Friday, February 19, 2021

  

गीता अध्याय १०, भाग १ , ध्वनी फीत . 



ईश्वर म्हणजे सर्व कारणांचे कारण : आपण जगाकडे दोन दृष्टीने पाहू शकतो. 

1) व्यवहार दृष्टी : हि स्थूल ज्ञान दृष्टी आहे. या दृष्टीला विश्वसंसार दिसतो. जगामध्ये जिकडे  -तिकडे घडणे-मोडणे , वाढणे-घटणे,  येणे-जाणे, दिसणे-नाहीसे होणे अविरत चालू असते. हा अनुभव प्रमाण धरूनच दैनंदिन जीवन जगावे लागते. 

2) परमार्थ दृष्टी : इंद्रियांना जसे विश्व दिसते तसे ते खरोखर नाही. विश्वाच्या प्रत्येक अंगामध्ये वरवर आढळणाऱ्या अनेकपणात खोल एकपण ओवलेला आहे. तो एकपण कार्यकारण संबंधाच्या द्वारा प्रचीतीला  येतो. हे कार्यकारण संबंध अतिशय स्थिर आणि कधी खोटे न ठरणारे असतात. 


युगानुयुगे तेच कारण तेच कार्य घडवून आणते. याचा अर्थ असा कि विश्वाच्या तिन्ही प्रमुख अंगामध्ये (जडद्रव्य, जीवन आणि अंतःकरण यांच्या हालचालींमध्ये) कार्यकारणाचे जाळे पसरलेले आहे.येथे तत्वज्ञान असे सांगते कि जर प्रत्येक  घटनेस कारण आहे तर कार्यकारण संबंधास देखील कारण असले पाहिजे. ईश्वर म्हणजे सर्व कारणांचे कारण.(प्रेमयोग के वि बेलसरे )

श्लोक १२ ते १८ अर्जुन भगवंतांना विचारतात. 

तुम्ही आमचे जीवन चालवत आहेत हे समजण्यासारखे आहे, तशी अनुभूतीपण येते. तुम्ही अविकारी आहात पण बाहेर तर सर्व विषयच दिसतात. भगवंत व्यापक आहेत हे सत्य आहे, पण व्यापक भगवंताचे चिंतन करायचे असते व व्यापकतेचा अनुभव घ्यायचा असतो. कोणत्या भावात तुमचे चिंतन करू?  चित्त एकाग्र करू? माझ्या जीवनात गुण यायला मी काय करू? हे सर्व तुम्ही विस्ताराने सांगा. 

अध्याय १० विवेचन स्वरूप. 

भगवत दर्शन; आणि त्यासाठी उपासना, भक्ती या मार्गी जाणे हे मनुष्यास का आवश्यक आहे , त्या मार्गावर जाण्याची इच्छा निर्माण होऊन त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे (साधना करणे) काआवश्यक आणि उपयुक्त आहे या बद्दलचे विचार समजून घ्यायचा प्रयत्न आपण या भागात बघणार आहोत . 

माणूस हा निसर्गतः स्व-केंद्रित असतो. अनेक प्रकारच्या न सम्पणाऱ्या इच्छा, आकांक्षा , वासना आणि भोग यामुळे आपले जीवन भोगवादी बनले आहे, अधीकाधीक बनत चालले आहे. त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. १० वा अध्याय आपल्याला भोगयोगाकडून प्रेमयोगाकडे जायला कसे सांगतो हे  आपण समजून घ्यायचा प्रयत्न या भागात करणार आहोत.  

