Friday, December 25, 2020

 

गीता अध्याय  ६, भाग १, : ध्वनी फीत



ध्यानयोग, आत्मसंयम योग, चित्तवृत्ती निरोध. (संयमाने मन वळवा)


अध्याय ६, मुख्य विषय 

कर्मयोगी होण्यासाठी काय प्रयत्न करावे, योगी हा समतेची मूर्ती असतो. (श्लोक १ - ९)

ध्यान साधना , योग साधना कशी करावी (१० - १९)

योगी वृत्तीची, वर्तनाची आवश्यकता व लाभ (२० - ३२) 

अर्जुनाचे प्रश्न (३३, ३४, ३७, ३८, ३९). 

भगवंताचा खुलासा आणि आश्वासन. (३५,३६, ४०,४१,४२). 

स्वास्थ्य म्हणजे काय ? स्वतःमध्ये स्थित होणे म्हणजे स्वास्थ्य.


आरोग्य म्हणजे पूर्णता. संस्कृतमध्ये “स्वास्थ्य” असा समर्पक शब्द आहे. स्वतःमध्ये स्थित होणे म्हणजे स्वास्थ्य. स्वरूपामध्ये अवस्थान असणे म्हणजे खरी स्वस्थता. स्वत्व ज्याला गवसले, ज्यांनी स्वतःची नीट ओळख करून घेतली, त्याला खरे स्वास्थ्य आरोग्य लाभते. 

आत्मदर्शनातून, आत्मज्ञानातून जीवनाची खरी परिपूर्णता, खरी निरोगीता प्राप्त होत असते. 

स्वास्थ्य प्राप्तीसाठी प्रयत्न दोन प्रकारे 

सर्जनशील चेतनेची वाढ दोन पावलांनी होते. एक पाऊल म्हणाजे क्रियाशीलत्व व दुसरे विश्रांती. क्रियाशीलत्व व विश्रांती या पावलांनी प्रगती होते. एक पाय क्रियाशील असतो, तो दुसऱ्या पायाच्या पुढे जाऊन मग स्थिर होतो. या स्थिर पायावर सर्व शरीराचा भार असतो. मग दुसरे पाऊल पुढे जाते. एका पायाचे क्रियाशीलत्व हे दुसऱ्या पायाच्या स्थिरतेवर , विश्रांती -स्थितीवर अवलंबून असते. स्थिरता हा क्रियाशीलत्वचा पाया होय. ध्यानात मिळणाऱ्या गाढ विश्रांतीने गतिमान व कौशल्यपूर्ण, यशदायी कार्य करण्याचे सामर्थ्य येते. 

स्वतःला विसरणे, काही काळ तरी , म्हणजे ध्यान

उद्धरावा स्वये आत्मा, खचू देऊ नये कधी, आत्माची आपुला बंधू, आत्माची रिपू आपुला.     (गीताई ५/६)

मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयो, बन्धाय विषयासंगो, मुक्त्यै निर्विषयं मनः.  (अमृतबिंदू उपनिषद २)

मन जिंकणे हि अवघड, म्हणजे साधनेची गोष्ट आहे. त्या साठी कर्मयोग सांगितला आहे. कर्म योगातील कर्मे शुद्ध (उपासना युक्त) होण्यासाठी ध्यान-योगाची उपासना ६ व्या अध्यायात सांगितली आहे. 

ध्यान म्हणजे घरी परत येणे. 

सुखाच्या शोधार्थ माणूस सर्वत्र भटकत असतो. पण स्वतःच्या घराची ओढ, मांगल्य आणि स्वथता ही काही वेगळीच असते. ध्यानावस्थेत माणूस असाच जणू घराच्या ओढीने स्वस्थ होतो. स्वाभाविक सुख-शांती अनुभवतो, आपण कोण आहोत ते आनंदाने पाहू लागतो. बाहेरच्या सुखावर अवलंबून रहात नाही. 

जीवनाच्या अगोदर मूळ गती शून्य अवस्था होती.या मूळ अवस्थेत जाणे म्हणजे ध्यान. आनंद नाही आणि दुःखही नाही तरी समाधान आहे अशी स्थिती. अशी स्थिती येऊ शकते ? होय ! काहींच्या बाबतीत येते, बाकीच्यांमध्ये येत नाही. पण बहुसंख्य म्हणाले “अशी स्थिती येत नाही” तर ते बरोबर नाही.

ध्यानासाठी आवश्यकता . 

ध्यान स्थिती कशी असावी. 

इत्यादी गोष्टी आपण या भागात पहाणार आहोत. 


विजय रा. जोशी


गीता अध्याय  ६, भाग १, : ध्वनी फीत












No comments:

Post a Comment