संत ज्ञानेश्वर--पसायदान
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे. तत्वज्ञानाचे रहस्य मधुर काव्यरचनेतून उलगडून दाखवले आहे. आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये उपनिषदे ,ब्रह्मसूत्र, भगवद्गीता अशी प्रस्थानत्रयी आहे. प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे, प्रवृत्तीकडून निव्रुत्तीकडे हा जीवनाचा प्रवास आहे. आत्मोन्नती हे साध्य व प्रस्थानत्रयी हे साधन आहे.
उपनिषदे संस्कृत मध्ये असून त्यातील तत्वज्ञान अभ्यासाला अवघड आहे . भगवद्गीतेत ते सुलभपणे सांगितले आहे आणि ज्ञानेश्वरांनी तर ते अनेक उपमा, दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणले आहे. हे तत्वज्ञान जन सामान्यांपर्यंत पोचवण्याचे असामान्य कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे.
इये मह्राठियेचिये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।I
ही ज्ञानेश्वरी मागील उदात्त बैठक आहे. ज्ञानेश्वरांनी ग्रंथरुपी यज्ञ सिध्दीस नेला. हा यज्ञ सात्विक यज्ञ आहे कारण तो करणे हे कर्तव्य आहे असे मानून फलाची अपेक्षा न ठेवता केला गेला आहे, त्या साठी आवश्यक असे तप केले आहे. या तपश्चर्येतून हा वाक्-यज्ञ सफल झाला व त्यातून ‘ज्ञानेश्वरी’ नावाचे अमृत निघाले .
पसायदान म्हणजे संत वाङमयातील कौस्तुभमणी आहे.
विश्वात्मक देवाने तोषून (आनंदित होऊन) संतुष्ट अंत:करणाने पसायदान द्यावे अशी प्रार्थना केली आहे. संताचे हे पसायदान व्यत्त्तिगत हितासाठी नसते तर अखिल सजीवस्रुष्टीच्या कल्याणासाठी या शुभकामना असतात. ”जे जे जगी जगते तया , माझे म्हणा करुणा करा” अशी ती विश्वव्यापी प्रार्थना असते. ज्या वेळी कोणताही यज्ञ सिध्दीस जातो त्या वेळी वैदिक संस्कृती प्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात येतो. संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलें पसायदान म्हणजे संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी आहे.
पसायदानाच्या ओव्या म्हणजे विश्वा एवढ्या व्यापक झालेल्या अंतःकरणाने , विश्वात्मक देवाजवळ , विश्वाच्या कल्याणासाठी केलेले मागणे आहे. इथे देणारा, मागणारा, आणि मागितले गेलेले हे सर्वच एवढे मोठे आहे कि त्यांच्या दर्शनाने माणसाचे लहानपण सरून जाते. या अपूर्व मागण्यामागील श्रीज्ञानदेवांचे हृद्गत काय असावे, याचा शोध त्यांनाच वाट पुसत या विवेचनात घेण्याचा प्रयत्न केला आहे.
संदर्भ -
1 प्रा. राम शेवाळकर युट्युब
2 डॉ. शंकर अभ्यंकर (इंटरनेट , युट्युब)
3 डॉ. सुषमा वाटवे , (स्वामी माधवनाथ प्रवचन आधारित)
4 देगलूरकर महाराज , पंढरपूर
(Main REF धुंडामहाराज आणि भानुदास देगलूरकर + स्वामी विज्ञानानंद यांच्या लेखन, विवेचनातील विविध अध्यात्म संदर्भ) .
विजय रा. जोशी.