Saturday, July 20, 2024

 योग ग्रंथ पाठ १६, अनुबंधचतुष्टय व षडलिंगे,   ५ जून २०२४. 





सारांश  

कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करतांना तो मुख्यत्वें कोणासाठी आहे, त्यात पुस्तकाच्या वाचण्याने 

काय लाभ होणार या प्रश्नांची उत्तरे प्रथमच समजणे माणसाला आवडते. म्हणून परमार्थशास्त्राच्या ग्रंथात या

 विषयांचा संपूर्ण विचार पद्धत आहे. यालाच अनुबंध म्हणतात.(अनुबंध म्हणजे मन वेधून घेणारी बाब.). 


अनुबंध - जे बांधून ठेवते ते, चतुष्टय - चार / चौकट 

१. ग्रन्थ अभ्यासाचे अधिकारी कोण ? 

२. विषय काय?

३. प्रयोजन काय ? 

४. संबंध काय ? विषयाचे प्रमाण मांडतांना त्याचा विषयाशी संबंध असावा.

      

षड्लिंगे.

साधकांनी शास्त्रग्रंथ खाली दिलेल्या  सहा गोष्टींकडे लक्ष ठेवून अभ्यासणे म्हणजे शास्त्रानुसार श्रवण होय.

 शास्त्रग्रंथ सहा बाबींकडे चांगले लक्ष ठेवून ऐकावयाचा असतो,ज्यांना ग्रंथाची षड्लिंगे म्हणतात. 

म्हणजे चांगल्या ग्रंथाच्या सहा खुणा,सहा विशेष. जे अभ्यास करतांना लक्षात घ्यायचे असतात. 

ही षड्लिंगे अशी -

१ ) उपक्रम आणि *उपसंहारामधील मेळ (एकवाक्यता) -- वर्तुळ काढायला सुरुवात केल्यावर ते जेथून

      सुरू होते तेथेच येऊन   पेन्सील थांबते (असे झाले पाहिजे.). याचप्रमाणे ग्रंथाच्या सुरुवातीला 

       ग्रंथ ज्या उद्देशाने सांगितलेला असतो तो उद्देश अखेर संपूर्ण झाला का ते पाहणे म्हणजे 

       उपक्रम-उपसंहारांची एकवाक्यता. *(अखेरीस असलेला समारोपाचा मजकूर. तात्पर्यवजा सार).

2). अभ्यास - श्रवण वगैरे साधने; विवेक, वैराग्य वगैरे अंगी बाणवणे; अनुसंधान आणि नित्य

     सदाचरण इ. सांभाळणे याला       अभ्यास म्हणतात. फलप्राप्तीसाठी सांगितलेले कायिक, वाचिक 

      व मानसिक कर्म म्हणजे अभ्यास. ग्रंथाचे वाचन, त्यावर विचार व त्यानुसार आचरण साधना.

    (उदा. नामसाधना, ध्यानसाधना इ.) हे परत परत करणे म्हणजे अभ्यास. 

३) अपूर्वता - इतरत्र कोठेच न मिळणारे असे जे विशेष त्या ग्रंथातून मिळते त्याला  अपूर्वता   म्हणतात.  

4)   फल - ग्रंथाच्या अभ्यासाने जे प्राप्त होणार त्याला फल म्हणतात. 

५)  अर्थवाद - वाचकांना खेचून घेण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी जरूर त्याहून फुगवून सांगणं 

               अतिशयोक्ती करणे म्हणजे  अर्थवाद होय.

६) उपपत्ती - सिद्धान्त सिद्ध करण्यासाठी ज्या उदाहरणांचा उपयोग केला जातो,  त्याला उपपत्ती म्हणतात. . 


साधकांनी शास्त्रग्रंथ वरील सहा गोष्टींकडे लक्ष ठेवून अभ्यासणे म्हणजे शास्त्रानुसार श्रवण होय. 

पुण्यप्राप्तीच्या हेतूने, कुतुहल भाव कळण्यासाठी ऐकणे याला शास्त्रात श्रवण समजत नाहीत. 


या संदर्भात योग ग्रंथांचा अभ्यास करण्याची शक्यता आणि त्याची उपयुक्तता यावर काही विचार उदाहरणांसह या विवेचनात आपल्याला ऐकायला मिळेल. 


विजय रा. जोशी 







Sunday, July 14, 2024

  योग ग्रंथ पाठ १५,  तत्वज्ञानाचे सार – प्रार्थना,  २९ मे २०२४. 





सारांश : 

माणसाला काही उच्च ध्येय साध्य करायचे असेल तर मनाला शांत, निःश्चल. एकाग्र करावे लागते.

अशा प्रयत्नांना ‘साधना’ असे म्हणतात. पूजा, मंत्र, जप, प्रार्थना, ध्यान अशा मार्गाने साधना होऊ शकते. 

या पैकी ‘प्रार्थना’ या साधनाचा संक्षिप्त विचार आपण करणार आहोत. प्रार्थना फक्त करायची

नसते तर ती जगायचीही असते.चांगल्या विचारांच, त्यातील अर्थाचं चिंतन करणे व तसे वर्तन स्वतःच्या आयुष्यात

प्रत्यक्षात जोडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे प्रार्थना जगणे. ही वैयक्तिक प्रार्थना प्रक्रिया. शांत स्थितीत, शुध्द

अंतःकरणाने, एकत्रितपणे सर्वांच्या कल्याणासाठी केलेले उच्चारण म्हणजे सामुदायिक प्रार्थना. 

