Thursday, May 20, 2021

 

गीता अध्याय 17, भाग 2, ध्वनी - फीत.




यज्ञ, दान, तप आणि जीवन.


जन्मल्या बरोबर मनुष्याचा संबंध स्वतःच्या शरीराशी, समाजाशी (अन्य व्यक्ती) व सृष्टीशी येतो. स्व-शरीराचा वापर, अन्य व्यक्तींची मदत व सृष्टी/निसर्ग यामधील गोष्टींचा वापर करीत, त्याना झिजवून माणूस जीवन जगत असतो. या क्षति/पूर्तीसाठी तप, दान व यज्ञ हा कार्यक्रम जीवनात सांगितला आहे.



तप – शरीर सेवा / शरीर शुद्धी.

दान – मानव सेवा.

यज्ञ – सृष्टीची / निसर्गाची सेवा.


आपण योग्य, अयोग्य अनेक संस्था निर्माण करतो. पण वरील तीन संस्था आपण निर्माण केलेल्या नाहीत, त्या स्वभावतः आपल्याला मिळाल्या आहेत. या संस्था कृत्रिम नाहीत. या संस्था आपण वापरतो, त्यांची क्षती करतो. या तिन्ही संस्थाचे काम उत्कृष्ठ चालेल असे वागणे हे आपले कर्तव्य आहे. हा आपला स्वभाव-प्राप्त

धर्म आहे कारण यज्ञ, दान, तप यांनी हे साधेल.  

यज्ञाने - सृष्टी संस्थेत साम्यावस्था प्राप्त होते. 

दानाने - समाजात समता प्राप्त होते . (दान, सन्मान , संगतीकरण - यज्ञ त्रिसूत्री). 

तपाने - शरीर शुद्धी होते. शरीराची दिवसे-दिवस झीज होत असते. 

आपण मन, बुद्धी, इंद्रिये यांना वापरतो, झिजवितो. या शरीर रूप संस्थेत जे विकार, जे दोष, उत्पन्न होतील, त्यांच्या शुद्धी  साठी तप  सांगितले आहे. 


मानवी जीवनाला मुलभूत असलेल्या ५ गोष्टी 


पुजाभाव / श्रद्धा 

आहार.

यज्ञ.

तप.

दान 


ओम तत् सत - 


अनादि , निर्गुण , निराकार परब्रह्माला ‘नाव’ नाही, पण “ओम तत् सत” रुपी परब्रह्माचे  नाव घेऊन सात्विक कर्मे केली, तर मोक्षाप्रत नेण्याचे सामर्थ्य कर्मात आणून ठेवण्याची शक्ती या नावात आहे. संसार तापाने पिडलेल्या लोकांची दया  येऊन श्रुतिमाऊलीने अशा लोकांच्या दुःखमुक्ती आणि ब्रह्मप्राप्तीसाठी हे नाव परब्रह्मास दिले आहे. 

“ओम तत् सत”  या नावाने युक्त होऊन सात्विक कर्म केले असता मोक्ष प्राप्ती सुलभ होते. पण हे नाव कसे घ्यावे, हे मात्र कळले पाहिजे.

या बद्दल सविस्तर माहिती या भागात  ऎका , गीता ज्ञान आत्मविकास साधण्यात खूप महत्वाचे आहे याचा अवश्य अनुभव घ्या. 



विजय रा. जोशी. 




गीता अध्याय 17, भाग 2, ध्वनी - फीत.







 

गीता अध्याय 17, भाग १, ध्वनी - फीत.


गीता शास्त्र - गीतेत जे जीवनाचे शास्त्र  सांगितले आहे, ते तसेच प्रमाण मानले तर, ग्रंथपूजा होईल. गीता हे एक प्रयोगशील (प्रयोगात्मक) शास्त्र आहे. एका निश्चित प्रक्रियेने ‘गीता शास्त्राचा’ प्रत्यक्ष अनुभव घेऊन (तो अनुभव तसे वागूनच येईल), कोणीही व्यक्ती समाधान घेऊ शकते. शक्यता/योग्यता असल्यास संशोधन करू शकते. अशी  वैज्ञानिक पद्धती, गीता शास्त्रास लागू आहे. (वेलोर प्रवचने). 



बुद्धीचे काम ज्ञान सांगण्याचे आहे. या ज्ञानावर स्थिर करण्याचे काम श्रद्धेचे आहे. काही लोक श्रद्धा व बुद्धी यांना परस्पर-विरोधी मानतात. पण ते तसे नाही. दोन्हीची आवश्यकता आहे. बुद्धिहीन श्रद्धा असेल तर डोळे मिटून चालणे आहे (अंधश्रद्धा). श्रद्धाहीन बुद्धी असेल तर अनेक वेळा कार्य घडत नाही, जीवन व्यर्थ जाते. (संशयात्मा विनश्यति).