पुढील भागात ,  सर्वव्यापी , सर्वत्र पसरलेला भगवंत समजून घेण्यासाठी स्वतःला कसे शिकवायचे हे आपण पूज्य विनोबाजींच्या चिंतनातून शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर वरील सर्व ज्ञान विचारांच्या पार्श्वभूमीवर व्यवहारात , जीवनाच्या विविध टप्प्यामधील वाटचालीत,प्रयत्नांची दिशा नेमकी कशी ठेवायची, काय साधना प्रयत्नांचा मार्ग धरून  प्रगती करून घ्यायची हे सर्व पूज्य स्वामी विज्ञानानंद यांच्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात समजून घेण्याचा आनंद आपण घेणार आहोत. 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय १०, भाग १ , ध्वनी फीत


Friday, February 12, 2021

 


गीता अध्याय  9 भाग  2 : ध्वनी फीत



कर्ममार्गाप्रमाणे भक्तिमार्गातही काही फुकट जात नाही.


माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी तू आपले मन स्थिर कर (गीता १८/२),

असा अर्जुनास प्रथम उपदेश केल्यावर नंतर “माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करणे

तुला होत नसेल तर अभ्यास म्हणजे वारंवार प्रयत्न कर, अभ्यासही होत नसेल तर

माझ्यासाठी चित्तशुद्धीकारक कर्म कर. आणि तेही होत नसेल तर कर्मफळाचा त्याग कर

आणि त्याद्वारे माझी प्राप्ती करून घे”. याप्रमाणे परमेश्वर स्वरूप मनात ठसविण्याचे जे निरनिराळे मार्ग भगवंतांनी वर्णिले आहेत.

(गीता १२/९-११). त्याचे कारण हेच होय.




मूळ देहस्वभाव किंवा प्रकृती तामस असेल तर, परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ठायी चित्त

स्थिर करण्याचा उद्योग एकदम जमणार नाही किंवा एकाच जन्मात सफल होणार नाही.

पण कर्ममार्गाप्रमाणे भक्तिमार्गातही काही फुकट जात नसून,

एकदा भक्तिपंथात पडल्यावर या नाही पुढच्या, नाहीतर त्याच्या पुढच्या जन्मात

केव्हां न केव्हातरी ‘सर्व वासुदेवात्मकच आहे’ असे परमेश्वराचे खरे ज्ञान मनुष्यास

प्राप्त होऊन , त्या ज्ञानाने त्याला मुक्ती मिळते. असे भगवंतांचे सर्वाना आश्वासन आहे.

आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले मित्र.

उद्धरावा स्वये आत्मा , खचू देऊ नये कधी

आत्मा चि आपुला बंधु , आत्मा चि रिपू आपुला (गीता ६/५)


हे तत्व भक्तिमार्गातही जसे च्या तसे सांगण्यात येते.

नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे I आणूनि निराळें द्यावे हाती I इंद्रियांचा जय साधुनियां मन I निर्विषय कारण असे तेथे II (गाथा ४२९७)

याची फोड तुकाराम महाराजांनी वरील अभंगात केली आहे. “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी” असे म्हंटले तर मूढ लोक आळशी होतील

म्हणूनच हे स्वावलंबनाचे आणि स्वप्रयत्नाने स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

परमेश्वर जगातील सर्व घटनांचा करता करविता आहे हे खरे; तथापि त्याच्याकडे

निर्दयपणाचा व पक्षपातीपणाचा दोष येऊ नये म्हणून तो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे

ज्याला त्याला फळ देतो असा जो कर्मविपाक प्रक्रियेतील सिद्धांत आहे

तो तोच याच कारणासाठी भक्तिमार्गातही घेत असतात. ९ वा अध्याय कसा समजेल ? सगळ्यात जायची तयारी असेल (वाईट/चांगले, लहान/थोर इ.) तर जगाचे राजे व्हाल.

आणि choosy व्हाल, आवड/निवड ठेवाल तर मग तुम्ही देवही नाही आणि देवभक्तही नाही. देव फक्त सुख/दुःख, स्वर्ग/नर्क/मोक्ष/पुनर्जन्म या प्रक्रिया सांगतो. त्या समजून घ्या.

