GANESH BHAKTI, गणेश उपासना 11 सप्टेंबर २०२४ (गणेश चतुर्थी पाठ 2/2)
भक्त म्हणिजे विभक्त नव्हे । आणी विभक्त म्हणिजे भक्त नव्हे ।
विचारेंविण कांहीच नव्हे । समाधान ॥ (दास. ४.९.६)
भावनांच्या कल्लोळाला विचारांच्या मार्गाने भगवंतापर्यंत नेऊन तो कल्लोळ भगवंतामध्ये विलीन होणे
हे भक्तीचे स्वरूप आहे. जीवभाव त्या प्रवाहातून आत्मभावात विसर्जित व्हावा.
भगवंतभाव व आत्मभाव एकच आहेत हे विचाराने निश्चित झालेले असावे.
भक्ती ह्या शब्दाचे उपासना, उपासक, उपास्य व यांचे ऐक्य असे चार घटक होतात.
ह्यातील उपास्य किंवा देव हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे.
ब्रह्म, ईश्वर, सगुण-अवतार व मूर्ती असे देवाचे चार स्तर समर्थ सांगतात. ह्यातील मूर्ती हा स्तर उपासकांसाठी उपास्य म्हणून उपलब्ध असतो. त्या मूर्तीच्या माध्यमातून उपासकाला ब्रह्मानुभवापर्यंत वाटचाल करावयाची असते.
प्रत्येक उपासकाने ह्याचे सतत भान ठेवले पाहिजे.
परमेश्वर इच्छेने जी स्थिती प्राप्त होते त्या (प्रत्येक) स्थितीत सुखी, उपकृत, संतुष्ट रहाणे. यास ईश्वर शरणागती म्हणतात. भक्ती हे एक परिपूर्ण शास्त्र आहे हे अनेक उपासक लक्षात घेत नाहीत. त्यांच्या मताने त्यांना झेपेल
व जशी जमेल तशी उपासना ते करतात. त्यामुळे उपासनेचे रूपांतर भक्तीत होऊन त्यापासून
मिळणारा आनंद दूर राहतो. निर्भयता, तृप्ती, शांती इत्यादींचा अनुभव येत नाही.
‘मी कर्ता’ या भावाबरोबर दोन गोष्टी येतात: वासना आणि अभिमान. जितक्या प्रमाणात वासना व अभिमान कमी होतो तितक्या प्रमाणात निस्सीम भक्तीला सुरवात होते.
कर्ममय भक्ती गीतेस मान्य असून आपल्यास प्राप्त झालेली कर्मे केलीच पाहिजेत पण ती स्वतःची
म्हणून न करता परमेश्वराला स्मरून त्याने निर्मिलेल्या जगाच्या संग्रहार्थ त्याचीच हि कर्मे होत ,
अशा निर्मम बुद्धीने करावीत. म्हणजे कर्म-लोप न होता उलट त्या कर्मांनीच परमेश्वराची सेवा,
भक्ती किंवा उपासना घडून त्याचे पाप-पुण्य आपणास न लागता अखेर पूर्ण सद्गतीही मिळते असे
गीतेचे सांगणे आहे.
भक्तीच्या पाण्याशिवाय मनाचे सूक्ष्म मल धुतले जात नाहीत. भक्तीच्या वेलीला ज्ञानाची फुले लागली पाहिजेत.
सविस्तर विचार/चिंतन पाठात ऐकावे ही विनंती.
विजय रा. जोशी.
No comments:
Post a Comment