योग ग्रंथ अभ्यास, विषयोग -2 , दि. २६ / ६ / २०२४.
सारांश :
अमिबाने माणसापर्यंत प्रगती केली, म्हणजे काय केले ? खालच्या अप्रगत प्राण्यापासून माणसापर्यंत प्रगती झाली, तशी त्याची दुःखे, गुणाकाराने वाढली. ती दुःखे, तो पुढे ढकलू शकला. एवढीच त्याला मेंदूने देणगी मिळाली.
स्त्री पुरुष 'समतोल' हवा. स्त्री- पुरुषातल्या संबंधाला सम+बंध, सम+भोग अशा समतोलवाचक, समतादर्शक वाक्यरचना केल्या आहेत.
खाणे आवश्यक, ते निवडून खा. खाणे ही अनेक इच्छा प्रमाणे एक इच्छा आहे. जी गोष्ट खाण्याची तीच आपल्या विकारांची आहे. काम, क्रोध, लोभ, मंद , मत्सर माया यांची आहे. देहात असताना योग्य गोष्ट एकच असते, की हे विकार वाईट आहेत ही गोष्ट मानायची, त्यातला वाईटपणा कमी करण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यातल्या त्यात या विकारांचा उपयोग कसा करून घ्यायचा ते पहायचे. स्वामीजींनी भारतीय संस्कृतीतील अत्यंत उच्च अशा देवता प्रतीकांची कामासक्ती संबंधित अनेक उदाहरणे दिली आहेत.
त्याचा हेतू ते सांगतात. सत्य हे मुक्त असले पाहिजे. कामविकार एवढा शत्रुवत मानणे हे मूर्खपणाचे आहे. त्याला मित्र बनवून, चुचकारून , त्याचा योग्य वेळी आदर राखून , आपण त्याला मदतीला बोलावले तर तो खरोखर आपल्याला उंच ठिकाणी घेऊन जाऊ शकेल, असे प्राचीन ऋषी-मुनींनी दाखवून दिले आहे. ते आपण समजून घेतले पाहिजे.
अधिभौतिक उत्क्रान्ति विरुद्ध भौतिक उत्क्रान्ति :
काम क्रोध काही प्रमाणात सर्व जीवाना आहेत, पण, लोभ, मोह, मद , मत्सर, … फक्त मनुष्याला आहेत … ही उत्क्रांतीतील एक प्रकारे.. प्रगती !!
निसर्गाची मानवाला मिळालेली ही अलौकिक देणगी पाहा ! ती म्हणजे आपली स्वसंवेद्य चेतना आहे. म्हणजे, स्वतःविषयी एवढी जाण असणारी चेतना आहे … ही फारच अतुलनीय अशी क्षमता आहे !"आपलेच जाणणे व पाहाणे, ह्याची जाणीव असणे आणि, देवघेवीच्या, परस्परसंपर्काच्या ह्या कृतीचे जे परिणाम होतात त्यांनाही समजणे" हे जे आणखी एक स्वातंत्र्य मनुष्य प्राण्याला आहे, ते स्वातंत्र्य, ती क्षमता इतर प्राण्यांना नसते.
पण आपल्या स्वच्छ, बुद्ध संवेदनावर , क्षमतेवर भूतकालीन स्मृतींचे ओझे लादले गेले आहे. त्यामुळे, आपली प्रत्येक गोष्टी विषयीं सम्यक् आकलन घडण्याची शुद्ध प्रक्रिया, ही, संग्राहित माहितीच्या ओझ्यांनी, साठवलेल्या अनुभूतींच्या परिणामांनी व साचलेल्या ज्ञानाच्या ठशांनी दडपली गेली. योगाचे हे शास्त्र नेमके ह्याच गोष्टीकडे आपले लक्ष वेधते की, आपली सम्यक् आकलनाची क्षमता ह्या पूर्व-स्मृतीत साचलेल्या माहिती वजा-ज्ञानाने व अनुभवांच्या स्मृती-गाठींनी अशुद्ध होत गेली आहे..
स्वार्थ आधारित, आत्मकेंद्रित वृत्ती हा सहज मानवी भाव असल्याने माणूस मूळ काम क्रोध विकारातून पुढे उत्क्रांतीच्या वाटचालीत अती हव्यासामुळे पुढे मोह, लोभ, मद , मत्सर व माया (मी आणि माझे) या पुढील विकारात वेढला गेला. काम विकाराने निर्माण झालेले जग , माणसाच्या प्रगती पर्येंत ‘माया’ विकारांत गुंतलेले दिसते. त्यातून सुटत जायचे तर माया विकारापासून सुटत सुटत काम विकारापर्येत जायचे, असा मार्ग दिसतो.
या वरील चिंतन या आणि काही पुढील पाठांत केले आहे.
विजय रा. जोशी.