ही किरणही होऊ शकणार नाही मग सूर्य कुठून होणार ? हा आपला पराभव असेल. आणि हि पराभूतता जर आपण टाळू शकलो तर आपल्याला सर्वत्रता मिळेल. नेहमी फायद्याचे घ्यायचे व तोटयाचे सोडायचे असं चालत नाही. न्याय व नियम हे तुमच्या सोयीप्रमाणे फिरत नसतात.

विभूती योग.

विभूतियोग म्हणजे सृष्टीच्या वैभवाचे वर्णन. ते वैभव भगवंतांनी अर्जुना समोर खुले केले. अर्जुन या सृष्टीतील विभूती (परमेश्वर रूपे) समजून घेतो व पुढे भगवंताना विचारतो “या सर्व विभूती कुठे आहेत ?” मला आपले खरे सर्वव्याप्त रूप बघायचे आहे. मग ११ व्या अध्यायात भगवंताना ‘विश्वरूप दर्शन’ घडवावे लागले.

विभूती योग कळल्यावर मग विश्वरूप दर्शन कळेल. हा विभूती योग या अध्यायात आपण समजून घेण्याचा प्रयत्न  करीत आहोत. 


विजय  रा. जोशी 



गीता अध्याय १०, भाग 2 , ध्वनी फीत .