अशी प्रार्थना ही अधिक शक्तिदायी असते.प्रार्थना शब्दांनी होते. मेंदूतून शब्द निर्माण होतात. त्यामध्ये व्यक्तीचा

हेतू मिसळतो व त्याचा परिणाम मेंदू व शरीरावर होतो. चांगले विचार मनात ठसले, वर्तनात उतरले की शरीर

 बदलते. 

१. आत्मचिंतन प्रार्थना : साध्य - स्व - कल्याण. 

                                  साधन -   प्रार्थना विचार. 

                                  कृती    -   परिस्थिती आहे तशी स्वीकारणे, ईश्वरी व्यवस्थेला शरणागत असणे. 

                                                 सुख / दुःख एकाच भावनेने स्वीकारणे. 

२. यज्ञ हवन प्रार्थना  :     साध्य  - आत्मज्ञान, 

                                     साधन - प्रार्थना विचार. 

                                     कृती   - हव्यास कमी करणे, स्वतःचे गुण, दोष आठवून अग्नीस शरण जाणे, 

                                             त्याने शक्ती, शांती जीवनात स्थिर होईल. 

३. समाज सेवेची प्रार्थना     साध्य - समाज कल्याण . सर्व कल्याण , निष्काम कर्माने चित्त शुद्धी होते.

                                      साधन - प्रार्थना विचार . 

                                       कृती -    आपण अनेक ज्ञात/अज्ञात शक्तींचे देणे लागतो, 

                                                     ते फेडण्यासाठी संकल्पानुसार निष्काम कर्म करणे.

प्रार्थनेचे महत्व, साधन आणि साध्य साधण्यासाठी करावयाचे प्रयत्न याचे सविस्तर विवेचन या पाठात ऐकायला

मिळेल. 


विजय रा. जोशी. 

  










Thursday, July 4, 2024

 योग ग्रंथ पाठ १४, ध्यान पाठ ३, शरीराशी संवाद  २२ मे  २०२४. 





सारांश 


योग म्हणजे क्षणा-क्षणाला शरीराची बातमी घेत, म्हणजेच भावना/विचार  स्थितीचे  आत्म-परीक्षण करीत,  

मनाचा वेग  (गती , विचार / भावनांची तीव्रता) कमी करायचा प्रयत्न. (साधना). 

अनंत जन्माच्या पूर्व संस्काराचे रंग (त्रिगुण) अंतःकरणावर चढले असतात. म्हणून हे सर्व वासना, संस्कार पुसून

टाकणे हे साधनेचे कार्य आहे. अंतःकरण स्वच्छ, सात्विक झाले की जाणीव शुद्घ होते. पारमार्थिक प्रगतीसाठी हे

आवश्यक आहे.

मानवाचे अंतःकरण, जाणीव सर्व प्राणी सृष्टीत विकसित आहे.

मी म्हणजे देह आहे असे वाटणे हि देहबुद्धी, मी म्हणजे आत्मा आहे असे वाटणे म्हणजे आत्मबुद्धी 

देहबुद्धी विवेकाने , प्रयत्नाने आत्मबुद्धीत बदलणे ही  साधना आहे. 

देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला।

देहातीत ते हीत सांडीत गेला॥

देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी।

सदा संगती सज्जनाची धरावी II     मनाचे श्लोक ॥१६३॥

आपल्याला सुख जेव्हा बाह्य गोष्टींमुळे मिळते असे वाटते ते ज्ञान खरे नाही. इष्ट गोष्ट प्राप्त झाल्याने , 

बुद्धी क्षण काळ निवृत्त होते. ते सुख 

धी  + न = ध्यान .  म्ह्णून बुद्धी ध्यान प्रक्रियेत शून्य करायची, 

म्हणजेच विचारशून्य व्हायचा प्रयत्न संकल्पाने करायचा. 


एक इच्छा पूर्ण झाली की अनेक इच्छा पुढे येतात, अंतःकरण परत क्रियाशील होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध

हे भोग विषय आणि यश, सत्ता, संपत्ती, कीर्ती, अधिकार, प्रतिष्ठा अशा अनेक न संपणाऱ्या इच्छा सर्व जागृत

अवस्था काळात असतात.  प्रयत्नपूर्वक वासना कमी करत नेणे हे साधनेचे कऱ्य आहे. त्यासाठी साधकाने 

श्री गुरूंच्या मार्गदर्शनात पूर्व तयारी करणे आवश्यक आहे.


स्वामीजी चौवार्षिक वर्गात सांगतात. शक्ती मिळविण्यासाठी ५ गोष्टी केल्या’

1) त्याग पथ्य. 

2) तप पथ्य

3)  अभ्यास (ज्ञान)

4) योग्य शांती प्रतिक प्रकाग्रता           

5) योग्य शक्ती प्रतिक एकाग्रता. 

तुम्ही वरिल ५ गोष्टी करा. तुम्हाला ही तसा अनुभव येईल. ते करता  येत नसेल तर विश्वास ठेवा 

व सांगितल्या गोष्टी करा.

शरीराशी संवाद या ध्यान पद्धतीची सविस्तर माहिती  या पाठात आपण ऐकू शकाल. 


विजय रा. जोशी.