निसर्ग नियम प्रक्रियेत देव सुद्धा व्यत्यय आणू शकत नाही कारण देवाचे एक नाव नियमेश्वर आहे. देवभाव कृष्ण म्हणतात : तुझे प्रयत्न, जीवन संपूर्णतेने मला अर्पण कर. माझ्याशी एकरूप हो. “देवा तू करशील ते चांगलं असेल, तेच मला चांगल वाटेल” हा विश्वास म्हणजे देवभाव. आपल्यात तो देव-भाव निर्माण व्हावा म्हणून प्रार्थना करू या.

१०व्या अध्यायात देवाची अनेक रूपे आपल्याला पहायची आहेत.त्या दिशेने मार्गस्थ होऊ या.



विजय रा जोशी. 



गीता अध्याय  9 भाग  2: ध्वनी फीत


Friday, February 5, 2021


 गीता अध्याय  9 भाग  1: ध्वनी फीत 


गीतेचे जीवनांतील महत्व.

अर्जुनाच्या निराश मनाच्या निर्माल्यातून पराक्रमाची फुलबाग कृष्णाने  फुलवली. गीतेतील शिकवण आजही जीवनात उपयोगी आहे. कुटुंबातील साधे झगडे, असंतोष मिटविण्या पासून ते वाममार्गी लोकांचे मन योग्य मार्गावर आणून त्यांना शांती मिळवून देण्या पर्येंत गीता सर्वांना उपयोगी आहे. 




गीतेच्या अभ्यासासाठी एकाग्रता आवश्यक आहे.गीतेचा जन्म स्व-कर्तव्याच्या आड येणारा मोह निवारणार्थ आहे. गीतेच्या अभ्यासाने स्वकर्तव्याचे भान येते व ते चांगले साध्य करता येते.८ व्या अध्यायात ध्यान प्रधान भक्तिमार्गाचे विवरण संपले. ९ व्या अध्यायापासून प्रेमप्रधान भक्ती मार्गाच्या विवरणाला प्रारंभ होतो. 

भक्तांनी या अध्यायाला गीतेतील सर्वाश्रेष्ठ अध्याय मानले आहे. या अध्यायाचे रहस्य आत्मसात झाल्यावर सगळे सोपे होते. येथे ज्या प्रेममार्गाचे वर्णन आहे , तो ध्यान मार्गातून सोपा आहे. त्यासाठी फार बुद्धिमत्तेची गरज  लागत नाही. पण पूर्ण श्रद्धा आणि निष्ठा मात्र हवी. 

राजयोग (कर्मयोग व भक्तियोग मिलाप)

सर्व महाभारताच्या मध्यावर गीता व गीतेच्या मध्यावर ९ वा अध्याय आहे. अनेक कारणांमुळे या अध्यायास पावनत्व आले आहे. ज्ञानदेवांनी जेंव्हा समाधी घेतली तेंव्हा हा अध्याय जपत ते समाधिस्थ झाले असे म्हणतात.

कर्मयोगात कर्म करायचे पण फलाची अपेक्षा मात्र ठेवायची नाही. भक्ती योगांत संपूर्ण शुद्ध भावाने ईश्वराशी जोडले जायचे. राजयोगात कर्म तर करायचे पण फळ टाकायचे नाही. तर ते घेऊन ईश्वरास तसेच्या तसे अर्पण करायचे.सर्व कर्माचा नेवेद्य प्रभूला अर्पण करायची ही भावना उत्तरोत्तर अधिक उत्कट करत गेलो की आपल्या साधनेच्या बरोबरीने क्षुद्र जीवन धन्य होते, मलीन जीवन सुंदर होते.

ज्या विद्येने जीवन कळते, जीवनाची कला कळते, ज्या विद्येमुळे जीवनाच्या शिल्पकारा विषयी माहिती मिळते, व ज्या विद्येमुळे या शिल्पकाराचे दर्शन घडते :तिलाच “विद्या” (राजविद्या) असे म्हणतात.तीच सर्व विद्यांचा राजा होय.

या राजविद्येबद्दल आणि राजयोगाची माहिती या पाठात घेऊ. 


विजय रा. जोशी 


गीता अध्याय  9 भाग  1: ध्वनी फीत