स्वभाव म्हणजे पूर्वकाळ / पूर्वजन्म यात केलेल्या पुण्यापुण्याच्या संचयामुळे उत्पन्न झालेली मनोघटना. स्वभाव म्हणजे ज्ञान (विचार) शक्ती, किंवा क्रिया शक्ती यांचा मनावर झालेला परिणाम. ज्ञानशक्ती किंवा क्रियाशक्ती जेवढी तीव्र तेवढा परिणामही तीव्र असतो.

भगवंत शेवटी सांगतात : 

शुद्ध सत्वगुणांनी युक्त होऊन शास्त्रविहित कर्म केले (किंवा असे कर्म करणार्यावर श्रद्धा ठेवून त्यांचे अनुकरण केले), तर उत्तम लोक-लोकांतराचे फळ जीवाला मिळेल. पण त्यात आणखी एका गोष्टीची भर घातली तर साक्षात मोक्षाची प्राप्ती होईल. 

अशी कोणती गोष्ट आहे , ती जाणून घेण्याची उत्कंठा अर्जुनास लागून राहिली. 

ती पाहून भगवान ती वस्तू आणि तिचे महात्म्य सांगत आहेत. अशा रीतीने , एरवी जीवाला जन्म-मरणाच्या संसारात बांधणाऱ्या यज्ञदानादि कर्मांना त्यांच्या कर्त्यांसह ब्रह्मपर्येत पोहोचविण्याचे सामर्थ्य “ओम तत् सत “ या नामामध्ये आहे. परंतु असे समर्पण न करता नुसतीच मोठमोठी   ‘यज्ञ दान तप ‘ अशी कर्मेच करीत बसल्यास त्यांच्या या तपःचर्या , दाने सर्व फुकट जातील. त्यांना ऐहिक भोगही मिळणार नाहीत, परलोकाची गोष्ट तर बोलायलाच नको. 

ओम तत् सत -  या विषयी सविस्तर माहिती आपण पुढील भागात बघणार आहोत,  


विजय रा. जोशी. 




गीता अध्याय 17, भाग १, ध्वनी - फीत.


Friday, May 7, 2021

 

स्वामी विज्ञानानंद : मानवता कल्याणासाठी समर्पित जीवन


संकल्प दिन - २३ एप्रिल हा स्वामी विज्ञानानंद (स्वामीजी) यांचा जन्मदिवस. मनशक्ती साधक हा दिवस ‘संकल्प’ दिन म्हणून पाळतात. या दिनानिमित्त दि २५ एप्रिल २०२१ रोजी online घेतलेला पाठ. 

स्वामीजी २१ फेब्रुवारी १९७१ ला सकाळी समाधी प्रयोग करणार होते. त्या क्षणाचे अपूर्व अनुभव कथन एक आगळे, विचार क्षोभक प्रयोगपूर्ण संवेदन . जे त्यांनी सांगितले ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

समाधी स्थितीत देह काही काळ सोडून परत देहात येण्याचा आणि त्यामधील काळात काही संशोधन/प्रयोग करण्याचा , त्याचा अनुभव इतरांना देण्याचा हा  एक अगोदर सार्वजनिकरित्या जाहीर केलेला विलक्षण प्रयोग सुरु होण्याच्या अगोदर काही मिनिटे थांबविला गेला. 

हा प्रयोग काय होता, कशासाठी होता, त्यात काय साध्य करायचे होते, त्यासाठी किती दीर्घ काळ पूर्व तयारी केली होती, आणि तो का संपन्न होऊ शकला नाही यावर आणि इतर संबंधित गोष्टींवर नंतर स्वामीजींच्या जे सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले, त्यातील काही भागावर आधारित  हा ऑडिओ पाठ आहे. 

स्वतःची सर्व साधना आणि अभ्यास , स्वामीजींनी   विज्ञान आणि अध्यात्म याचा समन्वय  करून मानवी जीवन/व्यवहार कसा योग्य, अर्थपूर्ण होऊ शकेल यावर मार्गदर्शन करण्यासाठी उपयोगात आणला. त्यातील हा न साधू शकलेला समाधी प्रयोग आणि त्याची सर्व हकीगत  सर्व श्रोत्यांना  नक्कीच विलक्षण आणि प्रेरणादायी वाटेल. 



विजय रा. जोशी. 



स्वामी विज्ञानानंद : मानवता कल्याणासाठी समर्पित जीवन